दिनकर सर... विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले एक सेवामुक्त शिक्षक. तीन दिवसांपूर्वी शहरातील एका रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचं निधन झालं होतं.
त्यांच्या स्मरणार्थ आज प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. वेळ होत चाललेला, म्हणून हळूहळू लोक जमू लागले.
ठरलेल्या वेळेस कार्यक्रम सुरू झाला. एकामागून एक विद्यार्थी आणि काही लोकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कार्यावर प्रकाश टाकला.
सभेला रंग चढत असतानाच एक अनोळखी व्यक्ती आत आली आणि म्हणाली —
"हा लिफाफा दिनकर सरांच्या रुग्णालयातील उशीखाली सापडला. त्यावर त्यांनी लिहिलं आहे — 'हा केवळ माझ्या प्रार्थना सभेतच उघडावा'."
सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सरांच्या इच्छेनुसार लिफाफा उघडण्यात आला. त्यात एक पत्र होतं. सभेत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं ते पत्र मोठ्यानं वाचायला सुरुवात केली...
📜 पत्राचा मजकूर:
"प्रिय बंधूंनो,
जेव्हा हे पत्र वाचलं जात असेल, तेव्हा मी या जगातून निघून गेलो असेन. हे पत्र विशेषतः माझ्या शिक्षक बांधवांसाठी आहे — माझ्या जीवनातील अनुभव त्यांच्याशी शेअर करण्यासाठी. जर त्यातून थोडी जरी प्रेरणा मिळाली, तर मी माझं आयुष्य सार्थकी लागलं असं समजेन.
साल होतं १९७५. शिक्षक म्हणून २० वर्षं झाली होती. एकदा वृंदावनला धार्मिक यात्रेस गेलो होतो. तिथं एकदा रामसुखदासजींचं सत्संग ऐकायला गेलो. प्रवचन संपल्यानंतर मी त्यांना विचारलं —
> "स्वामीजी, माझी ईश्वरावर नितांत श्रद्धा आहे, पण मला पूजाअर्चा, विधी वगैरे करणं फारसं जमत नाही. तरीही मला ईश्वराची कृपा कशी लाभेल?"
स्वामीजी थोडा वेळ शांत राहिले. मग म्हणाले —
"भक्ती म्हणजे सेवा. जर आपण प्रत्येक प्राणीमात्रात ईश्वराचं रूप पाहिलं आणि मनापासून सेवा केली, तर तीच खरी भक्ती!"
मग त्यांनी मला विचारलं —
> "तू काय करतोस?"
"मी एक शिक्षक आहे."
"मग तुझं कामच तुझी भक्ती समज. जर प्रत्येक व्यावसायिक आपल्या कामात सेवा आणि कृतज्ञतेची भावना ठेवेल, तर तो ईश्वराचीच सेवा करत असतो."
हे विचार मनात घेऊन परत शाळेत आलो. पण लवकरच लक्षात आलं की, मुर्तीची भक्ती करणं किती सोपं आहे! आणि मुलांचं शिक्षण... अहो, त्या चंचलतेने, वात्रट स्वभावाने, सततच्या प्रश्नांनी, हे तर अगदी कठीण!
कधी शहाणे, कधी मंदबुद्धी, कधी आज्ञाधारक तर कधी खोडकर विद्यार्थी. त्यात आठवीतला एक विजय नावाचा मुलगा — सतत शाळेत अडचणी निर्माण करणारा. शिक्षणात रस नाही, गैरहजेरी, खोडसाळपणा... त्याच्या अनेक कारस्थानांमुळे मी अनेकदा संतापून त्याला मारायचो.
एक दिवस बातमी आली की त्याचा भीषण अपघात झाला आहे आणि दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेत. थोडं दुःख झालं पण दिलासाही वाटला की आता काही दिवस तो शाळेत येणार नाही.
पण काही दिवसांनी मी विचारांत पडलो — ही माझी भक्ती आहे का? एका विद्यार्थ्याच्या अनुपस्थितीचा आनंद घेणं? नाही, काहीतरी चूक आहे.
मी निर्णय घेतला की शाळेनंतर मी त्याच्या घरी जाऊन त्याला शिकवेन.
जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो, तो आश्चर्यचकित झाला. मी त्याला समजावलं, विचारपूस केली आणि शिकवायला सुरुवात केली.
हळूहळू तो बदलू लागला. अभ्यासात रस घेतला. खूप हुशार होता, फक्त योग्य मार्गदर्शनाची आणि प्रेमाची गरज होती.
परीक्षा आली, त्याने छान गुण मिळवले – ७३%!
नंतर मी ट्रान्सफर होऊन दुसरीकडे गेलो. काळ पुढे सरकत होता...
अनेक विद्यार्थी आले-गेले, पण विजयसारखा अनुभव जीवनात ठसा उमटवून गेला.
१० वर्षांनी, आणि हे पत्र लिहायच्या आठवडाभर आधी, मला हॉस्पिटलमध्ये जबरदस्त ब्लड प्रेशरनं आयसीयूमध्ये दाखल केलं गेलं.
शुद्धीवर आलो तेव्हा एक डॉक्टर माझं प्रकरण पाहत होता. तो म्हणाला —
"सर, आपण इथे?"
"हो, पण तुम्ही कोण?"
"मी विजय!"
तोच विद्यार्थी — आज एक यशस्वी हार्ट सर्जन! आणि म्हणतो — "सर, तुम्हीच माझं आयुष्य बदललं."
ते ऐकून मी समाधानी झालो. विजयचं यश हे माझं रिपोर्ट कार्ड होतं — इश्वराचा शिक्कामोर्तब.
त्यानंतरची रात्र... मी झोपलो. वाटलं, हीच कदाचित माझी शेवटची रात्र आहे.
आज पहाटे सूर्यदर्शन झालं… सूर्यास्त दिसेल की नाही माहीत नाही.
हे पत्र मी सकाळी ३ तासांपूर्वी लिहायला सुरुवात केलं.
हे पत्र सांगतं की — प्रेमानं, मनापासून केलेली सेवा कधीही वाया जात नाही.
शिक्षकांनो, तुम्ही कोण आहात हे विसरू नका!
तुमच्यामुळेच डॉक्टर, इंजिनीयर, कलेक्टर, मंत्री घडतात.
तुम्हीच या राष्ट्राचे शिल्पकार आहात.
चला... येतो मग मी आता.. 🙏🙏🙏
पत्र संपलं.
सगळीकडे शांतता पसरली होती.
पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना —
"दिनकर सर गेले नाहीत — ते आजही आपल्यात आहेत... एका अमर प्रेरणेच्या रूपात."
ही कथा शिक्षणक्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने वाचावी अशी आहे.
🙏 शिक्षक म्हणजे फक्त ज्ञानदाते नाहीत — ते जीवनाचे खरे शिल्पकार असतात.✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा