वकिलांच्या चेंबर्स मध्ये घटस्फोट घेण्या बद्दलची चर्चा सुरू होती. न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत उद्या संपणार होती. तत्पूर्वी पुन्हा एकदा काही समेट घडते आहे का, ह्याची चाचपणी करण्यासाठी वकिलांच्या चेंबर्स मध्ये पुन्हा दोघांना बोलाविण्यात आले. आधीचे सर्व प्रयत्न धुळीस मिळाले होते. घटस्फोट घ्यायचाच ह्या भूमिकेवर दोघेही ठाम होते. उद्या कोर्ट घटस्फोटाची घोषणा करणार होते. कुणाकडे काय काय येईल, ह्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मुलगी वडिलांकडे तर मुलगा आईकडे राहतील, हे दोघांनी मिळून मान्य केले होते. एकदा पुन्हा विचार करा, किमान मुलांसाठी तरी, वकील साहेब विनंती करीत होते. पण दोघे आपापल्या भूमिकेवर ठाम होते. वकिलांच्या चेंबर्स मागे दोन्ही मुले बसुन रडत होती. मुलगा दहा वर्षाचा तर मुलगी सहा वर्षांची ! दोन्हीही भाऊ बहीण वेगवेगळ्या ठिकाणी जायला तयार नव्हते. दोघा भावा - बहिणीचे आपसात प्रचंड प्रेम होते. वकिलांच्या चेंबर्स मध्ये दोघे आत आले. आपापल्या मुलांना पाहून दोघे भारावले. दोघांनी आपले हात पुढे केले पण दोघे मुले आई बाबांकडे गेले नाहीत. मान खाली घालून ते रडत होते. मुलगा रडत रडत म्हणाला " तुम्हाला वेगळे व्हायचे तर व्हा, आम्ही दोघे भाऊ बहीण वेगळे राहणार नाहीत. तुम्ही मोठी आहात, तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो घ्या पण तुमच्या मुळे आमच्यात दुरावा निर्माण करू नका. आम्ही कसेही जगू, शिकू अन मोठे होऊ पण पुन्हा तुमच्या कडे आम्ही येणार नाही. एकत्र रहायचे नव्हते तर आम्हाला जन्म तरी का दिला तुम्ही ? तुम्ही वेगळे व्हा, पण आम्ही मात्र कधीच वेगळे होणार नाही. "
हे सगळे ऐकून दोघे गार पडले " अरे बेटा असे करू नका. तुझा मी खूप चांगला सांभाळ करेल, तुला खूप आनंदात ठेवेल " बाबा मुलीकडे पाहून बोलले. " बेटा आता तूच तर माझ्या जगण्याचा आधार आहेस, तुला मी खूप मोठे करेन, खूप शिकवून तुला खूप मोठा अधिकारी करेन " आई मुलाकडे पाहून बोलली. पण दोघांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही व तिथून जायला लागले. आता काय करायचं म्हणून दोघेही संभ्रमात पडले. मुले अशी टोकाची भूमिका घेतील, असे त्यांना बिलकुल वाटले नव्हते. दोघेही बाहेर आले अन आपल्या मुलांना हाक मारू लागले. पण मुले दूर जात होती. आपल्या दोघांच्या इगो मुळे आपली मुले आपल्या पासुन दुर जात आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. दोघांची नजरानजर झाली. नजरेने पुन्हा एकत्र राहण्याचे ठरविले. आता दोघेही हातात हात घालून मुलांना हाका मारू लागले. मुलांनी मागे वळून पाहिले. आपले आईबाबा हातात हात घालुन आपल्या कडे येत आहेत, हे पाहून त्यांनीही आपली पावले आई बाबांकडे वळवली. दोघांनी आपापल्या मुलांना आपल्या मिठीत घेतले. मुलांच्या त्या निर्णयाने आईबाबा दोघे एकत्र आले होते. "आता आम्ही तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही" असे म्हणत दोघा मुलांना छातीशी कवटाळून मिठीत घेतले.
वकील साहेब मागून ही सर्व बघत होते. त्यांची कल्पना फलद्रूप झाली होती. कायदा हरला होता, प्रेम जिंकले होते. मुलांच्या प्रेमामुळे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले होते.
सतीश कलंत्री
मालेगाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा