गुरुवार, १७ जुलै, २०२५

2065. प्रत्येकाचे जगणे : पण वेगवेगळे

 विकेंड संपला. नाष्टा करायला बसलो की गेल्या दोन दिवसातील खर्च लिहायचे बाकी राहिलेत लक्षात आलं. नोकरदार माणसाचा पगार ३० तारखेला झाला की पुढच्या दहा दिवसात कर्जाचे हप्ते जातात. तेवढा काळ तो जरा आनंदात घालतो. एकदा अकाउंट मधून पैसे कमी व्हायला लागले की आनंदही कमी कमी होत जातो. महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात तो आठवडा कसा मॅनेज करायचा ह्याच चिंतेत असतो. प्रत्येकाच्या बाबतीत कमीअधिक प्रमाणात असंच असतं. मी पण काही वेगळा नाही.
खरं तर माणूस कितीही पुढं गेला, कितीही वयाने प्रगल्भ झाला, तरी त्याच्या आयुष्यात कर्ज, जबाबदाऱ्या आणि रोजच्या जगण्याच्या चिंता या काही सुटत नाहीत. ही सगळी मंडळी आपापल्या परीने सुखी असण्याचा आभास निर्माण करून जगत असतात. पण रात्री अंथरुणावर पडल्यावर सगळ्यांच्या मनात असं काहीसं चालू असतं की, “हे एवढं कर्ज कसं फेडायचं?”, “आपल्यावर इतकी जबाबदारी आलीय ती नीट पार पाडता येईल का?”, “हे पैसे पुरतील का?” आणि “उद्या काय होणार?” अशा हजारो प्रश्नांची गर्दी असते. 
मी अनेकदा स्वतःलाही या प्रश्नांच्या गुंत्यात अडकलेलं पाहिलंय. रात्रभर झोप न लागता विचारांचं काहूर माजत राहतं. माणूस बाहेरून कितीही धीराचा, स्थिर मनाचा दिसला तरी आत खोल कुठंतरी तोही अस्वस्थ असतो. मीसुद्धा असाच अस्वस्थ होतो. वरवर मी कितीही शहाणा झालोय असू वाटत असलं तरी या चिंतांनी मीही वेढला जातोच.
रात्री उशिरापर्यंत कर्जाच्या हप्त्यांचा हिशेब मांडत बसलो की आपल्याला लक्षात येतं की सुख समजत असलेल्या गोष्टींत किती त्रास लपला असतो. घरातला खर्च, शेतीचा खर्च, आजारी माणसांचं औषध, आणि त्यातूनच कुणीतरी मागणी केली की “थोडे पैसे मदतीला दे”, तर मग मनात एक अपराधीपणाची भावना निर्माण होते. मी देऊ शकत नाही म्हणून मला स्वतःचा राग येतो. “तू इतकं कमवतोस, पण तरीही देऊ शकत नाहीस” हा विचार सतावत राहतो. पण मग वाटतं, कुठे थांबायचं? सगळ्यांना मदत करत बसलो तर स्वतःच्या घरात अंधार राहील. आणि या सगळ्या विचारांत रात्रीचा अंधार आणखी गडद होत जातो.
एखादा माणूस आपल्या ओळखीच्या लोकांत, मित्रमंडळींत मोठा दिसावा म्हणून, सन्मान टिकवावा म्हणून कर्ज घेत राहतो, कधी घरासाठी, कधी सणासाठी, कधी कोणाच्या लग्नासाठी. सुरुवातीला वाटतं, थोडं घेतलं तरी परत होईल. पण जसजसे दिवस जातात, ते कर्जही वाढत जातं, आणि माणसाची झोप हरवते. मी अनेकदा असं पाहिलंय, बातम्या ऐकल्यात की कर्ज घेतल्यामुळे, ते परत करता आलं नाही म्हणून लोकांनी जीव दिला. तेव्हा वाटतं, असं काही करू नये. जगातल्या कोणत्याही समस्येपेक्षा जीव मौल्यवान असतो. पण तरीही हे असह्य ओझं उचलताना मनात निराशा येतेच. “आपण अपयशी ठरलो का?” असं वाटतं. “कुठे कमी पडलो?” हे शोधण्याचा प्रयत्न होतो.
मनात आणखी एक विचार पक्का रुजतो की, सगळ्या सुखांचं मुळं पैसा नाही. पैसा हा फक्त साधन आहे, साध्य नाही. पण साधनही नसल्यावर साध्य तर दूरच राहतं. जगायचंय, कुटुंब सांभाळायचंय, आपल्याच आणि कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करायचंय, हे सगळं पैशावरच चालतं. म्हणून पैशाचा विचार न करणं अशक्य आहे. आपल्याला असं खोटं समाधान देत राहावं लागतं की “पैसा काहीच नाही, प्रेम असलं की झालं”. खरंतर प्रेमच मुख्य आहे, पण पोट भरल्यावरच प्रेमाचंही समाधान मिळतं. माणूस उपाशी असताना कितीही मोठे तत्वज्ञान सांगितलं तरी तो शांत होत नाही.
माझा एक जुना मित्र म्हणायचा, “गरीब माणसाला सर्वांत मोठं स्वप्न असतं, किमान एवढं कमवावं की उद्या काय खावं हा प्रश्न पडू नये.” आणि श्रीमंत माणूस म्हणतो, “इतकं मिळवावं की मला काहीच कमी पडू नये.” हे दोघंही धडपडत असतात, एक गरिबीवर मात करण्यासाठी, एक असलेल्या संपत्तीत वाढ करण्यासाठी. पण शेवटी रात्री दोघांनाही झोप येत नाही. एकाला पैशाची चिंता, दुसऱ्याला त्याचे जपण्याची भीती.
एखाद्या शहरातल्या माणसाला वाटतं, “मी मोठ्या पदावर गेलो असतो, एखाद्या पाच आकडी पगाराची नोकरी केली असती, तर हे सगळं टळलं असतं.” पण तिथंही कुणाला सत्तेची हाव, कुणाला मानमरातबाची आस असते. मीसुद्धा कधी असं विचार करायचो, “माझी ओळख दुसऱ्यांच्या नजरेत आदराची असावी.” पण मग वाटतं, ओळख ही मिळवायची नसते, ती माणसाच्या वागण्यातूनच घडते. कुणीतरी हळूच पाठीवर हात ठेवतो, “कसंबसं निभावतोस सगळं.” आणि एवढंच समाधान देऊन जातो.
जमिनीवर उभं राहतं येणं हेही नशीब असतं. मी कधीकधी विचार करतो, “माझ्याकडे मी सोडून काहीच नाही.” खरंतर तसंही नाही. माझ्याकडे काही नाही म्हटलं तर ती गरिबी नाही, आणि खूप आहे म्हटलं तरी श्रीमंती नाही. ते मधलं काहीतरी आहे. थोडंसं मिळतं, थोडंसं जातं. कधी वाटतं, “कसली ही कसरत?”, “हे असं किती दिवस चालणार?” कर्ज फेडलं, पुन्हा नवं कर्ज आलं. एक प्रश्न संपला, दुसरा तयार. कधी घरात, नातेवाईकात आर्थिक नड आली की कर्ज लागतं, कधी आजारपण आलं की सगळी बचत संपते. तरीही मन म्हणतं, “जगावंच लागेल.”
माझ्या वडिलांचं एक वाक्य कायम लक्षात राहतं – “माणूस गरीब असो वा श्रीमंत, एक दिवस सगळं इथंच ठेवून जावं लागतं.” पण या विचारानंही मी काही शांत होत नाही. मला हे सगळं सांभाळायचं असतं, पुढच्या पिढीसाठी काहीतरी मागं ठेवायचं असतं. मग पुन्हा तोच विचार आणखी थोडं कमवायचं. थोडं अधिक सुरक्षित व्हायचं. थोडं अधिक स्थिर व्हायचं. पण हे “थोडं” कधीच पुरेसं वाटत नाही.
कधी कधी रात्री जागं राहून मी असंच लिहीत बसतो. वाटतं शब्दांमध्ये काही ताकद असेल, ती मला एखादा मार्ग दाखवेल. पण तसं झालं नाही. शब्दांना ताकद असते पण ते पोट भरत नाहीत. तरीही लिहित राहतो, कारण मनाला थोडं हलकं वाटतं. या लिखाणातूनही कधीतरी एक वेगळं समाधान मिळतं. “आपण कुणाच्या तरी भावना मांडल्या,” असं वाटतं.
हे सगळं लिहिताना कधी कधी असं वाटतं, “आपण कुणालाही काही सांगण्याइतकं काही अनुभवलं तरी आहोत का?” पण मग लक्षात येतं, सगळ्यांच्याच कथा वेगळ्या असतात, तरी त्या सगळ्यांत एकच धागा असतो आपली धडपड. कर्ज फेडायची, संसार निभवायचा, प्रेम जपायचं, स्वाभिमान टिकवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं जगायचं.
आजही रात्र पुढं सरकली आहे, विचारांची गर्दी तशीच आहे. आणि या गर्दीतून पुन्हा एक नवा दिवस उगवला आहे. परत तीच कामं, तीच धावपळ, तीच चिंता आणि कधीतरी थोडंसं समाधान. रात्रीचा काळोख जसा जसा संपतो, तसंच मनातही थोडं उजाडतं. “चला नवा दिवस काय वाढलंय बघुया...” म्हणत पुन्हा नव्या दिवशी पाय ठेवायचा असतो.
हेच आयुष्य... हेच जगणं... आणि या जगण्यातूनच माणूस स्वतःला शोधत असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...