शनिवारी रात्री जेवणं झाल्यावर नेहमीप्रमाणं दोन आईस्क्रिमचे बाऊल घेऊन सौरभ गॅलरीत आला. मोठ्या चौकोनी गॅलरीत फुलझाडं होती, एक झुला होता, आईस्क्रिम हातात देत सौरभ आईशेजारी बसला.
"मग कधी भेट घालून देतोस सईशी" आईची गाडी पुन्हा लग्न या मूळ पदावर आली.
"असं काही नाहीये गं आमचं " शक्य तितका शांत चेहरा ठेवत सौरभ म्हणाला.
"आणि सारखं काय गं लग्न लग्न. तुझा झालाय का संसार आहेस ना आनंदी तू, काय बिघडलं तुझं" थोडा वैतागून सौरभ बोलून गेला. त्यानेच आईच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवला होता पण वेदना मात्र त्याला स्वतःला जाणवली.
"असं नव्हतं म्हणायचं मला" या अविर्भावात त्यानं आईकडे पाहिलं आणि काही बोलणार तोच
"बिघडलं काही नाही रे, पण सारखं तुझ्या सोबत आईस्क्रिम शेअर करून कंटाळा आलाय मला, जरा चेंज म्हणून तरी सून आण" आईने एकदम चेष्टा करून त्याच्या मनावरचा भार हलका केला. पुढं थोड्या गप्पा मारून सौरभ गेला खरा झोपायला पण आईला मात्र वेगळीच चुटपुट लागून राहिली.
"अगदी संसार न करण्याइतपत का मनाची तयारी झाली असेल याची. नक्की काय आहे याच्या मनात, सई चांगली मुलगी वाटते. माझ्यासारखं काही नको याच्या नशिबात."
विचार रात्रीसारखेच गडद होत गेले आईच्या मनात. तिथेच झुल्यावर झोप लागली आईची आणि पहाटे थंडीने जाग आली. विचार काही झोपले नव्हते खरं रात्रभर. रविवार होता त्यामुळं नेहमीची घाई नव्हती. निवांत सरत होता दिवस. नुकताच नाश्ता आटोपलेला 11.30 वाजत आले होते आणि बेल वाजली.
दारावर नेम प्लेट होती..
सौरभ अंजली टिपणीस. सौरभने दार उघडलं आणि क्षणभर हबकला तो. दारात सई उभी होती.
सई श्रीधर सप्रे.
दिसायला मोहक, खांद्यावर रुळणारे कुरळे केस, तशी सावळी पण हसली की ओठांच्या शेजारी छोटी खळी पडायची. बघता क्षणी प्रेमात पडलेला सौरभ तिच्या. एकच ऑफिस मध्ये पण वेगळ्या डिपार्टमेंट मध्ये.
सई एच.आर.एम होती सौरभ सॉफ्टवेअर इंजिनिअर. ओळख झाली मैत्री झाली. सौरभ तर प्रेमात पडलाच होता पण सईलादेखील तो आवडू लागला होता. ऑफिस पार्टी, आऊटिंग, घरी येणं जाणं चालू झालं होतं. तसं अजून प्रोपोस दोघांनीही केलं नव्हतं एकमेकांना पण एकमेकांच्या मनातल्या भावना उमजून होते दोघं. पण गेल्या दोन महिन्यांपासून टाळत होता सौरभ सईला. फोन नाही, मेसेज नाही.सौरभचं असं काही नसांगता सवरता वागण्यामुळं सरळ घरचं गाठलं सईने ते ही चक्क तिच्या वडिलांसोबत.
आई अजून किचन मधेच होती.
"कोण आलंय??"
म्हणून तिने वाकून पाहिलं आणि
"अगं सई ! ये ना बस, तू काय नुसता बघत उभा आहेस ठोंब्यासारखा.
खरतर आपण जायला हवं मागणी घालायला. आता तुलाच मागणी घालायला आलीये ती " असं म्हणून एक कोपरखळी मारत, सौरभला बाजूला करत, आई दाराजवळ गेली आणि सौरभपेक्षा जास्त आईच हबकली.
सई एकटी आली नव्हती. सई आणि तिचे बाबा श्रीधर सप्रे दोघेही दारात उभे होते. चौघेही आत येऊन सेटल झाले. एक तणावपूर्ण शांतता होती.सौरभ सईकडे रागाने बघत होता. शेवटी सईने पुढाकार घेतला.
" सौरभ, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी जरा गॅलरीत येतोस?"
एकतर सगळंच अनपेक्षित घडत होतं सौरभ आणि त्याच्या आईसोबत.
श्रीधर सप्रे पण तसे अस्वस्थच होते. सई एकटीच काय ती थोडी शांत आणि स्थिर वाटत होती.
सौरभने नकारार्थी मान हलवली, म्हणाला " इथेच बोल. मी आईला सोडून नाही येणार"
"प्लिज सौरभ" सईने पुन्हा विनंती केली.
" जा तू, आय एम कम्फर्टेबल" आई म्हणली.
तसे सौरभ आणि सई दोघे गॅलरीत गेले.
"का आलीयेस सई, मी टाळतोय तुला हे समजलं आहे ना तुला. यायच्या आधी कळवायचं तरी" सौरभने विचारलं.
" मी सांगितलं असतं तर तू येऊ दिलं असतंस का?" सईने प्रतिप्रश्न केला.
"पण तुला कळतंय का तू असं तुझ्या वडिलांना आणून किती मोठा घोळ करून ठेवलायस" सौरभ सारखा आत डोकावत होता, अस्वस्थता वाढली होती त्याची. आईबद्दलची सगळी काळजी एकदम दाटून आली होती. पुढं काही ऐकून घ्ययच्या आधी तो पुन्हा खोलीत जाणार तोच सईने हात धरून थांबवलं त्याला. स्वतःच्या शेजारी झुल्यावर बसवलं, म्हणाली
"मला सगळं माहीत आहे सौरभ"
आत श्रीधर सप्रे आणि अंजली टिपणीस एकमेकांसमोर बसले होते. अस्वस्थ श्वासांची कंपन इतकंच काय ते चालू होतं. काळाच्या वाऱ्याने जोरात यावं आणि आयुष्याच्या पुस्तकाची पानं फडफडून अचानक मागच्या कुठल्यातरी आठवणींच पान अनाहूत समोर उघडलं जावं अगदी तसं झालं होतं दोघांना. काळानं पंचवीस वर्षे मागे नेऊन ठेवलं होतं.
अंजली टिपणीस. तळकोकणातून रत्नागिरीला एम.एस.सी करायला आलेली हुशार मुलगी. म्हणलं तर अगदी विज्ञानवादी पण मराठी कवितांच्याही तितकीच प्रेमात असलेली मुलगी. आणि नुकतेच एम. ए होऊन कॉलेजात मराठीचे प्रोफेसर म्हणून रुजू झालेले श्रीधर सप्रे. एक कविता वाचनाचा कार्यक्रम पाहायला गेलेले दोघ योगायोगानं एकमेकांच्या शेजारी बसले आणि तिथून ओळख झाली, एका अनाम नात्याला सुरवात झाली. रत्नागिरीत राहण्याचा, जेवणाचा खर्च निघावा म्हणून सुट्टीच्या दिवशी घरी जाऊन शाळकरी मुलांच्या विज्ञान आणि गणिताच्या शिकवण्या घेणारी अंजली पुन्हा एकदा योगायोगाने सप्रेंच्या पुतण्याला शिकवणी दयायला त्यांच्या घरी जाऊ लागली. दोन वर्षातच सूर जुळले दोघांचे. श्रीधर आणि अंजलीच्या त्या अव्यक्त नात्याला आता बंधनात अडकण्याची घाई झाली होती. अंजलीची एम.एस.सी ची परिक्षा जवळ आली होती. वर्ष संपायच्या आधी आईच्या कानावर घालावं म्हणून अंजली गावी गेली. परत आली ती आईचे दिवस कार्य उरकूनच. वडील नव्हतेच पण आई गेल्यावर हक्काचं असं कोणीच नव्हतं. आता श्रीधरच काय तो आधार. रत्नागिरीला आल्या आल्या तिने श्रीधरचं घरं गाठलं. तोरणं,मांडव, पाहुणे मंडळी आणि मधोमध गळ्यात हार घालून उभा असलेला श्रीधर आणि शेजारी उभी असलेली त्याची होणारी बायको पाहून जागीच स्तब्ध झाली अंजली. रत्नागिरी सोडायच्या आधी श्रीधर आणि तिची एक शेवटची भेट झाली.
" फक्त साखरपूडाच झालाय, सगळं इतकं अचानकपणे ठरलं आणि मी घरच्यांना नाही विरोध करू शकलो गं, तू अली आहेस तर आता सांगू चल " श्रीधर म्हणाला.
"आता खुप उशीर झालाय, याची शिक्षा तुमच्या होणाऱ्या बायकोनं का सोसावी"
श्रीधरची बाजू शांतपणे ऐकून, समजून, स्वतःची बाजू मांडून अंजलीने कायमचं रत्नागिरी सोडलं. आणि आज योगायोगानं अंजलीच्या मुलाला नेमकी श्रीधरची मुलगी अवडावी. नियती अशी एकमेकांना समोरासमोर आणेल असं वाटलं नव्हतं अगदी दोघांना.
"बरं वाटलं तूला इतक्या वर्षांनी पाहून" श्रीधर सप्रे सगळा धीर एकवटून म्हणले.
"लग्न केलंस, सेटल झालीस, घर पण छान आहे" यावर अंजली टिपणीस नुसत्याच हसल्या..
"सौरभच पूर्ण नाव माहीत आहे का ?" अंजलीने अचानक विचारलेल्या या प्रश्नावर श्रीधर थोडे गोंधळले.
" हो म्हणजे मी नेम प्लेट वाचली."
'सौरभ अंजली टिपणीस' असं नाव आहे वडील नाहीत त्याला.
"म्हणजे" श्रीधर.
"रत्नागिरी सोडून पुण्याला आले, एका नामवंत मेडिकल रिसर्च कंपनीत इंटर्नशिप मिळाली. काम करत असताना दोन वर्ष जम बसतच होता तोच आमच्या hod नी एक प्रपोजलं आणलं माझ्यासाठी. त्यांना सरोगसीची टेस्ट करण्यासाठी कोणीतरी व्हॉलेंटिअर हवी होती. बाळ होईपर्यंत सगळी आर्थिक जबाबदारी कंपनी घेणार होती, शिवाय माझा पगार चालू राहणार होता. आईला, आणि तुम्हाला गमावल्यावर मला आपलं असं कोणी नव्हतं या जगात. होणाऱ्या बाळाचे आजन्म हक्क माझे राहतील या बोलीवर मी त्या संशोधनात माझं योगदान दिल. सौरभ माझाच मुलगा आहे. फक्त माझा. पण मी मात्र माझ्या प्रेमाशी, तुमच्याशी प्रतारणा नाही करू शकले. मी अविवाहित आहे अजूनही.
श्रीधर सप्रे स्तब्ध होऊन सगळं ऐकत होते. सौरभ सईला टाळायला लागल्यापासून मध्यंतरी झालेल्या सगळ्या गोष्टी तिने त्याला सांगून शांत केलं होतं. गॅलरीच्या दारात उभे राहून दोघे सगळं ऐकत होते.
"काकू तुम्हाला आठवतं, मागे मी एकदा घरी आले होते सौरभ नसताना, तेंव्हा भिंतीवर लावलेल्या या फोटोमधून एक फोटो सतत मला कुठेतरी पहिल्या सारखा वाटतं होता. तुमचा कॉलेजच्या प्रांगणात काढलेला हा फोटो. मागे रत्नागिरीच्या कॉलेजच नावं हे. असच कॉलेज हे मी बाबांच्यापण एका फोटोत पाहिलं होतं. सगळं मी घरीं जाऊन बाबांना सांगितलं तर बाबानी त्यांच्या जुन्या डायरीतून मला हाच सेम फोटो काढून दाखवला आणि सगळं सांगितलं.
माझ्या बाबांशी भेट झाल्यावर सौरभला या सगळ्याची, तुमच्या जुन्या ओळखीची कल्पना आली असणार आणि म्हणून तो मला टाळत असेल याची खात्री पटली मला.
साखरपुडा मनाविरुद्ध झाला होता बाबांचा पण लग्न नाही झालं त्यांचं, टायफॉईड मध्ये गेली ती मुलगी लग्नाआधीच. मग मात्र त्यांनी पुन्हा तुमच्या प्रेमाशी एकनिष्ठ राहायच ठरवलं. माझं नाव जरी सई श्रीधर सप्रे असलं तरी मी त्यांची पुतणी आहे. रीतसर दत्तक घेतलं त्यांनी मला." सई बोलत होती.
"खरतर तुमचं लग्न झालं असत तर खरंच माझी आई झाला असतात काकू तुम्ही, पण आता मी रीतसर तुम्हाला मागणी घालतीये माझी आई होण्यासाठी. व्हाल माझी आई." सोफ्यावर बसलेल्या अंजली टिपणीसांच्या जवळ जाऊन सईने विचारलं त्यांना.
बराच वेळ शांतता होती. सई फक्त सौरभसाठी आपल्याला इथे घेऊन आली आहे असा समज होता सप्रेंचा. सईच्या मनात असे काही असेल असं वाटलं नव्हतं त्यांना. तेही आवक होऊन पाहत होते. सप्रे असे अचानक समोर आले तर काय होईल या विचाराने सईला टाळणारा सौरभ "आपल्या आईचं सुख यात असू शकत हे इतकं कसं समजलं नाही मला, आयुष्यभर जाच्या प्रेमाशी एकनिष्ठ राहिली त्याला भेटणं अपल्यामुळ लांबलं" असा विचार करत होता. पण सईचं मात्र कौतुक वाटतं होतं त्याला. आपली आवड चुकली नाही म्हणून मनोमन खूषही झाला तो.
"प्रत्येक नात्याला एक वेळेची चौकट असते सई. आता माझ्या आणि श्रीधरच्या नात्याला नावं देऊन आम्ही एकत्र येण्याची चौकट आम्ही केंव्हाच पार केलीये. पण श्रीधर आणि सौरभला हरकत नसेल तर एक कॅम्पानिअन म्हणून नक्की मी विचार करेन या नात्याचा. पण त्या आधी मीच तुला मागणी घालते सौराभसाठी " असं म्हणत अंजलीने एकदा सौरभकडे आणि एकदा श्रीधरकडे पाहिलं. वेळेच्या कायम पुढे विचार करणाऱ्या अंजलीचं कौतुकच होतं सप्रेना. सई लाजली सौरभनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. सईने घातलेल्या या धाडसी मागणीमुळं एक परिवार आज पूर्ण झाला होता.
मधुरंग
मधुरा कुलकर्णी© ®
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा