आज सकाळी कामानिमित्त सांगलीला गेलो होतो. येताना जयसिंगपूर मध्ये थांबलो. दुपारचा एक वाजला होता. दादा म्हणाला थोड नाष्टा करू. स्टँडवर नाष्टा केला आणि स्टँड च्या मागे दीड वर्षापूर्वी हॉस्पिटल मध्ये आमच्या बाबांना ऍडमिट केलं होत. नाष्टा करता करता बाबांची आठवण आली. दादाला म्हणालो बघ ना बाबांना जाऊन आठ महिने होत आले. बाबांना इथच ऍडमिट केलं होत. त्यावेळी अस वाटलं नाही की अजून एक दीड वर्षांनी बाबा आपल्यात नसतील....!!
खरंच आम्हा दोघा भावांच्या डोळ्यात हलकेसे अश्रू तरळले. तसा आमचा जयसिंगपूर या शहराशी लहानपणा पासून एक घनिष्ट आणि खास संबंध आहे. आमच्या बाबांची पूर्ण हयात या शहरात गेली आहे. बाबा जवळजवळ तीस वर्षे इथे कामावर होते. आम्ही पहिला मिरजेत राहायला असताना बाबा तिकडून येऊन जाऊन काम करायचे. आणि परत आता इकडे मानकापूरला आल्यावर इकडून तिकडे कामावर जात होते. मध्यंतरी दोन वर्ष या जयसिंगपूर मध्ये भाडयाने सुद्धा आम्ही राहिलो. बाबांचे मालक खूप छान माणूस. एकच ठिकाणी बाबांनी तीस वर्ष काम केलं. म्हणून या शहरात आल्यावर बाबांची आठवण ही कायम येतच राहणार. थोड पुढे आल्यावर गाडी थांबवली आणि जयसिंगपूर मध्ये आल्यावर नेहमी करतो ते काम केलं !
बाबांना फोन लावला. बाबा गेल्यापासून बाबांचा मोबाईल आई वापरते. पण एक वेडी आशा मनात घेऊन की बाबांचा आवाज तिकडून येईल. फोन उचलला आईने आणि ती काही बोलायच्या आत मी म्हणालो बाबा आम्ही आलोय जयसिंगपूर मध्ये. तिकडून आईचा भांबावलेला आवाज आला. अरे काय बोलतोयस बाबा, कुठे...काय... कस..आईला शांत करून म्हणालो. आई इथ आल्यावर कायम बाबांना फोन लावतो ग म्हणून बाबांच्या नंबरवर फोन केला. तुला दुखावण्याचा हेतू नव्हता माझा. पणं आई बोलली नाही बाळा उलट मला खूप बरं वाटलं..!!
माझी मुल त्याच्या बाबांना कधी विसरणार नाहीत. हे बघून जीवाला समाधान वाटलं. मंडळी तुम्ही म्हणालं काय उगाच वेड्यासारखं करतोस..आईला कशाला रडवतोस. कशाला सारखी आठवण काढून आईला त्रास देतोस. पण तुम्हाला सांगू का मला नाही विसरायचं बाबांना आणि कोणाला विसरून पण द्यायच नाही. बाबा जाऊन आठ महिने झाले पण आजही आम्ही रात्री बारा बारा वाजेपर्यंत बाबांविषयी बोलत बसतो....!!
आजकाल माणूस गेला की थोड्या दिवसांनी जीवन पूर्ववत होत. सगळं काही अलबेल होत. जणू काही तो माणूस आपल्यात नव्हताच अस सगळे वागायला लागतात. पण मला नाही अस राहायचं. मला कायम माझ्या बाबांची आठवण ठेवायची आहे. त्या आठवणीत खूप मोठं समाधान आहे. माझं बालपण ज्यांच्या अंगा खांद्यावर गेलं...माझं तरुणपण वाया जाऊ नये म्हणून ज्या व्यक्तीने मला सावरलं.. त्यांनाच विसरायचं....???
मग कसलं जीवन म्हणायचं हे , काय आठवणीत ठेवायचं आहे मग..या आईबापाशिवाय आपलं जीवन आहे का ?? भले काही लोक राहत असतील आईबापाशिवाय.. पण मला नाही जमणार.. मी मरेपर्यंत माझ्या बाबांची आठवण काढतच राहीन...या बापमाणसाच्या हातावर माझं आयुष्य सुरु झालं होत. आणि काही महिन्यांपूर्वी याच हातांनी त्यांना अग्नी दिला...नको नको वाटतं हो ....!!
मी माझ्या सासुरवाडीला जाताना सुद्धा मला जयसिंगपूर वरूनच जावं लागतं. बाबांची कायम नऊ ते साडेपाच ड्युटी असायची. बाबा सकाळी आमच्याशी बोलून डबा घेऊन कामावर जायचे. पणं तरीही आम्ही जाताना जयसिंगपूर मध्ये गेलो की बाबांना फोन लावायचो. बाबा तिथे स्टँडच्या समोरच्या गल्लीत कामावर होते. माझा फोन आला की सगळं काम सोडून लगेच तडक बाहेर यायचे. आमचं सकाळी बोलणं झालं असूनही आम्ही परत तिथे दहा पंधरा मिनिटे बोलायचो. कारण बाबा एवढ्या लांब कामाला यायचे. बाबांना जरा भेटून बोलून गेलो की त्यांनाही आणि मलाही बर वाटेल म्हणून इथे थांबायचो....!!!
बाबा लगेच माझ्या बायकोला म्हणजे त्यांच्या सुनेला विचारायचे स्वाती काही पैसे पाहिजेत का ?? मला म्हणायचे चल वडा खाऊ. अहो बाबा नको इथून जातोय म्हणून तुम्हाला भेटतो. उद्या संध्याकाळी येतो म्हणून बाबांचा निरोप घ्यायचा. तरी नातवांना काही खायला घेऊन जबरदस्तीने द्यायचे ..!!!
पण आता मला कधी जाताना येताना जयसिंगपूर मध्ये बाबा दिसतील का??? असा विचार करून मनात आठवणींचा अंगडोंब उसळतो. एकेक वेळ तर अस झालं मी सासुरवाडी वरून संध्याकाळी बाबांचे काम सुटताना आलो, तर बाबांना फोन लावून गाडीवरून घरी घेऊन यायचो. मी बायको मुल आणि बाबा. बाबा म्हणायचे अरे तुम्ही चला पुढे मी येतो एसटीने. पण मला बाबांना सोडू वाटतं नसायचं..!! आता कधी बसतील का बाबा माझ्या गाडीवर? खूप कमी वेळ दिला हो बाबांनी आम्हाला. त्यांच्यासाठी आता खूप काही करायचं होत पणं...??
कस आहे मंडळी ज्यांच्या नशिबात अजून बाप आहे त्यांनी खरंच त्या बापाची किंमत जाणा. तुम्हाला काय आणि किती सांगू बापाविषयी. ज्याला बाप नाही त्यांना किंमत विचारा. तो माणूस खूप राबलाय हो तुमच्यासाठी. परत तुमच्या आयुष्यात हा "देवमाणूस" येणार नाही हे ध्यानात ठेवा.
मी माझ्या बाबांना चार जणांच्या खांद्यावर शेवटच पाहिलं ना तेव्हा काळीज माझं फाटलं होत...!!
"तीरडीवर बांधलेल्या बापाचा शेवटचा चेहरा पाहण्यात काय दुःख आहे ते बाप गमावलेल्या लेकरांनाच माहिती असत..."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा