गुरुवार, ३ जुलै, २०२५

2036. वारस

  "आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी सर्व मान्यवर,आजचे सत्कारार्थी आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्री.अरुण नाईक यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं" सुत्रसंचालिकेने अशी विनंती करताच अरुण, जिल्हा साहित्य संघाचे अध्यक्ष आणि कलेक्टर साहेब यांच्यासोबत व्यासपीठावर जाऊन बसला.समोरच्या प्रेक्षागृहाकडे त्याने पाहिलं.प्रेक्षागृह तुडुंब भरलं होतं.एकही खुर्ची रिकामी नव्हती."हे सगळे खरोखरच पुस्तकप्रेमी आहेत की पत्रिकेत जेवायचंसुध्दा निमंत्रण आहे म्हणून फक्त जेवायला आलेले लोक आहेत?"त्याच्या मनात विचार आला.मागे त्याने पुस्तक प्रकाशनाचे दोनतीन कार्यक्रम बघितले होते.त्याच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनावेळीही अगदी मोजकी डोकी हजर होती.अर्थात आजचा कार्यक्रम वेगळा होता.त्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या कष्टमय जीवनावर आधारित कादंबरी "संघर्ष"ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.त्यानिमीत्त जिल्हा साहित्य संघातर्फे आज त्याचा सत्कार आणि मुलाखत असा दुहेरी कार्यक्रम होता.पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक आणि मित्रपरीवार त्याला पार्टी मागत होते.म्हणून मग अरुणने स्वखर्चाने कार्यक्रमाला येणाऱ्यांसाठी जेवणाचीही व्यवस्था केली होती.
  या कादंबरीसाठी अरुणला खुप मेहनत करावी लागली होती.आदिवासींच्या जीवनाच्या अभ्यासासाठी त्याला गडचिरोलीच्या जंगलात कित्येक वेळा जावं लागलं होतं.बऱ्याचदा तर त्याला १५-२० दिवस जंगलातच मुक्काम करावा लागला होता.दोन वर्षाच्या अथक मेहनतीतून कादंबरी तयार तर झाली पण तिला पुण्यामुबईतला कोणताही प्रकाशक छापायला तयार होईना.सध्याच्या व्हाॅटस्अप आणि फेसबुकच्या जमान्यात एवढी मोठी ३०० पानांची कादंबरी विकत घेऊन वाचणार कोण?हा त्यांचा प्रश्न होता आणि तो रास्तही होता.
त्याच्या स्वतःच्या घरात तो स्वतः सोडून कुणालाच पुस्तक वाचण्याची आवड नव्हती.जवळजवळ एक लाख रुपये किंमतीची पुस्तकं त्याच्या स्टडीरुममध्ये होती पण त्याची
मुलं आणि बायको त्यांच्याकडे ढूंकूनही बघत नव्हती.मुलं व्हाॅटस्अप आणि फेसबुकमध्ये हरवून गेली होती तर बायकोला टिव्ही सिरीयल्सशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं.आपल्या पश्चात या बहुमोल खजिन्याचं काय होणार?त्याला वारस कुठून आणणार?की अशीच रद्दीमध्ये त्याची विल्हेवाट लागणार? याची अरुणला सतत काळजी लागलेली असायची.घरची ही परीस्थीती. बाहेरच्यांकडून काय अपेक्षा करणार?पण अरुण त्या कादंबरीने झपाटला होता.पुण्यामुंबईतल्या प्रकाशकांनी नकार दिल्यावर त्याने स्थानिक प्रकाशकांशी संपर्क साधला.बरीच फिरफिर केल्यानंतर एक प्रकाशक तयार झाला.मात्र अट ही होती की पुस्तक विक्रीला येईपर्यंतचा सगळा खर्च अरुणने करायचा.नाईलाजास्तव पदरचे सत्तर हजार रुपये खर्च करुन अरुणने पुस्तक प्रकाशित केलं.योगायोग म्हणा,नशीब म्हणा की पुस्तकाचा उच्च दर्जा म्हणा,अरुणच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
आपल्या देशात चमत्कार केल्याशिवाय कुणी नमस्कार करत नाही.या अगोदरही अरुणची दोन पुस्तकं प्रकाशित झाली होती.पण वाचक,समाज,मिडियाने त्यांना नगण्य प्रतिसाद दिला होता.ती पुस्तकं छापण्याचा खर्चही अरुणच्याच बोकांडी बसला होता.मात्र "संघर्ष"ला पुरस्कार मिळाला आणि अरुण एकदम प्रकाशझोतात आला.अनेक पुस्तकं लिहुनही पुरस्कार मिळवू न शकणाऱ्या जुन्या लेखकांना या बातमीने धक्का बसला तर नवीन लेखकांना हुरुप आला."संघर्ष" वर चर्चा झडू लागल्या.बऱ्यावाईट प्रतिक्रिया मिळू लागल्या.खुप जणांना ते फालतू पुस्तक वाटलं तर काही जणांना वास्तव!पण पुरस्कार सगळयांची तोंडं बंद करत असतो.शेवटी अरुण नाईकचे सत्कार समारंभ सुरु झाले.आजचा सत्कार समारंभही बराच काथ्याकूट झाल्यानंतरच ठरला होता.
वक्त्यांची भाषणं सुरु झाली.अरुणने पाहिलं समोरच्या सोफ्यावर बसलेला त्याचा मुलगा आणि मुलगी मोबाईलशी खेळण्यात गुंतून गेले होते.बापाच्या सत्कारसमारंभचं त्यांना सोयरसुतक नव्हतं.बायको जांभया देत बसली होती.अधुमधुन तिचेही हात आणि डोळे मोबाईलमध्ये गुंतत होते.
बाहेरच्या बाजुला असलेल्या स्टाॅलवर प्रकाशनाच्या इतर पुस्तकांबरोबर अरुणचीही पुस्तकं होती.वाचक ती चाळत चर्चा करत होते.
"काय रे घेतोय का पुस्तक?"एकाने आपल्या मित्राला विचारलं
" नाही रे बाबा.फार महाग आहे"
"अरे महाग कसलं!फक्त पाचशे रुपयांचं आहे.शिवाय ४० टक्के डिस्काऊंट धरुन फक्त तीनशेला पडतंय ते पुस्तक!"
" अरे बाबा ते ठिक आहे पण तीनशे पानाचं पुस्तक वाचायला कुणाला इथं फुरसत आहे?व्हाॅटस्अप आणि फेसबुकवरचे मेसेजेस पहातापहाताच दिवस निघून जातो.शिवाय हे पुस्तक आदिवासींच्या जीवनावर आहे.आपला काय संबंध आदिवासींशी?
" हो तर ते सिडने शेल्डन आणि आयर्विंग वॅलेस यांची पुस्तकं तू नेहमी वाचायचास. त्यांच्याशी तुझा फार जवळचा संबंध आहे वाटतं?आणि संबंध नाही म्हणतोयेस तर फोटो का काढतोय पुस्तकाचा?अरे!मोबाईल नवीन घेतलास वाटतं!"
"हो मागच्याच आठवड्यात घेतलाय.तो मागचा मोबाईल होता ना त्याचा कॅमेरा इतका खास नव्हता"
"अच्छा!फक्त तेवढ्याच कारणाकरीता बदललास होय!कितीचा आहे?"
"फक्त पंचेचाळीस हजाराचा.आणि फोटो याकरीता काढतोय की हे पुस्तक काही दिवसांनी लायब्ररीत येईलच त्यावेळी पुस्तकाचं नाव आठवावं म्हणून!म्हणजे पुस्तक खरेदी करायची गरज नाही.फुकट वाचता येईल.बरं आज तू कसा काय इकडे?"
"काही नाही रे.या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं.यायची इच्छा नव्हती.आपण कुठे एवढे पुस्तकप्रेमी!पण बायको म्हणाली जेवणही ठेवलंय म्हणून आलो तेवढंच आपल्याला चेंज आणि बायकोला स्वयंपाकापासून फुरसत.तू कसा काय आलास?"
"माझंही तुझ्यासारखंच सेम सेम"
दोघांनी जोरात हसून एकमेकांना टाळी दिली.
वक्त्यांची भाषणं झाली.अरुणचा सपत्नीक सत्कारही झाला.प्रकट मुलाखतही संपण्यात आली होती.
"अरुणजी आता शेवटचा प्रश्न!"मुलाखतकार म्हणाले " प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हंटल्या जातं.तुम्ही याबद्दल काय सांगाल?"
असा प्रश्न विचारला जाणार याची अरुणला कल्पना होतीच.तो या प्रश्नासाठी तयार होता.क्षणभरात दोन वर्षाचा काळ त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेला.या दोन वर्षात त्याच्या बायकोने या पुस्तकासाठी कसलीही मदत तर केली नव्हतीच उलट त्यात अडथळेच आणण्याचा प्रयत्न केला होता.तीला अरुणचं असं वारंवार गडचिरोलीला जाणं अजिबात पसंत नव्हतं.मुळात ती त्याच्या पुस्तक लेखनाला रिकामे उद्योग म्हणायची.या विषयावरुन तिने त्याच्याशी अनेकदा भांडणंही केली होती.त्यामुळे ती प्रेरणा असणं शक्यच नव्हतं.त्याच्या आईलाही त्याचं सदोदित पुस्तक वाचणं आवडायचं नाही.ती त्याला पुस्तकी किडा म्हणायची.त्याला प्रेरणा मिळाली होती त्याच्या वडिलांकडून.त्यांनीच त्याला पुस्तकांचं वेड लावलं होतं आणि लिहायला उद्युक्त केलं होतं."मनातल्या भावना कागदावर उमटत गेल्या की सुचत जातं"असं ते म्हणायचे.त्यांच्यामुळेच अरुण वर्तमानपत्रातून लेख,कथा लिहू लागला होता.
पण या भावना जगासमोर मांडणं शक्य नव्हतं.तशा त्या  मांडल्या तर तो स्त्रीजातीचा अपमान ठरला असता.अनिच्छेने का होईना अरुणने जगरहाटीसोबत जायचं ठरवलं.
" अर्थातच माझी आई आणि माझी पत्नी यांनी सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी लेखक होऊ शकलो.आज आई हयात नाही पण माझ्या पत्नीने तिची उणीव मला कधी जाणवू दिली नाही.तिच्या सहकार्यामुळेच आज हे पुस्तक पुर्ण होऊ शकलं.माझ्या या पुरस्काराची अर्धी वाटेकरी ती आहे"
सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर फोटोग्राफर्सचे फ्लॅश चमकू लागले.अरुणला मात्र आपण वडिलांवर अन्याय केला असं प्रकर्षाने जाणवून गेलं.
कार्यक्रम संपला.सुत्रसंचालिकेने अरुणचं पुस्तक सभागृहाबाहेरच्या स्टाॅलवर सवलतीत उपलब्ध असल्याचं जाहीर केलं त्याचबरोबर जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जावू नये अशी सुचनाही केली.८०टक्के माणसं जेवणाच्या हाॅलकडे पळाली.उरलेली २० टक्के जी खरी पुस्तकं प्रेमी होती ती बुकस्टालकडे वळली.
अरुण कलेक्टरसाहेबांशी बोलत असतांनाच त्याचे साहेब समोर आले.
"अरे अरुण आम्हांलाही पैसे द्यावे लागणार आहेत का पुस्तकाचे?"त्यांनी विचारलं.
"काय साहेब तुमच्याकडून कोण पैसे घेईल?मी सांगतो स्टाॅलवरच्या मुलाला पुस्तक द्यायला"
थोड्यावेळाने त्याच्या मेव्हण्या आल्या.
"पंत आम्हालाही तुमच्याकडून गिफ्ट म्हणून हवंय पुस्तक "अरुणच्या बायकोनेे त्याच्याकडे डोळ्यांनी इशारे केले'नाही म्हणू नका' असा त्यांचा अर्थ होता.
"आणि आम्हांलापण" जवळच उभे असलेले त्याचे भाऊ आणि इतर नातेवाईक म्हणाले.अरुण नाही म्हणणं शक्यच नव्हतं.
"अभिनंदन अरुण.अरे सगळ्यांना फुकट पुस्तकं देतोय आणि आम्ही मात्र पैसे देऊन घ्यायचं.बहुत नाइन्साफी!ऐसे नही चलेगा अरुण.अरे एवढ्या जीवलग मित्रांपुढे तीनशे रुपये कुठे लागतात?"अरुणच्या मित्रांचा घोळका अरुणच्या भोवती जमा झाला.फुकट पुस्तकांच्या मागणीने अरुण अस्वस्थ झाला.
जेवणं झाली.अरुण पुस्तकांच्या स्टाॅलवर आला.स्टाॅलवर अगदी मोजकी पुस्तकं दिसत होती.
"वा बरीच पुस्तकं गेलेली दिसताहेत"त्याने स्टाॅलवरच्या मुलाला आनंदाने विचारलं.
"हो साहेब आपण तीनशे पुस्तकं ठेवली होती त्यातली फक्त पंचवीस उरली आहेत.पण त्यातली फक्त पन्नास पुस्तकं लोकांनी विकत घेतलीत.बाकीची दोनशेपंचवीस पुस्तकं फुकट वाटण्यात गेली आहेत"
"काय्यsssकुणी नेलीत एवढी फुकट पुस्तकं?"अरुणने संतापाने विचारलं
"साहेब मी कुणाला ओळखत नाही पण बऱ्याच जणांनी तुमचं नाव सांगून पुस्तकं नेली.मग मॅडमच्या मैत्रिणी आल्या होत्या.या दादाचेही मित्र आले होते.त्यांनी मला सांगितलं म्हणून मी दिली पुस्तकं"
अरुणने रागाने बायको आणि मुलाकडे पाहिलं.बायको म्हणाली
"हो मग! तुम्ही तुमच्या मित्रांना फुकट दिली.मग माझ्या मैत्रिणींनी काय घोडं मारलयं?त्या नेहमी मला काही ना काही गिफ्ट देत असतात मग मला त्यांना काही द्यायला गिफ्ट द्यायला नको?"
"हो ना.माझे मित्रही तसेच आहेत.पाचसहा पुस्तकं त्यांना दिली तर बिघडलं कुठे बाबा?"मुलाने विचारलं
"अरे बाबा प्रश्न असा आहे की ही फुकट पुस्तकं नेणारी माणसं पुस्तक वाचणार आहेत की फक्त शोकेसमध्ये ठेवणार आहेत?"
"ते आम्ही कसं सांगणार?नेलं तर वाचतीलच ना?"
"तसं नसतं रे.खरा पुस्तकप्रेमी पुस्तक विकत घ्यायला मागेपुढे पहात नाही.या फुकट्या लोकांना साहित्यप्रेमी कसं म्हणणार?"
पुस्तकविक्री झाली म्हणजे छपाईकरता केलेला खर्च काही प्रमाणात तरी वसुल होईल हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू साध्य न झाल्याने अरुण अत्यंत नाराजीनेच घराकडे निघाला.
घराजवळ येऊन पहातो तर एक बाई आणि एक तेराचौदा वर्षाचा मुलगा गेटजवळच उभे होते.कपड्यांवरुन तरी ते गरीब दिसत होते.अरुण गाडीखाली उतरताच ते त्याच्याजवळ आले .अरुणने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं.
" साहेब ते पुस्तक पाहिजे होतं " तो मुलगा घाबरत घाबरत म्हणाला.
" पुस्तक?कोणतं पुस्तक?"
तशी त्या मुलाने घडी केलेलं वर्तमानपत्राचं कटींग खिशातून काढून दाखवलं. अरुणच्या "संघर्ष" या पुस्तकाचा एका लेखकाने करुन दिलेला परीचय होता तो.कालच्याच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला.
" हो मिळेल ना! पण फुकट नाही मिळणार. पैसे लागतील त्याचे" त्याची चिडलेली बायको पुढे येत म्हणाली.
"किती लागतील ताई पैसे?"त्या बाईने विचारलं
"पाचशे रुपये"अरुणचा मुलगा म्हणाला.त्याचा हा आगाऊपणा अरुणला मुळीच आवडला नाही.
त्या बाईने कसलीही चर्चा न करता कमरेला लावलेली पिशवी सोडली.त्यातुन बऱ्याच दहा वीस रुपयांच्या चुरगळलेल्या नोटा काढून मुलाजवळ दिल्या.
"मोज रे सुशा"
मुलगा नोटा मोजू लागला.तशी ती बाई अरुणला म्हणाली
"दादा पोराला लई आवड हाये पुस्तक वाचायची.जे मिळेल ते वाचीत बसतो.पेपरमध्ये तुमच्या पुस्तकाचा फोटो पाहिला तवापासून मागे लागलाय हे पुस्तक घ्यायचं म्हणून"
"कुठे रहाता तुम्ही ताई आणि काय करता?"अरुणने उत्सुकतेने विचारलं
"ती बिल्डींग दिसती नव्हं का?"थोड्याशाच अंतरावरील बांधकाम सुरु असलेल्या बिल्डींगकडे बोट दाखवत ती म्हणाली"तिथंच म्या बांधकामावर मजुरी करते.पोरगाबी शाळा सुटली की तिथंच मजुरी करतो.बिल्डींगजवळ त्या झोपड्या दिसतात ना त्याच्यात आमी रहातो"
"या मुलाचे वडील काय करतात?"
"बाप नाही त्याचा.मेलं ते मागच्याच वर्षी.लय दारु प्यायचं"
तेवढ्यात मुलाने पैसे मोजून त्याच्या हातात दिले.
"मोजून घ्या साहेब,पाचशे आहेत"
"काय नाव बेटा तुझं?"
"सुशांत"
"कोणत्या शाळेत जातो आणि कितवीत आहेस?"अरुणने विचारलं
"नगरपालिकेच्या शाळेत जातो.नववीत आहे"
त्याचं शुध्द बोलणं ऐकून अरुण आश्चर्यचकित झाला.
"अजून कोणकोणती पुस्तकं वाचली आहेत?"
"अरे सुशा जा पुस्तकं घिवून ये आणि दाखीव साहेबाला " सुशा पळतपळत झोपडीकडे पळाला.
"साहेब लई हुशार पोरगं हाय.नेहमी पयल्या नंबरने पास होतं " बाईच्या डोळ्यातून पोराचं कौतुक ओसांडून वहात होतं.सुशा चारपाच पुस्तकं घेऊन आला.चेतन भगत,राॅबिन शर्मा,पु.ल.देशपांडे आणि इतर अनोळखी लेखकांची जुनी फाटलेल्या अवस्थेतली पुस्तकं होती ती.
"कुठून मिळवलीस ही पुस्तकं?"अरुणने विचारलं
"ते भंगारवाले येतात बघा.त्यांना सांगून ठेवलंय.रद्दीत पुस्तकं आली की ते आणून देतात.एका पुस्तकाचे वीस रुपये देतो त्यांना.बरेच जण पैसे घ्यायला नाही म्हणतात पण फुकट कशाला घ्यायचं?त्यांनाही पोट आहे " सुशा म्हणाला.अरुणला लाखाच्या गाड्यांमध्ये फिरणारे, पन्नास साठ हजाराचा फोन बाळगणारे आणि तरीही फुकट पुस्तक मागणारे आठवले आणि त्याचा संताप झाला.त्याने सुशांतला जवळ घेतलं आणि विचारलं
" बेटा तुला रोज नवीन पुस्तक वाचायला आवडेल?"
सुशांतचा चेहरा आनंदाने केवढा तरी फुलला
"हो साहेब"
अरुणने गाडीतून त्याचं नवीन पुस्तक आणि मागे प्रकाशित झालेली दोन पुस्तकं काढून सुशांतच्या हातात ठेवली.सुशांत त्याकडे गोंधळून पहात असतांनाच अरुणने पाचशे रुपयातले साठ रुपये काढून बाकीचे पैसे त्याला परत केले.
"तुला फुकट पुस्तकं घेणं आवडत नाही म्हणून प्रत्येक पुस्तकाचे वीस असे तीन पुस्तकाचे साठ रुपये फक्त मी घेतलेत"
"पण साहेब...तुमी इतकी मेहनत घेऊन लिहिलेलं पुस्तक..."
"असू द्या ताई.तुमचा मुलगा खरा पुस्तकप्रेमी आहे.त्याच्याकडून मला जास्त पैसे नकोत.आणि सुशांत,माझ्या घरातल्या लायब्ररीत हजारो पुस्तकं आहेत.तू रोज येऊन त्यातलं पुस्तक वाचू शकतो.एखादं नवीन पुस्तक बाजारात आलं तर मला सांग.कितीही महागडं असलं तरी मी तुला ते वीस रुपयातच देईन."
त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं.पदराने ते पुसता पुसता ती सुशांतला म्हणाली
"सुशा पाया पड साहेबाच्या"
सुशांत पाया पडायला खाली वाकला तोच अरुणने त्याला वरच्यावर उचलून छातीशी धरलं
"ताई आता हे वर्ष जाऊ द्या.दहावीला आपण सुशांतला चांगल्या शाळेत टाकू आणि घाबरु नका त्याच्या शिक्षणाचा खर्च मी करेन "
दोघां मायलेकांच्या तोंडावरुन आनंद ओसंडून वाहू लागला.अरुणलाही खुप आनंद झाला होता.त्याच्या पुस्तकांच्या संपतीला वारस मिळाला होता.
© दीपक तांबोळी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...