"रामराया कल्याण करील तुझं,..अरे आई खुप मायाळू आहे तुझी आणि बायको तर साक्षात लक्षुमी ए तिच्या कृपेने सगळी प्रगती साधतोय तू आयुष्यात,... वासुदेव हे बोलत होता तर शिवाने त्याला हातानेच पुरे बडबड नको अशी खुण केली,..."अरे तुला काय वाटलं वासुदेवा तुझी बडबड ऐकायला नाही आलो मी बाहेर,..तू इतकी सुंदर भजन म्हणत फिरतोस त्याच बक्षीस आईने दिलंय तुला,..हे घे दहा रुपये आणि चहा पी गरम गरम,..वासुदेव शिवाकडे बघत हसला,..."गाणं आवडलं पण बडबड नको वाटली तुम्हाला,...पण एक सांगतो माझ्या ह्या बडबडीने घरात जाऊन बघा आई आणि बायको कश्या आनंदी झाल्या असतील,..."येतो मी म्हणत वासुदेव निघाला,..."रामाच्या पारी दान पावलं...दान पावलं..."
शिवा मनात पुटपुटत आला,..ह्या दोघी कधी मला पटल्या नाही,... दोघी नेहमी दुरमुखलेल्या आणि हा म्हणतो,..एक लक्षुमी आणि एक मायाळू,..अरे स्वतःच्या बळावर कमावतो मी ह्यांच्या मुळे कसची लक्षुमी,..हे म्हणत तो घरात शिरला,..तसं वातावरण बदललेलं जाणवलं त्याला,..आई काहीतरी हसुन सांगत होती सूनबाईच्या कानात,...शिवाला आश्चर्य वाटलं दोघींचे चेहरे नेहमी सुतकी असतात आज इतके खुलले कसे..?पण त्याने मुद्दाम दुर्लक्ष केलं...झटकन आवरून तो ऑफीसला गेला...
दुपारी जय माऊली पाणी देता ना,..गेटमधून आवाज आला,..तो सकाळचाच वासुदेव,...शिवाची आई पाणी घेऊन खाली गेली,...काय माऊली जमलं का सकाळचं नीट,...?माऊली हसली म्हणाली,"अगदी छान पण पूर्वी तुझे वडिल म्हणायचे तसं नाही जमलं,...त्यांना घरी गेल्यावर विचार,..जोश्याच्या दारातल्या हाका काय होत्या,..वासुदेव हसला,"माऊली खरंच कमाल आहे तुमची,..काही माणसं बाईला कचरा समजतात जगण्यात,....तिथं तिचं मन सगळं तुटून जातं पण तुम्ही ते सावरलं होतं.. माझ्या बापाच्या हाकेत त्यांनी सांगितलं मला,....!उद्या मी सगळं नीट पाठ करून येईल येतो आता,..."
सकाळी सकाळी शिवाची सुरुवात चहात साखर कमी झाली म्हणून बायकोच्या अंगावर कप फेकेपर्यंत झाली होती,...ती बिचारी लहानसं तोंड करून बाकी कामं करत होती,.. तेवढ्यात हाक आली,...
"रामाच्या पारी
जोशींच्या दारी
आली वासुदेवाची स्वारी..."
शिवा आधीच चिडलेला होता,... तो गॅलरीतून ओरडला,.."रोज रोज तुला पैसे देणार नाही मी,..चल निघ बघू,..."
वासुदेव हुशार होता त्याने लगेच संवाद सुरू केले,.."अरे साहेब तुमची हुशारी सगळ्या दुनियेला प्यारी आहे,..तुमची बायको लक्षुमीच रूप आहे,..ती खूप कष्ट करते म्हणून तुमच्या नशिबी सुख आहे,..तिच्यामुळे घराचं वैभव वाढेल,..तुमची हुशारी त्याला तिची साथ मोलाची आहे,..आणि आई तर प्रेमाचा पाझर आहे,..ह्या दोघींशी छान वागलं की जगतात सुखच सुख आहे,..."
मला काही देऊ नका साहेब पण हे पक्क मनात ठेवा सगळं असंच आहे,...एवढं बोलून तो वळाला पावली खेळत पुढच्या दारी पळाला,..शिवा गॅलरीतून घरात आला
मघाशी लहान तोंड घेऊन फिरणारी ती फ्रेश दिसत होती,..आणि आईदेखील प्रसन्नपणे देवघरात पूजेला बसली होती...त्याच्या मनात वासुदेवाचे शब्द घुमत होते...त्याच लक्ष बायकोकडे गेलं,..ती तिच्या कामात मग्न होती पण चेहरा आनंदी होता,..मनाशीच काहीतरी हसणारा होता...त्याला वाटलं हिने वासुदेवाच बोलणं ऐकलं असेल,..हिच्या पायामुळे लक्षुमी हे ऐकून तर हि एवढी खुश नसेल,..पण खरंच ह्या पाच एक वर्षात हिने खरंच खुप साथ दिली आपल्याला,..फारसे खर्च नाही,आहे त्यात भागवते उलट काहितरी मागे टाकून देते अडीअडचणीला आपल्याला,.. आपण कितीही चुकलो तरी समजून घेते,.. खरंच वासुदेव सांगतो ते काही खोटं नाही,..आईकडे त्याच लक्ष गेलं,..आई मायाळू म्हणाला वासुदेव,....खरंच आहे आपणच रागवत राहतो गावाकडून इकडे आणलं तरी ऍडजस्ट करून राहते,....आपण चिडचिड करतो तरी दिवसभरात घटकाभर बसतेच आपल्या जवळ येऊन,..ह्या सगळ्या विचारांनी त्याच त्यालाच छान वाटायला लागलं,....आता तो ही दररोज वासुदेवाच्या हाकेची वाट बघायला लागला,..त्याला बायकोत आणि स्वतःमध्ये होणारे बदल जाणवायला लागले,...तिला ह्या महिन्यात मानसिक उपचाराला न्यावं लागलं नाही,....वातावरण बदलून गेलं सगळं,...तो एक दिवस आईला म्हणाला,"आई अग तुला जाणवतंय मी आणि माझी बायको किती बदललोय?आणि तू देखील जास्त आनंदी वाटत आहेस मला,.."आई हसली त्याच डोकं मांडीवर घेत त्याच्या केसात हात फिरवत आई बोलू लागली,..,"चाळीस एक वर्षापूर्वी असाच संसार होता माझा,..मी नवी नवरी,सासुबाई म्हणजे तुझी आजी आणि तुझे तापट बाबा,..कश्यावरूनही माझ्यावर चिडायचे,..घाबरून मन भित्र झालं,..त्याकाळी असे मनासाठी डॉकटर नव्हते रे,...एक दिवस अचानक वासुदेवाची हाक आली,.. सासूबाईंनी मला वाटीभर तांदूळ त्याच्या पिशवीत टाकायला संगितले,....मस्त पहाट ,पक्ष्यांचा किलबिलाट,...आकाशात केशर सांडून तो सूर्यदेव येतोय हे सांगत सोनेरी प्रकाशाची चादर अंथरली होती,..सगळं कसं प्रसन्न आणि त्यात ती गच्च मोरपिसांची टोपी आणि पांढराशुभ्र वेष धारण केलेला हसरा वासुदेव,..मी तांदूळ देताच म्हणाला,.."लक्षुमी आहेस ग तू,..तुझ्यामुळं घराणं फार पुढं जाईल,.. सगळी सुख पायाशी येतील,..हे सगळं ऐकून मन आनंदी झालं,..आजपर्यंत मनाला सकारात्मक हाक कोणी दिलीच नव्हती,..तुझे बाबा रागाने वाईटच बोलायचे,..तू दळभद्री,मूर्ख त्यांच्या ह्या शब्दांनी वेडी होत असलेली मी वासुदेवाच्या ह्या शब्दांनी आनंदून गेले,...मन स्वतःला मान द्यायला शिकलं,.. सासूबाईंनी हेरलं ह्या वासुदेवाच्या हाकांचं औषध लागु पडलं पोरीला,..आता रोज पहाटे त्या देखील वासुदेवाच्या हाकेकडे कान लावायच्या,...मी त्या शब्दांनी खुलत फुलत गेले,..आत्मविश्वास वाढला,..हळूहळू तुझ्या बाबांना माझा बदल जाणवला,..त्या हाकांनी बदललं सगळं,...सासुबाई म्हणाल्या,"हा वासुदेव क्षणभर आपण दिसणारा देव समजू,..त्याने दारात येऊन हाक मारून जाग केलं,..एकमेकांचा आणि स्वतःविषयी स्वतःच आदर वाढवला,..तसाच देवही अंतरमनातून हाका मारत असतो रे त्या ऐकू येण्याची क्षमता वाढवा,..कदाचित त्या ऐकू याव्या म्हणूनच त्याने हा वासुदेव पाठवला असेल,...पुढे खुप वर्ष हा वासुदेव येत राहिला,..शिवा तुला फार नसेल आठवत कारण तुला लहानपणापासून इथे शहरात मावशीकडे पाठवलं होतं,...पण ज्या क्षणी लग्नानंतर तू देखील तुझ्या बाबांसारखाच वागू लागला आणि सुनबाईला मनाच्या डॉकटर कडे नेलं,..त्याक्षणी ह्या वासुदेवाचा शोध घेतला मला गावीच कळलं होतं ह्या शहरातच आहे हा,..त्याला भेटले आणि त्याला त्याच्या वडीलांकडुनही इतिहास कळला,.. मग सुरू झाल्या तुला अहंकारातून जागवण्याच्या या हाका आणि सूनबाईला हरवून जाणाऱ्या आत्मविश्वासाच्या जगात टिकवण्याच्या हाका,.. आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणतंय आपण कोणीतरी छान आहोत हे मनात रुजतं आणि मन उभारी धरतं,..इतक्या सोप्या हाका आहेत ह्या..तू कष्टाळू आहेस, लक्षुमी आहेस हा शब्द सन्मानच आहे ना,.. त्यात सत्य किती ते माहीत नाही पण त्यातुन माणसं उभी राहतात मी स्वतः अनुभवलं आहे ते आणि ह्या काही दिवसात तू देखील अनुभवलं,..सुनबाई तिकडून हसत म्हणाली ,"आणि मी देखील अनुभवलं आई,....आणि आता मला कधीच मनाच्या डॉकटर कडे जावं लागणार नाही,..कारण हा वासुदेव तरी आज आहे उद्या नाही अश्या हाका मारायला पण आता त्याने मनातला आत्मविश्वासाचा तो वासुदेव जागा करून दिला जो मनाला मरगळ आली की अवर्जुन हाक मारून सांगेल,.."तुझ्या अंतर्मनात लक्षुमी आहे,...जिद्दीची,कष्टाची,यशाची मग मन रमेल त्या हाकांमध्ये आणि जगेल आनंदाने,.."शिवाला हे सगळं ऐकून खुप छान वाटलं बर झालं ह्या हाका आयुष्यात वेळेवर आल्या नाहीतर आपण अहंकाराने हे आंनदी घर गमावलं असतं,...
पहाट झाली आणि चिपळ्या वाजल्या,..."वासुदेवाची स्वारी,आली बघा दारी,.."
ते ऐकून शिवा स्वतः बाहेर आला,..वासुदेवाला चहाला पैसे दिले,..आणि म्हणाला,"वासुदेवाची ही स्वारी ,अशीच येऊ देत जा आमच्या दारी,....आत्मविश्वास वाढवणाऱ्या हाका मनाला ऐकवून.. घेऊ द्या त्याला उंच भरारी,..."
वासुदेव हसला,..पावली खेळत पुढे सरकला,...शिवा मात्र त्याच्या मोरपंखी टोपीकडे बघत राहिला त्यातुन त्याला मोरपिसाशी घट्ट नातं असणारा कृष्णच दिसला,....जो गीतेतूनही अश्याच हाका मारून जगण्याचं मर्म सांगत असतो आपल्याला...
©स्वप्ना मुळे(मायी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा