संध्याकाळचा फेरफटका मारुन दिवाकर घरात शिरला.बाथरुममध्ये जाऊन त्यानं हातपाय धुतले आणि बैठकीत येऊन बसत नाही तोच किचनमध्ये काम करणारी त्याची बायको सुमन बाहेर येऊन म्हणाली
"अहो तो रमाकांत भाऊजींचा मुलगा संजय आला होता.तुमच्याशी काहीतरी अर्जंट काम आहे त्याचं "
" कसलं काम?"
" माहीत नाही.मी विचारलं त्याला तर 'मी काकांशीच बोलेन 'असं म्हंटला.नऊ वाजता परत येणार आहे तो "
" अरे मग फोनवर बोलायचं ना म्हणा "
" मी तेही सांगितलं पण म्हणे फोनवर बोलण्यासारखं नाही "
" ठिक आहे तो आल्यावर बोलू "
दिवाकर कोड्यात पडला.असं काय घडलं की संजय ते फोनवर बोलू शकत नव्हता? रमाकांत अगदी बालवाडीपासूनचा त्याचा मित्र.त्यामुळे दोघांचे एकमेकांशी घरगुती संबंध. संजय मात्र तसा दिवाकरशी फटकून वागणारा.किंबहूना वडिलांचे कोणतेच मित्र त्याला फारसे आवडत नसत. असा हा संजय आपल्याला का भेटायला येतोय ते दिवाकरला कळेना.घरात काही भानगड तर नाही झाली? शेवटी तर्कवितर्क करण्यात काही अर्थ नाही.संजय आल्यावर काय भानगड होती ते कळणार आहेच या निष्कर्षाप्रत दिवाकर आला. बायकोनं आणलेला चहा पित तो टिव्ही बघत बसला.मात्र संजयचा विचार त्याच्या डोक्यातून काही गेला नाही.
नऊ वाजता येणारा संजय रात्री दहाला आला.सुमननं आणलेलं पाणी तो पित असतांना दिवाकरनं त्याला विचारलं
" हं बोल कसं काय येणं केलंस?"
संजयनं ग्लास टिपाॅयवर ठेवला आणि म्हणाला
"काका तुम्हांला तर माहितच आहे की अण्णा सध्या मुंबईत अनिलदादाकडे आहेत आणि मुंबईतच त्यांचं डायलिसिस सुरु आहे"
" हो बरोबर.पण परवा मी त्याच्याशी बोललो तर तब्येत बरी आहे असं म्हणाला "
" हो.तब्येत बरी आहे त्यांची पण किती दिवस असं डायलिसिस करणार? म्हणून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही असं ठरवलं होतं की त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट करुन टाकावं.पण डोनर मिळत नव्हता.आमची कुणाचीही किडनी मॅच होत नव्हती. पण आता डोनर मिळालाय.त्याच्याही सगळ्या टेस्ट झाल्यावर डाॅक्टरांनी आनंदाची बातमी दिली की त्याची किडनी घ्यायला हरकत नाही "
" वा वा! ही तर खुप आनंदाची बातमी दिलीस तू "
" ते ठिक आहे काका पण डाॅक्टर म्हणताहेत की साधारण दहा अकरा लाख खर्च येईल.त्यात डोनरने पाच लाखांची मागणी केलीये "
" हे तर किडनी दान करणं नाही तर विकणंच झालंय.कारण डोनरला पैसे दिले जात नाहीत.फक्त त्याच्या जाण्यायेण्याचा आणि इतर खर्च दिले जातात असं मी ऐकून आहे."
" हो बरोबर.ते धरुनच तो पाच लाख मागतोय.विशेष म्हणजे डोनर आमचा आतेभाऊच आहे पण त्याच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी त्याला एवढे पैसे हवे आहेत.शेवटी गरज आपल्याला आहे.त्यामुळे त्याची मागणी आपल्याला पुर्ण करावी लागेल.त्यातून अण्णांचा हेल्थ इन्शुरन्स नाहिये "
" अरे मग त्या आयुष्यमान भारत किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना त्यात काही जमतं का बघा "
" नाही ना काका.सगळं चेक करुन झालंय.कशातच आम्ही बसत नाही "
" ओके.माझ्याकडून कसली मदत हवी आहे? " मुद्द्यावर येत दिवाकरनं विचारलं.संजयनं आपला घसा साफ केला.
" काका अण्णा म्हणताहेत दिवाकरकाका नुकतेच रिटायर होऊन त्यांना नव्वद लाख मिळालेत.तर दहा लाख त्यांच्याकडे मागून बघ "
दिवाकरला हे अपेक्षित होतंच.तरीपण दहा लाख फार मोठी रक्कम होती.दोनतीन लाख मागितले असते तर गोष्ट वेगळी होती.
" दहा लाख? बापरे खुप होताहेत रे दहा लाख.मला पुण्यात एक थ्री बीएचकेचा फ्लॅट घ्यायचाय.त्यासाठी मलाच २०-२५ लाख कमी पडताहेत.बायकोचे दागिने मोडावे लागणार आहेत त्यासाठी,शिवाय सुजीतनं केलेली सगळी बचतही त्यासाठी खर्च होणार आहे "
" काका फक्त एक महिन्यासाठी द्या.आमचा एक प्लाॅट माणिकनगरमध्ये आहे.तो विकला गेला की लगेच तुम्हांला दहा लाख परत करतो.हवं तर एक लाख व्याज म्हणून देतो.पण नाही म्हणू नका.तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी तुमचं बोलणं अण्णांशी करुन देतो "
त्यानं लगेच फोन काढून वडिलांना लावला.दिवाकरला
रमाकांतनं आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी पाच लाखाची मदत केलेली आठवली.त्यानं ते पैसे सहा महिन्यांनी परत केले होते पण त्या सहा महिन्यात रमाकांंतनं एका शब्दानेही कधी पैशाची मागणी केली नव्हती शिवाय त्याच्याकडून व्याजही घेतलं नव्हतं.
" हं बोला काका अण्णांशी " त्याच्याकडे फोन देत संजय म्हणाला
" हॅलो रमाकांत.कसा आहेस? तब्येत काय म्हणतेय?"
" तब्येत बरी आहे पण ही पोरं म्हणताहेत किडनी ट्रान्सप्लांट करुन घ्या म्हणून.मी तर नाहीच म्हणत होतो.आता आपला काही भरवंसा नाही.कशाला इतका खर्च करायचा? पण डोनर मिळाला म्हणून वाटलं करुन घेऊ या.नंतर डोनर नाही मिळाला तर प्राॅब्लेम यायचा.ही पोरं सात आठ लाख जमा करताहेत पण तरीही दहा लाखाची अजून गरज आहेच.मीच म्हंटलं त्यांना दिवाकरकडे आता पैसा आहे तो देऊ शकतो.आपला प्लाॅट विकला गेला की देऊन टाकू त्याचे पैसे "
रमाकांतनंच खात्री दिल्यावर दिवाकर नाही म्हणणं शक्यच नव्हतं
" ठिक आहे.देतो मी .पण मला लवकर देशील.मला पुण्याला फ्लॅट घ्यायचाय "
" प्रश्नच नाही.प्लाॅट विकला की त्याच दिवशी तुझ्या हातात पैसे पडतील.तुला खात्री वाटत नसेल तर बाॅंड पेपरवर लिहून द्यायचं का?"
" नको नको.अरे आपण बालपणीचे मित्र.तुझ्यावर विश्वास ठेवायचा नाही तर कुणावर? आणि तू मागे मला पाच लाख उसने दिले तेव्हा कुठे आपण बाॅंडपेपर केला होता? तू बरा होऊन घरी ये.मग बघू पैशांचं.ठिक आहे?चेक देऊ की कॅश?"
" कॅशच दे.चेक क्लियरिंगला ३-४ दिवस लागून जातील.उद्या रात्री संजय मुंबईतला येतोय.त्याच्या हाती देऊन टाक"
" चालेल.कर तू आराम.मी पाठवतो पैसे "
त्यानं फोन ठेऊन संजयकडे पाहिलं.त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला दिसला.
" ठिक आहे काका मी येतो उद्या दुपारी बारा वाजता"
तो गेला.दुसऱ्या दिवशी दिवाकरनं बॅंकेतून पैसे काढून आणले.
" काहो तुम्ही एवढे दहा लाख त्यांना देताय,ते परत करतील ना? मला तर भीतीच वाटतेय " सुमन काळजीने म्हणाली
" संजयवर माझा विश्वास नाही पण रमाकांतवर आहे.आपल्या ईशाच्या लग्नाच्या वेळी त्यानं पाच लाख एका झटक्यात काढून दिले होते.आठवतंय? शिवाय तो आता जीवनमरणाच्या दारात उभा आहे.किडनी मिळाली तर १५-२० वर्षं आरामात जगेल.डायलिसिसवर किती दिवस जिवंत रहाणार आहे?अशा स्थितीत मित्राला मदत करायची नाही तर केव्हा करायची?"
" तुमचं म्हणणं बरोबर आहे.पटतंय मला.पण इतकी मोठी रक्कम द्यायची म्हंटली की नाना शंका मनात येत रहातात "
" काही काळजी करू नकोस.मिळतील आपले पैसे "
दिवाकर विश्वासाने म्हणाला
दुसऱ्या दिवशी संजय येऊन दहा लाख घेऊन गेला.त्याच्या हातात पैसे देतांना मात्र दिवाकरला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.
बरोबर पंधरा दिवसांनी संजयनं दिवाकरला फोन करुन बातमी दिली.रमाकांतचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन यशस्वी झालं होतं.मात्र काही दिवस त्याला हाॅस्पिटलमध्येच रहावं लागणार होतं.त्यानंतरही कसलेही इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याला घरी आयसोलेशनमध्ये रहाणं आवश्यक होतं.काही काॅंप्लिकेशन्स झाले तर हाॅस्पिटलमध्ये जाणं सोयीचं व्हावं म्हणून रमाकांत आणि त्याची बायको मुंबईतच त्यांच्या मोठ्या मुलाकडे तीन महिने रहाणार होते.
संजयला दहा लाख देऊन एक महिना उलटून गेला पण त्यानं अजून दिवाकरला पैसे आणून देणं तर सोडाच साधा फोनही केला नव्हता.जोपर्यंत रमाकांत घरी येत नाही तोपर्यंत काही बोलायचं नाही हे दिवाकरनंही ठरवून टाकलं होतं.रमाकांतलाही त्या दहा लाखाची काळजी असेलच.त्याला बरं वाटायला लागलं की तो स्वतःहूनच पैसे परत करायला सांगेल अशी त्याला खात्री वाटत होती.एक दिवस त्यानं स्वतःहूनच संजयला फोन करुन रमाकांतच्या तब्येतीबद्दल चौकशी केली पण पैशांचा उल्लेख करणं टाळलं.संजयनेही प्लाॅट विकला गेला की नाही,पैशांची व्यवस्था केली की नाही याबाबत चकार शब्द काढला नाही.
दोन महिने उलटून गेले.एकदिवस रात्री जेवत असतांना सुमननं त्याला विचारलंच
" काहो रमाकांत भाऊजींना दिलेल्या पैशांचं काय झालं?कधी परत करणार आहेत ते पैसे?"
" मी विचारलं नाही.रमाकांत अजून घरी परतला नसतांना संजयला विचारणं मला योग्य वाटलं नाही "
" मग रमाकांत भाऊजींनाच फोन करुन विचारा ना! आता तर ते फोनवर बोलू शकत असतील ना!"
" उद्या संजयला विचारतो.तो हो म्हणाला तर मी बोलेन रमाकांतशी.पण आपण स्वतःहून पैशाचा विषय काढणं बरं दिसणार नाही "
" बाबा आपल्याला घाई करायला पाहिजे.तो पुण्याचा फ्लॅट आपल्या हातून जायला नको " दिवाकरचा धाकटा मुलगा सुजीत म्हणाला.
" आपण असं करु, त्याला साठ लाख देऊन टाकू या.उरलेले पझेशन घेऊ तेव्हा देऊ "
" बाबा तो रेडी फॉर पझेशन फ्लॅट आहे आणि बिल्डरला पुर्ण पैसे द्यावे लागणार आहेत.त्याशिवाय तो पझेशन देणार नाही "
दिवाकरला काय करावं ते सुचेना.शेवटी तो बोलला
" काहीतरी मार्ग निघेलच.देवावर विश्वास ठेवा "
दुसऱ्या दिवशी संजयला विचारुन त्यानं रमाकांतला फोन केला.तब्येतीबद्दल चौकशी केल्यावर तो म्हणाला
" अजून फारसं बरं वाटत नाही रे मला.मधूनमधून ताप येतो.किडनीच्या ठिकाणी खुप वेदना होतात.कधीकधी खुप अस्वस्थ वाटतं.शुगर आणि बीपी.दोन्हीचा त्रास असल्याने खुपच पथ्य पाळावे लागतात.सगळं आयुष्य निरस होऊन गेलंय "
" काही काळजी करु नकोस.असं होतच असतं.आराम कर.औषधं वेळच्यावेळी घेत रहा.आम्ही वाट बघतोय तुझ्या येण्याची "
" तुझे पैसे द्यायचे लक्षात आहे माझ्या.पण तो प्लाॅट अजून विकला गेला नाही.काय प्राॅब्लेम आहे ते संजय सांगेल तुला.त्यानं फोन नाही केला का तुला?"
" नाही ना! पण तू काळजी करु नकोस.मी बोलतो त्याच्याशी.तू आराम कर "
दुसऱ्या दिवशी त्यानं सकाळीच संजयला फोन केला पण त्यानं उचलला नाही.असेल काही कामात असा विचार करुन तो संजयच्या फोन येण्याची वाट बघत बसला पण संजयचा फोन काही आला नाही.दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यानं परत संजयला फोन लावला.याहीवेळी त्यानं फोन उचलला नाही.आता मात्र त्याला काळजी वाटू लागली.३-४ दिवस वाट पाहूनही त्याचा फोन न आल्यामुळे रविवारी सकाळीच तो त्याच्या घरी गेला.
" आहे का संजय घरात?" दार उघडणाऱ्या संजयच्या बायकोला राधिकाला त्यानं विचारलं
" हो आहेत.झोपलेत.रात्री कुठल्या तरी पार्टीला गेले होते.अडीचला घरी आलेत म्हणून झोपलेत.उठवू का त्यांना ?"
" नको.फक्त त्याला मला फोन करायला सांग "
" काका तुम्ही बसा.मी चहा करते.तोपर्यंत ते उठले तर बरंच आहे "
" राहू दे बेटा चहाचं "
" असं कसं? बऱ्याच दिवसांनी आला आहात चहाशिवाय पाठवणं मला बरं तरी वाटेल का?"
नाईलाजाने तो बसला.राधिकेचं वागणं त्याला नेहमीच आवडायचं.खुप लाघवी आणि संस्कारी मुलगी होती.खरंतर त्याच्या मोठ्या मुलासाठी तो राधिकाला बघायला गेला होता तेव्हाच त्याला ती खुप आवडली होती .पण मुलामुलीच्या पत्रिकेत मृत्युषडाष्टक योग आल्याने तिच्या वडिलांनी नम्रतेने नकार दिला होता.त्याला स्वतःलाही ते योग्य वाटलं नव्हतं.नंतर संजयसाठी राधिकेचं स्थळ चालून आलं.पत्रिका जुळल्यामुळे शेवटी संजयशी तिचं लग्न झालं.पण त्या घरात राधिका सुखी नाही हे त्याला सुरुवातीपासूनच जाणवत होतं.संजय कमालीचा तिरसट माणूस होता.तो अगदी आपल्या आईवर गेला होता.त्याची आई म्हणजे रमाकांतची बायको महाभांडकुदळ बाई होती.राधिकाच्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नव्हता म्हणून ती राधिकाचा नेहमीच रागराग करायची,तिला सतत टोमणे मारत रहायची.खरंतर राधिकाचं रुप,तिचं शिक्षण, बोलणं,वागणं पाहून रमाकांतनंच हुंडा मागितला नव्हता.' इतकी छान लक्ष्मीसारखी सुन घरात येत असतांना तुला हुंडा कशासाठी पाहिजे
?' असं म्हणून त्यानं बायकोचं तोंड बंद केलं होतं.रमाकांत खमक्या होता आणि या वाचाळ मायलेकांपासून सुनेचं संरक्षण करत होता म्हणून राधिका निभवून घेत होती.
राधिका चहा बिस्कीटं घेऊन आली.तिच्यासोबत तिची दोन वर्षाची गोड मुलगी स्विटीही होती.स्विटीचे तो खुप लाड करायचा.तिचाही तो लाडका 'आबा ' होता.त्यानं लगेच तिला उचलून मांडीवर बसवलं आणि तिच्याशी गप्पा मारायला लागला.
" काका चहा घ्या अगोदर.तिला तर काय गप्पा मारायला खुप आवडतात"
दिवाकरनं तिला खाली सोडलं आणि तो चहा पिऊ लागला
" खुप छान झालाय चहा " तो कौतुकाने म्हणाला तशी राधिका गोड हसली.राधिका वेगवेगळे पदार्थ आणि स्वयंपाकही खुप छान करायची.तो रमाकांतला भेटायला आला की नेहमी तिच्या हातचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ त्याला खायला मिळायचे.राधिका खऱ्या अर्थाने उत्तम गृहिणी होती.सुजीतसाठी अशीच मुलगी पहायची असं कितीतरी वेळा त्यानं मनाशी ठरवलं होतं.
चहा संपत नाही तो संजय उठून बाहेर आला.किंबहूना राधिकानंच त्याला उठवलं असावं असं त्याच्या रागीट चेहऱ्यावरुन वाटत होतं
" काय म्हणता काका?"
" काही नाही.चारपाच दिवसांपूर्वी रमाकांतला फोन केला होता तेव्हा त्यानं सांगितलं की तुमचा प्लाॅट विकला गेला नाहीये म्हणून.काय प्राॅब्लेम आहे हे विचारायला मी तुला दोनतीन वेळा फोनही केला पण तू उचललाच नाही "
" हो.मी त्यावेळी बिझी होतो आणि प्लाॅटचा असा प्राॅब्लेम झालाय की दोनतीन प्लाॅट सोडून तिथं कुणीतरी दर्गा बांधलाय.अर्थात इललिगलच आहे तो,पण त्यामुळे त्या एरियात कुणी हिंदू प्लाॅट घ्यायला तयार होत नाहीये.एक बिल्डर तयार आहे पण तो भाव पाडून मागतोय.आपण अकरा वर्षांपुर्वी तो प्लाॅट पाच लाखाला घेतला होता.आपली अपेक्षा बारातेरा लाखाची आहे.कमीतकमी दहा लाख तर आले पाहिजे.बिल्डर सात आठ लाखाला तो मागतोय.कसा देणार आपण?कमीतकमी तुमचे पैसे तरी फिटले पाहिजे ना?"
" पण मग तुम्ही त्या अनधिकृत दर्ग्याची तक्रार का नाही करत?"
" अहो काका ज्याच्या प्लाॅटवर तो दर्गा आहे तो मालक जर तक्रार करत नसेल तर आपण काय करणार? तो मालक रहातो मुंबईत आणि वर्षातले साताठ महिने अमेरिकेत मुलाकडे असतो.तो त्या प्लाॅटकडे ढुंकूनही पहात नाहिये.तो काय तक्रार करणार?"
" पण मग हे असं किती दिवस चालणार? मला तो बिल्डर घाई करतोय पैसे देण्याची.त्याच्याकडे खुप कस्टमर आहेत.या महिन्यात त्याला पैसे दिले नाहीत तर इतका छान फ्लॅट आपल्या हातून निघून जाईल "
" माझे प्रयत्न चालू आहेत काका.प्लाॅट विकला गेला की मी ताबडतोब तुम्हांला पैसे आणून देतो "
दिवाकर उठला.बाहेर निघतानिघता तो संजयला म्हणाला
" प्लाॅटचं जमत नसेल तर दुसरे काहीतरी मार्ग शोध.मला घाई आहे रे पैशांची"
" काका दुसरे मार्ग असते तर तुमच्याकडून पैसेच कशाला घेतले असते आम्ही?"
दिवाकरनं न बोलता चप्पल पायात अडकवली आणि तो बाहेर पडला.
घरी आल्यावर सुमननं या दहा लाखावरुन त्याचं डोकं खाल्लं.अर्थात तिची चूक नव्हतीच.त्याची तरी कुठं होती.मित्रावर विश्वासून त्यानं पैसे दिले होते.पण त्या अंथरुणावर खिळलेल्या मित्राशीही वाद घालण्यात अर्थ नव्हता.त्यानं दहा लाख मिळवण्याचे दुसरे मार्ग पडताळून पाहिले.त्याचा मोठा मुलगा जर्मनीत होता.पण त्यानं नुकतंच तिथं नवीन घर घेतलं होतं.होती नव्हती तेवढी सगळी बचत त्यानं त्यात टाकली होती .वरुन कर्जही घेतलं होतं.त्याला पैसे मागणे मुर्खपणा होता.मित्रमंडळीत आणि नातेवाईकांत कुणीही इतका श्रीमंत नव्हता की जो दहा लाख देऊ शकेल.असता तरी दहा लाख कुणीच दिले नसते याची त्याला खात्री होती.सुजीत नुकताच बॅंकेत लागला होता.त्याला लगेच कर्ज मिळेल का याबद्दल तो साशंक होता.शिवाय कर्ज घेऊन फ्लॅट घेण्यात त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता.आयुष्यातील चाळीस वर्षं त्यानं वेगवेगळी कर्ज फेडण्यातच घालवली होती.
दहा लाख देऊन तीन महिने होऊन गेले.संजयने एकदाही फोन केला नाही.दिवाकरलाही त्याला विचारायची हिंमत झाली नाही.एक दिवस सुजीतनं वाईट बातमी दिली.जो फ्लॅट घेण्यासाठी तो इतकी धडपड करत होता.तो बिल्डरने विकून टाकला होता.सुमन आणि सुजीत दोघंही त्यादिवशी त्याला खुप बोलले.तो काय करु शकणार होता? त्यानं मुकाट्याने त्यांचं बोलणं ऐकून घेतलं.पण मनातून त्याला संजयचा खुप राग आला होता.
एका संध्याकाळी संजयचा फोन आला.बहुतेक प्लाॅट विकला गेला असावा.दहा लाख केव्हा घेऊन येऊ असा तो विचारत असेल या विचाराने उत्साहीत होऊन त्यानं फोन उचलला
" हं बोल संजय.झालं का प्लाॅटचं काम?"त्यानं उत्साहाने विचारलं
" नाही काका.काका अण्णा गेले "
" अण्णा गेले? कुठं?"
" काका अण्णा वारले" तो आता रडायला लागला.दिवाकरला धक्काच बसला
" ओ माय गॉड!अरे पण असं कसं झालं? ऑपरेशन तर सक्सेसफुल झालं होतं ना "
" हो काका.पण अण्णांना सतत त्रास होत होता.काल त्यांना खुप अस्वस्थ वाटत होतं म्हणून त्यांना हाॅस्पिटलमध्ये ॲडमीट केलं होतं.पण उपयोग झाला नाही.आता एक तासापुर्वीच अनिलदादाचा फोन आला होता अण्णा गेल्याचा "
" मग तू निघालाय का मुंबईला ?"
" नाही.अनिलदादा आणि आई बाॅडी घेऊन येताहेत.त्यांना यायला दहा तास तरी लागतील "
" बरं.मी पोहचतो त्यानुसार तुमच्या घरी "
" बरं "
फोन ठेवल्यावर दिवाकरला एकदम भडभडून आलं.शाळाकाॅलेजमधले रमाकांतसोबतचे कितीतरी प्रसंग त्याला आठवू लागले.गेल्या सहासात महिन्यात त्याचे दोन मित्र अगोदरच हे जग सोडून गेले होते.आता रमाकांत तिसरा होता.काही दिवसांनी आपला तर नंबर लागणार नाही या विचारांनी दिवाकरला अस्वस्थ वाटू लागलं.' शेवटी मृत्यू हेच सत्य आहे.जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मरण येणारच आहे.आपणही काही अमर नाही.मग का आपण रमाकांतला दिलेले पैसे मिळवण्यासाठी एवढा जीवाचा आटापिटा करतोय? समजा संजयनं ते पैसे परत केले, आपण फ्लॅटही घेतला आणि दुसऱ्याच महिन्यात आपण मरुन गेलो तर? मग कशासाठी तो फ्लॅट घ्यायचा? मुळात त्याची आपल्याला खरंच गरज आहे? फक्त मुलगी पुण्यात रहाते म्हणून सव्वा कोटी रुपये खर्च करुन तो फ्लॅट घेण्यात काही अर्थ आहे का? हे घर काय वाईट आहे? इथे आपले मित्र आहेत, नातेवाईक आहेत.त्यांना सोडून पुण्यासारख्या अनोळखी शहरात आपण जायचं आणि समजा पंधरावीस दिवसातच आपण वर गेलो तर?' विचार करकरुन दिवाकरचं डोकं दुखायला लागलं.
रात्री दहा वाजता तो रमाकांतच्या घरी गेला.संजय कोपऱ्यात बसला होता.त्याच्यासोबत त्याचे काही नातेवाईक बसले होते.संजयच्या चेहऱ्यावर फारसं दु:ख दिसत नव्हतं.मघाशी तो फोनवर रडला ते नाटकी होतं का असा प्रश्न दिवाकरला पडला.रमाकांतचं शव यायला पहाटेचे तीन वाजणार होते त्यामुळे अंत्यविधी सकाळी सात वाजता करायचं ठरलं होतं.संजयशी सहानुभूतीचे दोन शब्द बोलून तो उठला.उठतांना बायकांच्या घोळक्यात बसलेली राधिका त्याला दिसली.रमाकांत नसल्यावर या गोड मुलीचं काय होणार याची चिंता त्याला सतावू लागली.तो बाहेर आला.बाहेरच्या गर्दित त्याला त्याचे दोनतीन मित्र दिसल्यावर तो त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला.रमाकांतबद्दल थोडंफार बोलणं झाल्यावर एकानं त्याला विचारलं
" रमाकांतच्या ऑपरेशनसाठी तू दहा लाख दिले होते म्हणे. मिळाले का ते परत?"
" नाही.का?"
" तू दिले ते चांगलंच केलं पण काय उपयोग झाला बघ.शेवटी माणूस हाती काही लागला नाही.आणि रमाकांत होता तोपर्यंत ठिक होतं.आता तो नसतांना पैसे मिळणं कठीण आहे "
दिवाकरच्या पोटात मोठा खड्डा पडला
" का? संजय देईल ना?त्याच्या बापासाठीच तर दिले होते.मग त्याचं कर्तव्य नाही का ते परत करण्याचं ?"
" तो? तो काय परत करेल.तो म्हणेल तुम्ही तुमच्या मित्राला दिले पैसे .मला थोडीच दिलेत.मी कशाला फेडू?"
" तो नाही तर त्याची आई आहे ना! तिला मागू आपण "
" तुला तिचा स्वभाव माहित नाही का? ती डायरेक्ट पोरावर ढकलून देईल.म्हणेल मी कुठून आणू पैसे? संजयला विचारा.मग काय करशील?"
" पण संजय मला म्हंटलाय की प्लाॅट विकला गेला की देतो तुम्हांला "
" अरे त्या संजयनं कुणाला प्लाॅट घेता का हेसुद्धा विचारलं नसेल.आपण काय ओळखत नाही का संजयला? बरं तो प्लाॅट रमाकांतच्या नावाने असेल तर अजूनच कठीण होऊन बसेल.कारण मग दोन मुलं आणि बायकोचं नाव वारस म्हणून लागेल.त्यात वर्ष निघून जाईल.त्यात त्या अनिलने प्लाॅट विकायचा नाही म्हंटलं तर सगळीच गडबड होऊन बसेल "
दुसरा मित्र म्हणाला. दिवाकरला आता घाम फुटायला लागला
" बेस्ट वे तू एखाद्या वकीलाला गाठ.काय करता येईल ते विचार नाहीतर तो संजय आणि त्याची ती जहाँबाज आई तुला फुटकी कवडी देणार नाही "
' बापरे! हे काय होऊन बसलंय? आपली आयुष्यभराची कमाई रमाकांतसोबतच नष्ट होऊ द्यायची का?' समोर आलेल्या परिस्थितीने दिवाकरच्या मेंदूला जणू बधीरता येऊ लागली.
तो घरी आला पण त्याला पैशांच्या विचारांनी रात्रभर झोप लागली नाही.
गंधमुक्तीचा कार्यक्रम झाल्यानंतर सहासात दिवसांनी दिवाकरनं संजयला फोन केला.पण त्यानं उचलला नाही.त्यानं परत तीनचार वेळा प्रयत्न केला पण संजय प्रतिसाद देत नव्हता.काय करावं हे दिवाकरला सुचेना.खरं तर आता फ्लॅट हातातून गेलाच होता.उरलेले ऐंशी लाख बॅंकेत पडून होते.ते कसे खर्च करायचे हाच दिवाकरला प्रश्न पडणार होता.पण मेहनतीने मिळवलेले असे कुणालाही,मग तो मित्र का असेना,दान करण्याची कल्पना त्याला सहन होत नव्हती.
त्यानं परत दोनतीन वेळा संजयला फोन केला पण त्यानं उचलला नाही.मग त्यानं सकाळी अकरालाच त्याला फोन केला.आता मात्र त्यानं उचलला.दिवाकरला हायसं वाटलं.
" हॅलो संजय,दिवाकर बोलतोय "
" काका मी सध्या कामात आहे.आणि मला ऑफिसला असतांना फोन करुन डिस्टर्ब नका करत जाऊ "
" अरे पण तू संध्याकाळीही फोन उचलत नाही "
" मी रिकामा नाही तुमच्यासारखा.मला भरपूर कामं असतात.तुमच्याशी बोलणं हे एकच काम नाहीये मला "
त्याचं उर्मट बोलणं ऐकून दिवाकर स्तब्धच झाला.वडिलांच्या वयाच्या माणसाशी कुणी असं बोलू शकतो यावर त्याचा विश्वास बसेना.
" बरं ते जाऊ दे.काय झालं माझ्या पैशाचं ?" त्यानं अपमान सहन करुन विचारलं.
" सांगितलं ना तुम्हांला मी कामात आहे म्हणून " आणि फोन कट झाला.दिवाकर कितीतरी वेळ त्या मोबाईलकडे पहात राहिला.संतापाने आपले हातपाय कापताहेत हे त्याच्या लक्षात आलं.
संध्याकाळी सुजीत घरी आल्यावर त्यानं संजयशी झालेलं बोलणं सुमन आणि सुजीतला सांगितलं.ते ऐकून सुजीत खवळून उठला.
" बाबा तो जाणूनबुजून असा करतोय.त्याला पैसे परतच करायचे नाहीयेत असं दिसतंय.चला आपण लगेच त्याच्या
घरी जाऊ.त्याच्या मुस्काटात मारल्याशिवाय तो वठणीवर येणार नाही.एक महिन्यात पैसे परत करणार होता तो हरामखोर.आता पाच महिने उलटलेत.फ्लॅटही आपल्या हातून चालला गेला"
" इतकं संतापून चालणार नाही सुजीत.तू त्याला मारल्यावर त्यानं पोलिस कंप्लेंट केली तर नको त्या भानगडी निर्माण होतील.बाबांनाच निपटू दे ते प्रकरण " सुमन त्याला समजावत म्हणाली.
त्या रविवारी तो संजयकडे गेला.रमाकांतच्या बायकोने दार उघडलं.
" आहे का संजय ?"
" झोपलाय " तिनं दारातूनच उत्तर दिलं.साधं घरात बोलावण्याचं सौजन्यही ही बाई दाखवत नाहिये याचा त्याला संताप आला.
" उठवा त्याला " तो जरा कठोर आवाजातच म्हणाला
" काय काम आहे? त्यानं उठवायला नाही सांगितलंय"
" अहो वहिनी एका महिन्यात तो मला दहा लाख रुपये आणून देणार होता आज साडेपाच महिने उलटून गेलेत तरी तो पैसे परत करत तर नाहीच शिवाय फोन करावा तर तोही उचलत नाही "
" देईल ना! प्लाॅट विकला गेला की देऊन टाकू.प्लाॅटच विकला गेला नाही तर तो तरी काय करेल?"
" तुम्ही उठवा त्याला.मला बोलायचंय त्याच्याशी " तो रागात बोलला तशी ती आत निघून गेली.तेवढ्यात राधिका बाहेर आली
" बाहेर का उभे आहात काका? या ना आत " ती म्हणाली तसा तो आत जाऊन बसला.राधिकाचा चेहरा त्याला उतरलेला वाटलं.बरोबरच होतं रमाकांत गेल्यावर या मायलेकांनी तिचा छळ सुरु केला असणार.दिवाकरच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती दाटून आली
" काका मी तुम्हांला अनेकदा सांगितलंय की प्लाॅट विकला गेला की तुमचे पैसे मिळतील तरी तुम्ही वारंवार फोन करुन आणि घरी येऊन मला त्रास देताय "
संजयनं बाहेर येऊन त्याच्यावरच आरडाओरड सुरु केली
" जरा शांततेने बोल.मी तुझ्या वडिलांचा मित्र होतो आणि पैशांची मदत मागायला तू आला होतास.जरा उपकारांची जाणीव ठेव.असं बोलतात का मोठ्या माणसांशी? " दिवाकरही जरबेने बोलला तसा संजय वरमला
" तुझ्या प्लाॅटचे डिटेल्स दे.मी माझ्या ओळखीच्या ब्रोकरला सांगून पहातो.थोडा कमी भाव आला तरी विकून टाक "
" हो म्हणजे आम्ही आमचं नुकसान करुन घ्यायचं का?"
संजयची आई मध्येच भोचकली.दिवाकरला तिचा संताप आला.ही बाई त्याला कधीच आवडली नव्हती.रमाकांतनं कोणत्या मुहुर्तावर या बाईशी लग्न केलं होतं कुणास ठाऊक?
" मग दहा वर्ष तुमचा प्लाॅट विकला गेला नाही तरी मी काय दहा वर्ष थांबायचं? " दिवाकर चिडून बोलला तशी शांतता पसरली.तेवढ्यात राधिका चहा आणि टोस्ट घेऊन आली.चहा पिऊन होऊन झाल्यावर संजयच शांततेच्या सुरात म्हणाला
" माझा ब्रोकरही हुशार आहे काका.तुमच्या ब्रोकरची गरज पडणार नाही.मला महिन्याभराची मुदत द्या. कसंही करुन तुमचे पैसे परत करतो.पण मला आता महिनाभर फोन करु नका.मी कामात असतो.तुमच्या फोनमुळे मला फार अडचणी येतात "
" ठिक आहे.थांबतो मी महिनाभर.पुढच्या महिन्याच्या दहा तारखेलाच मी तुला फोन करेन.त्याच्या आत तू आणून दिलेस तर मग फोन करायची गरजच भासणार नाही "
तो उठला.उठतांना त्याची नजर संजयच्या आईकडे गेली.ती त्याला खाऊ की गिळू नजरेने पहात होती.तिच्याकडे दुर्लक्ष करुन तो बाहेर आला.
संजयवर त्याचा विश्वास नव्हता म्हणून संध्याकाळी सुजीतला घेऊन तो त्याच्या वकील मित्राकडे गेला.
" तुमच्याकडे त्यांना दहा लाख दिल्याचे काही लेखी पुरावे आहेत का काका?"वकिलानं त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर विचारलं
" नाही "
" काही साक्षीदार?"
" नाही.पैसे दिले तेव्हा तिथं कुणीच नव्हतं "
" आता मला सांगा तुम्ही खरं बोलताय की खोटं हे मीच ठरवू शकत नाही तर पोलिस किंवा कोर्ट कसं ठरवणार?तुम्ही एवढे पैसे दिले तर काहीतरी त्यांच्याकडून लिहून तर घ्यायचं.किंवा चेकने पैसे द्यायचे होते.इतका विश्वास तर आजकाल भाऊ भावावर ठेवत नाही "
दिवाकरचा चेहरा पडला
" पण मग काही उपायच नाही का?"
" दोनच उपाय आहेत.एक म्हणजे एखाद्या गुंडाला सुपारी देऊन पैसे वसुल करणं.पण त्यात रिस्क आहे.त्या संजयनं पोलिसात तुमच्या विरोधात दमदाटी आणि मारहाण केल्याची तक्रार केली तर तुम्ही अडचणीत याल.दुसरा उपाय म्हणजे गोड बोलून त्याच्याकडून पैसे काढून घेणं.पण त्याला किती दिवस लागतील आणि तो देईल का याबद्दल आपण काही सांगू शकत नाही.तुम्ही काही मध्यस्थ घेऊन जा म्हणजे थोडीफार नैतिकता त्याच्यात शिल्लक असेल तर तो पैसे देऊ शकतो.थोडेथोडे करुन दे असं म्हंटल्यावरही तो देऊ शकेल.एवढंही करुन जमलं नाही तर देवाच्या भरवशावर सोडून देणं हा एकमेव उपाय तुमच्याकडे शिल्लक रहातो "
नैराश्याने दिवाकरला खुप थकल्यासारखं वाटायला लागलं.त्याचे हातपाय गळून गेले.
" जाऊ द्या तुम्ही काही टेंशन घेऊन तुमचा बीपी.वाढवू नका.असाही फ्लॅट हातातून गेलाच आहे आता संजयच्या मागे लागूनही उपयोग नाही " घरी आल्यावर सुमन त्याला समजावत म्हणाली
" असं नाही सुमन.आयुष्यभर मेहनत करुन मी ते पैसे कमावले आहेत.ते असे चोरांना दान करुन टाकायचे का?"
" बरोबर आहे पण त्या पैशांच्या काळजीने तुम्ही तुमचं मनःस्वास्थ्य आणि शारिरीक आरोग्य घालवून बसाल.उरल्यासुरल्या आयुष्याचा कोणताही आनंद तुम्हांला घेता येणार नाही त्याचं काय? अशीही आपल्याला आता पैशांची गरज नाही.त्या उरलेल्या ऐंशी लाखाचं काय करायचं हाच प्रश्न आहे "
" असं कसं? फ्लॅट घेतला असता तर सुजीतला तर त्याचा फायदा झाला असता "
" सुजीतसाठी हे घर आहेच की! आणि किती करणार मुलांसाठी? त्यांनाही कर्तुत्व दाखवायला काहीतरी शिल्लक रहायला पाहिजे ना?"
" हे तू म्हणतेय? तूच तर माझ्या मागे लागली होतीस पुण्याला फ्लॅट घ्या म्हणून "
" हो ते यासाठी की सुजीतनं आपल्याला नाही सांभाळलं तर कमीतकमी मुलीजवळ तरी रहायला जागा असावी म्हणून "
" मग त्यासाठी आपल्याला सव्वाकोटी रुपयाचा फ्लॅट घ्यायची गरज नाही.या ऐंशी लाखात टूबीएचके फ्लॅट घेता येईल "
" हो.ते माझ्या लक्षात आलं म्हणूनच मी तुम्हांला म्हंटलं की तो हलकट संजय देईल तेव्हा देईल.तुम्ही टेंशन घेऊ नका "
" पण त्याला अधूनमधून टोचावं तर लागेलच.नाहीतर त्याला बरंच होईल."
महिना उलटून गेला पण संजयनं काही पैसे दिले नाहीत.दिवाकरनंही गोडीगुलाबीने घ्यायचं ठरवल्याने त्याला फोन केला नाही.पण एक दिवस त्याला संजय कार खरेदी करण्यासाठी शोरुमला गेल्याची बातमी कळली आणि त्याचं डोकं फिरलं.याचा अर्थ स्पष्ट होता की संजयजवळ पैसे होते पण तो दिवाकरला फिरवत होता.कदाचित तो प्लाॅट विकूनच त्यानं ते पैसे जमा केले असावे.त्यानं संजयला चारपाच वेळा फोन लावला पण त्यानं तो एकदाही उचलला नाही.शेवटी एकट्याने जाण्याऐवजी संजयवर दबाव टाकण्यासाठी तो एका संध्याकाळी त्याच्या एका मित्राला प्रमोदला घेऊन संजयच्या घरी गेला.राधिकानं त्याचं नेहमीप्रमाणे स्वागत करुन त्या दोघांना बैठकीत बसवलं.
" ते नुकतेच ऑफिसमधून आलेत.हातपाय धुताहेत.तुम्ही आल्याचं सांगते त्यांना "असं बोलून ती आतमध्ये निघून गेली.संजय बाहेर आला.त्याच्या रागीट चेहऱ्यावरुनच दिवाकरला पुढे काय घडणार आहे याचा अंदाज आला.
" हं बोला " दिवाकरसमोर दोन्ही हात कमरेवर ठेवत तो मग्रुरीनं बोलला.त्याच्या त्या पवित्र्याने दिवाकरच्या कपाळावरच्या नसा तडतडू लागल्या.
" अरे संजय दिवाकरकडून घेतलेले दहा लाख तू अजून परत केले नाहीस त्याला....." त्याच्याऐवजी प्रमोदनंच सुरुवात केली
" तुम्ही काय ह्यांचं वकीलपत्र घेतलंय का? तुम्ही कशाला मध्येमध्ये बोलताय?"
तो ओरडला तशी प्रमोदची बोलतीच बंद झाली.
" ठिक आहे मी बोलतो.तू मला महिन्याभरात पैसे द्यायचं कबूल केलं होतं.आता आठ महिने उलटून गेलेत तू पैसैही देत नाहीस आणि फोनही उचलत नाही.घरी आलो तर असा अंगावर धावून येतोस.काय समजायचं आम्ही?" दिवाकर स्वतःवर संयम ठेवत म्हणाला
" नाही जमलं माझं पैशाचं " संजय बेफिकिरीने म्हणाला
" कधी जमणार आहे?दोन महिन्यांपूर्वी मी आलो होतो तेव्हा तू कसंही करुन महिन्याभरात पैसे देतो असं म्हंटला होतास "
" मी काही तुम्हांला बाॅंडपेपरवर लिहून नव्हतं दिलं "
" शब्दालाही काही किंमत असते संजय.तू मागितलेस तेव्हा मी लगेच तुला केवळ शब्दावर पैसे.."
" हे पहा तुम्ही मला नाही माझ्या बापाला पैसे दिले होते.माझा त्याच्याशी काही संबंध नाही"
प्रमोदनं दिवाकरकडे पाहिलं.रमाकांत वारला तेव्हा हेच तर तो दिवाकरला म्हंटला होता
" मग आता तुझा बाप तर गेला.तुझं कर्तव्य नाही का कबूल केल्याप्रमाणे पैसे परत करण्याचं?"
" माझं कर्तव्य मला शिकवू नका.बापाने केलेलं कर्ज मी थोडीच फेडत बसणार आहे?"
दिवाकर स्तब्धच झाला.त्याला काय बोलावं ते सुचेना.तिथं बसलेल्या संजयच्या आईकडे बघून तो म्हणाला
" बघा हो वहिनी काय म्हणतोय तुमचा मुलगा "
" बरोबरच तर बोलतोय तो.तुम्ही त्याच्या बापाच्या म्हंणण्यावर त्याच्या ऑपरेशनसाठी ते पैसे दिले होते.संजयला थोडीच दिले होते!" रमाकांतची बायको म्हणाली तसे दिवाकरचे हातपायच गारठले.म्हणजे म्हातारीही पोराला सामील होती तर!
" हे बघ संजय मी शांत आहे म्हणून मला लेचापेचा समजू नको.तू अकरा लाखाची कार घ्यायला गेला होतास हे समजलंय मला.तुझ्याकडे पैसे आहेत पण तू जाणूनबुजून मला परत करत नाहीहेस हे समजतंय मला.बऱ्या बोलाने मला पैसे आणून दे नाहीतर..."
" नाहीतर काय? काय कराल तुम्ही?दाखवा मला तुम्ही कधी आणि किती पैसे दिले होते ते.आहे तुमच्याकडे काही प्रुफ? जा कुठेही जा मी नाही घाबरत तुम्हांला " तो दिवाकरच्या अंगावर धावत येत म्हणाला.त्याच वेळी राधिका चहाचे कप घेऊन आली.तिनं ते दृश्य पाहिलं आणि ती जोरात ओरडली
" अहो हे काय करताय .." तिनं पटकन हातातला ट्रे टेबलवर ठेवून संजयला हाताला धरुन मागं खेचलं
" अहो तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत ते.असं वागतात का वडिलांशी? "
" बघ बघ राधिका उपकाराची अशी परतफेड करतोय तुझा नवरा "
" शांत व्हा काका.मी समजावते त्यांना.तुम्ही तो चहा पिऊन घ्या "
वातावरणात शांतता पसरली.रमाकांत आणि प्रमोदनं चहा संपवला मात्र संजयनं चहाला हात लावला नाही .
" ठिक आहे आम्ही निघतो आता.तुझ्या नवऱ्याला चांगलं समजावून सांग " उठताउठता दिवाकर राधिकेला म्हणाला
" काही गरज नाही मला समजावण्याची.आणि तुमच्या धमक्या तुमच्याजवळच ठेवा.आणि पुन्हा कधी माझ्या घरात पाऊल टाकायचं नाही.समजलं?"राधिकेचा हात झिडकारुन संजय बोलला
" ह्याचा अर्थ तू पैसे देणार नाहीस तर " दिवाकर परत संतापला " तू कसा देत नाहीस ते पहातोच मी ..."
"काका मी पाया पडते तुमच्या.तुम्ही जा बरं.नाहितर नको ते होऊन बसेल आणि मला ते पहावणार नाही " राधिका हात जोडत म्हणाली तसा दिवाकर वरमला.
तो आणि प्रमोद दोघंही बाहेर पडल्यावर प्रमोद म्हणाला
" बघ मी तुला म्हंटलं नव्हतं की संजय किती नीच माणूस आहे म्हणून आणि ती म्हातारीही महा हलकट आहे.बरं झालं रमाकांत सुटला नाहीतर या मायलेकांनी त्याचे नुसते हाल केले असते "
" रमाकांत सुटला पण मला अडकवून गेला.त्यानं एकदा पाच लाख देऊन माझ्यावर उपकार केले होते त्याची जाण ठेवून मी त्याला एवढे पैसे दिले.काय चुकलं माझं?"
" पैसे दिलं ते चुकलं नाही.तू तुझी खरी मैत्री दाखवून दिलीस.मात्र तू बाॅंडपेपरवर लिहून घेतलं नाही ती मात्र चुक केलीस"
" मला तरी काय माहित होतं की रमाकांत इतक्या लवकर जाईल?"
" बरोबर.पण आता तो संजय तुझे पैसे देईल असं वाटत नाही "
दिवाकर थकलेल्या अवस्थेत घरी आला.आपले दहा लाख बुडाले या विचारांनी त्याला रात्रभर झोप लागली नाही.दुसऱ्या दिवशी त्याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे सुमन आणि सुजीत त्याला दवाखान्यात घेऊन गेले.दिवाकरचा बीपी.चांगलाच वाढला होता.छातीत डाव्या बाजूला वेदना होत होत्या.औषध लिहून देत डाॅक्टर म्हणाला
" जास्त टेन्शन घेऊ नका.तुम्हांला तर कल्पना आहेच की बीपी.वाढल्यामुळे तुम्हांला हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ब्रेन स्ट्रोकही होऊ शकतो.काळजी घ्या.टेंशन येईल असे प्रसंग, वादविवाद टाळा.औषधांनी बरं नाही वाटलं तर ईसीजी आणि टूडी ईको करुन घेऊ "
घरी येऊन सुमन आणि सुजीत दोघांनी त्याला समजावलं.सुमन म्हणाली
" असं समजा की तुम्ही ते पैसे तुमच्या भावाच्या आजारपणात खर्च केलेत आणि त्यांचा विचार सोडून द्या"
" बाबा माझा वकील मित्र म्हणत होता की यापुढे तुम्ही संजयच्या घरी जाऊ नका.' मी पैसे घेतले नसतांनाही ही मंडळी मला नाहक त्रास देताहेत' अशी त्यानं पोलिसात तक्रार दिली तर पोलिस तुम्हांलाच त्रास देतील.खरंच तुम्ही त्या पैशांचा विचार सोडून द्या "
" अरे बाबा सुजीत थोडीथोडकी रक्कम नाही.चांगले दहा लाख आहेत.काय होत नाही दहा लाखात?"
" बरोबर आहे पण तो संजय आहे एक नंबरचा गुंड.कुठं त्याच्या नादी लागता! त्यानं रस्त्यात तुम्हांला मारहाण केली म्हणजे?त्या अपमानानेच तुम्हांला अटॅक यायचा " सुमन काळजीने म्हणाली
" आपण मध्यमवर्गीय माणसं अशीच घाबरुन रहातो म्हणून या गुंडांचं फावतं.काल मी त्या हरामखोराच्या मुस्काटातच देणार होतो पण राधिकेनं मला आवरलं "
" तुम्ही त्याला मारलं असतं पण त्यानं तुम्हांला मारलं असतं तर तुमचा बीपी.प्रमाणाबाहेर वाढून तुमचं काही बरंवाईट झालं असतं तर?"
दिवाकर चुप बसला.
दिवस उलटत होते.संजयला दहा लाख देऊन आता अकरा महिने उलटले होते.दिवाकरला अधूनमधून पैशांची आठवण यायची आणि तो बैचेन व्हायचा.जाऊन त्या संजयचा खुन करावा इतका त्याला संताप यायचा.मात्र राधिका कधीतरी संजयला पैसे द्यायला तयार करेल अशी वेडी आशा त्याला वाटत होती.
एक दिवस सकाळी आठ वाजताच प्रमोदचा त्याला फोन आला.
" दिवाकर आजचा पेपर वाचला का?"
" नाही.का रे?"
" अरे तो हरामखोर संजय मेला "
" काय सांगतोय काय? कसा आणि कधी ?"
" त्यानं नवी कार घेतली होती.तिची पार्टी देण्यासाठी काल रात्री तो मित्रांसोबत गावाबाहेरच्या एका ढाब्यावर गेला होता.परत येतांना गाडी नदीवरच्या पुलाला धडकून नदीत पडली.गाडीतले चौघंही जण जागीच ठार झाले "
" ओ माय गाॅड! प्रमोद आपल्याला जावं लागेल त्याच्या घरी.अंत्यविधी केव्हा आहे?"
" ते माहीत नाही.पण आपण कशाला जायचं? रमाकांत गेला आणि आपले संबंध संपले.तू तर अजिबात जाऊ नकोस.तुला तर माहीत आहेच रमाकांतची बायको किती हलकट आहे ते.तुला पाहिल्यावर चारचौघात म्हणायची की या माणसाने त्रास दिल्यामुळे माझा पोरगा गेला "
" त्या बाईचं जाऊ दे ,राधिका आणि तिच्या पोरीसाठी जीव तुटतो रे !"
" त्यांना भेटायला नंतरही तू जाऊ शकतोस "
दिवाकरला ते पटलं.फोन ठेवून त्यानं पेपर हातात घेतला.संजयसोबत त्याच्या मित्रांचेही फोटो बातमीत होते.
गाडीतले चौघंही जण दारुच्या नशेत होते आणि गाडी संजयच चालवत होता
त्यानं ती बातमी सुमनला दाखवली.ती म्हणाली
" बरं झालं नियतीनंच त्याच्यावर सुड घेतला.बघा ज्या गाडीसाठी त्यानं आपले पैसे दिले नाहीत त्या गाडीनंच शेवटी त्याचा काटा काढला.एक मात्र खरं की आता आपले पैसे मिळण्याची शक्यता अजिबातच राहिली नाही "
दिवाकरनं नैराश्याचा एक सुस्कारा सोडला
" खरंय तुझं म्हणणं.आतापर्यंत मला आशा वाटत होती की राधिका कधीतरी संजयला समजावून आपले पैसे द्यायला राजी करेल.आता तीही मावळली.गेले आपले दहा लाख " बोलताबोलता त्याचा गळा भरुन आला.
संजय जाऊन वीस पंचवीस दिवस उलटून गेले.दिवाकर राधिकाला भेटायलाही गेला नाही.त्याची इच्छाच झाली नाही.शिवाय तिची सासू कशी वागेल याचीही त्याला भीती वाटली.
एका शनिवारी दिवाकरला राधिकाचा फोन आला .
" काका उद्या सकाळी घरी आहात का?"
ती हे का विचारतेय हे लक्षात न आल्यामुळे क्षणभर त्यानं उत्तरच दिलं नाही
" हो आहे.का?"
" काही नाही.थोडं काम होतं तुमच्याशी.येऊ का घरी? "
ते काम पैशाचं तर नाही असं विचारायची त्याची तीव्र इच्छा झाली.संजयनं असंच येऊन त्याला कधीही न भरणारी जखम दिली होती
" हो.ये " येतांना स्विटीला घेऊन असं म्हणायचा त्याला मोह झाला.बऱ्याच महिन्यात त्या गोड मुलीची भेटच नव्हती.पण आता त्या कुटूंबाशी कोणतेही संबंध ठेवण्याची त्याची इच्छा मरुन गेली होती.
" येते सकाळी दहा वाजता" असं म्हणून राधिकानं फोन ठेवला.सुमननं राधिका का येतेय हे विचारल्यावर दिवाकर म्हणाला
" असेल काही नोकरी बिकरीचं किंवा काही बॅंकेचं काम.फक्त तिनं पैसे मागायला नको.आता पैशाचे व्यवहार करायची हिंमत होत नाही"
" पण मला वाटतं पैशाचंच काही काम असावं.कारण तिच्या दिडशहाण्या सासूनं संजयला मिळालेला एक रुपयाही तिला दिला नसेल.आधीच बिचारीचे आईवडिल गेलेले.दोघं भाऊ दुरच्या राज्यात नोकरी करणारे.त्यांना पैसे मागायला तिला लाज वाटत असणार म्हणून ती तुम्हाला पैसे मागायला येणार असेल "
" तसंही असेल.पण मी मात्र तिला एक रुपयाही देणार नाही आणि तुही मला आग्रह करु नकोस "
दुसऱ्या दिवशी सकाळी दाराची बेल वाजली तेव्हा दिवाकर आपल्या बेडरूममध्ये पुस्तक वाचत पडला होता.राधिका आत आल्याचं त्याला कळलं.तरी तो बाहेर आला नाही.
" आबा कुथं गेले आजी ?" हा स्विटीचा आवाज होता
" जा आत आणि आबांना बोलावून आण " सुमन म्हणाली.आता मात्र दिवाकरला रहावलं नाही.तो उठून बाहेर आला तशी स्विटीनं धावत येऊन त्याच्या पायाला मिठी मारली.त्यानं तिला उचलून घेतलं.
" हं बोल काय म्हणतेय? काय काम काढलंस ?" दिवाकरनं सोफ्यावर बसताबसता राधिकाला विचारलं.ती आता किती पैशांची मागणी करते याचा तो विचार करु लागला.राधिकानं तिची पर्स घेतली.त्यातून एक लिफाफा काढला.तिच्या सासूनं आपल्याला काही नोटिस तर नाही पाठवली या शंकेने त्यानं त्या लिफाफ्याकडे पाहिलं.राधिकानं तो लिफाफा त्याच्या हातात दिला.
" काय आहे यात ?"त्यानं विचारलं
" बघा उघडून"
त्यानं धडधडत्या हृदयाने तो लिफाफा उघडला.आत एक चेक होता.त्यावर त्याचं नाव आणि अकरा लाखाची रक्कम टाकली होती.ते वाचून त्याचे डोळे विस्फारले
" हे काय आहे?" थरथरत्या आवाजात त्यानं विचारलं
" हे तुमचेच पैसे आहेत काका "
" पण मी तर दहा लाख दिले होते.हे अकरा दिसताहेत "
" काका एक वर्षाचं व्याज नको का द्यायला? "
दिवाकरचे डोळे भरुन आले.त्याला तो चेक दिसेनासा झाला.पुढच्याच क्षणाला तो चक्क रडायला लागला.राधिका उठून त्याच्याजवळ गेली.त्याच्या गळ्यात हात टाकून तीही रडू लागली.
" कुठून आणलेस पोरी हे पैसे ?" डोळे पुसतापुसता त्यानं विचारलं
" तो प्लाॅट विकला काका "
" म्हणजे तो प्लाॅट विकला नव्हता? मग संजयने ती गाडी कशी घेतली होती?"
" नाही काका.अण्णांचे इंश्युरन्सचे साडेचार लाख मिळाले होते.ते आणि बाकिच्या रकमेचं लोन काढून त्यांनी गाडी घेतली होती.हा प्लाॅट अण्णांनी त्या दोघांना न सांगता माझ्याच नावावर घेतला होता.म्हणून तर संजय प्लाॅटचे डिटेल्स तुम्हाला देत नव्हते.तुम्ही माझ्यावर प्रेशर टाकून तो प्लाॅट विकायला लावाल अशी त्यांना भीती होती.प्लाॅटचे कागदपत्रंही त्यांनी लपवून ठेवले होते.ते गेल्यावर मी ते शोधून काढले "
" पण तो दर्गा वगैरेच्या गोष्टी सांगत होता त्याही खोट्याच होत्या का?"
" नाही.त्या खऱ्याच होत्या.पण हे तेरा लाखावर अडून बसले होते.त्यामुळे तो प्लाॅट विकल्या जात नव्हता.ह्यांच्या निधनानंतर मी बिल्डरला जाऊन भेटले.दहा लाखावर सौदा झाला "
" पण मग बेटा वरचे एक लाख कुठून आणलेस? संजयच्या कंपनीकडून मिळाले असतील ना काही?"
" ते अजून मिळायचे आहेत पण ते मिळाले तरी मी त्यांना हात लावणार नाहिये काका.माझी सासू त्या पैशावरुन रोज माझ्याशी भांडते.तो कटकटीचा पैसा मला नकोय.कंपनीनं मला पुढच्या महिन्यापासून नोकरीची ऑफर दिलीये.मी ती स्विकारणार आहे.हे वरचे एक लाख मी मंगळसूत्र विकून उभे केले आहेत "
" त्याची काहीच गरज नव्हती बेटा.मला दहा लाखही पुरेसे होते"
" नाही काका.तुम्ही त्या दहा लाखासाठी जो मानसिक त्रास सहन केला त्यासाठी तर तुम्हाला वीस लाख परत करायला हवे होते.आणि काका आता माझा नवरा गेला हे मंगळसूत्र ठेवून मी काय करणार होते?असंही माझ्या नवऱ्यानं मला कोणतं सुख दिलं? अण्णा होते तेव्हातरी परिस्थिती बरी होती.त्यांच्या धाकामुळे माझा नवरा आणि सासू बरे तरी वागत होते.अण्णा गेल्यावर मात्र माझे हाल सुरु झाले.मेलेल्या व्यक्तीबद्दल काय वाईट बोलायचं असं म्हणतात पण काका तुम्हांला सांगते संजय एक नंबरचा स्वार्थी आणि संशयी माणूस होता.त्याचं फक्त स्वतःवर आणि पैशावर प्रेम होते.रुपाने आम्ही सगळ्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटायचो पण आमची मनं कधीच जुळली नाहीत.आम्हांला कधीही एकमेकांबद्दल प्रेम वाटलं नाही.त्यातून माझी सासू नेहमी माझ्याबद्दल संजयच्या मनात विष पेरत रहायची.त्यामुळे तर तो नेहमीच माझ्याशी तिरसटपणे वागायचा.अण्णांनी मात्र मला बापाचं प्रेम दिलं म्हणून तरी माझं आयुष्य सुसह्य होतं "
" आबा ती आजी आहे नं ती आईला लोज शिव्या देते " स्विटी मध्येच बोलली
" असं ? अजून काय काय बोलते आजी ?"
" घलातून निघून जा म्हणते.मल म्हणते.आबा तुम्ही आमच्या घली येऊन तिला माला "
दिवाकरनं राधिकेकडे पाहिलं.तिच्या डोळ्यातून टपाटपा अश्रू पडत होते
" हो काका.त्या मला पांढऱ्या पायाची समजतात. तू माझ्या नवऱ्याला आणि मुलाला खाऊन टाकलं' असं त्या नेहमी स्विटीसमोरच म्हणत असतात.त्यांना संजयचं लग्न त्यांच्या मावसभावाच्या मुलीशी लावायचं होतं.तो भाऊ त्यासाठी लाखो रुपयांचा हुंडा देणार होता. पण ती मुलगी कमी शिकलेली आणि चांगल्या चालीची नाही म्हणून अण्णा त्या लग्नाला तयार झाले नाहीत.त्याचा राग त्या नेहमी माझ्यावर काढायच्या.आता तर त्यांनी मला दोन दिवसात घरातून निघून जायला सांगितलं आहे "
" असं कसं म्हणू शकतात त्या?कायद्याने त्या घरावर तुझाही हक्क आहे " सुमन म्हणाली
" मला नकोय तो हक्क काकू.ज्या घरात कधी प्रेमच नव्हतं तर त्या चार निर्जीव भींतींवरचा हक्क मागून मी काय करु?काका एखादं घर भाड्याने मिळत असेल तर सांगा मला दोन दिवसात त्या घरातून निघायचं आहे "
" इथून जवळच्याच श्रीराम काॅलनीत माझ्या मित्राचं दोन रुमचं घर रिकामं आहे.चालेल का वहिनी तुम्हांला?"
सुजीतनं विचारलं
" चालेल चालेल.अगदी एक रुमचंही चालेल"
" तुमची तयारी असेल तर आपण लगेच जाऊन बघून घेऊ.तुम्हांला आवडलं तर लगेच फायनल करुन घेऊ"
" चालेल"
सुमननं आणलेला चहा घेऊन ती दोघं निघाली तसा दिवाकर राधिकाला म्हणाला
" बेटा तुझ्याकडे खर्चायला पैसे नसतील तर देऊ का?"
" नको काका.संजय मला खर्चासाठी पैसे द्यायला खुप कटकट करायचे म्हणून अण्णा मला बऱ्याचदा पेंशनमधले पाचसहा हजार रुपये माझ्या खर्चासाठी द्यायचे.ते जमलेले दिड लाख रुपये आहेत माझ्याकडे "
" बरं बरं.सुजीत या स्विटीलाही सोबत घेऊन जा .तिला चाॅकलेट आणि आपल्यासाठी अर्धा किलो पेढे घेऊन ये.राधिकेने आज खुप आनंद देणारी गोष्ट केली आहे "
दोन दिवसात सुजीत आणि दिवाकरनं मिळून राधिकेचं सामान नवीन घरात शिफ्ट करुन दिलं.निरोप घेताना राधिका सासूच्या पाया पडायला गेली तेव्हा तिनं पाया तर पडूच दिल्या नाहीत वरुन " तुझं काळं तोंड मला परत दाखवू नकोस " असा दम भरला.
नवीन घरात राधिका स्थिरस्थावर झाल्यावर एका महिन्याने दिवाकर सुमनला घेऊन तिच्या घरी पोहचला.आज रविवार असल्याने राधिका घरीच होती.
" काका आज तर तुम्ही सरप्राईजच दिलंत .तुमचा फोन आल्यापासून विचार करतेय की तुम्हांला माझ्याशी असं काय महत्वाचं बोलायचंय" दोघांच्या हातात पाण्याचे ग्लास देत तिनं विचारलं
" बेटा बऱ्याच दिवसांपासून ते माझ्या मनात होतं पण विचारायची हिंमत नव्हती कारण एक तर संजयचं नुकतंच निधन झालं होतं शिवाय आमच्याही मनात अनेक प्रश्न होते.आज मात्र सर्व ठरवूनच तुझ्याकडे चर्चेसाठी आलो आहे "
" थांबा काका आपण अगोदर पोहे खाऊन घेऊ आणि चहा पिता पिता चर्चा करुया "
" राहू दे बेटा.कशाला त्रास घेतेस?"
" अहो काका सगळं तयारच आहे "
ती आत गेली आणि पोह्यांच्या डिशेस घेऊन आली.पोहे खातांना दिवाकर स्विटीशी बोलत होता पण तो काहीतरी सांगण्यासाठी उतावीळ झाला आहे हे राधिकाला जाणवत होतं.पोहे खाऊन झाल्यावर ती चहाचे कप घेऊन आली.
" हं आता बोला काका "
दिवाकरनं चहाचा एक मोठा घोट घेतला.मग सुमनकडे नजर टाकली.तिनं मान हलवल्यावर तो म्हणाला
" बेटा तू माझी सुन होशील?"
राधिकेच्या हातातला कप थरथरायला लागला.तिनं तो पटकन बाजूला ठेवला.थरथरत्या आवाजात तिनं विचारलं
" म्हणजे मी सुजीतशी.....?"
" हो बेटा "
" पण काका सुजीतला खुप चांगल्या मुली मिळतील.माझ्यासारख्या विधवेशी आणि एका मुलीच्या आईशी त्यानं का लग्न करावं?"
" बरोबर आहे तुझं म्हणणं.सुजीतला चांगल्या मुली मिळतीलही पण राधिकासारखी सुन आम्हांला नाही मिळणार?"
राधिकाला गहिवरुन आलं डोळ्यातून अश्रू टपकायला लागले
" हा तुमचा मोठेपणा आहे काका.पण सुजीतशी लग्न करायला मी पात्र नाही असं मला वाटतं "
" तुझी पात्रता काय आहे हे माझ्याइतकं कोण जाणू शकेल बेटा? मी सार्थकसाठी तुला पहायला आलो होतो तेव्हाच तू मला खुप आवडली होतीस.पण तुमच्या दोघांचा मृत्यूषडाष्टक योग आडवा येत होता म्हणून तुझ्या वडिलांनी नकार दिला होता.त्यांचंही काही चुकलं नव्हतं.समोर संकट दिसत असतांना कोणता बाप आपल्या मुलीला त्यात ढकलेल? सुजीतसाठी मी तुझा हात मागणार होतो पण त्यावेळी सुजीतला चांगली नोकरी नव्हती.शिवाय तो तुझ्यापेक्षा एक वर्षानं लहानही होता.म्हणून मी चुप बसलो.आज सुजीत बॅंकेत मॅनेजर आहे.तो देखणा तर आहेच शिवाय तुमच्या दोघांच्याही पत्रिका जुळतात.त्यात कुठलाही अनिष्ट योग नाहिये असं गुरुजींनी मला सांगितलंय "
" पत्रिकेवर तर माझा विश्वासच राहिला नाहिये काका.संजयचे आणि माझे तीसच्या वर गुण जुळत होते.अनिष्ट योग तर नव्हतेच उलट लग्नानंतर भरभराट होईल,मुलगी राणीसारखं राज्य करेल असं भविष्य बऱ्याच ज्योतिषांनी वर्तवलं होतं.पण काय झालं ते तुम्ही पहाताच आहात.संजयचं आणि माझं कधीच पटलं नाही.राणीसारखी तर जाऊ द्या पण एका सामान्य बायकोला नवऱ्याकडून जो आदर,जे प्रेम हवं असतं तेसुध्दा त्यानं मला कधी दिलं नाही.घरात काम करणाऱ्या मोलकरणीसारखी वर्तणूक तो माझ्याशी करत होता "
" मला कल्पना आहे त्याची.पण सुजीतला तू चांगलं ओळखतेस.तो तुला भविष्यात त्रास देईल असं वाटतं का तुला?"
" कोण केव्हा कसं वागेल हे काही सांगता येतं का काका? मी इतकी पोळले आहे की मला आता कुणावरही विश्वास ठेवावसा वाटत नाही.आजतरी सुजीत खुप चांगला मुलगा आहे पण तो वाईट वागणारच नाही याची गॅरंटी काय?"
" तुझं म्हणणं बरोबर आहे पण कधीतरी कुणावर तरी आपल्याला विश्वास टाकावाच लागतो ना? हे जगच विश्वासावर चालतं.रमाकांतवर असाच मी विश्वास टाकून किती मोठी रिस्क घेतली होती हे तू बघितलंच आहेस.अर्थात रमाकांत जिवंत असता तर गोष्टी इतक्या पुढे गेल्याच नसत्या "
" तेही खरं आहे म्हणा.पण सुजीत तयार आहे का?"
" तोही सुरुवातीला तयार नव्हता.ज्या बाईला तो वहिनी म्हणत होता तिच्याशीच लग्न करणं त्याला विचित्रच वाटत होतं.पण तुला खरं सांगू आमच्या घरात जेव्हाजेव्हा तुझा विषय निघायचा तेव्हा तो सुमनला नेहमी म्हणायचा की आई मला राधिकावहिनीसारखीच बायको हवी आहे.नेहमी हसतमुख असणारी,सगळ्यांना प्रेम लावणारी.त्यानं निर्णय तुझ्यावर सोडलाय.तू तयार झालीस तर तोही राजी होईल.आणि आम्ही तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते किंवा पाळणा घरात रहाणाऱ्या तुझ्या मुलीची किंव येते म्हणून तुला मागणी घालायला आलोय असं अजिबात नाही.तुझ्या पगाराचीही आम्हांला अपेक्षा नाही.आम्हांला तू अगोदरही सुन म्हणून हवी होतीस आणि आता तर मुलगी आणि सुन म्हणूनही हवी आहेस "
" काका मला विचार करायला हवा.मी एकटी असते तर पटकन तयारही झाले असते पण आता स्विटीचाही मला विचार करावा लागणार आहे.सावत्र मुलांशी पुरुष किती वाईट वागतात याचे किस्से तुम्ही ऐकले असतीलच.शिवाय एक नवरा जाऊन तीन महिने होत नाही तर बाईनं दुसरा नवरा शोधला असं म्हणून लोक माझ्यावर थुंकायला आणि शिव्या द्यायला कमी करणार नाहीत "
" तू लोकांचा विचार नको करुस.संजय आणि तुझी सासू तुझ्याशी वाईट वागत होते.लोकांना ते दिसत होतं पण आलं कुणी त्यांना समजावायला? पण तू घटस्फोटाची मागणी केली असतीस तर ह्याच लोकांनी तुला नावं ठेवली असती.लोक नेहमी सोयीस्कर भुमिका घेत असतात.कुणाचं भलं होतंय याचा त्यांना आनंद होत नाही.वाईट होतंय म्हंटल्यावर ते खुश होतात.पण तू शांततेने विचार कर .आम्हांला घाई नाही.तू नाही म्हंटलंस तर आम्हांला वाईट जरुर वाटेल पण आपले संबंध पुर्वीसारखेच रहातील असा मी शब्द देतो.तू आजही माझी मुलगीच आहेस आणि तुझ्या नकारानंतर किंवा सुजीत सोडून तू इतर कुणाशीही लग्न केल्यावरही मुलगीच रहाशील हे नक्की "
" खुप बरं वाटलं काका हे ऐकून.फक्त एकदा सुजीतला माझ्याकडे पाठवून द्या.त्याच्याशी बोलून मी पुढचं ठरवते "
" चालेल बेटा.चल निघू आम्ही?"
" थांबा पाया पडते "
बरोबर एक महिन्याने दारावरची बेल वाजली म्हणून दिवाकरनं दरवाजा उघडला.अपेक्षेनुसार बाहेर राधिका हसऱ्या चेहऱ्याने स्विटीसोबत उभी होती
" आलीस बेटा?"
" हो काका.खरं तर मी अगोदर इथंच यायला हवं होतं पण बघा ना त्यासाठी चार वर्ष जावी लागली "
" शेवटी नशीब म्हणतात ते हेच असतं पोरी "
राधिका आत येऊ लागली तसं त्यानं तिला थांबवलं.मग आत वळून तो म्हणाला
" सुमन लक्ष्मी आली आहे.तिचं स्वागत करायला बाहेर ये"
सुमन ओवाळणीचं तबक घेऊन बाहेर आली.तिनं राधिका आणि स्विटीलाही ओवाळलं.राधिकाला हळदीकुंकू लावण्यासाठी तिनं हातपुढे केला पण राधिका मागे सरकली
" काकू मी विधवा आहे.मला ते चालणार नाही..."
" अगं वेडे सुजीत आणि तुझं लग्न अजून झालं नसलं तरी तू आजपासून आमच्यासाठी सौभाग्यवतीच आहेस.आणि लक्ष्मीला हळदीकुंकू लावायचं नाही असं कसं चालेल?"
राधिकाचे डोळे भरुन आले.आत येऊन तिनं सुमनला मिठी मारली.
" आम्ही खुप नशीबवान आहोत बेटा.तुझ्यासारखी लक्ष्मी आम्हांला मिळाली " दिवाकर डोळे पुसत म्हणाला
" नशीबवान तर मी आहे काका.मला माझं सौभाग्य तर मिळालंच पण प्रेमळ आईवडिलही मिळाले "
राधिका स्फुंदून स्फूंदून रडायली लागली तसा स्विटीला जवळ घेतलेला सुजीत म्हणाला
" बस वहिनी आता रडायचं नाही.आता यापुढे सगळं चांगलंच होणार आहे " तशी सुमन त्याला म्हणाली
" आता म्हणतोहेस ते ठिक आहे पण लग्नानंतर तिला वहिनी नको म्हणू बरं बाळ "
ते ऐकून रडतारडता राधिकेलाही हसू फुटलं
************
© दीपक तांबोळी
9209763049
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा