"आई, मला काहीतरी सांगायचं आहे… पण भीती वाटतेय!"
ही गोष्ट आहे एका १५ वर्षांच्या मानसीची. अभ्यासात हुशार, सोज्वळ आणि आईशी खूप घट्ट नातं असलेली. तिची आणि तिच्या आईची केवळ आई-मुलगी एवढीच नव्हे, तर मैत्रीणीसारखी जवळीक होती. एकमेकींशी मोकळं बोलणं, हसणं, सल्ला घेणं असं सगळं रोजचंच.
एक दिवस ती गोंधळलेली आईला दिसली, मुलगी घाबरलेली आहे भेदरलेली आहे,आईच्या नजरेतून हे सुटले नाही. मानसी आईला म्हणाली,
🔹"आई... एक मुलगा आहे... त्याने मला प्रपोज केलंय... पण मनात खूप शंका आहे. फसवणूक होईल का? मी चुकीचा निर्णय तर घेणार नाही ना?"
आईच्या पोटात गोळा आला, साहजिकच आहे कारण तिच्या उदरातून आलेल्या मुलीने तिला काहीतरी धक्का दिला होता. पण आईने चेहऱ्यावर चिंता दाखवली नाही. बळ एकवटून आवंढा गिळत, तिने मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हळूच म्हणाली —
"मानसी , प्रेम वाटणं, प्रेम करणं काही चूक नाही. ते दोघांना निभावता आल पाहिजे. हे वय स्वतःला ओळखण्याचं सुद्धा आहे. तुझ्या आयुष्याचं स्वप्न काय आहे ते आधी पाहा, ते ठरव बाकी निर्णय नंतर घे. मी कायम तुझ्या पाठीशी आहे."
🔹त्या मायेच्या, समजुतीच्या शब्दांनी मानसी विचारचक्रात गुंतली. कसोटीच्या क्षणी तिला आई आपल्या सोबत आहे असे जाणवले. पुढच्या काही दिवसात तिला कळलं की, त्या मुलाच्या मनात फारसं गांभीर्य नव्हतं. स्वतःहून तिने नातं तोडलं. तिचा आत्मविश्वास टिकून राहिला — कारण तिच्या मागे तिची ‘मैत्रीणीसारखी आई’ होती.
आपल्या आसपास अशा अनेक घटना रोज घडत आहेत. किंबहुना खूप नकारात्मक ऐकायला, वाचायला मिळते आहे. अशावेळी आई म्हणून किंवा मातृशक्ती म्हणून आपणही सावध ऐकायला हव्यात पुढील हाका....
▪️माझी मुलगी यातील नाही असा गैरसमज कोणीच करून न घेता सावधपणे पुढील पिढीला हाताळले तर आपल्या घरात, आसपास अशा घटना घडताना दिसल्या तरी आपण त्या किमान थोपवू शकतो.
▪️आई-मुलगी हे नातं केवळ बंधनाचं नसतं,ते विश्वासाचं असतं.
मुलीला तिच्या भावनांची, विचारांची आणि अनुभवांसाठी स्पेस देणं गरजेचं आहे. वयाच्या बदलामुळे, तिला व्यक्त होण्यासाठी तिच्या स्वातंत्र्याची आवश्यकता आहे. त्यामुळे, मुलीला तिचे निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य द्यायला हवं, पण त्यासाठी तिच्या मनातील गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात.
▪️संवादाच्या पद्धतीत सुधारणा
चुकता चुकता शिकताना, आपल्या संवादाच्या पद्धतीत काही बदल करायला हवे. उदा. मुलीला "उशीर का झाला?" किंवा "तुम्ही हे का केलं?" असे प्रश्न विचारण्याऐवजी, कशी आहेस किंवा आजचं दिवस कसा गेला?" असे प्रश्न विचारले तर मुलीला तिच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करायला मदत होईल.
▪️स्वातंत्र्य आणि मर्यादा यांचा समतोल
मुलीला तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या, स्वातंत्र्याच्या आणि निर्णयांच्या बाबतीत "मूलभूत" शिक्षण देणं आवश्यक आहे.मोबाईल, सोशल मिडिया आणि इतर गोष्टींचा योग्य वापर कसा करावा हे मुलीला शिकवण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचं आहे.
▪️मुलीला धोके आणि जोखीम समजावून सांगणे
मुलीला तिच्या जीवनात नातेसंबंध, मित्र आणि बाह्य जगाबद्दल विविध जोखमींविषयी आणि संभाव्य धोके समजावून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
▪️व्यक्तिमत्त्वाची स्वीकृती
आई आणि मुलीचं नातं घट्ट असावं, त्यासाठी तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंचा आदर करावा. तिच्या वयाच्या प्रगल्भतेनुसार, तिच्या विचारांची बदलती दिशा स्वीकारून संवाद साधायला हवा.
▪️सामाजिक धोके आणि सजगता
प्रत्येक बदलाचं एक कारण असतं. त्या बदलांबद्दल, मुलीच्या विचारांवर, निर्णयांवर आणि वर्तनावर, आई – मुलगी संवादातील सहजपणा आवश्यक आहे. काहीवेळा समाजाच्या अनाठायी भीतीने या नात्यात संवाद, आपुलकी काही काळासाठी दुरावते.त्यासाठी सजगता आवश्यक आहे. सामाजिक धोके वेळीच ओळखायला हवेत.
▪️परिस्थितीचा अभ्यास आणि समायोजन
आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढण्याचे प्रशिक्षण मुलींना आपल्या कुटुंबातच मिळायला हवे. मोकळेपणा, चर्चा,अनुकरण यातून मुलींचे व्यक्तिमत्व घडते. त्यामुळे परिस्थितीशी समायोजन करण्याचे तंत्र तिला कुटुंबातून मिळायला हवे. काहीही झाले तरी मुलीशी संवादसेतू बांधायला आपणच पुढाकार घ्यायला हवा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा