शनिवार, २६ जुलै, २०२५

2100. सासू सून

 देवसाळे काकू  सहाच्या ठोक्याला फिरण्यासाठी बिल्डींगच्या गेटमधून बाहेर पडल्या आणि रोजच्यासारखी त्यांच्या मागून कूचकूच सुरू झाली. त्यांच्या पाळतीवर गॕलरीतच फलटण उभी होती.
" शोभत नाही हो या वयात आता लेगीन नि कुर्ते ! "
" कानातले लोंबते डूल बघितलेत? आहेत आॕसम पण यांना कशाला हवेत ?"
" साडी नेसायच्या हो आत्ताआत्ता पर्यंत.अगदी काका गेले दोन वर्षांपूर्वी तोपर्यंत काकू काकूंसारख्या रहायच्या."
" कुर्त्यांचे कट्स बघितलेत? शी ः ! त्यातून त्या तंग लेगीन्स. ब्रह्मांडदर्शन अगदी !"
" हो ना , आत्ताच काय तरूणपण उफाळून आलंय कोण जाणे ! काॕलेजातल्या लेकीची बरोबरी करणं चाललंय अगदी. हेअर स्टाईल काय , लिपस्टिक काय , इथल्या इथे जातानाही मेकप काय !"
" हेडफोन लावूनच वाॕकला जातात. त्यांच्याचसारख्या छबेल्यांचा ग्रुप आहे म्हणे ! पिकनिक्स , पार्ट्या धमाल चाललीय."
" आत्तापण माॕर्निंगवाॕकला जाताना मोबाईल कशाला हवाय ?"
" त्यांच्या सुनेला बरं चालतं !"
" नसेल आवडत हो.पण बोलणार कोण ?"
एकंदरीत काय ? काकू आता माॕड झाल्यात हे सोसायटीत पचनी पडत नव्हतं.
या सगळ्या काॕमेंट्सची त्यांची सून मृणालला सवय झाली आहे.
ती हे ऐकते आणि सरळ दुर्लक्ष करते.
मृणाल आजच्या युगातही एक गृहिणीच आहे.घर हेच करियर मानणारी.चौकसपणे , सजगपणे नवनवे शिकत राहणारी ! घराशी संबंधित घटकांना जीवापाड सांभाळणारी .म्हणूनच सासूने जेव्हा लेगीन कुर्ता घालावासा वाटतो असं तिला म्हटलं तेव्हा तिला धक्का बसला नव्हता. कारण देवसाळे काका असेपर्यंत आपल्या सासूने किती मूग गिळले असतील याची तिला कल्पना होती. सासऱ्या पुढे सासूचे कांहीच चालत नव्हते, हे तिला माहीत होते .नव-याच्या धाकात आयुष्य गेलं आता तरी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायचा हक्क आहे.त्यात सुनेने किंवा मुलाने आडकाठी आणू नये हे मृणालचं मत.आणि मनाप्रमाणे म्हणजे तरी काय ....?
" मृणाल , मला ना नटावंसं वाटतं गं.छान साडी पीनप केलेली , मॕचिंग ब्लाऊझ , कानातले ,बांगड्या . लिपस्टीक...  अगं मृणाल , आमच्या लग्नात बरं का गं , माझ्या मैत्रिणीने मला नटवून छानशी लिपस्टीक लावली होती .माझी मीच माझ्यावर खूष झाले होते.पण बाई ss सासरच्या माणसांनी केवढा गहजब केला ! चालणार नाही म्हणे आमच्याकडे असली रंगोटी.पुसायला लावली गं मला आईबाबांनी लिपस्टीक."
" मला ना , एकदा गाडीजवळ उभं राहून पाणीपुरी खायची आहे."
" मार्निंगवाॕक सकाळीच हवा नाही का गं मृणाल ?"
" म्हणजे काय आई ? माॕर्निंगवाॕक उगीच का म्हटलंय ?"
" तसं नव्हे गं.उसंतच नसायची सकाळी फिरायला जाण्याएवढी ! सकाळचे केरवारे , डबे , तुझ्या सास-यांना दहाच्या ठोक्याला जेवण लागायचं .तव्यावरची पोळी पानात हवी असायची.तुला माहीतीय , माझा पहिला चहा ते कामावर गेल्यानंतर अकरा वाजता व्हायचा.खूप वाटायचं की कोरा पेपर आधी आपण उलगडावा , घुटक्याने चहा घेत तो वाचावा... "
मृणाल सासूचं मन जाणून होती.मन मारून जगावं लागल्याची तक्रार जरी नसली तरी खोलवरची दुख होती.
म्हणूनच सासूला हवं तसं जगण्यासाठी ती मदत करीत होती. 
 तिनेच सासूला स्मार्टफोन घेऊन दिला होता. तिच्या मैत्रिणींचा एक वाॕटसप ग्रूप करून दिला होता.
देवसाळे काकूंनी आता जशी कात टाकली होती. सुनेनं दिलेला आधाराचा हात धरून त्या मजेत रमतगमत रस्ता पार करत होत्या.
मृणाल आजुबाजूच्या लोकांचे शेरेताशेरे ऐकून सोडून देत होती.तिने आपल्या सासूचं हे बदलतं तरूण रूप जसं पाहिलं होतं तसंच प्रसंगी सासू आपल्याला कशी भक्कम पाठिंबा देते हे ही अनुभवलं होतं.मृणालचं बाळंतपण , तिला बाळाच्या संगोपनात मदत करणं , रात्री स्वतः बाळाला मांडीवर थोपटत मृणालला झोप घेऊ देणं , मृणालच्या समाजसेवेची जाणीव असणं हे गुण मृणाल जाणून होती.
दोन बायका न भांडता एकात्र नांदूच शकत नाहीत हा समज मृणालला पटलाच नव्हता.उलट सासू सूनच एकमेकींना जवळून ओळखू शकतात आणि एकमेकींच्या आधाराचा खांब होतात यावरा तिचा गाढ विश्वास आहे.
पेपरवाल्याने पेपर टाकल्याचा आवाज आला आणि मृणाल वळली. पेपरची घडी सासूसाठीच राखीव ठेवायची होती तिला !!
ही पोस्ट वाचणाऱ्या सासू आणि सूना दोघीही असतील. पोस्ट वाचून आप आपल्या भूमिका अद्यावत ठेवायला कांहीच हरकत नाही. दोघींचे संबंध ही गोड राहतील. दोघींनी पण एकमेकी साठी जे चांगले केले ते लक्षात ठेवायचे आणि जीवनात आनंद घ्यायचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...