गुरुवार, २४ जुलै, २०२५

2083. मुझको भी तो ‘लिफ्ट’ करा दे !

 ऑफिसवरून रात्री दहानंतर गाडीवरून घरी येतांना मला रस्त्याने कोणी लिफ्ट मागितली की मला थांबायचा मोह आवरत नाही. रात्रीची लिफ्ट देणे धोकादायक असते हे माहित असूनही मी बऱ्यापैकी कोणी हात दाखवला की थांबून त्याला गाडीवर घेतो. त्याला कारणही तसेच आहे कारण, मी नगरला कामाला असतांना गावी यायला रात्री अकरा वाजायचे आम्ही स्टँडपासून दोन किलाेमीटर अंतरावर राहात असल्याने मला रात्री अकराच्या पुढे पायी-पायी यावे लागायचे त्यामुळे रस्त्याने कोणीही टूव्हीलरवाला दिसला की, त्याला हात करायचो क्वचित कोणी थांबत किंवा बरेचसे तसेच निघून जात त्यामुळे चला आपण सुद्धा कोणाला तरी मदत करावी हा माझा उद्देश होता .
असेच एकदा रात्री गाडीवरून येत असतांना माझ्याच वयाच्या एका व्यक्तीने मला लिफ्ट मागितली. थांबावे की जावे असा ‘टू बी ऑर नॉट बी’ असा विचार करून मी गाडी थांबवली त्याला गाडीवर घेतले. कुठे जायचे असे विचारल्यावर त्याने मलाच ‘तुम्हाला कुठे जायचे’ असे विचारले मी पत्ता सांगितल्यावर मलाही तिकडेच यायचे आहे असे म्हणत तो डायरेक्ट मागे बसला. बसतानांच त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता. आता बसलाच आहे तर त्याला लगेच खाली उतर म्हणणेही योग्य वाटत नव्हते. थोडे पुढे जाऊन याला खाली उतरून द्यावे असे म्हणून मी गाडी सुरु केली. त्याने गाडीवर असतांना माझी चौकशी सुरु केली. माझे गाव नाव विचारले व डायरेक्ट तुमच्या गावाकडे माझ्यासाठी लग्नाला मुलगी मिळेल का? असे विचारले. आता तरुण मुलांनाच मुली भेटायची मारामार झाली  आहे तर याला पन्नाशीच्या पुढच्याला कोण मुलगी द्यायचे असे मनात विचार करून मी ‘तुम्ही अजून लग्न केले नाही का’ असे विचारले. त्यावर त्याने लग्न केले होते पण एकदा मी माराामाऱ्या केल्या पोलिसांनी मला उचलले व तुरुंगात टाकले पाच सहा महिने जेलमध्ये राहिल्याने बायको मला सोडून गेली आहे त्यामुळे मला पुन्हा दुसरे लग्न करायचे आहे असे सांगितले. मी शॉकच झालो तरी त्याचे एकच म्हणणे होते की मला लग्नासाठी मुलगी पाहा.
मला शोले पिक्चरमधल्या अमिताभची आठवण झाली. मला याच्या लग्नाची बोलणी करायची म्हणले तरी हा कामधंदा सोडून बाकी सगळेच करीत होता, म्हणजे दारूही पित होता, भांडणेही करत होता. पण आता आपणच होऊन याला लिफ्ट दिल्याने त्याचे ऐकून घेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.
शेवटी अखेर मी त्याला माझे पण अजून लग्न झालेले नाही त्यामुळे एक काम कर मलाही एखादी मुलगी बघ म्हणजे मी तुला मुलगी बघतो व तु मला बघ म्हणजेच दोघांचेही एकदम लग्न होऊन जाईल तुझ्या सारख्याच माझ्याही काही जास्त अपेक्षा नाहीत  असे म्हणलो त्यावर त्याने काय राव तुम्ही माझी चेष्टा करताय असे मला म्हणाला. मी त्याला खोटेच मला मेडिकलमधून औषधे घ्यायची अाहेत वेळ लागेल असे म्हणून गाडी थांबवली बळेबळे त्याला खाली उतरवले.
त्यानंतर पुन्हा कोणाला लिफ्ट द्यायची नाही असे मी ठरवले. पण असेच एकदा रात्री कामावरून घरी येत होतो. थोडा थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली होती. मी जोराने गाडी पळवित होतो अचानक एका पंचवीस सव्वीस वयाच्या तरुणाने हात दाखवला मागचा अनुभव असल्याने थांबायचे नाही असे ठरवूनही थोडा पुढे गेल्यावर पुन्हा गाडी स्लो करून मी थांबलो तो पळतच माझ्याकडे आला व ‘काका प्लीज मला पुढच्या चौकापर्यंत सोडवां असे म्हणाला. फोनवर तो आईसोबत बोलत होता. आई तु काही काळजी करू नको, आता मी कामाला लागलोय ना आपण सर्वांचे पैसे फेडू तु रडू नको, पप्पांना सांग काळजी करू नका आता मी आहेना असे म्हणत मी तुला नंतर फोन करतो असे म्हणत त्याने फोन ठेवला.
मी सहज विचारले कोठे आहेस त्यावर त्याने मी आजच पुण्याला कामाला जॉईन झालो आहे. दिवसभर काम केले आणि आता रूमवर चाललो आहे अजून मला बादली टूथपेस्ट साबण सर्व खरेदी करायचे आहे असे सांगितले. आज कामाचा पहिलाच दिवस होता. रूमवर जायचे तर रात्री बसही भेटत नव्हती व रिक्षावाले किती पैसे घेतात हे पण माहित नव्हते. आई-वडिलांनी खूप काबाडकष्ट करून लोकांकडून पैसे उसने घेऊन माझे शिक्षण केले आहे लोक आता उसने दिलेले  पैसे मागायला येत आहेत मला सर्वांचे पैसे फेडायचे असल्याने काही दिवस तरी काटकसरीने राहावे लागेल असे म्हणत त्याने माझे आभार मानले.
आपण सध्याच्या तरुण पिढीला सारखे मोबाईलवर असतात किंवा व्यसनाधिन आहेत असे म्हणून नावे ठेवतो पण काही तरूण असेही आहेत की त्यांना आईवडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव आहे हे मला त्या तरुणाकडे पाहिल्यानंतर समजले व  किमान ही ‘लिफ्ट’ तरी कारणी लागली असे मनात म्हणत मी त्याला चौकात सोडून पुढे निघालो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...