बुधवार, १६ जुलै, २०२५

2053. अति लघु कथा - आई

 जेव्हा मी पावसातून भिजत घरी आलो...
बाबा ओरडले, "अरे गाढवा, छत्री का नेली नाहीस?"
बहीण म्हणाली, "आजारी पडल्यावरच मग ह्याला कळेल!"
आजोबा ओरडले, "पाऊस थांबेपर्यंत तुला थांबता नाही आले? एव्हढं भिजत यायची काय गरज होती?"
पण...
आई माझे केस पुसत म्हणाली, "मूर्ख आहे हा पाऊस! माझा मुलगा घरी येईपर्यंत याला थांबायला काय झालं होतं?"
★★★
बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. मी बाहेरुन आलेलो असतो. बाहेरच्या दाराच्या कोपऱ्यात भिजलेली छत्री ठेवतो आणि मागे वळतो. मधल्या दारात आई उभी असते, "उजव्या बाजूने पूर्ण भिजलायस... तिला उद्या घरी यायला सांग... मला भेटायचेय..."
★★★
मित्रांमधे खेळता खेळता उंबरठ्यावर बसलेल्या आपल्या आईला बघत तो दुडूदुडू धावत येतो आणि तिच्या कुशीत घुसतो. 
"आई, तुझ्या पोटात येण्याआधी मी कुठे होतो गं?"
"तू ना... कुठे बरं होतास? हां... तू ना माझ्या स्वप्नात होतास... माझ्या डोळ्यात होतास... माझ्यातच माझ्यातला थेंब होतास..." (टागोरांच्या एका कवितेवर आधारित)
★★★
संध्याकाळची वेळ. गाडी चालवत घरी येतोय. समोर काचेवर पाऊस. बाहेर अंधार होत चाललाय. फोन वाजतो, "अरे कुठे आहेस? पाऊस पडतोय... सावकाश ये... लवकर ये... मी वाट बघतेय...."
डोळ्यात निरांजनं घेऊन दारात वाट बघत उभी असलेली आई....
★★★
"गाढवा, अक्कल कधी येणारेय तुला? बाबा इथं मर मर मरतायत आणि तुला शिकवतायत. तर तू गणितात वीस पैकी दोन मार्क आणून मला न दाखवता पेपर फाडून टाकलास? तुला काय वाटलं मला समजणार नाही? आयतं मिळतंय ना म्हणून हे सुचतेय...
जा स्टॅण्डवर जाऊन हमाली करून पाच रुपये कमवून आण. मग कळेल तुला कमावणं काय असतंय ते...
बाबा बोलत नाहीत म्हणून तुझी थेरं वाढलीत...
पण आता नाही चालणारेय हे...
जोवर तू आपण होऊन बाबांना हे सांगत नाहीस तोवर तू उपाशी बसायचं...
काही मिळणार नाही तुला...
भूक लागली तर बाहेर जाऊन भीक मागून खा...
पण घरातलं मी देणार नाही..."
रात्री न बोलता तसाच झोपलो. आई बाबा दोघंही बोलले नाहीत.
दुसरे दिवशी सकाळी उठून बाबा अ़ॉफिसला जायच्या वेळी धाडस करून त्यांना सांगितले. एक दणका पाठीत आणि एक गालावर बसला आणि न बोलता ते ताडताड निघून गेले.
आतून आई आली. पदराला हात पुसत होती. माझ्या रडक्या चेहऱ्याकडे बघत मला जवळ घेतले. केसातून हात फिरवत, "राजा, अभ्यास कर रे. अभ्यासाशिवाय काही खरं नाही रे! अरे बाबा एव्हढं कुणासाठी करतायत? आपल्यासाठी, तुझ्यासाठीच ना! मग, त्यांना बरं वाटायला तू अभ्यास करायला हवास, मार्क चांगले पाडायला हवेत. चल, आता रडणं बंद. आता अभ्यास करायचा आणि मार्क चांगले पाडायचे, हं!"
तोवर बाबा परत येतात, "जा, गाढवा. जा... ते रडकं तोंड धुवून घे आणि जेवण कर... कालपासून ती पण उपाशीच आहे... तुझ्यासाठी !"
★★★
पार्टीत बसलोय. वेळ झालाय. साडेबारा वाजलेत. पार्टी संपते. बाहेर येऊन मोबाईल बघतो. तेरा मिस कॉल्स. परत कॉल करायचा धाडस नसते.
गाडी अंगणात आत घेतो. मधला लाईट सुरूच असतो. गाडीचा आवाज ऐकून दार उघडले जाते. पेंगुळल्या डोळ्यांनी, दिवसभराच्या शिणवट्याने थकलेली ती दारात. "अरे, किती फोन करायचे रे. काळजी वाटते. एक फोन घ्यायला काय होतंय रे. म्हातारं झाल्यावर कळेल तुम्हाला... चल, ये आता आत. आत कट्ट्यावर थंड ताक ठेवलेय ते पी आणि झोप... नंतर सकाळी ॲसिडिटी झाली म्हणून जेलुसिल खात बसशील आणि आता हे जरा कमी कर... तूही पन्नाशी पार केलीयस आता. काळजी घे रे आता जरा स्वतःची."
★★★
मुलाचं लग्न ठरलेलं. एक दिवस आईचा फोन. येऊन जा. मी जातो. आई बाबा समोर बसवून घेतात आणि हातामधे एक पाकिट कोंबतात. मी उघडून बघतो. मुलाच्या नावाने अडीच लाखाचा चेक!
"आम्ही तुला काही दिले नाही. पण नातवाला देऊ शकतोय आज. हे त्याच्यासाठी...!"
★★★
घराची थोडी दुरुस्ती करायचीय. पैसे असतात  पण गंमत करायची म्हणून मी विचारतो, "तुम्ही किती देणार?"
ताडकन् आई बोलते, "द्यायचं ते सगळं दिलेय. आता फक्त सईसाठीचे पाच लाख आहेत ते मी मोडणार नाही. ते तिलाच तिचं लग्न ठरलं की देणार. इथे जे करायचेय ते तूच करायचेस. तुला एक पैसा देणार नाही. हां पण कैरीचं लोणचं देणारेय..."
★★★
शनिवारी संध्याकाळी अंगणातल्या मारुतीसमोर भीमरुपी, रामरक्षा, करुणाष्टके म्हणून झाली की आम्हाला सगळ्यांना एकत्र बसवून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकत 'ईडापिडा टळो' म्हणत दृष्ट काढणारी...आई !
★★★
अशी आई असल्यावर आपल्याला दृष्ट लावायची कुणाची टाप आहे... 
आणि
म्हणूनच आईचा दिवस वर्षातला फक्त एकच नसतो, तर सगळं आयुष्यच तिचं असतं... रोजचा दिवस तिचाच...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...