मी काल माझ्या बहिणीकडे गेलो असताना माझा भाचा केतन याच्याशी चर्चा करित असतना त्यानी विचारतो, “मामा, तुम्ही रोज देवपूजा करता, पण का करता? देवाला रोज आठवण करून द्यायची का की आपण आहोत?”
त्याचा प्रश्न ऐकून मी काही क्षण शांत झालो. कारण मीही रोज देवपूजा करतो, पण ‘का?’ हा प्रश्न मी स्वतःलाही कधी विचारला नव्हता. त्या क्षणी मला जाणवलं - काही प्रश्न लहान असतात, पण त्यांची उत्तरं जीवन बदलतात.
मी केतनला जवळ बसवलं आणि म्हणालो, “बाळा, मामा रोज देवपूजा करतो कारण पूजा म्हणजे देवाला खुश ठेवणं नाही, तर स्वतःला देवत्वात जागं करणं आहे.”
तो म्हणाला, “देव आपल्यात असतो का मामा?”
मी हसून उत्तर दिलं, “हो, देव आपल्या आत आहे, पण आपण जगाच्या गडबडीत त्याला विसरतो. रोजची पूजा म्हणजे त्या विस्मरणावरचा उपाय आहे.”
मी त्याला समजावलं - “आपण जेव्हा दीप लावतो, तेव्हा तो केवळ देवळातील प्रकाश नसतो, तो आपल्या मनातील अंधारावर विजय मिळवण्याचं प्रतीक असतो. धूप देतो म्हणजे आपले विचार शुद्ध होतात; घंटा वाजवतो म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर होते; पुष्प अर्पण करतो म्हणजे आपल्या भावनांतील प्रेम आणि कृतज्ञता देवाला अर्पण करतो. ही सर्व क्रिया बाह्य नाही, ती अंतर्मुख प्रवास आहे.”
मी पुढे सांगितलं, “पूजा म्हणजे देवाशी संवाद नव्हे, ती आत्म्याशी संवाद आहे. जेव्हा आपण देवासमोर बसतो, तेव्हा काही क्षण आपण जगाच्या गोंधळापासून दूर जातो. त्या शांततेतून आपण स्वतःला समजायला लागतो. पूजा म्हणजे ध्यानाची पहिली पायरी.”
केतन मोठ्या लक्षाने ऐकत होता. मग विचारतो, “मामा, रोज पूजा केल्याने देव काही देतो का?”
मी म्हणालो, “देव देतो बाळा, पण तो वस्तू देत नाही - तो शांती, धैर्य, संयम आणि समाधान देतो. तेच खरे प्रसाद आहेत.”
मी त्याला सांगितलं की रोजची देवपूजा ही एक ऊर्जाशुद्धी प्रक्रिया आहे. पूजेच्या वेळी उच्चारले जाणारे मंत्र आणि ध्वनीकंपनं आपल्या शरीरात, मनात आणि घरात सात्त्विक स्पंदनं निर्माण करतात. त्यामुळे घरात प्रेम, शांतता आणि सहकार्य वाढतं.
वेदात म्हटलं आहे -
“यत्र नित्यं अग्निहोत्रं तत्र देवः वसति।”
ज्या घरात रोज देवपूजा होते, तिथे देव स्वतः वास्तव्य करतो.
मी केतनला सांगितलं, “मामा रोज पूजा करतो कारण मला देव बाहेर पाहायचा नाही - मला देव माझ्यात जाणवावा म्हणून करतो.”
त्या क्षणी केतनने हसून म्हटलं, “मग मीही आजपासून पूजा करीन, माझ्यातला देव जागवण्यासाठी.”
त्याचा तो निरागस निर्धार पाहून मला जाणवलं - आज मी त्याला उत्तर दिलं नाही, तर त्यानेच मला खरा अर्थ शिकवला.
देवपूजा का करावी याचं उत्तर आता मला स्पष्ट झालं -
“देवपूजा म्हणजे देवाला भेटणं नाही, तर स्वतःतील देवाला जागं करणं.”
🌺 देवपूजा ही भक्ती नव्हे, ती आत्मज्ञानाची साधना आहे.
🙏 रोज देवपूजा करा - कारण तीच अंतर्मनाचा प्रकाश जागवते.
✍️ लेखक : वकील विकस एस. भाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा