प्रोफेसर बोडस यांनी जड मनाने आपले सामान एका पिशवीत भरले. आपल्या ॲाफिसकडे एकदा शेवटचं बघून बाहेर पडले. गेली पंचेचाळीस वर्ष गणित शिकवणारे प्रोफेसर आज आयुष्याचं गणित समजून घेताना गोंधळून गेले होते. काल तर पन्नाशी गाठली होती.. कुठं गेली दहा वर्षं? त्यांनी मांडलेले आजवरच्या आयुष्याचं समीकरण तसं सोपं होतं.
Happiness = Mathematics + Publications
त्यांचे पेपर्स जगातल्या उत्तम कॅानफरन्स मध्ये वाचून दाखवले जात होते. त्यांनी लिहलेलं टेक्स्टबुक बहुतेक कॅालेजमधे वापरत असतं. विद्यादानाचं पवित्र कार्य आजवर जीव तोडून केलं होतं. उत्कृष्ट विद्यार्थी तयार केले होते. किती पेपर्स, पेटंटस्, पुस्तकं लिहली होती.. पण आज सारं संपणार होतं. एवढी वर्षं इतर काही केलं नाही. कधी चार मित्र जोडले नाहीत की कुठे प्रवास केला नाही. सिनेमा क्वचित कधीतरी. आता हा मोकळा वेळ कसा घालवायचा? गणिताची चर्चा कुणाबरोबर करायची? विद्यार्थ्यांला गणित कळलं की त्यांच्या डोळ्यात दिसणारी चमक कुठे शोधायची? घरी पोचताच त्यांनी नलिनीला हाक मारली. गेली चाळीस वर्ष नलिनीनं फक्त निर्व्याज प्रेमाची साथ दिली होती म्हणून तर आपण एवढं काम करू शकलो याची त्यांना जाणीव होती.
“नलू, मला असं एकटं बसण्याची सवय नाही.. मला हा चेंज फार कठीण जाणार आहे”..
“होईल हळूहळू सवय! फार विचार नका करू!” नलूचा शांतपणा बघून ते नेहमीच थक्क होत असतं.
दोन महिने कसेबसे गेले.. विद्यार्थ्यांत रमणारऱ्या प्रोफेसरांना घरी बसून नैराश्य येऊ लागलं होतं. तब्येत नाजूक झाली होती. हल्ली हात फार थरथरतात हे त्यांनी नलूला सांगितलं..
“अहो, असं होणारच वयाप्रमाणे. नका काळजी करू! डॅाक्टरना विचारू परत!” ती स्मित हास्य करत आणखी काहीतरी सांगणार एवढ्यात दाराची बेल वाजली...
“साहेब, मी दगडू..तुमी रिटार झाला नव्हं?” मळक्या वेशात दगडू लेकाला घेऊन उभा होता.
“आमच्या केशवला गणित शिकवाल का? पोराला एड्यीयचडी का काय असा आजार जडलाय..पन याला गणित लई आवडतय बघा. पण लक्षच लागत न्हाय त्याचं!”
ADHD असलेल्या केशवची बुद्धी तल्लख होती पण त्याचं मन भरकटत असे. उच्च गणितातील कठीण प्रमेयं शिकवणाऱ्या प्रोफेसरांना साधं गणित शिकवताना आपलं मन रमेल का वाटतं होत. पण नलूनं डोळ्यांनी केलेला आग्रह बघून त्यांनी शिकवणी घ्यायचं ठरवलं.
“पैसे किती?” केशवचे वडील जवळच्या कारखान्यात कामगार होते.
“पुढच्या आठवड्यात पगार हाय. लगेच पैसं देतो..या माज्या लेकानं माझ्यासारखं कामगार व्हवू नये असं वाटतया... दगडू अजीजीनं बोलला.
“पैसे नकोत मला.. मी विनामूल्य शिकवेन!” त्यांचं वाक्य ऐकून नलू गालातल्या गालात हसली..
दगडूनं दहा वेळा प्रोफेसरांचे आभार मानले व ते दोघे बाहेर पडले. नलू केव्हापासून गावातल्या मुलांना शिकवा म्हणत होती पण आपल्यालाच पूर्वी वेळच नव्हता..
केशव प्रोफेसर साहेबांकडे गणित शिकायला जातो ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. कारखान्यातील कामगारांचीच काय पण प्रतिष्ठित लोकांची मुलं मुली गणित शिकायला येऊ लागली. मुलांचे आई बाप काही ना काही सल्ला मागायला येऊ लागले. सर विनामूल्य मदत करत आहेत तर मोकळ्या हातांनी कसं जायचं या विचाराने कुणी कृतज्ञतेने जेवण बनवून आणे तर कुणी भाजीपाला आणून देई..कोणी पैसे देई. लोकांचे प्रेम बघून प्रोफेसर साहेब थक्क होऊन गेले. सकाळी उठण्यासाठी हल्ली वेगळी उर्जा जाणवत होती…हात अजिबात थरथरत नव्हते..ADHD मुळे लक्ष न लागणारा केशव गणित बोर्डगेम सारखं समोर ठेवलं की पटापट सोडवू लागला होता.
“आयुष्यातील कुठल्याही समस्येसाठी विनामूल्य सल्ला” असा बोर्ड प्रोफेसरांनी लावला. लोकांची रिघ लागली होती. लोकांना शिकवताना प्रोफेसरच किती गोष्टी शिकत होते. २ + २ नेहमी ४ नसणारं बाहेरचं जग समजून घेत होते. शिकवण्याच्या पध्दती बदलत होते. गणिताच्या जगात उत्तर सापडतं पण वास्तवातील जगातल्या प्रश्नांची उत्तरं सरळ नव्हती..
ADHD असलेला केशव, सुतारकाम करून एकेक पैसा जमवून रात्र शाळा करणारा जनार्दन, लेकीच्या गळ्यात मंगळसूत्र बघण्यासाठी स्वत:चं मंगळसूत्र विकणारी अन् सोनार मला फसवत नाही ना साहेब विचारणारी सुमा, नवरा गेल्यावर आयुष्यातील अर्थ गेलेली शांता यांच्या आयुष्याची समीकरणं नियमात बसणारी नव्हती..
त्यांनी Math in Daily Life हा पेपर लिहायला घेतला.
“Life is a math equation. In order to gain the most you have to know how to convert negatives into positives.” आर्यभट्टांनी लिहलेलं वाक्य पहिल्या पानावर लिहलं.
आयुष्य हे गणिताचे समीकरण आहे. यात जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी निगेटिव गोष्टी पॅाझिटिव करायला शिकावं लागतं..
त्यांनी बराच विचार करून आयुष्याचं नवं समीकरण लिहलं..
Happiness = Purpose + Hard Work - Obstacles
आनंद = उद्दिष्ट + उद्दिष्टासाठी श्रम - उद्दिष्टप्राप्तीतले अडथळे
सिध्दार्थ गौतम बुध्दाला राजवाड्याबाहेरचं जग दिसलं तेव्हा त्याच्या हातून बौद्ध धर्माचा उदय झाला. प्रोफेसर साहेबांना जेव्हा बाहेरचं जग दिसलं तेव्हा त्यांनी आनंद या संकल्पनेचं नवं समीकरण लिहलं.
पैसा, चैनीच्या गोष्टी, परीक्षेत यश म्हणजे आनंद असं माणूस स्वत:ला पटवतो. पण तो आनंद फार वेळ टिकणारा नाही. दोन चार तासांत तो निघून जातो..पुढचं आव्हान समोर ठेऊन! पण एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन इतरांना काही देण्यात जो आनंद आहे तो फार मोठा आहे.. दीर्घकाळ टिकणारा आहे..आयुष्यात काही उद्दिष्ट असेल तरच आयुष्याचा अर्थ आहे..
आयुष्याचं उद्दिष्ट कसं शोधायचं हे लोकांना शिकवता आलं तरच वरील समीकरण काम करेल.. त्यांनी चष्मा काढून टेबलावर ठेवला..
दारात शांता उभी होती.. नलूची अगदी जवळची मैत्रीण!
प्रोफेसर, उद्या ह्यांच्या श्राध्दाचं जेवायला या. आणि हो. नलूचा दिवस पण आलाय जवळ..यावर्षी काय करायचं ठरवलं आहेत?” शांता नवऱ्याच्या आठवणीत बुडून गेली होती.
“शांता, नवरा नाही हे आधी ॲक्सेप्ट कर..आणि हो.. अग
माझ्याकडे आज सहा मुलं ट्यूशन साठी यायची आहेत. त्यांच्यासाठी पोहे करशील का? बिचारी भुकेली असतात..
आणि थोडे लाडू करशील का या आठवड्यात? मुलांना बक्षिस म्हणून?”
हो आणि नलूचा दिवस आता वेगळा करायची जरूर नाही. माझं काम बघून ती खूष आहे ! ” प्रोफेसर काय बोलतात शांतेला कळत नव्हतं.
सुगरण असलेली शांता स्वयंपाक करताना सारं विसरून जाते हे प्रोफेसरांनी पाहिलं होतं. हे तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट बनलं तर तिचा आनंद वाढणार आहे याची त्यांना खात्री होती..आपल्याकडे सतत आलं गेलं आहे. त्यांचं खाणं पिणं बघण्याची जबाबदारी तिच्यावर टाकली पाहिजे असा विचार ते करत असताना त्यांना नलूची चाहूल जाणवली.
“वॅाव, प्रोफेसर साहेब!” नवं समीकरण मनापासून आवडलेली नलू फोटोतून पहिल्यांदाच मनसोक्त हसत होती !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा