कोणा एका राजाकडे एक बकरा होता. राजाने एकदा जाहीर केले की ह्या बक-यास जो कोणी जंगलामध्ये चरवुन तृप्त होऊन आणेल त्याला मी माझे अर्ध राज्य देईन. परंतू बक-याचे पोट पुर्ण भरले आहे की नाही याची मी परिक्षा स्वतः घेईन.
ही सुचना ऐकून एका माणसाने राजा जवळ येऊन म्हटले बकरा चरवणे ही कांही मोठी गोष्ट नाही आणि तो बकरा जंगलात घेऊन गेला. तिथे दिवसभर कोवळे हिरवे गवत त्याला खाऊ घातले. संध्याकाळ झाल्यावर त्याला वाटले, आता तर बक-याचे पोट भरलेच असेल, कारण की मी दिवसभर त्याला चरवीत फिरत होतो. बकरा घेवून तो राजापाशी आला. राजाने थोडेसे गवत बक-यासमोर ठेवले, तर बकरा खाऊ लागला. त्यावर राजा त्या मनुष्यास म्हणाला की तू या बक-याला पोटभर खाऊ घातले नाहीस ! कारण तो तर पुन्हा गवत खाऊ लागला.
अशा प्रकारे भरपूर लोकंनी बक-याचे पोट भरण्याचा प्रयत्न केला, परंतु दरबारात त्याच्या समोर गवत ठेवल्या बरोबर तो गवत खाऊ लागला.
एका सत्संग्याने विचार केला की राजाच्या ह्या कृतीत काहीतरी रहस्य असले पाहिजे, म्हणून मला हे काम युक्तीने काम करायला हवं, तो बक-याला चरायला घेऊन गेला. जेव्हा बकरा गवत खाऊ लागला तेव्हा तेव्हा तो त्याला काठीने मारू लागला. सबंध दिवसभर अनेक वेळा असे झाले. सरते शेवटी बक-याने विचार केला जर मी गवत खाण्याचा प्रयत्न केला तर मार खावा लागतो. तेव्हा ते खाणंच नको. संध्याकाळी बक-यासह तो संत्संगी दरबारात आला. बक-याला त्याने मुळीच खायला दिले नाही. तरी पण राजाला सांगितले की त्याला पोटभर खाऊ घातले आहे, म्हणून तो गवत मुळीच खाणार नाही. परिक्षा घ्या तुम्ही आता.
राजाने बक-या समोर गवत टाकले, परंतु त्या बक-याने गवत खाल्ले तर नाहीच पण त्याच्याकडे पाहिले देखील नाही आणि वासही घेतला नाही. बक-याच्या मनात पक्के ठसून गेले होते की गवत खाल्ले तर मार बसेल, म्हणून त्याने गवत खाल्लेच नाही.
● या कथेतील..हा बकरा म्हणजे आमचे "मन" आहे..बक-याला चारायला घेऊन जाणारा आपला "जीवात्मा" आहे तर राजा "परमात्मा" आहे.
● सम्यक मतितार्थ..मनाला मारा, मनावर अंकूश ठेवा, मन सुधारेल तर जीवन सुधारेल. मनाला विवेकरूपी काठीने रोज झोडपा.
मन तृप्त होऊ शकत नाही. त्यागातच तृप्ती सामावलेली आहे. मन अहं आणि ममतेने भरलेले आहे. दृढ वैराग्य, तीव्र भक्ती आणि ""यमनियमादींच्या"" अभ्यासाने चित्त वश होते. सरते शेवटी प्रकृती सुध्दा अदृश्य होऊन जाते.
● यमनियमादींचा अभ्यास...
यम, योगशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. 'यम' म्हणजे नैतिक आचरण आणि सामाजिक जबाबदाऱ्या. अष्टांग योगामध्ये यमाला पहिली पायरी मानले जाते. यात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या तत्वांचा समावेश होतो.
● यम म्हणजे काय?
यम, म्हणजे योगामध्ये पाळायचे काही नियम. हे नियम व्यक्तीला नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या योग्य आचरण करण्यास मदत करतात. यमामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
१) अहिंसा: कोणालाही शारीरिक, मानसिक किंवा भावनिक त्रास न देणे.
२) सत्य: नेहमी खरे बोलणे आणि वागणे.
३) अस्तेय: दुसऱ्याची वस्तू किंवा अधिकार यांची चोरी न करणे किंवा त्यांची इच्छा न करणे.
४) ब्रह्मचर्य: इंद्रियांचा संयम ठेवणे.
५) अपरिग्रह: गरजेपेक्षा जास्त वस्तू साठवून न ठेवणे.
● यम आणि नियम:
यम आणि नियम हे दोन्ही योगाचे महत्वाचे भाग आहेत. यम हे सामाजिक आचरण आणि नैतिक जबाबदाऱ्यांशी संबंधित आहे, तर नियम हे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आहेत. नियम म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात चांगले गुण विकसित करणे, जसे की स्वच्छता, समाधान, तपश्चर्या आणि भगवंतावर विश्वास ठेवणे.
● यम आणि अष्टांग योग:
अष्टांग योगामध्ये यमाला पहिली पायरी मानले जाते. पतंजलींच्या योगसूत्रात, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाचे आठ अंग सांगितले आहेत. त्यापैकी यम हे पहिले अंग आहे.
● यम आणि नैतिकता:
यम हे केवळ योगाचा भाग नसून, ते जीवनातील नैतिक आचरणाचेही मार्गदर्शक आहेत. यमाचे पालन केल्याने व्यक्ती अधिक संतुलित, शांत आणि समाधानी जीवन जगू शकते.
● यम आणि सामाजिक जीवन:
यमाचे पालन केल्याने व्यक्ती समाजात अधिक सलोख्याने आणि समजूतदारपणे वागू शकते. अहिंसा, सत्य आणि अस्तेय यांसारख्या तत्वांचे पालन केल्याने सामाजिक संबंध सुधारतात आणि एक चांगले समाज निर्माण होण्यास मदत होते.
● यम आणि योग साधना:
यम आणि नियमांचे पालन केल्याने योगसाधनेत यश मिळवणे सोपे होते. यम-नियमांचे पालन न करता आसने किंवा इतर योगाचे प्रकार करणे, म्हणजे 'बिना पायाचे घर' बांधण्यासारखे आहे, असे योगतज्ज्ञ सांगतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा