नेहमीप्रमाणे बाबा देवघरात ज्ञानेश्वरी वाचत होते. रविवारचा दिवस असल्यामुळे मी आरामात चहा पीत तंगड्या पसरून सोफ्यावर बसलो होतो. आज ऑफिस, डबा, आणि बस पकडण्याची घाई या सगळ्यातून मुक्तता मिळालेली होती. हिच्या मैत्रिणींचा काल विकेंड नाईट आउट होता, त्यामुळे काल रात्रीपासून ती मैत्रिणीकडे राहायला गेली होती. मुलेही सुट्टी असल्याने निवांत झोपली होती. सुट्टीचा मूड अक्षरशः नसानसात उतरला होता. ज्ञानेश्वरी वाचन झाल्यावर बाबा मनोभावे नमस्कार करून उठले .देवघरातून बाहेर येऊन नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा हात जोडून त्यांनी नमस्कार केला. काहीतरी पुटपुटत बराच वेळ ते उभे होते. मी मनातल्या मनात हसलो. एक नमस्कार बास की देवाला ! पुन्हा बाहेर आल्यावर हा दुसरा नमस्कार कशाला ? बाबा म्हणजे ..... !!!!
बाबा वळले आणि माझ्या कडे पाहू लागले. बहुदा माझ्या मनातले विचार छद्मी हास्याच्या रूपाने चेहऱ्यावर झळकले असावेत .स्थिर नजरेने माझ्याकडे पहात बाबा म्हणाले," का हसतोयस ?" वर्तमानपत्रात डोके खुपसून मी त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. माझ्या शेजारी सोफ्यात बैठक मारत बाबा म्हणाले ," शरद, काही बोलला नाहीस तरी कशासाठी हसत होतात ते न समजण्याइतका दुधखुळा नाही मी !" तोंडा पुढचे वर्तमानपत्र बाजूला करत मी म्हणालो, " अहो बाबा तसं नाही....... मी माझ्याच विचारात होतो. तुम्हाला नाही हसलो काही !! " आता बाबा प्रसन्नपणे हसले .मला म्हणाले, "एक काम कर.आपल्या दोघांसाठी एक एक कप फक्कड चहा बनवून आण. आज रविवार आहे .एक जादा चाय तो बनती हि है।" बाबा खुशीत आले की हिंदीत बोलतात. मी पटकन उठून किचन कडे निघालो.
चहा घेत असताना बराच वेळ कोणीच काही बोलले नाही. बाबा चवीने चहा पीत होते .चहा संपल्यावर रिकामा कप समोरील टिपॉयवर ठेवत ते म्हणाले ," शरद, माझ्या आयुष्यातील तुला माहीत नसलेली एक गोष्ट आज मी सांगणार आहे. ही गोष्ट मी आणि तुझी आई या शिवाय इतर कोणालाच माहीत नाही. तुझ्या आईला जाऊन आता दोन वर्षे होतील. खूप खूप जुनी गोष्ट आहे ही ! आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी मी अकरा किंवा बारा वर्षांचा होतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात असणाऱ्या उत्साही आणि चैतन्याने भरलेल्या दिवसात मी तारुण्यात पदार्पण केलं. अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचा उदय या काळात झाला होता. आपणही देशाच्या राजकारणात पडून काहीतरी कार्य करावे या मनोमन इच्छेने मी प्रयत्न सुरू केले होते. प्रथम गावपातळीवर आणि नंतर जिल्हा पातळीवर मी बऱ्यापैकी सक्रिय होतो. दुसरीकडे कॉलेजचे शिक्षणही चालू होते. माझ्या वडिलांना माझे हे उद्योग फारसे पसंत नव्हते. एक दोनदा त्यांनी मला तसं बोलूनही दाखवलं होतं . पण मी ऐकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी या विषयावर फुली मारली होती."
" राजकारण हे एखाद्या व्यसनासारखे असते शरद !! त्याची नशा फार वाईट ! माणूस त्या नशेत सर्व काही विसरतो . माझेही तेच झाले .अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मी राजकारण करू लागलो. परिणामी कॉलेजच्या पहिल्या वर्षात चांगलीच आपटी खाल्ली .कधीही न रागावणारी माझी आई त्यावेळी मात्र माझ्यावर खूप चिडली होती. 'राजकारणाने पोट भरत नाही यशवंत ....... !! त्यासाठी शिकून नोकरी करावी लागते . आपल्यासारख्यांसाठी नाही रे हे क्षेत्र !! चांगलं शिकून नोकरीला लाग. तुझे वडील थकलेत आता ! त्यांना विश्रांतीची गरज आहे या वयात !' पुढे न बोलता ती स्फुन्दून स्फुन्दून रडू लागली ."
थांबून बाबांनी सुस्कारा सोडला. टीपॉय वरील चहाचा रिकामा कप उगाचच उचलून त्यांनी पुन्हा तिथेच ठेवला. " खरं तर माझ्या आईलाही विश्रांतीची गरज होती. तिच्या तारुण्यापासून आमच्या एकत्र कुटुंबात राबून खूप थकली होती बिचारी ! मी तिच्यासाठी सून आणावी ही तिची ईच्छा अगदी रास्त होती. पण माझ्यासारख्याला मुलगी देणार कोण ? त्यातून माझीही मनस्थिति लग्न करण्याची नव्हती . प्रसंगी अविवाहित राहून राजकारणाच्या माध्यमातून देशसेवा आणि समाजसेवा करण्याचे भूत माझ्या डोक्यावर स्वार झाले होते. वडिलांनी चार ठिकाणी सांगून ठेवल्यामुळे मला स्थळे सांगून येत असत पण माझ्या भविष्याबद्दल खात्री न वाटून वधूपिते पुन्हा काही फिरकत नसतं."
"अशातच एके दिवशी मला सुमनचे स्थळ सांगून आले. दिवस ठरवून मी ,आई आणि वडील त्यांच्या घरी गेलो. सुमन मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी होती .इंटरची परीक्षा पास होऊन ती एका प्रार्थमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होती . नोकरी करता करता पुढे डी एड करायचा तिचा विचार होता . बघण्याचा कार्यक्रम छान झाला. मला सुमन मनापासून आवडली होती. साधी पण नीटनेटकी नेसलेली साडी ,डोक्यावरुन पदर, शांत मुद्रा आणि निश्चयी नजर !! तिची नजर खूप वेगळी होती. निश्चयी पण शांत !! आमच्याकडून होकार होता. माझ्या आई-वडिलांनाही ती खूप आवडली होती. आम्ही होकार कळवूनही दोन-तीन दिवस झाले पण त्यांच्याकडून काहीच कळेना. आयुष्यात पहिल्यांदाच मी गंभीर झालो. आपली किंमत लग्नाच्या बाजारात किती कमी आहे हे मला पहिल्यांदाच जाणवले होते."
" एका आठवड्याने सुमनच्या घरून निरोप आला. मुलीला पुन्हा एकदा मुलाला भेटायचे आहे म्हणून !! हे आक्रीतच होतं... त्या काळात आजच्यासारखं मुलं-मुली लग्नाआधी एकमेकांना भेटत नसत. जी काही भेट किंवा चर्चा व्हायची ती पालकांसमोरच ! त्यामुळे सुमनची हि अजब मागणी ऐकल्यावर माझ्या आई वडिलांच्या मनातही चलबिचल झाली. पण बदलत्या काळाप्रमाणे आपणही हळूहळू बदलले पाहिजे अशी मनाची समजूत घालून त्यांनी या भेटीला होकार दिला."
"मी आणि सुमन एका इराण्याच्या हॉटेलमधील फॅमिली रूम मध्ये भेटलो ! समोरासमोर बसून, पुढे ठेवलेले पाण्याचे ग्लास आम्ही तोंडाला लावले .पाणी पिऊन झाल्यावर सुमन माझ्याकडे बघून हसली. काय बोलावे हे मला सुचेना. परक्या मुलीशी असं एकांतात बोलण्याचा माझा पहिलाच प्रसंग होता. घशाला कोरड पडली होती आणि तळहात घामाने भिजले होते. बोलायला सुमननेच सुरुवात केली . 'तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आहे का ?' मी अवाकच झालो .होणाऱ्या पतीला पहिल्या भेटीत विचारण्याचा हा काही प्रश्न नक्कीच नव्हता. किंचित रुष्ट आवाजात मी उत्तरलो,' नाही ... मी नास्तिक आहे. देवाधर्मावर माझा विश्वास नाही .' सुमन हसली. म्हणाली ,'तरीही एकदा वाचा. ज्ञानेश्वरी मुळे माझ्या आयुष्याला वळण लागले. भविष्यातील ध्येय ठरवण्यासाठी मला ज्ञानेश्वरीचा उपयोग झाला .तुम्ही राजकारणात कारकीर्द करू इच्छिता असं कळलं .वाईट काहीच नाही. पण क्षेत्र कुठलेही असो शिक्षण महत्त्वाचं नाही का ? राजकारण तुमच्या शैक्षणिक कारकीर्दीत बाधा आणत आहे हे तुम्हाला तरी पटतंय का ?' तिच्या सडेतोड युक्तिवादास समोर मी निरुत्तर झालो होतो. ती पुन्हा एकदा हसली . 'मला तुम्ही आवडला आहात. आयुष्याच्या जोडीदाराच्या माझ्या कल्पनांमध्ये तुम्ही अगदी तंतोतंत बसत आहात. पण मला शिकलेला आणि पदवीधारक जोडीदार हवा आहे . तुम्हाला जर हे मान्य असेल तर ...... तर मी तुमच्यासाठी आणखी काही वर्ष थांबायला तयार आहे.' मी तिथल्या तिथे तिला वचन दिले............. प्रथम श्रेणीत पदवी मिळवण्याचे !!"
" त्या एका प्रसंगाने माझे आयुष्यच बदलून गेले .नेटाने मी पदवीचा अभ्यास सुरू केला. आयुष्याला दिशा मिळाली. सुमन बरोबरच्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत मी अभ्यास करू लागलो . राजकारणातील माझी कारकीर्द मात्र संपुष्टात आली होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या दिवशी कॉलेजमधून घरी आलो तर घरात सुतकी वातावरण होते. मला पाहिल्यावर आई एकदम रडू लागली. वडील उठून आत निघून गेले. मी आई शेजारी बसलो. आई रडत रडत म्हणाली,' यशवंत, सुमन गेली रे ssss ' बसलेल्या धक्क्याने मी बधिर झालो. नोकरी संभाळून सुमन डीएड करत होती. कॉलेजमध्ये जात असताना बसच्या अपघातात तिचा दुर्दैवी अंत झाला होता."
बोलता-बोलता बाबा थांबले .पाणावलेल्या डोळ्यांनी चहाच्या रिकाम्या कपाकडे पाहात ते म्हणाले ,"शरद त्या रात्री मी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी उघडली. माझ्या आयुष्याला वळण लावून माझी स्फूर्तिदेवता निघून गेली होती .त्यानंतर मी तिला दिलेल्या वचनाप्रमाणे प्रथम श्रेणीत पदवी मिळवली. चांगली नोकरी मिळवून आणि तुझ्या आईशी लग्न करून माझ्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण केली .आता तर सुमनचा चेहराही फारसा आठवत नाही. आठवतात ते फक्त तिचे निश्चय डोळे !! एखाद्या निरांजना प्रमाणे तेवत असणारे !! म्हणून रोज ज्ञानेश्वरी पठण झाल्यावर पहिला नमस्कार माऊलींना करतो आणि देवघरातून बाहेर आल्यावर दुसरा नमस्कार त्या देवतेला करतो, जीने माझ्या आयुष्याला वळण लावले ....." बाबा बोलायचे थांबले. डोळ्यांच्या कडा पुसत ते संथपणे त्यांच्या खोलीकडे निघाले. समोर देवघरातील निरांजन शांतपणे तेवत होते .आणि नकळत त्या स्तब्ध आणि निशब्द अवस्थेत ,माझे हात आपोआप जोडले गेले.
© मिलिंद अष्टपुत्रे
लेखकांच्या नावाशिवाय पोस्ट शेअर करु नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा