शुक्रवार, १८ जुलै, २०२५

2068. मायेची सावली

  सकाळी सकाळी डोअरबेल वाजली. कचरा नेण्यासाठी सफाई कर्मचारी आला होता. घड्याळ पाहिले, बाप रे सहा वाजले. कसं आटोपणार सगळं आता. अर्णवच्या शाळेची तयारी, डबा तयार करायचा. माझा (मीनाक्षी) डबा, सुधीरचा डबा, सकाळची सगळी आन्हीक आटपायची. तितक्यात मोलकरीण मालती ही आली. "मालती, आज तुलाही उशीर झाला."
"काय करू ताई, माझ्या धाकल्या पोराला बरं नव्हतं. रातभर किरकिर करत होता. सकाळी सकाळी झोपला तशी आली इकडे धावत." 
"बरं बरं, कामावरून गेली कि मुलाला घेऊन जा दवाखान्यात. आज मलाही उशीरा जाग आली. सगळं काम पडलंय."  
"काही काळजी करू नका. पोळ्या मी भाजून देऊ का ?" 
"हो चालेल." मालतीने पोळ्या करायला घेतल्या, मी पटकन गवारीच्या शेंगांची भाजी फोडणीला घातली. वरण भाताचा कुकर लावला. मधून मधून अर्णवला उठवत होते. 'थांब थोडावेळ, थांब थोडावेळ', त्याचं चालूच होतं.
      सुधीरही उठले. यांना अगदी गरम चहा लागतो. अर्णवही उठला. त्याचं स्नान, युनिफाॅर्म, बूट घालून देणे, डबा, वाॅटरबॅग, सगळं दिलं. मला 'बाय बाय' करत तो सुधीरसोबत गेला शाळेला. मी ही तयारीला लागली आणि धावत पळत 8.40 ची लेडीज स्पेशल ट्रेन गाठली. साडेनऊ वाजता ऑफीसला पोहोचले. पी सी आँन केला. आजचे मेल चेक केले. आवश्यक ती उत्तरे दिली. आजच्या कामाचं शेड्यूल पुन्हा एकदा चेक केलं. प्रशांत बिल्डर्स, संदीप प्लास्टिक्स यांचे लोन प्रपोजल्स होते. त्या साईट सीनला व्हिजीट द्यायच्या होत्या. फोनवरून मी वेळ ठरवली व आवश्यक कागदपत्रांची फाईल घेतली. माझी ऑफिसर मीनाला ऑफिस सांभाळण्याच्या सूचना देऊन मी निघाले.
       संदिप प्लास्टिक्सचं प्राॅडक्शन युनिट, बॅलन्सशीट, ॲसेटस, लायबिलीटस व प्रत्यक्षदर्शी मी केलेला अभ्यास. सगळे प्वाईंटस नोट करुन थोडा मोकळा श्वास घ्यावा वाटत असतांनाच फोनची रिंग वाजली. आईचा फोन होता. बाबांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला होता. माझी तर पायाखालची जमीनच सरकली. काही वेळ मला काही सुचलेच नाही. 
"काय झालं मॅडम. काही प्राॅब्लेम ? तुम्ही चिंताक्रांत दिसत आहात." संदीप प्लास्टिक्सचे CEO मूलचंद वर्मा बोलत होते. 
"माझ्या बाबांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आलाय. रूग्णालयात अतिदक्षता विभागात आहेत." 
"ओह, धीर धरा मॅडम, बाबांना काही होणार नाही." त्यांनी मला पाणी दिले. एक दीर्घ श्वास घेऊन मी सुधीरला फोन केला.
"मीनाक्षी, घाबरू नकोस. मी निघतोय ऑफिसमधून, येतांना अर्णवलाही आणतो शाळेतून. लगेच निघू आपण आपल्या गाडीने".
      हळूहळू बाबांच्या आठवणी मनात फेर धरत होत्या. माझ्या प्रगती पुस्तकावर कौतुकाने सही करणारे बाबा, मला बक्षीस मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे बाबा, परीक्षेच्या वेळी प्रोत्साहन देणारे बाबा, संकटे, अडी अडचणीच्या वेळी धैर्य, हिंमत देणारे बाबा, मला नोकरी मिळाल्यावर पहिल्या दिवशी माझ्यासोबत ऑफिसला येणारे बाबा, माझ्या लग्नातील निरोपाच्या वेळी हळवे झालेले बाबा, डोळ्यातील अश्रूंना 'कचर्‍यामुळे आले' सांगणारे बाबा.
       आठवणींच्या या भोवर्‍यात मला आठवला तो प्रसंग जेव्हा आई बाबांना म्हणत होती, "अहो मीनाक्षीसाठी स्थळ पाहणी सुरू करा आता." तेव्हा बाबांना वाटले कालपर्यंत इटुकली पिटुकली असलेली माझी मैना सासरी जाण्या इतपत शहाणी कधी झाली ? 
"काय हो ? काय विचार करताय ?" 
"काही नाही ग. आपली छकुली कधी मोठी झाली कळलेही नाही." 
"अहो चालायचंच. प्रत्येक बापाला असंच वाटतं. आपल्या लेकीविषयीची माया असते ही. पण जगरहाटी कोणाला सुटलीय ? तर आपल्याला सुटेल ?"
"नाही नाही, मी नाही माझ्या मीनूला कोठे पाठवणार ?" 
"म्हणजे ? तिचे लग्नच करणार नाहीत काय तुम्ही?"
"तसं नाही ग, माझ्या राजकन्येसाठी चांगला राजकुमार शोधेन मी. राहतील दोघे माझ्याजवळ." 
       पण मी बँकेत अधिकारी तर सुधीर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये क्लास वन अधिकारी. आमचे दोघांचेही ट्रान्सफरेबल जाॅब. बाबांजवळ फारसं राहताच आलं नाही. आम्ही आमच्या आमच्या चक्रात फिरतच होतो. सणावारालाही आम्ही अभावानेच जात होतो. शाळेत मला वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं. बक्षीसाचं स्वरूप होतं, गोष्टीचं पुस्तक  'गुलाब आणि जाई' बाबांनी किती कौतुक केलं होतं माझं, त्यांनी स्वतःही ते पुस्तक वाचलं. माझ्या आजोबांनीही वाचलं. घरातून मिळणार्‍या या प्रेरणेचं मला पुढे मिळणार्‍या अनेक बक्षीस, पुरस्कारांची नांदी ठरलेत.  बाबांनी जीवनाच्या पावला पावलावर माझी मदत केली. माझ्या महाविद्यालयातील प्रवेशावेळीही बाबांनी अगदी माहिती पत्रक आणून, स्वतः त्याचा अभ्यास करून मला योग्य ते मार्गदर्शन केले होते. माझ्या नोकरी संशोधनातही त्यांचा सिंहाचा वाटा. अगदी भरतीच्या जाहिराती वाचून तर फाॅर्म भरण्यापासून, कागदपत्रांच्या पूर्ततेपासून सगळं बाबाचं बघायचे.
     बालपणी दसर्‍याच्या दिवशी मी सुद्धा सिमोलंघनाला जायचे. मग बाबा मला पेढे, बताशे, फेणी, असा खाऊ घेऊन द्यायचे. खेळणी, फुगे घेऊन द्यायचे. मग रावण दहनाचा कार्यक्रम आटोपला की आम्ही परतायचो. देवळात देवीला सोने वाहिल्यावर घरी यायचो. दरवाज्यावर आई सीमोलंघनाहून आले म्हणून आम्हां भावंडांचं व बाबांचही औक्षण करायची. मग आम्ही आईला सोनं द्यायचो. 
      अश्रूंचे ओघळ गालावर आले तसे सुधीर म्हणाले, "मीनाक्षी be brave, काही होणार नाही बाबांना. Every thing will be alright. घे, पाणी घे जरा," म्हणत त्यांनी पाण्याची बाॅटल मला दिली. अर्णवही अंतर्मुख झाला होता. मला चिकटून बसला. मी त्याच्या पाठीवरुन हात फिरवला, त्याला आंजारलं, गोंजारलं. माझं लेकरू टकामका मला पाहात होतं. मी स्वतःला सावरलं. त्याच्याशी प्रेमानं बोलले तसा तो थोडा रिलॅक्स झाला, मोकळा झाला. सुधीर स्वतःच कार ड्रायव्हिंग करत होते. डोळ्यावर झोपेची पेंग येऊ लागली तशी त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला चहाच्या टपरीजवळ लावली. मीनाक्षी, "चहा घेऊया थोडा थोडा, माझी ही झोपेची पेंग जाईल, तुलाही थोडी तरतरी वाटेल."
      बाबा ICU मध्ये तर आई आणि भाऊ waiting room मध्ये. मला पहाताच आईच्या संयमाचा बांध फुटला. मी ही अश्रूंना रोखू शकत नव्हते. "आई, ताई रडू नका, शांतता राखा. आपण हाॅस्पिटलमध्ये आहोत." माझा भाऊ सचिन बोलत होता .सुधीरने ही आपला आश्वासक हात सचिनच्या खांद्यावर ठेवला. त्याच्याही डोळ्यात अश्रू तरळत होते पण प्रयत्नपूर्वक त्याने रोखले होते.
      ICU room च्या काचेच्या विंडोतूनच मी बाबांना पाहिले. त्यांना त्या अवस्थेत पाहून मला कसेतरीच होऊ लागले. तिथे जवळच पॅसेजमध्ये गणपतीचे छोटेसे मंदिर होते. "देवा, माझ्या शिरावरील ही मायेची सावली हिरावून घेऊ नकोस. मला पोरकं करू नकोस. उतार पडू दे बाबांच्या तब्येतीला." 
मी मनोभावे देवापुढे प्रार्थना करत होते कि माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला, "होईल तुझी प्रार्थना सफल. विश्वास ठेव. डगमगू नकोस." वळून पाहिले तर एक ताई होत्या . 
"कोण आहे तुमचं आजारी?" 
"माझे बाबा. तुमचं कोण आहे ताई ?" 
"सासूबाई, अर्धांगवायूचा झटका आलाय. जीभही जडावलीय." 
"वाटेल बरं त्यांनाही, मी मनोमन पुन्हा देवाला हात जोडले. इतक्यात शर्वरी सचिनसाठी डबा घेऊन आली. 
"ताई, भावोजी तुम्ही प्रवास करुन आलात. घरी जा, फ्रेश व्हा, मी स्वयंपाक करुन ठेवलाय, थोडं खाऊन घ्या मग या सावकाश दवाखान्यात, सोबत आईंनाही घेऊन जा. खूपच टेंशन घेतलंय त्यांनी."
      मनावर दडपण तर खूप होतं. मन अशांत होतं. अशा या विकल अवस्थेत केव्हा डोळ्यावर झोपेने अंमल मिळवला कळले नाही. सकाळी सकाळी मोबाईलचा रिंगटोन वाजला. सचिनचा फोन होता. "ताई बाबा गेले ग..." आईने तर हंबरडा फोडला, माझी व शर्वरीचीही रडारड सुरू झाली. सुधीर लगेच गाडी घेऊन रूग्णालयात गेला. रूग्णालयातील आवश्यक पूर्तता करून बाबांचं कलेवर घरी आणलं. बाबांना निरोप देतांना मला खूपच भडभडून आलं. "माझी मायेची सावली हरवली हो" मी सुधीरच्या खांद्यावर मान ठेवली.
       सुधीरने हलकेच मला थोपटलं. "मीनाक्षी सावर स्वतःला. बाबांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांनी दाखविलेल्या पाऊल वाटेवर चालत राहा. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आज त्यांचं पार्थिव शरीर संपलय पण अंतःकरणातील स्थान पक्कं झालंय. बघ अर्णव किती दुर्मुख झाला आहे. आपणही आई बाबा आहोत हे विसरुन कसं चालेल." 
      मी अश्रू पुसले. अर्णव ला कुशीत घेतलं. आता ही मायेची सावली मला अर्णव वर धरायची होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...