गुरुवार, ३ जुलै, २०२५

2038. देवाने केलेली निवड

       मला आठवतं. तो ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा असावा. दिवाळीचा उत्सव लवकरच सुरू होणार होता. बाजारपेठा, दुकाने आणि मॉल्स ग्राहकांनी भरलेले होते. वातावरण अतिशय उत्साही होते. प्रत्येकजण सणाचा आनंद घेण्याच्या मूडमध्ये होता. भेटवस्तू, बोनस, रोख बक्षिसे, गिफ्ट व्हाउचर्स सर्वत्र वाटली जात होती. एटीएम सेंटरसमोर पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा दिसत होत्या. वातावरण पूर्णपणे उत्साहाने भरलेले होते आणि आमचे कार्यालयही याला अपवाद नव्हते. अशा आनंदी वातावरणात आमचा एक एजंट सकाळी माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारले की मी त्याच्यासाठी थोडा वेळ काढू शकतो का? कारण त्याला माझ्याशी काही वैयक्तिक चर्चा करायची होती. तसे, एजंट श्री. कुलकर्णी मला बऱ्यापैकी परिचित होते. व्यवसायाच्या बाबतीत ते एक सर्व साधारण उत्पादक होते, पण ते एक प्रामाणिक सेल्समन होते. मी त्यांच्याकडे पाहिले आणि थोडंसं हसून म्हणालो, "कुलकर्णीजी दोन मिनिटे बसा. मी हातातलं काम संपवतो, मग आपण बोलू. पाच एक मिनिटात माझं काम संपलं आणि मी त्यांना म्हणालो, "चला, तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा."
       त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि आमच्या जवळ कोणी नसल्याची खात्री केली आणि म्हणाले, 
"सर, आम्हाला काही दिवसांपूर्वीच फेस्टिव्हल ऍडव्हान्सची रक्कम मिळाली. दिवाळीच्या वेळी करावयाच्या खर्चासाठी आपल्या सर्वांच्या बँक खात्यात आता पुरेशी रक्कम जमा झाली आहे" आणि ऑफिसमधील डिस्पॅच विभागात काम करणाऱ्या मुलांकडे लक्ष वेधून ते म्हणाले, "ही मुले वर्षानुवर्षे आपल्यासोबत इतक्या प्रामाणिकपणे काम करतात. पण त्यांना बोनस मिळत नाही, आगाऊ रक्कम मिळत नाही, कारण ते पूर्णपणे रोजंदारीवर काम करतात. ते आपल्या संस्थेचे पर्मनंट एम्प्लॉईज नाहीयेत. म्हणून मला या मुलांना काही भेटवस्तू द्यायची आहे, जेणेकरून तेही आपल्यासारखी दिवाळी साजरी करू शकतील." 
 हे माझ्यासाठी थोडंसं अनपेक्षित आणि हटके होते. खरं तर, मी आश्चर्यचकित झालो होतो. थोड्याशा उत्सुकतेने मी त्यांना विचारले, "पण तुम्हाला हे कशासाठी करायचे आहे?"
 ते म्हणाले, "सर, मी जेव्हा जेव्हा या शाखेत येतो तेव्हा जवळजवळ प्रत्येक वेळी मी या मुलांना खूप प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करताना पाहतो. ते विनम्र आणि होतकरु आहेत. मी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक कार्यालयांमध्ये जात असतो, परंतु या मुलांमध्ये मला जे दिसते ते वेगळेपण मनाला सुखावणारे आहे. ते सर्वांच्या मदतीसाठी इतके तत्पर असतात की येणाऱ्या प्रत्येकाला इथे आपलं काम होणार याची खात्री असते. ते शंभर टक्के वचनबद्धतेने त्यांचे कर्तव्य बजावतात. कामाबद्दलची त्यांची आत्मियता खूप दुर्मिळ आहे."
       त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरले होते. खरं तर, ते ऑफिसच्या बाहेरचा माणूस होते. पण त्यांनी मुलांचे काम खूप बारकाईने न्याहाळले होते. ते पुढे म्हणाले, "सर, दिवाळीसाठी मी त्यांना काही भेटवस्तू दिली तर या मुलांची काही हरकत नसेल ना?"
       मी थोडा वेळ विचार केला आणि म्हणालो, "कुलकर्णीजी, तुम्ही खूप वेगळ्या प्रकारचे सेल्समन दिसता. तुम्ही इतरांबद्दल ज्या पद्धतीने विचार करता ते खूप युनिक आहे. मला आधी मुलांशी बोलू द्या. कारण मी नाही खात्रीने सांगू शकत की, त्यांना ते आवडेल की नाही. ते गरीब आणि गरजू जरुर आहेत पण ते स्वाभिमानीही आहेत. मला वाटत नाही की ते अशी भेट स्विकारतील. मला प्रयत्न करुन पाहू द्या."
       तो म्हणाला, "ठीक आहे सर. कृपया माझा निरोप मुलांना सांगा. त्यांना सांगा की मी हे माझ्या मनापासून करू इच्छितो आणि त्या बदल्यात माझी काहीही अपेक्षा नाही. मी उद्या परत येईन." असे सांगून ते ऑफिसमधून निघून गेले.
       संध्याकाळी मी तिन्ही मुलांना माझ्या टेबलापाशी बोलावलं आणि कुलकर्णी एजंट काय करू इच्छितात ते त्यांना सांगितले. सुरुवातीला ते कोणतीही भेट स्वीकारण्यास तयार नव्हते. पण मी त्यांना सांगितलं की ते खूप प्रामाणिकपणे हे करू इच्छितात आणि त्या बदल्यात त्यांना काहीही अपेक्षा नाही. खूप आग्रह केल्यानंतर मुलांनी ते स्वीकारण्यास होकार दिला. दुसऱ्या दिवशी श्री. कुलकर्णी आले. मी त्यांना सांगितले की मुले सुरुवातीला तयार नव्हती पण मला त्यांना पटवून द्यावे लागले. मग कुलकर्णी खुर्चीवर जरा आरामात बसले. त्यांनी त्यांची बॅग उघडली. मिठाई आणि सुकामेवा असलेली तीन पाकिटे त्यांनी माझ्याकडे दिली आणि मला ती मुलांना देण्याची विनंती केली.
 मी पाकिटे उचलली आणि म्हणालो, "कुलकर्णीजी, कृपया मला सांगा की हे करून तुम्हाला काय मिळते?"
 श्री. कुलकर्णी यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, "सर, माझा दहा वर्षांचा मुलगा आहे. तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग आहे. आम्ही आमच्या मुलाचे आरोग्य पूर्ववत करण्यासाठी सर्वोत्तम डॉक्टरांशी संपर्क साधला. अनेक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेलो. पण माझ्या मुलाच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. मी आणि माझी पत्नी नेहमीच आमच्या एकुलत्या एक मुलाच्या भविष्याबद्दल चिंतेत असतो. जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत कोणतीही समस्या येणार नाही; पण आमच्या पश्च्यात आमच्या अपंग मुलाची काळजी कोण घेईल? सर, माझा ठाम विश्वास आहे की आम्ही गेल्यानंतर जग आमच्या मुलाची काळजी तेव्हाच घेईल, जेव्हा मी निस्वार्थपणे जगासाठी काहीतरी चांगले करेन, जे "मी" आणि "माझा"च्या पलीकडचे असेल. त्याच्यासाठी मी हे पुण्य कमवत आहे. सर, मी ही मदत देऊन मुलांवर कोणतेही उपकार करत नाहीये. उलट ती मुलेच माझी मदत स्वीकारून माझ्या मुलासाठी पुण्य कमावण्यास मला मदत करत आहेत. मी त्यांचा खरोखर आभारी आहे, ऋणी आहे." त्यांनी माझा हात आदबीने हातात घेतला आणि ते स्तब्ध उभे राहिले.
       त्यांच्या निश्चल आकृतीकडे पाहून माझ्या मनात एक विचार आला आणि मी म्हटले, "मिस्टर कुलकर्णी, तुम्ही पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान पालकांपैकी एक आहात. देवाने तुम्हाला त्याने निर्माण केलेल्या सर्वात नाजूक आत्म्याची काळजी घेण्यासाठी नियुक्त केले आहे. लक्ष्यात घ्या, देवासाठीही "झिरो एरर प्रॉड्क्शन" अद्याप शक्य झालेले नाही. कधीकधी देवही चुका करतो. त्यालाही अंतर्मनात त्याबद्दल घृणा वाटत असेल. पण मग त्याने त्याच्या दोषांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला निवडले आहे. तो नेहमीच तुमच्याकडे पहात असेल. देवाला तुमच्यावर सर्वाधिक विश्वास असला पाहिजे जेणेकरून त्याने सर्वात जास्त लक्ष देण्याची, काळजी घेण्याची आवश्यकता असलेल्या त्याच्या निर्मितीला तुमच्या घरी पाठवले आहे. त्याची खरंच काळजी घ्या, तशी ती तुम्ही घेतंच असणार म्हणा. पण तुम्ही देवाचे काम करत आहात हे विसरु नका. तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहात, नशिबवान आहात. लोक देवाच्या शोधात गावो गावी भटकतात, तीर्थयात्रेला जातात. त्याचे दर्शन घेण्यासाठी ते अनेक कठीण तपस्याही करतात. पण देव स्वतः तुमच्या भेटीला आला आहे. त्याच्या सहवासाचा आनंद घ्या. तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्हाला नक्की फल देईल, त्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.
       कुलकर्णींनी डोळे घट्ट मिटले होते आणि त्यांच्या दोन्ही गालावरून अश्रू ओघळत होते.

©®प्रभाकर जमखंडीकर, 
सोलापूर, मो. 9922111725

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...