सुरेशभाऊ पालकर गेले तेव्हा मी गावी होतो. पण त्यांच्या कार्याला हजर राहायचे हे मनाशी पक्के करूनच कामे उरकली आणि परतलो.
कार्याचे एक बरे असते. बरेचसे नातेवाईक आणि मित्रमंडळी भेटतात. ते जणू एक छोटे गेट टू गेडर असते. यावेळी ज्याचे कार्य आहे त्याच्या विषयी कोण चर्चा करत नाही पण गावातील वाद ,मुलांचे शिक्षण ,जमीन ,भावकी , देऊळ असे बरेच विषय चर्चिले जातात. सुरेशभाऊच्या दशविधी कार्याला काही वेगळे चित्र नव्हते. त्यांचा मुलगा अंकित निर्विकार चेहऱ्याने भटजी सांगेल ते करत होता. अर्थात वयाच्या नव्वदाव्या वर्षी नातवंडांची लग्ने पाहणाऱ्या व्यक्तीच्या जाण्याचे कोणाला दुःख होईल म्हणा. पण सुरेशभाऊनी माणसे खूप जोडून ठेवली होती. स्मशानात नाही म्हणायला पन्नास साठ जण उपस्थित होती. मी रजा घेतली असल्यामुळे घाईत नव्हतो.त्यातच काही जुने मित्र आणि ओळखीचे काहीजण स्मशानात नेहमीप्रमाणे भेटले आणि त्यांची विचारपूस ही झाली.
सुरेश भाऊंच्या दशक्रियाविधी शेजारीच साधारण पंचविशीचा एक तरुण विधी करायला बसला होता . त्याच्यासोबत कोणीच दिसत नव्हते. त्याचा तो केस काढलेला गुळगुळीत चेहरा पाहून मी हळहळलो. बिचारा .. तरुण वयातच हे असे विधी करायला किती यातना होत असतील त्याला .शिवाय धीर द्यायलाही कोणी हजर नाही.आपले कोणी गेल्याचे दुःख एकट्याने सहन करायचे म्हणजे साधी गोष्ट नाही . मी त्याच्याकडे पाहत हाच विचार करीत होतो. काही वेळाने सुरेशभाऊंचे कार्य संपले .कावळेही जणू पिंडाची वाटच पाहत होते.अंकितची पाठ वळताच तीन कावळ्यांनी पिंडावर एकदम हल्ला केला आणि अंकितसह उपस्थित सर्वांनी हुश्श केले आणि पैसे लावायला रांग लावली. त्या तरुणाचेही सर्व आटपले आणि पाचच मिनिटात त्याने ठेवलेल्या पिंडाला कावळा शिवला. मी सवयीप्रमाणे हुश्श केले पण त्याच्या चेहऱ्यावरची माशी हलली नाही. सर्व संपल्यावर त्याने भटजीला नमस्कार केला आणि बाराव्याची वेळ विचारून घेतली. त्याने जाताजाता आपले कार्ड काढून गुरुजींना दिले , हे माझ्यासाठी थोडे विचित्रच होते . साधारणतः भटजी आपले कार्ड देतात पण इथे उलट होते .मी फारसे मनात न ठेवता सर्वांसोबत घरी परतलो .
आज सुरेशभाऊंना जाऊन महिना झाला. मित्राचा फोन आला म्हणून ऑफिसमधून बाहेर पडलो आणि समोरच्या कॉफीशॉपमध्ये बसलो. त्याच्याशी गप्पा मारताना रस्त्यावर नजर होती . समोरच्या गल्लीतून एक प्रेतयात्रा बाहेर पडत होती. हल्ली कोणीही प्रेताला खांद्यावर घेऊन स्मशानात जात नाही. त्यासाठी विभागातील समाजसेवकांनी वेगवेगळे रथ तयार केलेले असतात .
अश्याच एका रथावरून ती प्रेतयात्रा चालली होती .त्या रथावर हातात मडके धरून बसलेल्या तरुणांकडे पाहून मी उडालोच .हा तोच तरुण होता जो स्मशानात अंकितच्या बाजूला कार्याला बसलेला होता.
"अरे रे ..!! बिचाऱ्यावर दुःखाचा डोंगरच कोसळलेला दिसतोय. महिन्याभरापूर्वी एकाला गमावले आणि आता दुसऱ्याला " मी स्वतःशी पुटपुटलो.
