गुरुवार, २४ जुलै, २०२५

2090. आनंदी रहा : आनंद वाटा

 एका क्षुल्लक कारणावरून बायकोशी भांडण झाले होते. तो घरातून वैतागून बाहेर पडला. मनात विचार आला, "कधीच बोलणार नाही या भांडकुदळ बाईशी! काय समजते स्वतःला? सतत कुरकुर, जगूच देत नाही माणसाला!"
चप्पल घातली आणि जवळच्याच टपरीवर गेला. एक कप चहा मागवला आणि समोरच्या स्टुलावर बसला.
तेवढ्यात मागून आवाज आला,
"इतकी थंडी असताना चहा प्यायला घराबाहेर आलात?"
तो वळून पाहतो, तर मागच्या स्टुलावर एक वृद्ध गृहस्थ बसले होते.
"बाबा, तुम्हीही तर थंडीमध्ये बाहेर?"
ते हसत म्हणाले, "मी एकटाच आहे. घर नाही, संसार नाही. पण तू मात्र लग्न झालेलास वाटतोस रे बेटा!"
"बायको घरात जगूच देत नाही बाबा! सतत भांडण, सतत कुरकुर… घरात राहावं तरी कसं? आयुष्य नरक केलंय तिनं!"
तेव्हा त्या वृद्धांनी हळूहळू बोलायला सुरुवात केली:
"बायको जगू देत नाही म्हणतोस? अरे, बायकोच आयुष्य असते रे! गेली आठ वर्षं झाली माझ्या बायकोला गेलेली. जिवंत असताना तिचं कधी कौतुक केलं नाही. आणि आता? विसरताच येत नाही. घर ओसाड वाटतं. मुलं आपापल्या कामात, पैसा आहे, मोठं घर आहे, सगळं आहे... पण तिच्याशिवाय काहीच सजीव वाटत नाही. सतत कुठे तरी भटकत राहतो. काहीच चांगलं वाटत नाही. तिच्या जाण्यानंतरच कळलं, ती माझ्या आयुष्याची नस नव्हे, धडधड होती!
"पण तू तर अजून तरुण आहेस रे! जा घरी, आनंदात जग, समजून घे. नाहीतर माझ्यासारखं उशीर झाल्यावर फक्त पश्चात्ताप उरतो."
त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते… आणि एकाकी दुःख, शांतपणे ओसंडून वाहत होतं.
त्याने चहाचे पैसे दिले. वृद्धाकडे शेवटची नजर टाकली… आणि एका क्षणाचाही विलंब न करता घरी वळला.
लांबूनच तिला पाहिलं… डोळे पाणावलेले, काळजीने दरवाज्यात उभी होती...
"कुठे गेला होतास? जॅकेटही नाही घातलंस… थंडी लागेल तुला!"
तो हसून म्हणाला, "आणि तू सुद्धा, स्वेटर घालायचं भान नाही? बाहेर दरवाज्यात उभी राहिलीस?"
क्षणभरासाठी दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात बघितलं… आणि त्यांचं प्रेम त्यात स्पष्ट वाचता आलं!
कधी कधी आपणही अशाच चुका करतो… कधी पत्नीवर रागावतो, तर कधी आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र यांच्यावरही राग काढतो, जो केवळ आपल्यालाच नव्हे, तर त्यांनाही दुखावतो.
जीवन खूपच छोटं आहे… कुठे "माफ करा" म्हणावं लागेल, तर कुठे "माफ केलं" असं म्हणावं लागेल…
पण एकदा हसून, प्रेमानं, माणुसकीनं आयुष्य जगून बघा
" जिंदगीके सफरमे गुजर जाते है जो मकाम.. वो फिर नही आते..!!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...