सोमवार, २८ जुलै, २०२५

2110. मन:शांती : येथे व आत्ता

           एक अट्टल चोर होता. तो फक्त रेल्वेच्या लांबच्या प्रवासात अत्यंत नियोजनपूर्वक मोठा हात मारायचा. एकदा एका श्रीमंत माणसावर पाळत ठेवून नेमके त्याच्या कूपेमध्ये तिकीट त्याने मिळवले. कूपेमध्ये फक्त हे दोघेच होते.  शैटजींकडे भरपूर मौल्यवान दागिने होते. तीन  रात्रीचा प्रवास होता. रोज रात्री शेटजी पोटली काढायचे, दागिने मोजून परत ठेवायचे.बाथरूमला जाऊन यायचे व निवांत घोरत झोपायचे. शेडजी जाऊन आल्यावर चोरही बाथरूमला जाऊन यायचा. शेटजी झोपी जाण्याची वाट पाहायचा  व लगेच पोटली शोधण्यासाठी शेटजींची बॅग तपासायचा. हे काम त्याला वाटले तितके सोपे नव्हते. पहिल्या रात्री पूर्ण वेळ शोधूनही काही हाती लागले नाही. दुसऱ्या दिवशीही तेच घडले. तिन्ही दिवस शेटजीने पोटली त्याच्या समोरच काढली व त्याच्या समोरच खाली ठेवून दिली होती. पण चोराला आश्चर्य वाटायचे की, त्याला ती तिथे का  सापडत नाही.
    शेवटी मुक्कामी पोहोचण्याचे स्टेशन आले. शेटजींनी पोटली हातात घेतली व म्हणाले, "मित्रा, तीन रात्री तू झोपला नाहीस. आता घरी जाऊन निवांत विश्रांती घे." चोराने त्यांच्या पायावर लोटांगण घातले व म्हणाला,"इतकी नामुष्की मला कधीच आली नाही. तुम्हाला सर्व काही ठाऊक होते तरी, तुम्ही रात्रभर निवांत झोपायचा. पण येथेच असलेला मुद्देमाला मला सापडला नाही. गेल्या पंधरा वर्षात असे कधीच घडले नाही. प्लीज, मी तुमच्या पाया पडतो. तुम्हाला गुरु मानतो. मला सांगा, तुम्ही ती पिशवी कोठे लपवायचा?" शेटजी म्हणाले," तू रात्री बाथरूमला गेलास की लगेच, मी ती पिशवी तुझ्या उशीजवळ ठेवलेल्या तुझ्या हॅन्डबॅगेत ठेवायचो. आणि पहाटे उठून पुन्हा काढून घ्यायचो. तू माझा सर्व सामानात रात्रभर शोधत बसायचास. पण ती पिशवी माझ्याकडे नसायचीच.
     आपण चोर नाही पण एक गोष्ट आपण सर्वांनी या गोष्टीपासून लक्षात घेतले पाहिजे की, सुखशांतीचा जो खजिना आपण बाहेर शोधत आहोत, तो आपल्यापाशीच आहे. 
          समजा तुम्हाला कोणी विचारले की, तुमच्यासाठी जगातील सगळ्यात जास्त मौल्यवान वस्तू काय आहे? सगळ्यात जास्त मौल्यवान व्यक्ती कोण आहे?  वेगवेगळी उत्तरे येतील. कोणी म्हणेल  देव! कोणी म्हणेल मुलगा! कोणी म्हणेल इस्टेट! पण खरं सांगा! तुमच्याशिवाय या सर्व वस्तूंना काही महत्त्व आहे का? तुमच्या स्वतः शिवाय दुसरे कोण तुम्हाला प्रिय असेल? 
      प्रत्येकाला तो स्वतः सर्वात जास्त प्रिय असतो. पण मजा अशी आहे की, आपण जगातील सर्व वस्तूंबद्दल जाणण्याचा प्रयत्न करतो, पण आपण स्वतःबद्दल जाणण्याचा विचार करत नाही. ते जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. म्हणून जगातील काही लोकांनी खूप यशस्वी जीवन जगल्यानंतर आणि जगाचा बराचसा अनुभव घेतल्यानंतर विचार करायला सुरुवात केली की,
'मी कोण आहे?'
'मी येथे कशासाठी आहे ?' 'माझ्या जीवनाचे ध्येय काय ? उद्देश काय ?'
      सगळ्या चिंतनांमधून एक निष्कर्ष निश्चित निघतो की, आपण जीवनात जे काही करतो, त्या सर्वांमधून फक्त आनंदच प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आनंदाची इतकी तजवीज करूनसुद्धा आपण दुःखी का राहतो ? ही महत्त्वाची समस्या आहे. लोक निवृत्तीनंतर काय काय करावे ह्याची स्वप्नं मनाशी बाळगतात. पण निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी लगेच नवीन जॉब घेऊन बसतात. काही न काही करत राहायचे, जास्तीत  जास्त कमवायचे, अधिकाधिक वस्तू गोळा करायच्या आणि अधिकाधिक दुःख व्हायचे. असे का ?
         एक गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे की, ज्या आनंदाचा शोध आपण घेत आहोत, तो बाहेरच्या कोणत्याही वस्तूत, व्यक्तीत किंवा परिस्थितीत नाही. आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी हे ओळखले होते की, नित्य-परिवर्तनशील वस्तूंमध्ये शाश्वत सुख देण्याची क्षमताच नसते. आणि हे सर्वसाधारण तर्कानेही लक्षात येईल की,जी वस्तू स्वतः टिकाऊ नाही, ती टिकाऊ सुख देऊ शकणार नाही. 
      पूर्वसंस्कारानुसार मनामध्ये राग-द्वेष असतात. राग म्हणजे अनुराग, प्रेम किंवा आवड. सुखप्राप्तीसाठी मन नेहमी आवडीच्या गोष्टींच्या शोधात असते व नावडत्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करते. अशाप्रकारे वस्तू व व्यक्तींमध्ये सुखासाठी झटणारे बहिर्मुखी मन नेहमी रजोगुणात  किंवा तमोगुणातच असते. 
      पण काही चिंतन व्हायचे असेल तर, मन सात्विक असले पाहिजे. विचार करूनच आपण समजू शकतो की, आपण जे काही करीत आहोत ते का व कशासाठी करीत आहोत ? ते तसे करायला आपल्याला नको बाध्य करीत आहे?  सुखप्राप्ती हेच एकमेव ध्येय असेल तर, विचार करणे आवश्यक आहे की, विषय वस्तूंमध्ये आनंद आहे का ? आनंद देणे हा विषय वस्तूंचा धर्म आहे का? गोड असणे हा साखरेचा धर्म आहे, साखर गोड नाही असे असूच शकत नाही. चॉकलेट खाऊन नेहमी आनंद मिळतो का ? लहानपणी एखाद्याला चॉकलेट खूप आवडत असेल पण तेव्हाही एक मर्यादेनंतर ते पण कंटाळवाणे होत होते. वय झाल्यावर मधुमेहाने शरीरं ग्रासलेले असतील तर, चॉकलेट अगदी त्याज्य होऊन बसते. म्हणजे आनंद देणे हा
चॉकलेटचा किंवा कोणत्याही वस्तू-व्यक्ती-परिस्थितीचा धर्म होऊ शकत नाही. हा आपला भ्रमच आहे की, एखाद्या
वस्तूमुळे आपल्याला आनंद मिळतो, हा भ्रम आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे. खरं तर एखाद्या वस्तूबद्दल इच्छा झाल्याबरोबर मनात विक्षेप निर्माण होतात. मन अशांत होते. ही अशांतता आपल्या दुःखाला जन्म देते.
   सुख आणि दुःख ह्या मनाच्या दोन प्रमुख अवस्था आहेत. पण आपण मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर वस्तू प्राप्त करण्यासाठी आपण धडपड करण्याचे सोडले तर शांती उपलब्ध आहे. आनंदही उपलब्ध आहेच.
  Please can be gained, right here and now.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...