दोन दिवस त्याचा चेहरा नजरेसमोरून जाईना. मी मनाशी दिवस मोजले आणि दहाव्या दिवशी सकाळी स्मशानात हजर झालो. अर्थात तिथे नेहमीप्रमाणे कोणी ना कोणी ओळखीचे भेटलेच. त्याची विचारपूस करतानाच माझी नजर त्याला शोधू लागली आणि एका कोपऱ्यात गुरुजींच्यासमोर कार्याला बसलेला तो दिसलाच. त्या दिवशीसारखाचा तो एकटाच कार्य करत होता. आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते .मी माणुसकी म्हणून त्याच्यामागे उभा राहिलो . खरे तर आता स्मशानात सकाळीसकाळी आलोच आहे तर कोणाच्या तरी पिंडाला पैसे लावूनच जाऊ हा सुप्त हेतू होताच. कार्य होताच तो पिंड ठेवायला पुढे गेला आणि हात जोडून कावळ्याची वाट पाहत उभा राहिला.पाच मिनिटात कावळ्याने पिंडाला चोच मारली. मी सवयीप्रमाणे पैसे लावायला पुढे झालो तसा तो थबकला.काही न बोलता त्याने मला पाया पडायला दिले नंतर सर्व सामान गोळा करून समुद्रात सोडायला गेला. जाताना त्याने आपले कार्ड भटजीला दिले. ते पाहून मला पुन्हा आश्चर्य वाटले.
तो स्मशानाबाहेर पडला आणि मी त्याच्या मागून जात हाक मारली .
"अरे मित्रा "
तसा तो वळला आणि माझ्याकडे पाहून ओळखीचे हसला .
" तुम्ही महिन्यांपूर्वी इथे आला होतात " तो हसून म्हणाला ."कोणी गेले का पुन्हा ?"
"नाही पण यावेळी तुला भेटायला आलो होतो. दहा दिवसापूर्वी तुला रथावर मडके घेऊन बसलेले पाहिजे. महिन्याभरात दोन कार्य आणि सोबतीला कोणीच नाही म्हणून आश्चर्य वाटले. म्हणून मुद्दाम तुझ्यासाठी आलो " मी म्हणालो.
तसा तो हसला आणि खिशातून कार्ड काढून माझ्यासमोर धरले आणि म्हणाला "चला चहा पिवू ."
कार्डवर त्याचे नाव आणि मोबाईल नंबर होता पाठीमागे एकच वाक्य होते मी आहे.
" हे काय " चहाचा घोट घेत मी विचारले.
"एका कार्याचे कमीत कमी पंचवीस हजार घेतो. भटजी आणि सामानाचे वेगळे." तो शांतपणे म्हणाला.
म्हणजे "मी चकित होऊन विचारले .
" ज्यांचे कोणीच नाही पण त्यांच्याकडे पैसे आहेत. माणसे नाहीत अश्याच्या कार्याची जबाबदारी मी घेतो. त्यांच्या अंत्ययात्रेपासून दिवसापर्यंत इतकेच नव्हे तर वर्षश्राद्धपर्यंत सर्व कार्य व्यवस्थित करण्याची जबाबदारी मी घेतो आणि त्यानुसार पैसे आकारतो." तो सहजपणे म्हणाला .
"अहो पण अंत्यसंस्कार तर आमचा बंड्याही करतो. तेही फुकट " मी ऐटीत म्हणालो.
" पण तो दशक्रिया, बारावे , तेरावे, श्राद्ध करतो का "? त्याने विचारले.
तसा मी निरुत्तर झालो.
"बंड्या अंत्यसंस्कार करून मोकळा होतो पण पुढे काय? बंड्या चांगले काम करतो मान्य आहे पण मृत्यूनंतर बाकीची कार्य केल्याशिवाय आत्म्याला मुक्ती मिळत नाही अशी आपली समजूत आहे. मग ती कामे मी करतो अर्थात पैसे घेऊनच." तो सहजपणे म्हणाला.
" सुरवात कशी झाली ? " मी कुतूहलाने विचारले.
"माझ्या मित्राचे लांबचे काका होते. ते निपुत्रिक होते आणि शेवटी वृद्धाश्रमात राहत होते. ते गेल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार मित्रच करणार होता पण नेमका काही दिवसासाठी बाहेरगावी गेला आणि ते वारले. त्यांच्या मृत्यूनंतर सगळी कार्य व्यवस्थित रितिरिवाजनुसार व्हावे अशी त्यांची इच्छा. मित्राने मला फोन केला . मीच त्यांचे अंत्यसंस्कार केले. नंतर वृद्धाश्रमाने साठ हजार माझ्या हातात दिले आणि अंतिम इच्छेनुसार त्यांची सर्व कार्य करायला सांगितले. मी त्यांचे दहावे बारावे, वर्ष श्राद्ध केले. सर्व मिळून पंचवीस हजार खर्च झाले. मित्राने उरलेले पैसे तुलाच ठेव असे सांगितले. एकेक दिवसाची तीन कार्य आणि तीही दोन दोन तासाची. साधारण पस्तीस हजार मिळाले. मीही खुश ,मित्र खुश , त्याचे काका वर जाऊन खुश .नंतर त्या वृद्धाश्रमाने अजून दोन तीन जणांची कार्य करायला सांगितली. त्यातही पैसे मिळाले .मग ह्यातच गुंतून गेलो. " तो हसत म्हणाला.
"तरीही पैसे घेऊन दुसऱ्याची कार्य करणे हे पटते का तुम्हाला " मी धाडस करून विचारले.
" भाऊ, भटजी पैसे घेऊन विधी करतो. हजाम पैसे घेऊन केस कापतो. स्मशानात लाकडे फुकट देतात तरीही आपण तिथे चिता पेटवणार्याला दोनशे रुपये टीप देतो. पोलिसांना बॉडी सोडविण्यासाठी पैसे देतो. मग अंत्यसंस्कार आणि इतर विधी करणाऱ्याला का पैसे देऊ नये? तसेही हल्ली बरेचसे वृद्ध आपल्यानंतर अंत्यसंस्काराची आधीच तयारी करून ठेवतात. मग त्यांच्या इच्छा माझ्यामार्फत पूर्ण होतात " तो सहजपणे म्हणाला.
त्याचे चुकीचे काहीच वाटत नव्हते. तो कोणाला फसवत नव्हता. अगदी त्यांच्या अंतिम इच्छेनुसार सर्व कार्ये करीत होता.
" मग किती ऑर्डर असतात महिन्यात? "मी हसत विचारले .
"सरासरी महिन्याला चार ते पाच. लाख दीड लाख सुटतात महिन्याला. आता तर स्मशानातील भटजीही ओळखीचे झालेत. कधी ते मला बोलावतात तर कधी मी त्यांना ऑर्डर देतो. तुम्हाला सांगतो भाऊ हल्ली वेळ कोणालाच नसतो. लोक दशक्रियेला पाया पडून इथूनच ऑफिसला जातात. बाराव्याला जेवायला कोण येत नाहीत. खांदेकरी वेळ मिळेल तेव्हा येऊन खांदे उतरवून जातात. विधुर मिळत नाही, जोडपे मिळत नाही मग मीच काहींना पैसे देऊन बोलावतो." त्याने आपल्या धंद्यातील अडचणी सांगायला सुरुवात केली.
अरे बापरे ,हा आता मलाही एखादी ऑफर देईल की काय ? अशी भीती वाटू लागली .
"मग त्या केसाचे काय? " मी हसत विचारले.
"मी आता हीच स्टाईल ठेवलीय. त्याने शेंडी दाखवत सांगितले. पैसे महत्वाचे. डोक्यावर भरमसाठ केस असणे महत्त्वाचे नाही." असे बोलून तो उठला आणि चहाचे पैसे देऊ लागला.
" मी देतो." मी त्याला थांबवत म्हणालो.
" नको भाऊ , हे पॅकेजमधून आहे. या कार्यातून बारा ते पंधरा हजार तरी मिळतील " तो हसत म्हणाला .
मी हात मिळवून पुढे निघालो. मागून पुन्हा त्याने हाक मारली .
" भाऊ ,भेटू पुन्हा इथेच कधीतरी. नाहीतर या वीस तारखेला भेटा. एकाचे वर्षश्राद्ध आहे. चांगल्या दहा पदार्थांचा मेनू आहे विथ आईस्क्रीम. हॉल घेतलाय. बघा प्रयत्न करा." तो हसत म्हणाला.
मी लांबूनच हात जोडले आणि हसत हसत पुढे निघालो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा