मुसळधार पावसात एक आजोबा ब्युटीपार्लरच्या बाहेर ठेवलेल्या खुर्चीत येऊन बसले. रेनकोट, छत्री आणि आजोबा तिघेही चिंब भिजलेले. ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या एक दोन मुलींनी,'आजोबा इतक्या पावसाचे कशाला बाहेर पडलात?' म्हणून विचारलं सुद्धा. पण आजोबा नुसतं हसले. त्यांनी रेनकोट काढला. खिशातून ओला रुमाल काढून त्याने चेहरा पुसला. बाजूच्या टपरीवाल्याला खुणेनेच 'एक कटिंग'ची ऑर्डर दिली आणि मुसळधार पाऊस बघत बसले. काम करणाऱ्या मुलींचं कुतूहल वाढलं. एवढया पावसात, भिजत हे आजोबा इथे कशाला आले असतील? पावसात भिजून आजारी पडू किंवा पाणी साचलं तर कुठे तरी अडकू वगैरे विचार ह्यांच्या मनात आले नाहीत का? मस्त कटिंग पीत बसले आहेत. आजोबांनी हळूच काचेतून पाहणाऱ्या पोरींकडे एक कटाक्ष टाकला आणि हसले. मुली आपापल्या कामाला लागल्या.
आजोबा आणि आज्जी दोघेच राहतात. मुलं परदेशी. मित्र परिवार भरपूर पण आता फक्त मनाने चिरतरुण. त्यामुळे दररोज भेटीगाठी नाहीत. ह्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली. किती ते दोघांनाही आठवत नाही. आपल्या गतीने दैनंदिन कामं, बाजारहाट, बँका वगैरे कामं दोघे मिळून करतात. जिथे प्रेम असतं तिथे भांडणंही असतात. हे जोडपं ही त्याला अपवाद नाही. अजूनही भांडतात. फक्त आता आवाजातील धार कमी झाल्याने, त्यांचं भांडणही एखाद्या शास्त्रीय गायकाने लावलेल्या सुरांसारखं भासतं. कानावर पडत राहावं असं! जेव्हा केव्हा त्यांच्यात भांडण होतं तेव्हा आज्जी पर्स घेतात आणि घरातून निघून जातात. पण,आज्जी जाताना त्या कुठे जात आहेत ते एका चिठ्ठीवर लिहितात. तासाभराने राग मावळला की आजोबा निघतात त्या पत्त्यावर. आज्जी तिथे असतात बसलेल्या काम आटोपून. मग दोघे एकमेकांना पाहून सुखावतात आणि हसत खेळत घरी येतात. आयुष्य रटाळ होऊ नये,त्यात मजा टिकून रहावी म्हणून त्या दोघांनीच शोधून काढलेली ही आयडियाची कल्पना.
आजही असंच झालं. सकाळी वातावरण निरभ्र असताना अचानक मुसळधार भांडण झालं. ऐकणाऱ्याला रिमझिमच वाटलं असतं. आज्जीनी चिठ्ठी लिहिली आणि निघाल्या. त्या निघाल्या तेव्हा पाऊस नव्हता,त्यामुळे आजी छत्री न घेताच पडल्या बाहेर. पाऊण तासाने आजोबांनी चिठ्ठी पाहिली आणि निघणार तेवढ्यात पाऊस कोसळायला सुरुवात झाली. मग काय आजोबांनी रेनकोट, पावसाळी चपला सरकवल्या. बायकोसाठी छत्री घेतली आणि निघाले हळूहळू. पाऊस जरा जास्तच होता. त्यामुळे त्यांनी छत्री उघडायचा निर्णय घेतला. आणि पावसाचं आक्रमण झेलत कसेबसे ब्युटीपार्लरला पोहोचले. काचेतून त्यांना आज्जी दिसल्या होत्या, त्यामुळे त्यांनी कोणालाच काही विचारलं नाही.
बघता बघता आजोबांनी तीन कटिंग संपवले. पावसानही थोडं नमतं घेतलं. दीड तास होऊन गेलेला आज्जीनी घर सोडून. आजोबा उठले, हातात चौथा कटिंगचा ग्लास आणि दार उघडून आत गेले. सगळ्या मुली लाजल्या. आजोबांनी थेट आज्जींची खुर्ची गाठली. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले,' तुला कोणत्याच ब्युटीपार्लरची गरज नाहीये गं!! तू अशीच खूप सुंदर दिसतेस!!' इतकं म्हणून त्यांनी आज्जीना कटिंगचा ग्लास दिला आणि हात देऊन खुर्चीवरून उठवलं. दोघेही थोडा वेळ हसत खेळत चहा पीत बाहेर बसले. पार्लरच्या मुलीही त्यांना सामील झाल्या. थोड्यावेळाने सगळ्यांना टाटा करून आयुष्यात आलेलं अजून एक प्रेमळ वादळ थोपवत, दोघेही एकाच छत्रीतून घराकडे निघाले.
(कंसात लिहिण्यासाठी एक वाक्य लिहिलं होतं पण ते ह्या मुसळधार भांडणात चिरडलं गेलं)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा