"काय गं दीप्ती कुठे हरवलीस? मगाचपासुन आवाज देतेय. ठेवलास ना नैवेद्य मंदिरात?" वंदनाताईंनी गॅसजवळुनच आपल्या नव्या सुनेला विचारलं.
"अं नाही काही नाही आई. ठेवला मी नैवेद्य." दीप्ती चाचरत म्हणाली .
"बरं मग पानं वाढायला घे. जेवायला बसुन घेवू आपण." वंदना ताई गॅस बंद करून कढईतल्या पुऱ्या काढत म्हणाल्या.
"हो आई घेते." म्हणत दीप्ती ने त्या दोघींची पानं वाढुन घेतली.
पानातलं ते गोडाधोडाचं जेवण अन् श्रावणी सोमवारामुळे जेवायला उशीर झालेला असुनही तिच्या गळ्याखाली घास उतरत नव्हता. मगाशी महादेवाच्या मंदिरात त्या चार पाच मुलांना तिने नैवेद्याचं ताट ठेवताच त्यावर अक्षरशः तुटुन पडलेलं पाहुन ती मुलं किती भुकेली असावीत याचा अंदाज येवुन तिचं मन अजुनही ढवळून निघत होतं. बाजुलाच अनेकांंनी नैवेद्य ठेवले होते. पण त्याला लगेच पावसाळा असल्याने माशा, मुंग्या लागत होत्या. पण तो नैवेद्य सुद्धा काही जण नाईलाजाने जवळच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरत होती. नुकतेच ठेवलेले ताजे नैवेद्य खाण्यासाठी तर त्यांच्यात जणु स्पर्धा लागली होती. ते दृश्य पाहून दीप्ती सारख्या संवेदनशील व्यक्तीचं मन हळहळलं नसतं तर नवल.
"काय गं दीप्ती. स्वयंपाक चांगला नाही झाला का आज. तुझं जेवणात लक्ष का नाहीये?" वंदना ताईंनी तिच्याकडे पाहत विचारलं.
"अं..नाही आई छान झालंय सगळं.. ते जरा असंच ..उपवास झाला की जेवण जात नाही ना जास्त. म्हणून.बाकी काही नाही." दिप्तीने कसंबसं उत्तर दिलं. पण तिची अस्वस्थता काही कमी झाली नाही. थोडंसं जेवुन तिने वंदनाताईंना सगळं आवरायला मदत केली. पाहता पाहता आठवडा असाच निघुन गेला. दुसरा श्रावण सोमवार उजाडला. आज स्वयंपाकात मदत करतांना मात्र दीप्तीने धीर करुन त्या दिवशीचा प्रसंग अन् त्यावर मनात असलेला उपाय सासूबाईंना बोलुन दाखवायचं ठरवलंच.
"आई तुम्हीच सांगा देव भावाचा भुकेला असतो आणि आपल्या सर्वांचा पालक असतो ना हो. मग आतमध्ये देवाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवायचा आणि बाहेर ती चिमुकली मुलं अन्नासाठी तडफडतायत असं चित्र असेल तर देव खरंच संतुष्ट होईल का हो? त्यापेक्षा आपण त्यांनाच पोटभर खायला दिलं तर त्यांचा भुकेला आत्मा शांत तरी होईल ना? आणि आपली मुलं खुश तर त्यांचा पिता खुश. महादेव जगतपिता आहेत मग त्यांच्या वर दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा, पंचपक्वान्नाची रांग लावुन मंदिरात अस्वच्छता करण्यापेक्षा अश्या गरजूंना अन्नदान केलं तर महादेव खरंच संतुष्ट होतील ना? खुलभर दुधाची गोष्ट आपण नुसती ऐकुन आणि वाचुन सोडून द्यावी म्हणुन नाही दिलीये ना पुराणात. मी मागच्या वेळी त्या मुलांचे ते भुकेले चेहरे पाहिल्यापासून माझ्या मनातनं हा विचार जातच नाहीये. आपण आज त्या मुलांसाठी जेवण घेवून जावुया का आई?" दिप्तीने घडलेला प्रसंग सांगुन वंदना समोर आपले विचार मांडले.
वंदनातल्या धार्मिक व्यक्तीला हे वरवर जरी ठीक वाटत असलं तरी मनापासून काही तितकंसं रुचलं नव्हतंच. पण मंदिरात गेल्यावर जेव्हा दिप्तीने कोपऱ्यात उभ्या लहान मुलांना बोलवुन व्यवस्थीत पॅक केलेले जेवणाचे पार्सल त्या मुलांच्या हाती दिले तेव्हा " हे आमच्यासाठी आहे " असं आश्चर्याने विचारतांना त्यांच्या डोळ्यांत आलेली ती चमक पाहुन मात्र इतका वेळ चुकल्याचुकल्या सारखं वाटणाऱ्या वंदनाताईंच्या मनाला एक वेगळंच समाधान जाणवलं. तिथेच बसण्यासाठी असलेल्या जागेवर बसुन आनंदाने जेवणाऱ्या त्यांचे ते तृप्त चेहरे पाहण्यात हरवलेल्या या सासुसुनांची तंद्री भंगली ती वंदनाताईंच्या मैत्रिणीच्या म्हणजेच शर्मिष्ठाताईंच्या बोलण्याने.
"वंदना तुझी सून नावाप्रमाणेच नव्या विचारांचे दीप प्रज्वलित करणार असं दिसतंय. भक्ती अशीच असावी गं. जित्याजागत्या माणसांतला देवच दिसत नसेल तर मुर्तीतल्या देवासमोर यज्ञयाग केले तरी व्यर्थच. मी सुद्धा इथे या मुलांना देण्यासाठी फळ वगैरे घेऊन आलीये. तुझ्या सुनेच्याच हातुन होवुदे हे सत्कार्य. दिप्ती ये गं बाळा. ही फळं सुद्धा दे यांना. इथे खायचं असेल तर खातील किंवा हवं तर घरी नेतील." शर्मिष्ठाताईं दिप्तीकडे कौतुकाने बघत म्हणाल्या.
"काकु अहो पण मी कसं? तुम्हीच द्या ना." दिप्ती संकोचुन म्हणाली.
"अगं बाळा संकोच कसला करतेस. उलट तुझ्या हातुन हे काम झालं तर मला जास्त आनंद होईल. मी एक एनजिओ चालवते आणि त्या माध्यमातून असेच आपल्याला शक्य होतील ते छोटे- छोटे उपक्रम घेऊन नवीन विचार पेलण्याचा प्रयत्न करते. हल्ली माणूसकी, संवेदनशीलता तशी अभावानेच पहायला मिळते गं. नवी पिढी तर आपल्यातच मश्गुल दिसते आणि जूनी पिढी देवभोळी ती अशी मुर्तीपुजेतच धन्यता मानणारी. कुणाच्या श्रद्धेवर बोट ठेवायचं नसतं आपल्याला पण मग असं सगळं चित्र राहिलं तर या भुकेल्यांकडे,गरजुंकडे कुणी बघायचं? असा प्रश्न पडतो. अश्यात तुझ्यासारखं कुणी दिसणं म्हणजे आशेची पणती गवसण्यासारखंच आहे बघ. तुझं मनापासून कौतुक करावंस वाटतंय म्हणून तुझ्या हाताने फळांच वाटप व्हावं आणि तुला आवडणार असेल तर तु आमच्या एनजिओ मध्ये सुद्धा सामील व्हावंस कसं मला वाटतं." काकूंनी मनातले विचार बोलुन दाखवले.
"काकु तुम्ही इतकं मनापासून बोलताय नाही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. द्या इकडे ती फळांची पिशवी. मी देते सगळ्यांना आणि हो आपल्या एनजिओ मध्ये सुद्धा मी मला जमेल तशी मदत करेन पण एका अटीवर. आत्ता तुम्ही आमच्या सोबत आमच्या घरी जेवायला यायचं !! बोला कबुल ना?" दिप्तीने मोकऴं हसुन विचारलं.
अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ दिप्ती. वंदनाताई हसुन उद्गारल्या.
"हो गं बाई कबुल !! " काकुंनीसुद्धा दिलखुलास हसुन उत्तर दिलं.
सगळ्यांना फळं देवुन घरी आल्यावर काकुंसोबत सोमवारचा उपवास सोडतांना आज मात्र दिप्तीच्या चेहऱ्यावर मुलांचे आनंदी चेहरे आठवुन खऱ्या अर्थाने तृप्तीचे भाव पसरले होते. आजचा नैवेद्य खऱ्या अर्थाने महादेवा़ंपर्यंत पोहचला असावा.
ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. दिप्तीच्या माध्यमातून जशी महादेवाने वंदनाला सुबुद्धी दिली तशी या कथेतून तुम्हा आम्हाला मिळो हीच महादेवचरणी प्रार्थना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा