आज जवळ जवळ चौदा वर्षाने अचानक दिपुचा फोन आला. ताई आहे तशी लवकर निघून ये. आई खूप सिरीयस आहे. तिला तुला भेटायची शेवटची इच्छा आहे. सारखी मनु, माझी मनु म्हणून रडते. ताई प्लीज लवकर निघ.
मनोज आणि मनाली एकाच वर्गात होते. सातवी आठवी पासून त्यांच्यात एक वेगळंच नात होत. मनोजला कधी शिक्षा झाली तर मनालीला खूप त्रास व्हायचा, मनालीला काही झाले तर मनोजला त्रास व्हायचा. पुढे दोघे एकाच कॉलेज मध्ये बारावी पर्यंत होते. मित्रांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्यांनी यावरून मनोज आणि मनालीला चिडवायला सुरुवात केली. तेव्हाच त्यांना सुद्धा जाणीव झाली. खरचं आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत. अगदी नकळत्या वयापासून. दोघांचे प्रेम आणिकच घट्ट झाले. मनालीचे लग्न होऊन चौदा वर्ष झाले होते. तिचे एका मुलावर प्रेम आहे हे जेव्हा घरी कळले तेव्हा वडिलांनी स्पष्ट नकार दिला. हे खूळ डोक्यातून काढून टाक नाहीतर तुझा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. अशी धमकी दिली. दोन्ही घरून विरोघ होता. मनोजच्या आईबाबांनी सुद्धा स्पष्ट सांगितले, त्या मुलीशी लग्न केले तर आमच्याशी काही सम्मंध ठेऊ नको. शेवटी त्याने पुण्याला ट्रान्स्फर करून घेतली. एक दिवस पळून जाऊन लग्न केले. दोन्ही घरचे संबंध तुटले होते. सुरवातीला तिने खूप प्रयत्न केले. पत्र पाठवायची, फोनवर संपर्क साधायचा प्रयत्न केला पण कोणीच बोलायला तयार नव्हते. कधीच पत्राचे उत्तर आले नाही. शेवटी आपल्याला आईवडील आहेत हा विचार त्यांनी डोक्यातून काढून टाकला.
मनाली गरोदर होती, मनोजने तिचे सर्व कोडकौतुक केले. कधी तिची आई झाला. कधी सासू झाला, तर कधी प्रेमळ नवरा. वेगवेगळ्या भूमिका योग्य वेळी तो पार पाडत होता. आज का कोण जाणे, तिला आईची खूप आठवण आली. आपण आई होणार ही गोड बातमी आईला सांगावीशी वाटत होती.थरथरत्या हाताने फोन उचलला. मनात म्हणत होती, देवा आज आई घरात एकटीच असू दे ! आईशी बोलायची एक संधी दे देवा !
फोन लावला, आईने उचलला, बहुतेक घरात कोणी नसावे.
हॅलो !
हॅलो आई !
मनाली बोलते !
लेकीचा आवाज ऐकुन त्या माऊलीच्या डोळ्यांना धारा लागल्या. तोंडातून शब्द फुटत नव्हते.
हुंदके देतच, आई म्हणाली ! बाळा , कशी आहेस !
तुझी खूप आठवण येते ग !
एकदा डोळेभरून पहावेसे वाटते ! पण तुझे नाव जरी काढले तर तुझे बाबा खूप संतापतात.
इच्छा असूनही बोलता येत नाही. छातीवर दगड ठेऊन जगते तूझी आई!
मनाली म्हणाली आई , मी आई होणार आहे !
तु ! तू ! आजी होणार आहे !
काय बोलतेस बाळा तू !
किती गोड बातमी दिली ग !
सांभाळ स्वतःला आणि त्या पोटातल्या जीवाला !
हो आई !
आई , मनोज खरचं खुप चांगले आहेत. आता या अवस्थेत माझी सर्वतोपरी काळजी घेतात. बाबा म्हणायचे, त्याच्या नादी लागून वाटोळं करून घेशील स्वतःच. मग म्हणशील , बाबा माझा चॉइस चुकला हो ! नाही आई, माझा चॉइस अगदी योग्य आहे. शोधूनही मनोज इतका समजदार नवरा नसता मिळाला. आई ऐकते आहेस न ?
हो बाळा सगळ ऐकते.
एवढ्यात मनालीचे बाबा घरात आले, आईचा आणि मनालीचा संवाद बहुतेक ऐकला असावा. म्हणाले , खबरदार जर पुन्हा त्या कार्टीला फोन केला तर, या तर ती जिवंत असेल किंवा आम्ही. तुम्हीच ठरवा काय ते.
त्या दिवसापासून आज बारा वर्ष झालेत काहीही संपर्क नव्हता.
आज अचानक दिपूचां फोन. मनालीच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले. म्हणतो आईला भेटायचे आहे तुला.!
पण बाबा ! बाबा आपल्याला आईला भेटू देतील ? माफ करतील का ते मला आणि मनोजला ? काय सांगू मनोजला ? आईची तब्येत बरी नाही ? तिने मला भेटायला बोलावले आहे ? मनोज खूप समंजस आहे, नक्की घेऊन जातील. पण बाबांनी मनोजचा अपमान केला तर? नाही ! नाही ! मी मनोजचा अपमान सहन करूच शकणार नाही. त्या पेक्षा नकोच जायला. नाही ! नाही ! मनोजला यातले काहीच सांगायला नको. मनाली तंद्रीतच, दारावरची बेल वाजली. मनाली भानावर आली, दार उघडले. समोर मनोज उभा. म्हणाला चल पटकन बॅगेत चार कपडे भर, तुझी आई खूप सिरीयस आहे. तिची शेवटची इछा तुलाच भेटायची आहे. दिपूचा फोन आला होता.
काय ? तुम्हाला पण फोन आला होता ?
हो !
तुला पण आलेला न !
हो !
मग तू इतकी शांत कशी.
म्हणजे ?
अग जायची तयारी करायची न ! मला साधा फोन सुद्धा केला नाही.
तसे नाही मनोज ! मला खूप मनातून वाटत होते. तुम्हाला सांगावे, पण पुन्हा भीती वाटत होती.
भीती ? कशाची ?
बाबांची !
तिकडे गेल्यावर ते तुमचा अपमान करतील, आणि ते मला सहन होणार नाही त्यापेक्षा नकोच. मनोजने मनालीला जवळ घेतले, म्हणाला बाबा जाऊन चार वर्ष झाले.
काय.?
हो अग !
मनोज बोलला. बाकीचे गाडीत सांगतो. तू बॅग भर, तोवर मी सीमाला शाळेतून घेऊन येतो. मनाली मनोमन देवाला प्रार्थना करत होती, देवा आईची तरी भेट माझ्या नशिबात असू दे. सीमाला घेऊन मनोज आला, तिघे गाडीत बसले. मनोज सांगू लागला, तुझे बाबा जाऊन चार वर्ष झाले. हार्ट अट्याक आला होता त्यांना. त्यांनी मरते वेळी सुद्धा आईला निक्षून सांगितले. मनाली सोबत कोणताच समंध ठेऊ नका. माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आई काळजावर दगड ठेऊन त्याचे पालन करत होत्या. परंतु सात आठ दिवस झाले. त्यांना ताप येतो. कोणालाच ओळखत नाही. फक्त तुझे नाव घेते. दिपू सांगत होता. सारखे मनु मनु करते. म्हणते माझ्या मनुला एकदा डोळे भरून पाहायचे आहे. कधी एकटीच बडबड करते, म्हणते अहो तुम्ही तुमची ती अट मागे घ्या न. सांगा न मला , स्वाती भेट आपल्या मनूला. मोडली मी माझी शपथ. किती निष्ठुर हो तुम्ही. बोला हो एकदा. मला माझ्या मनुला भेटायचे आहे. कुणी माझ्या मनुची भेट करून द्या प्लीज.!
तुझ्यात जीव अडकला असेल आईंचा. दिपू आणि समृद्धी दोघांनी हा निर्णय घेतला आणि आपल्याला फोन केला. त्याला हे ही माहित होते. तू इतक्या सहजासहजी तयार होणार नाही. म्हणून मग मला फोन केला. मनालीच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहत होता. तिचे संपूर्ण बालपण डोळ्यासमोरून तरळून गेले. खरतर तिचे मनाली हे नाव तिच्या बाबांनी ठेवले. खूप लाडकी होती ती बाबांची. आई रागावली, कधी मारले तर आधी बाबांचे आणि आईचे भांडण व्हायचे. म्हणायचे बघ ह तुला सांगुन ठेवतो, माझ्या पोरीवर अजिबात हात उचलायचा नाही. पोरीला सासरी जायचे असते. आहे तोवर खूप प्रेम करून घ्यावे ग. मागेल ती प्रत्येक गोष्ट दिली. इतकेच नव्हे तर नको नको म्हणत असताना सुद्धा प्रत्येक सुख पदरात घातले. पण आयुष्याचा एक निर्णय घ्यायची वेळ आली, त्यावेळी बाबांनी आपला निर्णय दिला. एक तर तो निवड नाहीतर मला. काळजावर दगड ठेऊन मनोज सोबत पळून जाऊन लग्न केले. वाटत होते, थोडे दिवस गेल्यावर बाबांचे विचार बदलतील. नक्की मनु मनु करून जवळ घेतली. कधी वाटलेच नव्हते इतके प्रेम करणारे बाबा इतके कठोर होतील. इतकचं नव्हे तर आई आणि दिपुला सुद्धा बोलायला मनाई करतील. ते बिचारे बाबांच्या अहंकार दुखावला जाईल म्हणून आज पर्यंत गप्प बसले. बाबा जाऊन चार वर्ष झाली. मरताना सुद्धा बाबा म्हणाले म्हणे, त्या कार्टीची सावली सुद्धा माझ्या प्रेतावर पडता कामा नये. अजुन एक मी मेलो तरी तुम्ही तिच्याशी समंध ठेवायचा नाही. या घरासाठी मेली ती.
मनोजला दिपू म्हणाला, भाऊजी खूप वाटायचे एकदा ताईला भेटाव. पण आई म्हणायची, दिपू बाबांची शपथ मोडू नको. जीवंत पणी यांचे घाबरून का होईना मन जपले. आता मेल्यावर दुःख नको. पण आता आई फक्त मनाली चे नाव घेते. डोळे सुद्धा उघडत नाही. आठ दिवस झाले admit आहे. अन्नाचा कण पोटात नाही. डॉक्टर म्हणाले यांना घरी घेऊन जा. मनु कोण? त्यांची भेट नक्की करून द्या. कदाचित तीच त्यांची अंतिम इच्छा असेल. कदाचित त्यांना पाहून ते त्यांचा प्राण सुद्धा सोडतील. म्हणूनच आज त्याने बाबांच्या शपथे ची पर्वा न करता, आईची अंतिम इच्छा पूर्ण करायला फोन केला. ताई आहे तशी लवकर निघून ये. काश बाबा एकदा म्हणाले असते, मनु आहे तशी निघून ये, बाळा तुझी खूप आठवण येते. विचार येतो, खरच माणसे इतकी निष्ठुर असतात. आपल्याच पोटच्या गोळ्याचा एक निर्णय, जो त्यांच्या आयुष्याचा असतो. तो घेण्याचा अधिकार सुद्धा मुलांना नसावा. विचारांच्या आणि ओघळत्या अश्रुंच्या गर्दीत घर कधी आले कळलेच नाही. दिपू सारखा आतबाहेर करतांना दिसला. कदाचित मनालाची वाट पाहत असावा. गाडी थांबताच तो गाडीजवळ आला. मनालीला घट्ट मिठी मारली. म्हणाला ताई चल लवकर. आई शेवटची घटका मोजत आहे. दोघे बहीन भाऊ तब्बल चौदा वर्षाने एकमेकांना भेटत होते.समृध्दी दिपुची बायको तिला तर मनालीने पाहिले सुद्धा नव्हते. घरात पाऊल ठेवताच दिपू म्हणाला.
आई ! आई ! बघ ! डोळे उघड! तुझी मनु आली ! मनाली आई जवळ गेली
आई ! डोळे उघड ग ! आई ! एकदा तुझ्या मनूला डोळे भरून पाहा ! आई!
ही बघ तुझी नात ! सीमा !
आई सीमा ला आशीर्वाद देणार आहेस न तू ?
आई तुला आठवते, मी तुला फोन केला होता, मी गरोदर असल्याचा.
आई बघ सीमा आता बारा वर्षाची होत आली. इतके वर्ष उलटले ग !
आई बघ तुझी मनु आली !
आईने डोळे उघडले. मनालीच्या डोक्यावरून हात फिरवला. सीमाच्या डोक्यावरून हात फिरवला. इतकचं बोलली मनु मला माफ कर बेटा. हातात घेतलेला हात हलकेच सुटला. डोळे मात्र उघडेच होते. जणू ती तिच्या मनूला डोळ्यात साठवत होती. दीपूने आईचे डोळे बंद केले.
आई!!!!! म्हणून दोघा बहिण भावांनी जोरात हंबरडा फोडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा