“दादा,कोथिंबीर ऽऽऽ...” अशी उंच आवाजातली हाळी ऐकू आली, मी मागं वळून पाहिलं. एक तरुण उभा होता.अंगात साधा शर्ट, पॅन्ट, पायात प्लास्टिकची चप्पल अशा पोशाखात हातात एक रंग उडालेली जुनी सायकल,तिला लावलेल्या चारपाच पिशव्या आणि भाजीच्या पोत्यावर शिंपडायला म्हणून एक पाण्याची बाटली असा एकूण जामानिमा.. लालसर तांबूस वर्णाच्या कपाळावर गंधबुक्का उठून दिसत होता, गळ्यात तुळशीची माळ होती. त्या माळेवर माझे डोळे खिळले होते. इतक्यात त्यानं मला पुन्हा हाक मारली.
“ओ दादा...”
“बोला.”
“काय घ्यायची का कोथिंबीर? ताजी आहे..”
“कशी दिली?”
“चाळीस रुपये”
“चाळीस ?”
“महाग नाही देवा. जास्त पैशे नाही सांगणार तुम्हांला.”
“घरी विचारायला पाहिजे. विचारून सांगतो.”
“जाऊ द्या सोडा. पस्तीस द्या.”
“अहो, तसं नाही. खरंच विचारून सांगतो.”
“कोणतीही बायको कोथिंबिरीला नाही म्हणत नसती. रोज कोथिंबीर खायला पाहिजे, तब्येत चांगली राहती. लोह असतंय त्यात.”
तरीही मी शांतच.
“दादा, चला तीसला घेऊन टाका.”
मला काही सुचेना. सुचेना म्हणण्यापेक्षा माझ्या डोक्यात निराळंच चक्र सुरु झालं होतं. माणूस तर प्रामाणिक वाटतो. गरजू वाटतो पण लाचार वाटत नाही. बोलण्यात गोडवा आहे, समोरच्या माणसाचा चेहरा ह्याला बरोब्बर वाचता येतो. माळकरी दिसतोय म्हणजे खोटं बोलणार नाही आणि टोपी घालण्याचा उद्योग करणार नाही. आता राहिला प्रश्न पूर्वाचा. एक जुडी कोथिंबीरीला ती काही नाही म्हणाली नसती. (पण एखादी व्यक्ती डोक्यात फिट्ट बसली की, मी त्या व्यक्तीकडून भक्कम खरेदी करतो आणि मग हातातली सगळी कामं बाजूला ठेवून तिलाच त्या गोष्टींचं सगळं बाळंतपण करत बसावं लागतं, असा तिचा अनुभव.) तरीही मी प्रामाणिकपणे तिला फोन केला आणि परवानगी घेतली.
“एक पेंडी घ्यायला येवढा विचार करायचा नसतो.” तो म्हणाला.
मी खिशातून कापडी पिशवी काढली आणि भाजी घेतली. पैसे काढून दिले आणि मागे वळून न पाहता झपाझप निघालो. घरी पोचलो. हातपाय धुतले. भाजी दिली. पिशवी लगेच धुवायला टाकली. “सुट्टे पैसे-बिसे घेतलेत का त्याच्याकडून? असतील तर दे. सॅनिटाईझ करायला पाहिजे.” बायको म्हणाली. “नाही नाही, सुट्टे पैसेच दिले मी. त्याच्याकडून नाही घेतले.” मी म्हणालो आणि कपडे बदलायला जाणार इतक्यात दारातून हाक ऐकू आलीच.
“ओ दादा..” मी बाहेर गेलो. मागोमाग पूर्वाही दारात आली. दारात तोच भाजीवाला तरुण उभा.
“अहो, ते मगाशी तुम्ही पैशे दिले आणि गेलात. मी पण तशेच खिशात घातले. पण पुढं एकाला सुट्टे पैशे देताना बघितलं तर तुम्ही मला पन्नास रुपये जास्त दिलेत. आपले तीसच ठरले होते, तुमी ऐंशी दिलेत. हे बगा. दहाच्या आठ नोटा.” पूर्वानं माझ्याकडं पाहिलं आणि ‘कोविड हरिश्चंद्र’ असं पुटपुटत आत निघून गेली.
“हे घ्या तुमचे पैशे परत.”
“राहू द्या. आज बाजाराचा दिवस आहे, लागतील तुम्हांला.”
“नको नको. जास्तीचे पैशे घेऊन काय करू ? हे तुमचे पैशे तुमी परत घ्या नाहीतर आणिक एक पेंडी घ्या कोथिंबीरीची.”
हो-नाही, हो-नाही करता करता त्यानं हट्टानं एक जुडी दारात ठेवलीच आणि वरून पुन्हा वीस रुपये जुडीबरोबर ठेवले. तीस रुपये एक जुडी हा हिशोब त्यानं पक्का लक्षात ठेवला होता.
“तुमचं शेत आहे? ही शेतातली भाजी?”
“नाही ओ. कुठलं शेत? यार्डातनं विकत घिऊन विकतो.”
“तुम्ही इथले दिसत नाही.” मी त्याला म्हटलं.
“हो. मी इथला नाहीच. मी आहे लातूरचा.”
“मग इकडं?”
“मी टोलनाक्यावर कामाला आहे ना.तिथं चार ते बारा ड्युटी असती. मग सकाळी भाजी विकतो. तेवढेच चार पैशे सुटतात.”
“किती पैसे मिळतात भाजी विकून?”
“ते फिक्स नसतंय. कधी शंभर सुटतात,कधी तीनशे पण मिळतात. कधी कधी पन्नास पण सुटत नाहीत.”
“पण हा जोडधंदा चांगला आहे की.”
“काय करणार? तिकडं भाऊ आणि भावाच्या बायकोबरोबर पटेना. म्हणून मग घर सोडून इकडं आलो. एकाच्या ओळखीनं टोलनाक्यावर नोकरी लागली. पंधराशे रुपये पगार. पाचशे रुपये खोलीचं भाडं आणि पाचशे रुपये जेवणाचा डबा. पाचशे रुपये तरी शिल्लक राहतायत ना, मग चालतंय म्हणून ती नोकरी धरली.”
तेवढ्यात “चहा...” अशी हाक आली आतून. आणि मागोमाग बायको पाण्याचा तांब्या आणि चहा देऊन गेली.
“घ्या चहा.” मी.
“चहा नको. पाणी बास आहे.” असं तो म्हणाला. चहाच्या कपाकडे त्यानं पाहिलंसुद्धा नाही.
“ तसं नाही, घ्या चहा तुम्ही.”
मी आग्रह केल्यावर चहाचा कप त्यानं घेतला.
“मग घरी कोण कोण असतं?”
“ घरी होय? मागची दोन वर्षं इकडं मी एकटाच राहिलो. तिकडं भावानं घर स्वतःच्या नावावर करून घेतलं. आई वडील राहतात त्याच्याकडं. मी दोन वर्षं काम करून पंधरा हजार रुपये जमवले. मग गेल्यावर्षी लग्न केलं. आता आम्ही दोघं राहतो.”
“मग बायको काय करते?”
“ती होय? ती दोन घरची कामं करती. तिला दोन हजार रुपये मिळतात.” तो अभिमानानं सांगत होता. दोन लाख रुपये पगार असणाऱ्या माणसाकडे सुद्धा इतका शुद्ध आनंद मी आजवर पाहिलेला नाही.
“मला कसं, पंधराशे रुपये पगार आणि सहा-सात हजार रुपये भाजी विकून मिळतात. बायकोचे दोन हजार आहेत.आम्हांला दहा हजार रुपये मिळतात महिन्याला. अजून काय पाहिजे? चालतंय आपलं बरोबर..”
मी अवाक झालो. कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था,मंदी, पगार नाहीत, नोकऱ्यांमधली कपात,आमचं कसं होणार, आमचे किती हाल होतात वगैरे गोष्टींचा त्याच्या बोलण्यात लवलेशही नव्हता.
“माझी ड्युटी असती चार ते बारा. घरी जायला एक वाजतो. पहाटे पाच वाजता उठतो. लिलावाला जातो. सकाळी सात पासून दुपारी बारा-साडेबारा पर्यंत भाजी विकतो. मग एक वाजता घरी जायचं, जेवायचं आणि एक तासभर झोपायचं. मग रात्रीचा डबा घ्यायचा आणि कामावर जायचं.”
“पण मग घरी बायको एकटीच?”
“एकटी कशाला? पांडुरंग हाये ना. तो असल्यावर कशाला उगं डोक्याला ताप करून घ्या? आपलं आपलं काम करायचं आणि गप बसायचं.”
“पण मग तुमचं स्वतःचं घर कधी होणार? तुम्ही आयुष्यभर सायकलवरच फिरणार? पुढं जाऊन मुलं होतीलच की. मग त्यांचं शिक्षण वगैरे..”
“येवढा विचार कशाला करायचा? आपल्याला दोन वेळचं पोटाला मिळतंय ना, ते बास आहे. मला पंधराशे रुपये पगार होता, खानावळीच्या डब्यातलं थंडगार जेवत होतो. दोन वर्षांनी पांडुरंगाला वाटलंच का नाई माज्याबद्दल? वर्षभरापूर्वी घरी बायको आली. आता आमी दोघं कमावतो. मला ती गरम जेवायला वाढती. दिवसभर मस्त काम करायचं आणि चांगलं राहायचं. कशाला काय होतंय?” कुणीतरी फाडकन कानाखाली मारल्यावर कशा अंगभर झिणझिण्या येतात, तशा झिणझिण्या मला जाणवायला लागल्या.
“लागतंयच कशाला स्वतःचं घर? जोवर इकडं काम मिळतंय तोवर इकडं राहणार. काम नाही मिळालं तर जिथं काम मिळंल, तिथं जायचं. पोरं काय, सरकारी शाळेत शिकतीलच. मग उगच तंगडं कशाला अडकून घ्यायचं?” तो सांगत होता.
पण तो नुसता सांगत नव्हता, तो बरोबर सांगत होता. जे योग्य तेच सांगत होता. जे आज प्रत्येकानं समजून घ्यायला हवं, तेच आयुष्याचं शास्त्र तो मला सांगत होता.ती पोपटपंची नव्हती, ते पाठांतर नव्हतं, तो त्याचा प्रत्यक्ष अनुभव होता. जाणिवेच्या जागृत पातळीवरचा प्रत्यक्ष अनुभव... ‘सदा सर्वदा देव सन्निध आहे,कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे,सुखानंद आनंद कैवल्यदानी,नुपेक्षी कदा राम दासाभिमानी’ ह्या ओळी समर्थांनी उगीचच लिहिलेल्या नाहीत, याची आत कुठंतरी जाणीव झाली.
“चला, येतो दादा..” असं म्हणून चहाचा कप ठेवून तो उठला. त्याच्या त्या जुन्या-पान्या सायकलवर टांग मारून पॅडल हाणत निघाला सुद्धा. त्याची ती पाठमोरी आकृती हळूहळू अस्पष्ट होत गेली. मी विचारांच्या तंद्रीत तसाच मागं फिरलो. आत गेलो. कपडे बदलले. खोलीतून बाहेर आलो. तेवढ्यात बायकोनं हाक मारली म्हणून पाहायला गेलो. ती नुकतीच कोथिंबीर स्वच्छ करून निवडायला बसली होती.
“अरे हे बघ काय आहे..” तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं.
मी पाहिलं. कोथिंबीरीची जी दुसरी जुडी तो ठेवून गेला होता, त्या जुडीत बुक्का लागलेली तुळशीची पानं.... हा योगायोग होता की स्पष्ट संकेत? मी जागेवर खिळून तसाच उभा राहिलो. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. माझा सासवडपर्यंतचा वारीचा नेम. पण यंदा कोरोनामुळे वारी नाही, नेम चुकला. ज्येष्ठ दशमीच्या दिवशी रात्री उशिरा माउलींच्या दर्शनाला जाणं ठरलेलं असायचं. पण यंदा तेही नाही. वारीला जाता आलं नाही म्हणून मनात प्रचंड अस्वस्थता होतीच आणि अतिशय चिडचिड होत होती. मनातल्या मनात मी हजारदा त्यांची क्षमा मागितली असेल.. आज ज्येष्ठ कृष्ण एकादशी..योगिनी एकादशी..त्यातून बुधवार.. प्रत्यक्ष वारीला जाता आलं नाही पण माउलींचा प्रसाद मात्र घरपोच मिळाला..! काय म्हणायचं, सगळे शब्दच मुग्ध होऊन गेले..!
“साक्षात्कार ही जाणिवेची एक अवस्था आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या जशा जाणिवेच्या परस्परांहून अगदी भिन्न अवस्था आहेत, तशीच साक्षात्कार, ईश्वराचा, आत्म्याचा अनुभव हीही एक भिन्न अवस्था आहे. ही अवस्था अनंत असून, परम सत्य असे तत्त्व, एकमेवाद्वितीय, अविनाशी अविकारी तत्त्व म्हणजे ही अवस्था होय. वस्तुतः अगदी तर्कसिद्ध व बुद्धिमान्य असे शास्त्र असूनही, साक्षात्कारशास्त्र अजूनही गूढ आणि केवळ श्रद्धेचाच विषय आहे, असे मानले जाते. गुरुदेव रानडे यांनी स्पष्ट सांगितले आहे की, साक्षात्कारवाद हा तर्कमान्य, बुद्धिनिष्ठ आहे हे वचन आज वदतोव्याघातासारखे मानले जाते, पण ते सर्वमान्य झाले पाहिजे” हा गुरुदेव रानड्यांच्या साहित्यातला संदर्भ डोळ्यांसमोर आला, माउलींनी त्यांच्या अस्तित्वाचा प्रत्यय याच्याही आधी मला अनेकदा दिला होताच, आज तो पुन्हा दिला.. म्हणजे, वारी चुकली नाहीच.. ती तर लाभलीच..!
१७ जून,२०२०, बुधवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा