गुरुवार, २४ जुलै, २०२५

2088. डबाभर पुण्य

 अगं  अगं , काय करतीयेस??? विचार तरी पोळी वाढायच्या आधी...हवीये कि नको ते.. उगीच आपलं  वाढत सुटायचं - पाध्ये काका
अहो मी दोनदा विचारलं. तुम्ही आपले ढिम्म...काही प्रतिक्रिया नाही ..मग काय समजायचं माणसाने??? मग मी विचार केला, अजून रोजचा खायचा कोटा पूर्ण झाला नाहीये, मग घालावी एखादी गरमा गरम तव्यावरली पोळी... – काकू
हो. तुझं आपलं काहीतरीच...वाटलं कि करायचं ..खाणारा मी आहे ना पण. 
हं ..आताशा मी बघितलंय ..आजकाल तुमचं लक्ष नाहीये खाण्याकडे...कुठे हरवलायत? 
माझं काय विचारतेस, तुझं तरी कुठाय चित्त थाऱ्यावर.. 
तेही खरंच आहे म्हणा... घर घर लागलीये नुसती .विचार करून डोकं फुटायची वेळ आलीये.. हे घर सोडायचा विचार सुद्धा करवत नाही . आपला सगळा संसार इथेच झाला.. माप ओलांडून घरात आले तेव्हा या तीन खोलाडांमध्ये हीssss  एवढी माणसे होती...सासूबाई, बाबा, भावजी आणि तुमच्या बहिणाबाई. आपली तनु पण इथेच जन्मली..काय सुंदर होते ना ते दिवस. माझे कि नाही त्या अगदी रोपट्यासारखे झालेय हो.. रोपटे दुसरीकडे उपटून लावताना, त्याला कशी माती चिकटलेली असते..अगदी तसेच झालेय माझे.. गत  काळातल्या स्मृती काही जात नाहीयेत. खोलवर सगळ्या आठवणी रुतल्यात हो या वास्तूमध्ये.. अजून काही वर्षे हा वाडा टिकला असता तर काय बिघडले असते?? आत्ताच मेल्या त्या वरच्या मजल्याला तडा जायचा होता. अगदी पुरापासून सर्व धक्के सहन केले याने...आपले आयुष्य संपेपर्यंत तरी तग धरायची होती याने. मी कायम देवाला ही  प्रार्थना करत आले कि बाबा शेवटच्या काळात जावयाच्या दरवाजात पडायची वेळ आणू नकोस बघ... पण त्याला कुठली दया  यायला...कितीही जरी आपली लाडाची लेक असली तरी तिच्या घरी जायची वेळ नको होती यायला.. जावई भला मानस मिळाला आपल्याला..पुण्यच म्हणायचं आपलं. आता त्यांच्या तीन खोल्यात आपल्या दोघांची भर. अवघडच आहे...आपल्याकडे मेले दातावर मारायला पैसे नाहीत..आपलं औषध पाणी आणि बाकीचा खर्च कसातरी भागवतोय आपण. आपल्याला भाड्याने घर घ्यायला सुद्धा पैसे नाहीयेत.. काय मेली ती डिपॉजिट आणि केवढे ते भाड्याचे पैसे. आपल्याकडे एवढे पैसे असते तर दुसऱ्याच्या दारात जायची वेळ आली असती का आपल्यावर?  
इथे सगळे कसे अगदी जवळ...हाकेच्या अंतरावर आहे. अडचण आली तर धावून येणारे शेजारी आहेत. तिकडे गेल्यावर सगळं वेगळं .. तनू आणि तिचा नवरा दिवसभर बाहेर ..त्यांचे राहणीमान, विचारसरणी वेगळी... तिकडे ते फ्लॅट कल्चर..त्यातून सगळी दुकानं लांब, म्हणजे गाडी चालवणं आलं ..आता या वयात कोण गाडी चालवणार.. आपल्या म्हातार्यांचे प्रॉब्लेम्स आपल्यालाच माहित..कोणाला सांगून ते कळणार नाहीत.. आपण दहा वेळा कण्हणार कुथ णार, आईगं उईगं करणार.... आपण मुद्दाम करत नसलो तरी लोकांना ते ऐकून चिडचिड होतेच..म्हातारपण फार वाईट... आपली मठी  असली कि आपण आपले राजे.. कधीही  झोपा, कधीही उठा, पाहिजे ते आणि सोसेल ते खा आणि गप रहा..दुसऱ्याच्या दारात गेलो कि त्यांच्याप्रमाणे वागायचे. अगदी आपली लेक असली तरी ती तिच्या नवर्याच्या मनाप्रमाणेच वागणार ना?? जावई देव माणूस आहे..पण कधीतरी भेटणं  आणि कायमस्वरूपी त्यांच्या बरोबर राहणं यात फरक आहे. कसा काय निभाव लागणार हो आपला?? दोन महिन्यात सगळ्या सामानाची विल्हेवाट लावायचीये.. किती हौसेने, काडी काडी करून हा संसार जमवला होता... आपल्या हाताने मोडायची वेळ आलीये.. 
मालू, बास आता.. तुझ्या बोलण्याने परिस्थिती बदलणार आहे का?? नाही ना ? मग? माझा श्रीहरी आहे. त्याने आजपर्यंत आपल्याला काही कमी पडू दिले नाही..पुढे ही  कमी पडू देणार नाही.. नको काळजी करुस . वाईट विचार कशाला करतेस? आपण आपल्या मुलीबरोबर राहणार यात आनंदच आहे की..याच तर वयात आपल्याला सोबतीची गरज असते. तू जेऊन घे.. शांत हो. 
दोघांची जेवणे झाल्यावर, पाध्ये काकू थोड्यावेळ गप्पा मारायला शेजारच्या विंचूरकर काकूंकडे गेल्या. तिथे त्यांची मैत्रीण आली होती. तिघीही गप्पात रमल्या.. अनेक विषयांवर चर्चा झाली. एव्हाना त्या मैत्रिणीला त्या वाड्यातल्या लोकांची समस्या कळली होती.. पाध्ये काकूंच्या डोळ्यातले पाणी ठरत नव्हते. शेवटी ती मैत्रीण म्हणाली, काकू रडू नका. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. तुम्हाला शंकर महाराज माहित आहेत का?? त्यांना साकडे घाला..ते तुम्हाला मार्ग दाखवतील.. मला त्यांची अनेक वेळा प्रचिती आली आहे. तुमचे नशीब चांगले आहे..आजच मी 'शंकर गीतेच्या' दोन प्रति बरोबर आणल्या आहेत.. या पुस्तकाच्या मागे, ही  गीता कशी वाचायची, अध्याय कसे वाचायचे आणि पारायण कसे करायचे..याची सगळी माहिती दिलीये.. महाराजांची सेवा म्हणून कायम मी याच्या प्रति बरोबर ठेवते आणि ज्यांना गरज आहे त्यांना देते..मलाही खूप समाधान मिळतं यातून..नक्की वाचा. 
तू एवढ्या श्रद्धेने देतीयेस, तर नक्की वाचेन... आजपर्यंत अक्कलकोट स्वामींचे कधी पाय सोडले नाहीत बघ. मी कायम त्यांचीच भक्ती करत आलीये.. 
अहो, शंकर महाराज पण त्यांचेच शिष्य... असे समजा कि स्वामींनीच मला बुद्धी दिली तुम्हाला ही  गीता द्यायला .. गप्पांच्या नादात चहाची वेळ कधी झाली कळलंच नाही. काकांसाठी चहा करायला काकू त्यांच्या घरी गेल्या. काका चहा घेऊन नेहमीप्रमाणे त्यांच्या कट्ट्यावर जायला निघाले. काका रोज त्यांच्या घराजवळ असलेल्या बागेत फिरायला जात असत. तिथे त्यांचे सगळे रिटायर्ड झालेले मित्र भेटत असत. गपांमध्ये कसा वेळ जायचा ते कळत नसे.. साधारण ७ च्या सुमारास परत सगळे घरी जात.. 
दुसऱ्यादिवशी अनायसे सोमवार असल्याकारणाने, काकूंनी पटकन त्यांच्या काळ्या मोबाईलवरून काकांना फोन केला आणि थोडी जास्तीची फुले आणायला सांगितलं... काका घरी आले आणि चप्पल काढता काढता म्हणाले, उद्या काही विशेष..आता कुठल्या देवाला गळ घालणार आहेस? छे तुमचं आपलं काहीतरीच - काकू फणकाऱ्याने म्हणाल्या..
असूदेत असूदेत...तुला आनंद मिळतोय ना...मग कर काय हवं ते. 
काकूंनी, त्या मैत्रिणिने सांगितल्याप्रमाणे शंकर गीता वाचायला सुरवात केली..अगदी मनापासून त्यांनी पारायण करायला घेतलं होतं.. रोज त्या मनाशी हेच म्हणायच्या कि महाराजांनी काहीतरी चमत्कार करावा आणि आम्हाला आमचं असं घर मिळावं. जावयाच्या घरी जाणं  टळावं... 
कोरोनामुळे फिरण्यावर निर्बंध आले होते.. त्यामुळे काका आपले टीव्ही पुस्तक वाचन यात कसे बसे वेळ घालवत होते. आता कट्टा बंद झाला होता. त्यामुळे मित्रांबरोबर जो छान वेळ जात होता ते मात्र आता दुरापास्त झालं होतं ... काकांचा जेमतेम डोळा लागला होता, तेवढ्यात त्यांचा फोन खणखणला.. डोक्यावर असलेला चषमा सावरत त्यांनी फोन घेतला. पलीकडून त्यांचा मित्र बोलत  होता. त्याला कोरोना झाला होता....नशिबाने घरीच राहायला डॉक्टरांनी सांगितले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेमध्ये... यांना इथे बघणारे कोणीच नाही... त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच निवर्तलेली होती... त्यामुळे त्यांची फारच पंचाईत झाली होती.. पाध्ये काकांना क्षणात त्यांची अडचण समजली...त्यांनी त्यांना निःश्चिन्त राहायला सांगितले.. आम्ही तुझे सर्व काही करू..तू काळजी करू नकोस.. असे म्हणाले.. 
काकांचं हे बोलणं काकूंनी ऐकलं...काकूंनी मानेनेच होकार दिला. काकू निगुतीने आणि आपुलकीने रोज काकांच्या मित्रासाठी, अप्पा कानडे यांच्यासाठी ताजा गरमागरम डबा पाठवत होत्या. एवढंच नाही तर काका त्यांना औषधं पाणी किंवा इतर सुद्धा काही हवं नको ते बघत होते. अप्पा या पतिपत्नीच्या सेवा भावी वृत्तीने भारावून गेले. ते बरे झाल्यावर, दोन तीन महिन्यांनी यांच्या घरी आले, खास त्यांचे आभार मानण्यासाठी.. सदगदित होऊन म्हणाले कि वहिनींच्या रूपात जणू अन्नपूर्णाच माझी काळजी घेत होती. त्यांनी दिलेल्या डब्यासाठी त्यांनी काही पैसे देऊ केले, तर काकू त्यांना म्हणाल्या कि अहो तुम्ही माझ्या भावासारखे, आणि भावाकडून कोणी पैसे घेतं  का?? आणि हो, बहीण  म्हणून मी तुम्हाला हक्काने सांगते...मी आत्तापर्यंत जसा डबा देत आले तसाच पुढेही देईन..काही नको ती विकत वगैरे आणायची भानगड..दिवस काही बरोबर नाहीत..आमच्याच घासातला घास आम्ही तुम्हाला देऊ..तुम्हाला इथे यायचं असेल जेवायला तरी चालेल..मला काही सुद्धा त्रास नाही.. निदान आम्ही इथे असेपर्यंत तरी..त्यापुढे त्यांना बोलवेना. कंठ दाटून आला.. 
काही महिने अप्पा जेवायला येत होते.. पण काही दिवसांनी ते कुठेतरी गावाला जातोय म्हणून सांगून गेले..मग काही दिवस त्यांची काहीच खबरबात नव्हती.. इकडे वाडा सोडण्याचा फतवा निघाला.. एकीकडे काका काकूंची सामानाची बांधाबांध सुरु झाली.. ही जागा सोडताना दोघांच्या मनाची घालमेल चालू होती...काहीच सुचेना..काकूंच्या डोळ्यांना जणू अश्रूंची धारच लागली होती. त्यांना अजिबात जावयाकडे जायची इच्छा नव्हती.. नवे किंवा जुने घर घेण्यासाठी गाठीशी पैसे नव्हते..जी काही साचवलेली गंगाजळी होती ती त्यांनी दोघांच्या औषध पाण्यासाठी, अडीनडीसाठी ठेवलेली होती..लेकीच्या घरी गेल्यावर तिला यांचा काही खर्च पडू नये हि इच्छा होती. काकू रोज देवाला प्रार्थना करत होत्या. शेवटी तो दिवस उजाडला.. काकूंनी आशा सोडून दिली.. दोघे जण सामान नेण्यासाठी टेम्पोची वाट बघत बसले होते. टेम्पोवाल्याला नेमका वेळ नव्हता.. त्याला यायला उशीर होणार होता. काकू घरावरून शेवटची नजर फिरवत होत्या. तेवढ्यात काकांना एक फोन आला. तशी ते तडक अंगात कपडे चढवून निघाले...अप्पा कानडे यांच्या बिल्डिंग च्या चेअरमन ने त्यांना फोन केला होता. त्यांच्या सोसायटीच्या ऑफिस मध्ये ते चेअरमन आणि एक महाशय त्यांची वाट बघत बसले होते. काका त्यांच्या समोर जाऊन बसले..ते दोघे जण त्यांच्याशी जे बोलत होते त्याने काका अगदी सुन्न झाले. चेअरमनने त्यांना प्यायला पाणी दिले.. थोड्या वेळाने काका घरी आले..त्यांची अवस्था बघून काकू कासावीस झाल्या..अहो काय झालं? कुठे गेला होतात? अशी त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. काकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.. मालू काय नियतीचा खेळ असतो बघ. मी आत्ता कुठे गेलो होतो माहित आहे?? अप्पाच्या बिल्डिंग मध्ये.. तिथे गेल्यावर कळलं कि अप्पा गावाला गेला तिथेच हार्ट अटॅक नि गेला. गावाला जायच्या आधी त्याने मृत्यू पत्र तयार करून घेतलं होतं.. त्याच्या पश्चात त्याचं राहतं घर आपल्या दोघांच्या नावावर करावं  अशी त्याने त्याची शेवटची इच्छा लिहून ठेवली आहे.. त्याचे जे काही पैसे होते, बायकोचे दाग दागिने होते ते त्याने त्याच्या मुलाच्या नावावर केले आहेत. मुलगा अमेरिकेत आहे. त्याला कशाला कमी नाही.. तो तिथला नागरिक झाला आहे.  त्याला इकडे परत येण्यात काहीच रस नव्हता. जेव्हा तो फोन वर अप्पाला म्हणाला कि तुमच्या पश्चात मी तो फ्लॅट विकून टाकेन..तेव्हा अप्पाला खूप वाईट वाटलं.. कुठल्यातरी गरजवंताला आपलं घर द्यावं असं त्याच्या मनात आलं... मालू तू जे त्याला प्रेमाने इतके दिवस जेवायला घातलंस, त्या बदल्यात, एका भावाची ओवाळणी म्हणून त्याने त्याचं घर आपल्या नावावर केलंय..आणि आपण तिथे लवकरात लवकर राहायला जावं अशी इच्छा लिहून ठेवलीये. दोघेही काही क्षण सुन्न झाले होते. नियतीचा हा खेळ पाहून ते नि:शब्द झाले होते..
काही दिवसातच ते त्यांच्या हक्काच्या घरात राहायला गेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...