गुरुवार, १७ जुलै, २०२५

2062. दिवाळी : सायकल अन टू व्हिलर

   कमला मनातल्या मनात बडबडत रस्त्याने चालत एकटीच निघालेली. किती भराभरा पावलं टाकली तरी ही वाट काही संपंना. शरीरापेक्षा मनच आज जास्त थकलयं. गेलं आठ -धा दिवस झालं कामानं नुसता जीव काढला होता. 'सणवार तोंडावर आला की सगळ्यांचीच जास्तीची कामं निघत्यात. वर घरातलं हायच सगळं करायचं. त्यात त्या सरीता ताईचं फर्निचरचं काम. तीन महिनं झालं असतील जादाची कामं त्या घरात चाल्यात. पण असून दे, दिवाळीत चांगले पैशे मागून घेणार हक्कानं. गेली दहा वर्षे झाली त्यांच्या आईकडं आणि सात महिने झाली ताई इथं रायला आल्यापासनं ताईकडं काम करतीया.  बघतीया, तसा हात मोकळा नायच त्यांचा, पण आपुणबी कवा काय पगारा पलिकडं मागितलं नाय, आणी मागणार बी नाय ! पण आता मागून घेईन. किती हक्कानं ताईनी माझ्याकडनं कामं करुन घेतली. कोपरा न कोपरा साफ केलाय. आरशावाणी लख्ख घर केलंय. त्या मला घरच्यासारखंच माणत्यात. पैशे जास्तीचे द्यायला नाय म्हणायच्या नायत.' तिच्या चेहऱ्यावर आनंद तरळून गेला. 
      कमलानं दारावरची बेल वाजवली. 
सरिताने दरवाजा उघडला. "ये कमला !!.... काय मग, तुझी झाली का गं घरची दिवाळीची कामं ?"
     कमला - "हो ताई, चालल्यात."
     सरिता -  "ह्या वेळी काय नविन खरेदी करतेयस."
     कमला - "रोहन ला, माझ्या लेकाला सायकल घ्याची म्हणतेय. बघू पैसा वाटणीला आला तर...."
      सरिता, आनंदाने - "कमला तुला सांगू का !!!!! दिवाळीचा सण आला की आनंदाला पारावारच उरत नाही. काय ते खमंग खुसखुशीत पदार्थ, नवनविन कपडे, साड्या, दागदागिने, लहानग्यांचे किल्ले, मावळे, फटाके, कंदील लायटिंग, रंगीबेरंगी रांगोळ्या किती सुंदर, सगळ्याची रेलचेल अक्षरशः .."
      सरिता एकदम खुश होती. घरात हवं तसं फर्निचर, बराच पैसा खर्च करून बनवून घेतलेले. तीन महिने काम चाललं पण मनासारखं काम झालं  !!! तरी बरं दसऱ्यातच सगळं आवरलं ! त्यामुळे दिवाळीला भारी वाटणार. कलर केलेले घर, नविन फर्निचर. सरिता खूपच खूष होती. 
     कमला - "ताई, आज काय काय कामं आहेत ?"
      सरिता - "साफ सफाई तर झाली. भांडी घासून लावलीस. एक काम कर, आज सगळे पडदे, बेडशीट धुवून वाळत टाक."
      कमला - "बरं ताई."
    दिवाळीचा सण छान, नेहमीपेक्षा जास्तच उत्साहात साजरा होत होता. कमला होतीच मदतीला. दिवाळीतच सरिताने लेकासाठी टू व्हीलर सव्वा लाखाची खूप हौसेने घेतली. अंगणात गाडीची पूजा चाललेली. मस्तपैकी गाडीला दोनशे रूपयांचा हार घातलेला. नवी कोरी गाडी दारात. मुलगाही भलताच खुश. 'गाडी खूपच छान आहे. मस्तच ! आज आणली का?' असं प्रेमानं गल्लीतील बघणारे प्रत्येकजण विचारत होतं. विचारणाऱ्याच्या  हातावर अर्धा पेढा मोडून ठेवत गोड हसत 'बरेच जणांना अजून द्यायचे आहेत. तसंही हल्ली गोड फार कोणी खातच नाही' सरिताच सहज बोलून गेली !!!!
      कमला मावशी चकितच झाल्या
हे बोलणं ऐकून. आणि गोंधळल्याही.... 'एवढी शिरमंती असणारी लोकं इतक्या कोत्या मनाची कशी काय असत्याल ?? शिरमंती पैशानं येती का जाती ??'
      सरीताचा मुलगा - "आई एक एक पेढा तरी दे ना गं सगळ्यांना  !!!"
     सरीता (मुलाला) - "तुला काय कळतं, फुकट येतात पेढे. गाडी पैसे खर्च करून आपण घ्यायची, पेढे ह्यांना वाटत बसू. फुकट पेढा मिळतोय म्हंटल्यावर 'छान आहे गाडी' म्हणणारच."
       कमला मावशी तिथंच होत्या. अंगणात लावलेली ती गाडी कमला मावशी आनंदाने, खूप कौतुकाने पाहत होत्या. ताईच्यात गाडी आणली पण  त्यात त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. 
      सरिता मावशींना म्हणाली, "आपण नाही आपल्या पोरांची हौस करणार तर कोण करेल ?" असं म्हणत "तुझा दिवाळीचा बोनस देते ग, थांब हं !" ती आत गेली मावशींच्या हातात शंभर रुपये टेकवले आणि "ही घे साडी, घरातली आहे पण नवी कोरी आहे बरं !"
      कमलानं साडी बघीतली, ही तर ताईंच्या मैतरणीनं दिलेली तिच्या घराच्या वास्तूकशांतीला. ताई घरी आल्यावर चिडल्या पण होत्या. मी तिथंच होती. हजार रुपयाचं गिफ्ट दिलं आणि दोनशेची साडी हातात टेकवली म्हणून. तेवढ्यात ताईंचा आवाज आला. "आवडली का साडी ? ह्या वेळी खूप खर्च झालाय गं, तू बघीतलसं की, नवीन इंटेरियर झाले दोन महिन्यापूर्वी, आता ही गाडी घेतली सव्वा लाखाची. पुढच्या दिवाळीच्या सणाला बघू जास्तीचं. तू इथंच आहेस, मी ही इथंच आहे, कुठं जातेय." 
      कमला - "हो ताई !!!" दिलेली शंभराची नोट तिने मुठीत चुरगळून बंद केली. साडीची पिशवी एका हातात. डोळ्यातलं पाणी शक्य तेवढं पापण्या आड लपवलं. "ताई गाडी छान आहे" ती म्हणाली.
      "मग, लेकाला तीच पाहिजे होती, घेतली मग," ताईने हसत हसत अर्धा पेढा तिच्या हातावर टेकवला. 
      ताई - "अग ! आताच सगळे पेढे संपले. तूच उशिरा आलीस."
      कमला कसनुशी फक्त हसली. तिने गाडीला न्ह्याळून पाहिलं. स्वतःचा मुलगा रोहन तिच्या डोळ्यापुढे उभा राहिला. लांबूनच ती गाडी बघत होती. भारीतली दिस्त्या, उगाच आपलं मळकट हात नकोत लागायला त्याला. ती जरा मागे सरकली. तिने विचारले, "ताई अजुन काही काम हाय का ओ, का मी घरी जावू?"
      सरिता - "अग दुपारी लाडू केले. चिवडा फोडणी टाकला, त्याची भांडी नळावर पाठीमागे ठेवलेत, ती स्वच्छ घासून पुसून आत ठेव, मग जा घरी."
      कमला - "हो ताई...."
      तिनं नळावरची भांडी लख्ख घासून काढली, आत आणून ठेवली. "ताई मी निघते" असं म्हणत निघाली. पण पाऊल पुढे पडतच नव्हतं... काय करणार घरी जाऊन.... 'रोहन.. त्याच्या बापाचा आधार लहानपणीच गेला तेव्हापासून किराणा दुकानात कामाला जातोय. लहान लेकरू. रात्रशाळा आणि दिवस भर दुकानात. सणावाराला तर त्याच्या हाताला चैनच नसतो. एवढं कवळं हात ती मालाची पोती उचलत, पिशव्याच्या पिशव्या भरून मालाच्या घरोघरी पोचवतंय. मी ही धुणीभांडी करून हातभार लावत्या, पण सगळंच किती महागलंय. शंभरात आता कायच नाही येत. गरिबान जगावं तरी कसं. दोघच असलो तरी खर्च कमी हाय का. खोलीचं भाडं हाय. नवऱ्याच्या आजारपणात किती पैशे उचलल्यात, ते बी फेडायचे हायत. आम्ही बी माणूसच हाय. जिवाला सणावाराला चांगलंचुंगलं खावं वाटतं, मन कुठलं राहतंय. माझ्या पोराला बी चांगली कापडं मिळावी असं वाटतं. आईचं मन हाय. दिड वरीस होत आलं, पोर नविन सायकल घ्यायला पैसं साठवतय, पण वाटणीलाच ईनाती. आजारपण, औषध पाणी, पै पाहुणं, कशात तरी खर्चून जातेतच. एवढंसं पोर पाच सहा किलोमीटर चालत जातंय दुकानात. रात्रीचं अंधारातनं एकटंच चालत येतं. सायकल घेतली असती, त्याच्या जिवाला जरा आराम झाला असता. दिवाळीत बाकीच्यांनी दिलेल्या पैशानं तेला शर्ट पँट घेतली. दिवाळीचं थोडं का होईना सामान घेऊन सण केला. ताईनी दिलेल्या पैशात भर घालून सायकल घ्याचीच असं ठरीवलं‌, पण आता पोराला काय सांगू? वाट बघत बसलं आसल आई पैशे घेऊन येईल म्हणून. ताईनी जरा हात आखडताच घेतला पैशे देताना. साडी नसती दिली तर चाललं असतं, पण तसं बी ह्या साडीवर वरीस बाहीर पडलं माझं. घ्याला नाय लागणार नविन. पण पैशे पोरासाठी पायजेल हुतं. सणाला पोराबाळांचा आनंद मोठा, आपलं काय हाय !!!!!
   ‌‌    ताईच्या घरात मी आपलीच माणसं हायत म्हणून मनापसनं केली सांगल ती कामं ! आशा होती मनात, दिवाळीला कष्टाचं चीज होईल. आणि एवढं करुन पदरात कायच नाय पडलं... पण गाडीला सुदीक शे दोनशे चा हार ! गाडी हायच तेवढी भारीतली म्हणा, पण हारच त्यो. उद्याच्याला वाळल्यावर काढून फेकणारच की. ते भारितलं पेढं आणल्यालं लाल बॉक्सातलं ताईच्यात, ते रोहन ला किती आवडत्यात. दोन कागदात बांधून दिलं आसतं तर... डोळं पुसत 'आपून आज असा का इचार करतूया? पोराला मिळालं नाय तेचं वाइट वाटतया... पेढं बगून पोर हरखून गेलं असतं... जावू दे... बडा घर पोकळ वासा म्हणत्यात ते उगाच नाय. आज बघीतलं, अशी बी माणसं असत्यात. सणावाराचा सगळा आनंद मावळला. कसंतरीच वाटतंय.' तिने ती पदरात बांधलेली चुरगळलेली शंभराची नोट काढली हे पैशे हायत रोहनला जाताना पेढ घेऊन जाते सायकल बघू पुना कवा तरी.पेढ बघून हारखून जाईल पोर माझं ......
      तेवढ्यात मागून कोणी तरी जोरात पदर ओढला. ती एकदम दचकली. सर्रकन काटा आला अंगावर, घाबरून मागं बघीतलं, आठ नऊ वर्षांची मुलगी, फाटकी कापडं, विस्कटलेल्या केसानं उभी होती, काखेत लहान पोर उघडंच होतं. लईच रडत होतं एकसारखं. 
ती मुलगी - 'ताय व ताय, कायतरी खायाला द्या की.  काल पासनं काय नाय खाल्लं... भाव बी उपाशीच हाय म्हनून एवढा रडतूया. ताय खरंच लय भूक लागलया. आई एकलीच हाय घरात. तिन बी काय नाय खाल्यालं.'
       कमलाला गलबलून आलं. त्या मुलीला म्हणाली, "चल माझ्यासंग." ती समोरच्या छोट्या टपरीवजा हॉटेल मध्ये घेऊन गेली. मुलासाठी दूध मागवलं, त्या पोरीसाठी खायला. "पोटभर खा." 
      ती मुलगी इकडं तिकडं न बघता तुटून पडली त्या खाण्यावर. किती अधाशासारखी खात होती ते बघून कमलाचे डोळे भरून आले. आपसूक पाणी गालावर ओघळलं. 'खर हाय, गरिबी लय वाईट बाई. गेलोया आम्ही बी या साऱ्यातनं.' कमला  स्वतःशीच बोलली. 
       त्या पोरीचं पोटभर खाऊन झालं, पोर दूध पिऊन हातात बिस्कीट खात गालात गोड हासत होतं. का कोणास ठाऊक, पण किती तरी दिवसांनी आज वेगळाच आनंद तिच्या मनाला स्पर्शून गेला. तिनं हॉटेलवाल्याला बिल विचारलं. एकशे वीस रुपये. तिने ती शंभराची चुरगळलेली नोट आणि जवळचे वीस रुपये घालून पैसे दिले. दोन वडापाव बांधून घेवून त्या साडीच्या पिशवीत ठेवले. त्या पोरीजवळ गेली, "हे आईला दे !" असं म्हणून ती पिशवी तिला देवून तिथून खूप आनंदाने घरी निघाली. 'आज दिवसाचं सार्थक झालं. हा सण खरंच आयुष्य उजळवून गेला. रस्त्यावर लागलेले दिवे, घराघरातले आकाशकंदिल, अंगणातल्या पणत्या,श जास्तच प्रसन्नतेने लखलखत होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...