शनिवार, २६ जुलै, २०२५

2103. घटस्फोटाशी फारकत

       आज आम्हाला सेपरेट होवून जवळजवळ वर्ष झालं होतं. ह्या एका वर्षात मी जे कमवलं त्यापेक्षा जास्त गमावलं होतं. वर्षभर आमचं बोलणं नसल्यासारखेच. फक्त सौम्या, आमची मुलगी, जी तिच्या बरोबर रहायची, तिला भेटायला गेलो की तोंडदेखलं बोलणं व्हायचं. आज माझ्या हातात आमच्या घटस्फोटाच्या फायनल हिअरींगची नोटिस होती. विचार आला, तिलाही मिळाली असेल. तिलाही माझ्यासारखे भरून येत असेल? तिलाही माझ्यासारखी कुठेतरी सल जाणवत असेल?  मी व्हॉटस ॲप वर तिचा मेसेज बॉक्स ओपन केला. आज एक वर्षाने मी तिला काही मेसेज करत होतो.
“हाय. तुला पण नोटिस मिळालीच असेल. संस्कृत मधे एक सुभाषित आहे, यथा काष्ठं च काष्ठं च... याचं गदिमांनी फार चपखलपणे भाषांतर करून ते गीत रामायणात वापरले आहे.  'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ' अगदी तसंच तुझं आणि माझं आहे. 
      कधी भेटलो... कुठे भेटलो हे एक वेळ तारीख वार कळेल... पण का भेटलो हे माहीत नाही... आपलं भेटणं हे विधिलिखित होतं... मला पाहता क्षणी तू आवडली. का असं म्हणु की तुझ्या साधेपणात खुललेल्या सौंदर्याने मला वेड लावले. त्यातूनही जीवघेणं तुझं हसणं पाहताक्षणी एकमेकांवर विश्वास बसला. एक आंतरिक आवाज आला. 'यू कॅन ट्रस्ट'. सगळं एकमेकांना सांगितलं. असं वाटलंच नाही की कालच भेटलो आहोत. एकमेकांना समजून पण घेतलं. 
     किती बोलत होतो ना आपण? रादर तू जास्त बोलायची आणि मी ऐकायचो. खरं म्हणजे तू बोललेली मला आवडायचं. त्या गोड बोलण्यात आणि त्या विचारात मी हरवून जायचो. सारखे तुझे विचार. दिवस रात्र असं करत करत तू माझ्या मनात खूप खोलवर उतरलीस. मग माझ्या कवितांतून आणि नंतर माझ्या कथांमध्ये. 
      तुला आठवतं? तू, तुझं मन माझ्यासमोर मोकळं करायचीस त्यावेळी माझ्यामधे आणि तुझ्या मनामधे छान. मनमुराद. दिलखुलास. संवाद चालायचा. तेंव्हा मी तुझ्या मनावर. आयुष्यावर कविता करायला लागलो. त्यावेळी तुझं मन एक "खुली क़िताब" होतं. ते मन जाणता जाणता मी तुझा आणि तू माझी कशी झालीस हे कळलंच नाही. माझ्या कविता आणखीन बहरल्या. मी तुला वेगवेगळ्या रंगात बघू लागलो. कधी पावसात भिजलेली. तर कधी कुठल्या तरी चित्राकृती प्रमाणे. प्रत्येक वेळी तुझं रूप किती आकर्षक होतं आणि मी त्याच सौंदर्याला लिहीत गेलो. माझं प्रेम आणखीच उत्कट झालं . पण... पण...
     आपल्या मधे कळत नकळत काही रेषा आणि काही भिंती उभ्या राहिल्या. मला जाणवायला लागलं की मी जी दोर पकडून ठेवली आहे ना. त्याच्या दुसर्‍या टोकाला कुणीच नाहीये. मी ज्या बंधनात तुझ्याबरोबर स्वतःला बांधलं होतं. ते बंधन माझं नाहिये.  कदाचित तुलाही तसंच वाटलं असेल. कदाचित काही गोष्टी तुला हव्या तशा झाल्या नाहीत. मान्य आहे. काही गोष्टी मला हव्या होत्या तशा झाल्या नाहीत. पण ह्याचं दुःख नाही. तर दुःख ह्याचं आहे की काहीतरी संपवावं लागतंय” 
      आमच्या दोघांच्याही हातात घटस्फोटाचे पेपर होते. दोघेही शांत आणि निर्विकार होतो. कुणीच जिंकलं नव्हतं. दोघेही हरलो होतो. केस चालू असताना जेंव्हा कोर्ट मधे भेट व्हायची तेंव्हा कधीच ओळख नसल्यासारखे एकमेकांना बघायचो. पण त्या नजरा आज अपराधी झाल्या होत्या. दोघांच्याही मनात एक गिल्ट होती. आमच्यामुळे सौम्याला सहन करावं लागत आहे. आमचे इगो इतके मोठे आहेत की त्यापुढे आम्हाला त्या निरागस जिवाची काहीही फिकीर नाही.
      काय गंमत आहे ना? कोर्टात एकमेकांविरुद्ध काय बोलायचं हे वकील आम्हाला सांगायचा. त्यातल्या बर्‍याच गोष्टी, मला बोलायच्याच नव्हत्या. पण “असं बोलला नाहीत तर घटस्फोट होणार नाही” ह्या दबावाला मी बळी पडलो होतो. मला खात्री आहे की ती पण अशाच दबावाला बळी पडली असणार. बर्‍याच वेळा भावनेच्या भरात चुकीच्या गोष्टी पण बोलल्या गेल्या. लगेच स्वतःला सावरून घेतलं. पण त्याबद्दल माफी मागायची तर परत इगो आड येत होता. 
       आपल्या बाजूने निकाल लागला म्हणून दोन्हीकडचे वकील खुश होते. ज्यांना वाटत होतं की आमचा घटस्फोट व्हावा असे नातेवाईक सुद्धा खुश होतील. दोघांच्या आई बाबांच्या डोळ्यांत मात्र संमिश्र भावना होत्या. त्यांना कळत नव्हतं की हा मोकळा झाला म्हणून आनंद मानावा, का हा आता एकटा आणि एकाकी म्हणुन दुःख. मी मात्र शून्यात हरवलो होतो आणि ती विमनस्क अवस्थेत बसली होती. कोणे एके काळी आम्ही एकत्र उभे होतो. आज एक क्षण असा आहे की आम्ही एकमेकांसमोर उभे आहोत. कोणे एके काळी मी तिच्या डोळ्यात स्वप्नं पहिली होती. आज असा क्षण होता की आम्ही समोरासमोर असून सुद्धा नजर चुकवत होतो. 
       मी माझ्या आणि तिच्या आई बाबांना विनंती केली. "तुम्ही पुढे व्हा. मी हिला अर्ध्या तासात घरी सोडतो." तिनेही मानेने तिच्या आई वडीलांना जाण्याची खूण केली. मला तेवढंच समाधान वाटलं की नातं तुटलं असलं तरी अजून विश्वासाचा एक धागा बाकी आहे 
      "चल… जरा कॉफी घेवू."  
     आम्ही ड्राईव्ह करून नेहमीच्या कॉफी शॉप मधे आलो. त्या शॉप मधे आमच्या टिपिकल टेबल वर  लग्नाआधीच्या डेटिंगच्या आठवणी घर करून आहेत.  
"अभिनंदन… तुला जे हवे होते ते मिळाले" ती म्हणाली.
"शेवटी तू जिंकलीस तर… तू घटस्फोट मिळवला." 
"घटस्फोटाने मी काय जिंकलं?"
मी काहीच बोललो नाही. तशी ती म्हणाली, "कोण जिंकलं माहीत नाही, पण सौम्या मात्र हरली, आणि खूप काही हरवून बसली." 
मला जाणवत होतं की खूप काही चुकलंय. माझ्या कडून आणि तिच्या कडून सुद्धा. पण घड्याळाचे काटे बरेच पुढे सरकले होते. कॅलेंडरची बरीच पानं उलटली गेली होती. 
 "कोर्टात तुझ्या वकिलाने मी चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला आणि तू गप्प राहिलास" तिच्या आवाजात दुःख जाणवत होतं.
 "ते माझं चुकलं" मी कबुली दिली आणि म्हणालो "आणि तू? मी तुझा पैशासाठी छळ करत होतो? तुला मारायचो?"
 "नाही. पण माझ्या वकिलाच्या असल्या अर्गुमेंटस वर मी गप्प राहिले हा माझा मूर्खपणा होता...पण...इतके दिवस झालेल्या मानसिक त्रासामुळे मी विचारशक्ती हरवून गेले आहे."
"मी देखील" 
बोलता बोलता तिच्या हातून कप हिंदकाळला आणि गरम कॉफीचे थेंब तिच्या बोटांवर पडले.
"सावकाश…. पोळेल… जपून धर जरा" मी नकळत बोलून गेलो… 
तिने चमकून माझ्याकडे पाहिले… 
"तुझी पाठ दुखवायची थांबली का?" मी विचारलं.
"पूर्ण नाही अजून… फार दुखायला लागली तर पेन किलर घेते."
"तू पाठीचे एक्सरसाईज पण नीट करत नाही" माझ्या बोलण्यातली खिन्नता मिश्रित उद्विग्नता मलाच जाणवली… 
"तुझा मायग्रेन… अजून त्रास होतो?" तिच्या आवाजातला तुटकपणा कमी झाला होता… 
"हंss… डॉक्टर म्हणाले स्ट्रेस कमी कर म्हणजे मायग्रेनचा त्रास कमी होईल." 
"सकाळी प्राणायाम आणि योगासनं करतोस का?"
     मी काही उत्तर न देता शांत बसलो. ती एकटक माझ्याकडे पहात होती. ओढवलेले तिचे डोळे माझ्या चेहर्‍यावरचा तणाव वाचत होते. तिच्या डोळ्यावरून वाटत होतं की ती काल रात्री झोपली नसावी. 
"तुला आत्ता पन्नास लाख रुपये द्यायचे आहेत." माझ्या ह्या बोलण्यावर ती काहीच बोलली नाही.
 "एक पंधरा दिवसात आपला बावधन मधला फ्लॅट तुझ्या नावावर करतो." 
"तो तर नव्वद लाखाचा आहे… तुला फक्त पन्नास द्यायचे आहेत." 
"आय नो. पण राहु दे. सौम्या पण मोठी होतीय. खर्च वाढतील."
"मग... जावू दे... काही नाही" तिने तिचं बोलणं अर्धवटच बंद केलं. बोलता बोलता तिने डोळे पुसले. मला देखील भरून आलं होतं. पण माझ्यातला पुरुष मला अडवत होता... दोघही शांत बसलो.
      मनातले कोलाहल आता कमी झाले होते त्यामुळे बाहेरचा आवाज जाणवत होता. दोघेही भरून आलेल्या मनांनी एकमेकांना पहात होतो. 
"मला काही बोलायचे आहे" मी मनाचा हिय्या करून म्हणालो
"बोल ना" तिच्या आवाजातला तुटकपणा आता पूर्णपणे गेला होता.
भेटीचे शेवटचे काही क्षण राहिले असल्याचे तिला जाणवत होते… "पण बोलायला भीती वाटते." 
"पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का?... सरळ सांग… कदाचित मला जे बोलायचे आहे पण मी बोलू शकत नाही असे पण असेल" तिच्या ह्या बोलण्याने मला धीर आला… 
"ह्या एक वर्षाच्या काळात असे अनेक क्षण आले की जिथे मी तुला खूप मिस केलं." 
"लग्ना आधीचे आणि नंतरचे गोल्डन डेज मी पण विसरू नाही शकत" तिच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. 
      मी टिशू स्टँड तिच्याकडे सरकवत घोगऱ्या आवाजात म्हणालो. "जे झालं ते झालं. दुर्दैवाने. दोघेही त्याला जबाबदार आहोत. आपण आपल्या नात्यापेक्षा इगोला जास्त महत्व दिलं. गोष्टी नीट, शांत डोक्याने एकमेकांशी बोलून सोडविता येतात हे माहिती असून सुद्धा आपण वितंडवाद आणि मतभेद यांना प्राधान्य दिलं. कदाचित...एक वर्षांपूर्वी आपण आत्ता बसलोय तसे बसून बोललो असतो तर ही वेळ आपल्या वर आली नसती. अर्थात ही सगळी पश्चात बुद्धी. सगळं होवून गेल्यावर सुचलेलं शहाणपण."
       थोड्या पॉझ नंतर मी कंटिन्यू केलं… 
"ओके...आपण अजूनही आपल्या आयुष्याला एक वळण देवू शकतो."
 "कसलं वळण?" तिच्या बोलण्यातून काहीतरी तुटल्याचे दुःख जाणवत होते. 
 "आपण परत एकमेकांना चान्स देवू. आपण परत एकदा एकत्र येऊन राहू. तू मी आणि सौम्या. एका नवरा बायको बरोबरच पूर्वीसारखे मित्र म्हणून राहू. थोडा मी माझा इगो बाजूला ठेवतो. थोडा तू देखील ठेव. थोडा मी माझा आनंद आणतो, थोडा तू पण आण. काही दुःख, वेदना, ज्या वाटेत येतील त्या वाटून घेऊ. आपल्या हृदयातील प्रेमाची कवाडं जरा उघडू. गैरसमजाचं जळमट झाडून टाकू. जरा फ्रेश हवा आत आली की सुखाचं आयुष्य परत सुरु होईल."
 ती अवाक होऊन पाहात होती…. 
"अरे पण हे पेपर... हा घटस्फोट?"
"घाल चुलीत ! आपल्या होणार्‍या फालतू वादांच्या लाकडांबरोबर ही कागदं जाळून टाकू. मी उद्याच वकिलाकडे जातो आणि त्यांच्यातर्फे कोर्टाला विनंती करतो की आमचा डिवोर्स रद्दबातल करण्यात यावा. व्हॉट से?"
     तिच्या चेहर्‍यावरचा तणाव पूर्ण गेला होता. हलकेच हसुन ती म्हणाली "ते जज आपल्याला वेडं म्हणतील. पहिली केस असेल जिथे डिवोर्स घेतल्यावर नवरा बायको दुसर्‍या दिवशी तो कॅन्सल करा म्हणुन विनंती करत आहेत."
      एक वर्षानंतर दोघेही एकत्र मनमोकळेपणाने हसलो.
… 
      थोडे रीलॅक्स झाल्यावर मी म्हणालो 
"एक काम करू... मी आणि तू तुझ्या आणि माझ्या आई बाबांना जाऊन भेटू आणि झालेल्या मूर्खपणाची कबुली देवू आणि त्यांची माफी मागू. आपल्या अहंकारापायी त्या चौघांनाही आपण खूप मनस्ताप दिला आहे."  
 "आणखीन एक सांगू... तुझ्यापासून दूर राहिल्यावर मला कळलं की मी काय मिस केलं आणि काय हरवलं ते" मी कबुली दिली.
 "माझे काही वेगळे नाही अरे" तिने माझा हात हातात घेऊन थोपटला. त्या स्पर्शात मला पूर्वीची आश्‍वासकता मिळाली आणि पुन्हा नव्याने "ती" मिळाली.

© ® विक्रम इंगळे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...