रविवार, ६ जुलै, २०२५

2045. वडिलांची डायरी

 "आई, बाबा कुठे आहेत?"
डॉ. श्याम घरी शिरताच आपल्या आईला विचारतो.
आई म्हणते, "माहित नाही रे बाबा, पाहा ग्रंथालयात असतील."
तेवढ्यात त्याची पत्नी सोनाक्षी म्हणाली,
"आज तुम्ही बाबांवर  खूप रागावलात. म्हातारे झालेत ते आता, त्यांचं वय तरी लक्षात घ्या."
डॉ. श्याम म्हणाला, "म्हातारे झालेत खरं, पण वागणं अजूनही लहान मुलांसारखं आहे. लहान मुलांबरोबर बसून व्हिडीओ गेम खेळत होते आणि आरडाओरडा करत होते. घरात पाहुणे होते. तरी यांना काही फरकच पडत नाही."
श्याम तक्रार करत ग्रंथालयाकडे जातो.
तिथं पाहतो, वडिलांची डायरी उघडी पडलेली आहे आणि वाऱ्याने तिचे पानं फडफडत आहेत.
तो मनातल्या मनात बोलतो, "पाहा, डायरीसुद्धा उघडी टाकून गेलेत, फाटली असती तर?"
तो डायरी बंद करायला घेतो पण त्याच क्षणी त्याच्या नजरेस स्वतःचं नाव दिसतं. उत्सुकतेने तो डायरी उचलतो आणि तिथेच खुर्चीवर बसून वाचायला लागतो.

[डायरीतून…]
“माहितेय का बाळा, जेव्हा तू पहिल्यांदा या जगात आलास, तेव्हा माझ्या डोळ्यात हजारो स्वप्नं दाटली होती. जेव्हा तू तुझ्या आईच्या कुशीत दुध पित होतास, तेव्हा मी लपून बघत राहायचो. तुला तासन्‌तास पोटावर झोपवत ठेवायचो. मनात होतं, की सगळं प्रेम तुझ्यावर ओतून टाकावं. पण बाबागिरीसोबतच जबाबदाऱ्या आल्या होत्या..
तुझ्या प्रत्येक गरजेची पूर्तता करणं, तुला शिस्तीत वाढवणं, तुला सक्षम बनवणं या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता-पाडता एक बाप आपसूकच कठोर होऊन जायचा. त्याच्या भावना हळूहळू आतल्या आत दडून  जायच्या. कधी-कधी तुझ्या आईशी असलेली तुझी जवळीक पाहून मला हेवा वाटायचा. तू तिच्याशी खूप गोड गोड बोलायचास, आणि मी दुसऱ्या खोलीतून ऐकत असायचो. मनात सुखावत होतो, पण समोर यायची हिंमत होत नव्हती.
त्या दिवशी तू जेव्हा गुडघ्यावर पडून रक्त काढलंस आणि आई धावत जाऊन औषध लावू लागली. मी पण धावत आलो होतो. पण तुझं रडणं पाहून मी चेहरा वळवला. तुला वाटलं असेल की मला काही फरक पडत नाही. पण खरंतर बाळा, ती जखम माझ्या काळजावर झाली होती. डोळ्यात पाणी आलं होतं. पण मी तिथुन् निघून गेलो, कारण मला भीती होती, तू माझे अश्रू पाहून कमकुवत होशील.
त्या दिवशी, जेव्हा मी तुझ्याकडून एक-एक पैशाचा हिशोब मागितला, त्याचा तुला राग आला असेल. पण रे वेड्या, तो माझा तुझ्यावर अविश्वास नव्हता. उलट विश्वास होता म्हणूनच पैसे देऊन तुला बाजारात पाठवलं. मी तुला पैशाचं मोल शिकवायचं ठरवलं होतं.
     तू जेव्हा मित्रांसोबत पार्टीसाठी पैसे मागितलेस आणि मी नकार दिला तेव्हा तुझ्या आईने तुला पैसे दिले. तेव्हा मी तिला काहीच विचारलं नाही. पण तुझ्यावर नजर ठेवून होतो. तू मित्रांसोबत धमाल करत होतास, नाचत होतास, मजा करत होतास. मलाही वाटलं की तुझ्याबरोबर बिनधास्त नाचावं, पण स्वतःला आवरलं. वाटलं, तू यशस्वी झालास की मग बाप-बेटा मिळून मस्ती करू. पण...
आज तू खूप मोठा झालास. यश तुझ्या पायाशी आहे. पण आता मी. मी फक्त तुझा बाबा नाही, तुझ्या मुलांचा आजोबा झालोय आणि तू, तूही फक्त मुलगा नाही, बाप झालायस. मी तुझी प्रत्येक अवस्था समजून घेतो. पण तू माझी समजायला थोडा उशीर करतोस.
शेवटी एवढंच म्हणेन-
तुला मी तुझ्या आईसारखं पोटातून नाही जन्म दिला, पण तू माझा अंश आहेस.
तू जेव्हा हसतोस, तेव्हा माझा सगळा थकवा विसरतो मी.
तुझ्या लहानपणात माझं लहानपण पुन्हा जगतो.
तू म्हणतोस की मी मुलांबरोबर मुलांसारखं वागतो पण तु जेव्हा माझ्या वयाचा होशील,
दादा होशील... तेव्हा कळेल रे तुला, मी आज काय अनुभवतोय.
पण तेव्हा कदाचित मी या जगात नसेन..."
इतकं वाचून श्यामच्या डोळ्यांसमोर त्याचं संपूर्ण बालपण चित्रासारखं फिरू लागतं. त्याचे डोळे पाणावतात.
तेवढ्यात सोनाक्षीचा आवाज येतो..
"श्याम, बाबा सापडले नाहीत, कुठे गेले असतील?"
आईही मागे उभी होती.
श्याम पटकन डोळे पुसतो आणि म्हणतो,
"आई, मला माहिती आहे ते कुठे गेले असतील...मी त्यांना घेऊन येतो."
तो तडक बाहेर पडतो.
पोहोचतो त्या पार्कमध्ये, जिथे लहानपणी वडील त्याला नेहमी फिरायला आणायचे.
तो तिथे बघतो.. वडील एकटे एका बाकावर बसलेले असतात.
श्याम जाऊन त्यांच्या बाजूला शांतपणे बसतो आणि म्हणतो,
"बाबा, तुम्ही खूप बरं केलं की माझ्याशी अंतर ठेऊन वागलात. आज मी जे काही आहे, ते फक्त तुमच्यामुळे. अनेकदा माझं मन भटकायचं, शाळा बंक करून चित्रपट पहायचा, मित्रांसोबत दारू प्यायची. पण प्रत्येक वेळी तुमचा तो कठोर चेहरा आठवायचा. तुमच्या भीतीने मी वाचलो.
तुमचं रागावणं हे खरंतर माझा हात धरून मला चुकीच्या रस्त्यावरून वाचवणं होतं.
आज फक्त एवढंच सांगायचंय...मी तुमच्यावर खूप प्रेम करतो बाबा."
हे बोलताना श्यामचा गळा भरून येतो.
त्याचे वडील त्याला जवळ घेतात. मिठीत घेऊन शांतपणे डोळे मिटतात.
एक बापाचं प्रेम नेहमी शब्दांपेक्षा कृतीत दिसतं. पण त्याची भावना वाचण्यासाठी लागते एक उघडं मन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...