आमचा साहित्यिक स्त्रियांचा एक वाचन ग्रुप आहे. इथं नेहमीच वेगवेगळे विषय अभ्यासले व चर्चिले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सावित्री या विषयावर आम्हाला बोलायचं होत. आम्ही तिघी मैत्रिणी मिळून सावित्री हा विषय मांडायचं ठरवलं. खरतर वटसावित्री पौर्णिमा व्रत मी कधीच केलं नाही. मला ते कधीच आवडलं नाही. पण वडाचं झाड मला खुप आवडत. कारण झाडांची मला खूप आवड आहे. पण का कुणास ठाऊक वटसावित्री पौर्णिमेच व्रत 'जन्मोजन्मी हाच पती मिळावा ' म्हणून करतात. ही संकल्पना मला कधीच रुचली नाही. प्रत्येक गोष्टीत अधिक उणे मुद्दे येतातच. त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन चालत राहिलं की जगणं खूप सुखकर व आनंद देणार होतं असतं. भद्र राज्यातील अश्वपतीची कन्या सावित्री सत्यवानास वरते. सत्यवान अल्पायुषी आहे. असं नारद सांगतात.तरिही ती सत्यवाना सोबत लग्न करते. आपल्या मतावर ठाम असलेली सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. एक 'स्त्री' म्हणून तिच्या गुणांना मी त्रिवार वंदन करते. वटवृक्षाच्या पूजेच्या निमित्ताने वडाला घातल्या जाणाऱ्या प्रदक्षिणा, चोविसतास ऑक्सिजन देणाऱ्या वडाच्या सानिध्यात रहाने व वटवृक्षाचे रक्षण करणे. म्हणजेच वडाच्या फांद्या तोडायच्या नाही. जळण म्हणून त्याचा वापर करायचा नाही. त्याचं नेहमी संवर्धन करायच. या सगळ्या बरोबरच पतीचे स्वकर्तृत्वाने कणखरराहुन रक्षण करणारी खंबीर स्त्री व तिची कथा.
फार...फार...वर्षांपूर्वी लिहिली गेलेली ही कथा आहे. एक प्रकारे 'स्त्री' जाणीवेचा 'स्त्री' शक्तीचा हा गौरवच आहे. सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी, कुंती, गांधारी अशा स्त्रियांवर पुराणकथेत लिखाण केल आहे. या जवळपास सगळ्याच स्त्रियांच्या सौंदर्य, सौज्वळता ,शीलवंत, प्रेमळ, हुशार, गुणी, सहनशील व खंबीर आणि महत्त्वाचं म्हणजे पतीव्रता या गुणांवर भर देऊन लिहिलेल्या या पौराणिक कथा आहेत. ऐतिहासीक कथा वाचताना ऐकताना मला नेहमीच जाणवते भारतात पुरुष पराक्रमाचे विपुल लिखाण केले आहे. या मधल्या काळात स्त्रियांवरचं लिखाण फार कमी प्रमाणात झालं असाव अस मला वाटत. परंतु 1990 नंतर प्रामुख्याने स्त्रियांचा इतिहास लिहिला जाऊ लागला.
तर ...सावित्री या एकाच विषयावर आम्ही तिघी एकत्र बोलणार होतो. ते हे मुद्दे घेवुन .
1.पुराण कथेतील सावित्री.
2.माॅडर्ण सावित्री.
3.प्रॅक्टीकल सावित्री.
एका डॉक्टर मैत्रीणीने पुराण कथेतील सावित्रीची जशी आहे तशी कथा त्यामध्ये विशेष रस घेऊन कथेची सुंदर उकल करत सगळ्यांसमोर हुबेहूब कथा साकार केली. आणि पुराणातली सावित्री कशी होती याच सगळ्यांना दर्शन घडवलं. त्यानंतर माझ्या दुसऱ्या वकील मैत्रिणीने तिच्या विचारानुसार आजच्या नव्या युगातली मॉर्डन सावित्री, ऑफिस, घर व नवरा, मुलं खंबीरपणे कशी सांभाळते, हे खूपच सुंदर पद्धतीने मांडलं. माझा विषय प्रॅक्टीकल सावित्री. अर्थातच खरी खुरी जगलेली सावित्री. अनुभवलेली सावित्री. म्हणजेच...
मी जगलेली सावित्री
कुसुमाग्रज साक्षात वास्तव्यास असताना नाशिक या पवित्र भूमीत कुसुमाग्रजांच्या घरा शेजारी राहण्याचं खूप मोठं भाग्य आम्हाला लाभलं. माझे पती नाशिक महानगरपालिकेत मेडिकल सुप्रीटेंडंट या पदावर कार्यरत होते. महानगरपालिकेतील हॉस्पिटलचा कामाचा खूप मोठा व्याप होता. सकाळी दहा वाजता ते ऑफिसला जायला निघाले. स्वतःच्या कपड्यांच्या बाबतीत फार काही चोखंदळ नसलेले डॉ.भोसले तयार होत असताना मी नेमकं कपड्यांच्या कपाटा जवळ गेले .व त्यांनी मला विचारलं "आज कोणता शर्ट घालू ". सकाळची वेळ असल्यामुळे मी खूप घाईत होते. तरीही कधी नाही ते विचारलेल्या प्रश्नाने मी घाईतच हँगरला लावलेला एक शर्ट त्यांच्या हातात दिला. "हा घाला ". एवढंच उत्तर दिलं. खूप दिवसात न घातलेला ब्रासो फुल शर्ट .त्यांना आवडला नव्हता. हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत. तरीही त्यांनी नाईलाजाने तो शर्ट घातला. व ऑफिसला गेले. नाशिक महानगरपालिकेची खूप मोठी भव्य इमारत. तिचे मागच्याच वर्षी उदघाटन झाले होते. ब्रिटिशांच्या काळापासून दगडी किल्ल्यासारख्या जुन्या वास्तूतील महानगरपालिकेच कार्यालय या नव्या व भव्य इमारतीत आलं होत. ही इमारत खूपच मोठ्या प्रशस्त जागेत सुंदर प्लॅन करून बांधली होती. तेंव्हा नाशिकच्या पालकमंत्री मा.पुष्पाताई हिरे होत्या. कामकाज करण्याच्या दृष्टीने बारिक सारिक सुविधांनी सुसज्ज असी ही इमारत. मी ही अनेक वेळा पाहिली होती. इथं कुणाही अधिकाऱ्याचं निवासस्थान नव्हतं. तरी इमारतीच्या मागच्या बाजूला सुंदर बगीचा व त्यामध्ये मोठा तरण तलाव केला होता .एखाद्या कार्यालया समोर बगीचा व शोभिवंत कारंजे असन हे साहजिक आहे. पण हा तरण तलाव का केला असेल ?.यावर मी तेव्हा भरपूर टीका केली होती ."नाशिकच्या पेठ , सुरगाणा आदिवासी भागातिल लोकांना प्यायला स्वच्छ पाणी मिळत नाही. त्या भागातील लोकांना राहायला घरं नाहीत. नाशिक महानगरपालिकेला पाणी व पैसा जास्त झाला आहे का?. बैठकीमध्ये जनतेच्या पैशाने मेवा खाणारे हे अधिकारी उधळे आहेत ." वगैरे.. वगैरे...पण
एका सामान्य नागरिकाची चीड व नड यांना कशी कळणार?? याच इमारतीत माझे पती बैठकीला ( मीटिंग) गेले होते. या इमारतीचं सौंदर्य बघूनच जणु इथं आग्या मोहाळाच्या माशांनी तिथं आपल बसस्तान बसवलं होतं.जगातील सर्वात सुंदर वास्तुशास्त्राचा नमुना असलेला मेणाचा व मधाचा सुपाएवढ्या आकाराचा लटकता सुंदर बंगलाच जणू मधमाशांनी या इमारतीवर बांधला होता. ऐन प्रवेशद्वारावर काळभोर मधाचंपोळ त्या इमारतीला काळा तीट लावल्यासारखं भासत होतं. आग्या मोहोळ (जंगली माशी)अत्यंत आक्रमक व रागीट असते. या माशांचा हल्ला प्राणघातक ठरु शकतो.माशीने ठंक केलेल्या ठिकाणी प्रचंड आग होते .म्हणून या माशांना आग्या म्हणतात. याची एका मिटरच्या आसपास लांबीची खूप मोठी वसाहत महाकाय वृक्षांवर व उंच कड्यावर असते. माणसाने जंगलातले महाकाय वृक्षतोडून महाकाय इमारती बांधल्या. आता या मधमाशांनी तरी कुठे जावं ??. आज सकाळीच शिपायांनी काठीने मधाचे अर्धेपोळं उठवलं होतं. मधमाशा खुप चिडल्या होत्या . तिकडे कोणी जाऊ नये म्हणून शिपाई जोरजोरात शिट्ट्या वाजवत होता. सगळ्यांना धोक्याचा इशारा करत होता. पण त्याकडे दुर्लक्ष करून. माझे पती गाडीतून उतरून भरभर दारातून आत जाऊ लागले. मागून बॅग घेऊन शिपाई येत होता. "साहेब... साहेब... पुढे जाऊ नका." तोही ओरडत होता. पण यांचं त्या शिपायाच्या आवाजाकडे जराही लक्ष नव्हतं. नेमके हे दारात गेले. व लटकलेली अर्धी आग्या मोहाळाची पोळी तुटुन यांच्या डोक्यावर पडली. झालं... त्या सैनिकी माशांना वाटलं असाव यांनीच आम्हाला छेडलं.खालच्या वरच्या सगळ्याच माशांनी यांच्यावर चक्रव्युह सारखा हल्ला केला.आग्या मोहाळाच्या माशांच्या घेऱ्यात लोकांना डॉ. भोसले दिसेनात .व डॉ. भोसले यांना रस्ता नीट दिसेना. सगळं मोहोळ यांच्या डोक्यावर अंगाभोवती घुं..घुं... आवाज करत गोल गोल फिरू लागलं. चावा घेऊ लागलं .ते हवेतलं मधमाशांचं आवरन व त्यातून पळून जाऊन सुटका करून घेण. खूपच अवघड होऊन बसलं. हे बघून, आजूबाजूचे लोक तर केंव्हाच लांब पळाले होते.
त्यातलेच एक हुशार व आपुलकी असलेले अधिकारी मोठा टेबल क्लाॅथ घेऊन यांच्या अंगावर पांघरुन टाकण्यासाठी धावत आले. झालं त्यातल्या अर्ध्या मधमाशा त्यां अधिकाऱ्याच्या मागे लागल्या. तेही पळायला लागले. हे एका बाजूला व ते दुसऱ्या बाजूला पळु लागले. नेहमीच मध खाल्लेले हे दोन अधिकारी पळापळीचा गमतीदार खेळ खेळत होते. हे लिहिताना आताही अंगावर काटा येत आहे. खरंच किती भयानक व भीतीदायक वातावरण होतं ते. पण ते दृश्य डोळ्यासमोर आलं की वाटत नेहमीच दुसऱ्यांना पळवणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची विचित्र पळा पळी आठवून मला आत्ता खूप हसू येत आहे. तेव्हा मात्र ही बाब खूपच गंभीर होती. यात शंकाच नाही. काहीही गंभीर होऊ शकत होतं. आग्या मोहाळाच्या माशाने डंक केल्यास माणसाचे शरीर लुळे होऊ शकते. किंवा मृत्यूही होऊ शकतो. एवढ्या या घातक आणि विषारी मधमाशा असतात. एवढाशा चिमूटभर जीवान आमच्या यांना चांगलंच गोल गोल फिरवलं होतं. एका मागे एक मधमाश्या धावतच होत्या.एवढ्याशा मधमाशाच्या चिमुकल्या जिवाण एकीचं बळ काय असतं हे दाखवून दिलं होतं. मधमाशांचा मोर्चा तसूभरही मागे हटायला तयार नव्हता. माणसाने जंगले तोडली नसती तर ..त्या मधमाशा सिमेंटच्या जंगलात का? घुसल्या असत्या.? 'तुम्ही जगा व आम्हालाही जगू द्या.' असंच जणु त्या सांगत होत्या.
महानगरपालिकेच्या समोरच यांच्या मित्राचं मोठं रेमंडच शोरूम होतं. यांच ऑफिसच्या रिकाम्या वेळात गप्पा मारण्याच ते नेहमीच ठिकाण. माझे सत्यवान हैराण होऊन दुकानात घुसले. नेहमी लांबूनच "या... साहेब." म्हणणारा रेमंडचा दुकान मालक. यांच्या भोवती मधमाशांचा घोळका बघून दोन्ही हाताने हातवारे करून "साहेब बाहेर जा.. लवकर बाहेर जा." असं सारखं म्हणू लागला. त्याने जस...पुर्वी रेल्वेला हाताने इशारा दिला जायचा. त्या पद्धतीने बाहेर जा. बाहेर जा. असं सारखं हात हलवत तो म्हणू लागला. त्याने यांना आत येऊ दिलं नाही. माझे पती दुकानात जाता जाता. पुन्हा बाहेर पळायला लागले. हो पळायलाच लागले. मधल्या वेळात ते दुसरे अधिकारी ज्यांच्या मागे अर्ध्यामाशा लागल्या होत्या. त्यांनी तरण तलावात उडी मारली. व मधमाशांपासून स्वत:ची सुटका करून घेतली. ते पाण्यात होते. तरीही काही वेळ मधमाशांच आक्रमक सैन्य पाण्यावर टेहळणी करत होतं. आतातर डॉ. भोसले चक्क रोडवर गर्दीतून पळत होते. तेवढ्यात... त्यांना बघून एखाद्या देवदुता सारखा एक मेडिकल रिप्रेझेंटिव्ह स्कुटरवरुन तिथं आला. पुढचा मागचा विचार न करता म्हणाला.
"साहेब.. माझ्यामागे पटकन बसा." इतक्या वेळापर्यंत मधमाशांनी यांच्यावर हल्ला चढवला होता. माशांच्या जबरदस्त डंकाने हे हैराण झाले होते. हे पटकन स्कूटरवर बसले. त्या मेडिकल रिप्रेझेंटीव्हने मधल्या रस्त्याने. जमेल तेवढा जास्तीत जास्त वेग वाढवून स्कुटर तीन ते चार किलोमीटर पळवली. तेंव्हा... कसे काय झाले कुणास ठाऊक. त्या सगळ्या माशा मागे राहिल्या. मधमाशांच्या जाळातून हो जाळातूनच. माझ्या सत्यवानाची सुटका झाली.
तुम्हाला सांगताना जरा मी चुकते आहे.अस तुम्हाला वाटण सहाजिकच आहे. इथं सत्यवान सावित्रीचा काय संबंध? नाही का? हो ...बरोबर आहे. इथं तर एका अधिकाऱ्याचा जीव एका एमआर ने वाचवला होता. तर.. सत्यवान सावित्रीची कहाणी अजुन संपली नाही. तर ती खरी कहाणी (सत्यकथा) इथून सुरू झाली आहे.
एम आर ने डॉक्टर भोसले यांना त्यांच्या गाडी जवळ आणून सोडले. ते गाडित बसले.ड्रायव्हरने विचारले. "साहेब कुठे जायचं आहे." यांना भरपूर माशा चावल्यामुळे काहीच सुचेना. ते म्हणाले
"लवकर घरी चल. "
नाशिक महानगरपालिकेच्या हॉस्पिटलचे डाॅ.भोसलेंच्या अधिपत्यात तेव्हा 70 डॉक्टर होते. व प्रायव्हेट प्रॅक्टिसनर वेगळेच. यांच्या ऑफिस पासून एक मिनिटाच्या अंतरावर कांही स्पेशलाईजड् हॉस्पिटलही होते. अशावेळी (माझ्या सत्यवानाने) एका डाॅक्टर असलेल्या अधिकाऱ्याने कुठलंतरी हॉस्पिटल जवळ करणं गरजेचं होतं. पण ते ऑफिस पासून तीन किलोमीटर अंतरावरील घरी आले. माझी कन्या शाळेच दप्तर घेऊन शाळेत निघाली होती. ती वेळ 11 वाजताची होती. सकळी घराबाहेर पडलेले हे.. तब्बल एक तास मधमाशांच युद्ध चालू होतं. मधमाशांचा एकतर्फी मारा चालू होता. याची आम्हाला काहीच कल्पणा नव्हती. नेमकं त्याच वेळेला माझ्याकडे एक फोटोग्राफर 'स्त्री' मंडळाच्या कार्यक्रमाचे फोटो घेऊन आला होता. मी स्त्री मंडळाची सचिव होते. माझं एक एक फोटो बघणं चालू होतं. तेवढ्यात हॉलच्या दारातून डॉ.भोसले आले व आत बेडरूम मध्ये गेले. त्यांचे कपडे संपूर्ण घामाने भिजले होते. हॉलच्या पॉलिश केलेल्या कोटा फरशीवर यांच्या प्रत्येक पावलाचे ओले ठसे उमटले होते. मी त्यांच्या मागे आत गेले. ते बेडवर पडले होते. "माशा...चं..च..चा.." एवढा एकच शब्द बोलले व डोळे मिटले. तेवढ्यात बॅग घेऊन ड्रायव्हर आला. क्षणभर काय विचार करावा हेच मला सूचेना. आता यांना उचलूननेण तर शक्यच नव्हत. ड्रायव्हर म्हणाला "मॅडम काय करायचं". मी म्हटलं "डॉक्टरांना फोन कर ".मला तो म्हणाला. "कोणत्या डाॅक्टरांना करू?."
मधमाशा चावल्यानंतर नेमक्या कोणत्या डॉक्टरला फोन करावा?. हे मलाही काहीच समजेना. आम्ही कोणीही कधी आजारी पडलं की आम्हाला हेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असत. ती त्यांची जबाबदारी होती. आता यांना कुठ न्यावे??. हे तर काहीच बोलत नव्हते. त्यामुळे मी ही काय करावे या संभ्रमात पडले. मी ड्रायव्हरला म्हटलं. "फोनची डायरी घे आणि त्यात ए पासून प्रत्येक पानावर ज्या कुठल्या डॉक्टरांचे नाव दिसेल त्यांना एकेकाला पटापट फोन कर. व सांग. भोसले साहेबांना खूप मधमाशा चावल्या आहेत. आणि ते घरी सिरीअस आहेत. लवकर या. एवढाच निरोप दे." ड्रायव्हरने खूप चपळाईने लँडलाईनचे नंबर गोल गोल फिरवून डिरेक्टरीच्या प्रत्येक पानावरच्या डाॅक्टरांना पटापट फोन केले.आता जे येतील ते येतील. माझी कन्या शाळेत गेली नाही.आम्ही यांचा ओला शर्ट काढून टाकला. पूर्ण अंगावर, डोक्यावर , पाठीवर व चेहऱ्यावर. जिथे जिथे जागा दिसेल तिथे तिथे माशांनी प्रामाणिकपणे जीव तोडून हल्ला केल्याचे माझ्या लक्षात आले. मी काही दिवसापूर्वी सहजच मैत्रीणींच्या आग्रहामुळे मधुमक्षिकापालनाचा पंधरा दिवसाचा कोर्स केला होता. त्यामुळे मला वेगवेगळ्या जातिच्या मधमाशांची माहिती झाली होती. मधमाशा चावल्यानंतर प्राथमिक उपचाराचा अभ्यास झाला होता. त्या काळात माझं ब्युटी पार्लर सोडुन जायला जराही वेळ नव्हता. तरीही 15 दिवस मधमाशीपालनाच ट्रेनिंग घेतल.ते माझ्या जीवनात माझ्यासाठी खुपच महत्वपुर्ण ठरल.शिकलेल काहीच कधिच वाया जात नाही.हे मात्र खरं.
मधमाशा सहसा कोणाला चावत नाहीत. त्यांना त्रास दिल्यास अगदी शेवटचा उपाय म्हणून त्या चावा घेतात. मधमाशांच्या मागच्या शेपटीच्या गोलअंडाकृती भागात विष असते. व त्या विषाच्या चंबूवर काटा असतो. म्हणजे नांगी असते. मधमाशा तोंडाने कधीच चावत नाहीत.त्या शेपटीचा(नांगी) काटा टोचवतात. म्हणजेच डंक मारतात. हा काटा आकड्यासारखा वाकडा असतो. तो काटा माणसाच्या त्वचेमध्ये घुसला की मधमाशी तिथे अडकते. तिला सुटका करून घेता येत नाही. सुटण्याच्या धडपडीत तिचा काटा शेपटी पासून तुटून माणसाच्या त्वचेतच राहतो. त्याला मधमाशीचा छोटा त्वचेचा लाल भाग असतो. मधमाशी उडत जाते .पण तिच्या रक्तात रक्त गोठण्याची क्रिया होत नाही. मधमाशीचे रक्त वाहत जाते. बिचारीचा मृत्यु होतो. हा प्रकार खरच खूप वाईट आहे. नाही...का. मधुर मध गोळा करणाऱ्या शाकाहारी मधमाशा. कोणाच्या आधी मधी नसतात. त्यांची फक्त जगातल्या सुंदर, सुगंधी व मधुर फुलांशीच आयुष्यभर मैत्री असते. पण माणसाने त्यांना त्रास दिल्यासही काटा टोचवायची म्हणजे डंक मारायची त्यांना निसर्गाने परवानगी दिली नाही. असेच म्हणावे लागेल. कारण त्याची शिक्षा म्हणून त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागतो. मधुघट भरणारी मधमाशी आयुष्याच्या शेवटच्याक्षणी. संरक्षणासाठी... नाईलाजाने... अतिरेकी बनते व मरते. या माशांवरून मला वाटतं मणुष्य अतिरेक्यांच ही असंच होत असावं. मद्याच्या नादात व स्वतःच पोळं भरण्याच्या नादात यांच्या जीवावर बेतत.ते या विचित्र चक्रव्यूहात संपूर्ण अडकतात. दुसऱ्यांना मारताना त्यांना मागेही येता येत नाही. व पुढेही जाता येत नाही .बिचाऱ्यांना शेवटी स्वतःचा जीव गमवावा लागतो.
तर मी माझ्या सत्यवानाच्या शरीरात अडकलेला एकएक काटा प्लकरणे विशिष्ट असा अर्धगोल हात फिरवून काढू लागले. पार्लर मधले कापसाचे गोल गोळे करून ठेवलेला मोठ्ठा डबा घेतला. हाताने होईल तेवढं जोरात दाबून विषारीरक्त बाहेर काढून कापसाने पुसून टाकले. त्यानंतर रुमालात गुंडाळलेला बर्फाचाखडा घेवुन माझा दुसरा काटा काढुन होई पर्यंत माझी कन्या त्या जखमेवर बर्फाचारुमाल ठेवायची. हे आम्हा दोघींचही न थांबता पटापट चालूच होतं. अधून मधून यांना हलवून जागे करणे व हाका मारणेही दोघींचे चालूच होते. आम्ही त्यांना सतत जाग करत होतो.व बोलत रहात होतो. मागे ,पुढे, पाठीवर, पोटावर व चेहऱ्यावर सुज व सगळे रक्ताचे डागच डाग झाले होते. तेंव्हा यांच्या डोक्यावर भरपूर केस होते. त्यामुळे डोक्याला मधमाशांना फारस चावता आलं नाही. तरीही नुकत्याच पडलेल्या छोट्या टकलावर काही माशा चावल्या होत्या. योगायोग बघा नेमका त्या दिवशी फुल शर्ट घातला होता.. त्यामुळे माशांना हाताला डंक मारता आला नाही. इथं चावणे या शब्दाऐवजी नांगी मारणे किंवा डंक मारणे हा शब्द बरोबर होईल. शोधुन शोधुन सगळे काटे काढुन झाले. तरीही आम्हाला न दिसलेले दोन काटे पाठीवर राहिलेच.व त्या ठिकाणी दोनगाठी बनल्या त्या गाठींनी नंतर बरेच दिवस त्रास दिला होता.
आता एकएक डॉक्टर येवु लागले. सगळ्यात आधी डॉ. डी. बी. पाटील व डाॅ.प्रकाश आहेर आले. त्यानंतर डॉ. बागडे डॉ. गरुड डाॅ. भारती. डॉ. काळे डॉ.देव डाॅ.नाईक एक ना दोन अनेक तज्ञ डॉक्टर त्यांच्या मेडीकलकिटसह देवासारखे धावतच आले. सगळ्या डॉक्टरांनी मिळुन पटापट उपचार केला. आता माझं काम संपलं होतं. तज्ञ डॉक्टरांच्या हातात सत्यवानाला देईपर्यंतचीच माझी भूमिका होती. त्यानंतरचे दोन तास सगळेच खूप घाबरून गेले होते. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकत होतं. हे न बोलता न सांगताच डॉक्टरांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. मी व माझी कन्या या व्यतिरिक्त आमचा एकही नातेवाईक नाशकात नव्हता. पण या संकट समयी माझ संपूर्ण घर जिवाभावाच्या , आपुलकिच्या व काळजी घेणाऱ्या डॉक्टरांनी भरून गेल होत.
शेवटी सगळ्यांच्या प्रयत्नाने व शुभेच्छांनी यांना उपचार लागू झाला. माझे सत्यवान डोळे उघडून बघू लागले. बोलू लागले. आता सगळेच बोलायला लागले. थोड गांभीर्य कमीझालं.डॉ.डी.बी.पाटील यांनी सहजच प्लेटमध्ये आम्ही काढून ठेवलेले मधमाशांचे काटे मोजले. ते 99 काटे होते. ते काटे बघून डॉक्टर पाटील यांच्यासह सगळ्यांनाच खूप नवल वाटलं. ते बोलले."बापरे एवढ्या जास्त प्रमाणात मधमाशा चावल्या तरी भोसले साहेब. तुम्ही वाचलातच कसे??." डॉ. पाटील म्हणाले "वहिनी...तुम्ही हा प्रथम उपचार केला. तो खूप महत्त्वाचा ठरला. शरीरात विष पसरण्याच्या आत तुम्ही ते बाहेर काढलं. म्हणून आमच्याही उपचाराचा उपयोग झाला. अन्यथा आम्ही येई पर्यंत पेशंट राहीला नसता."
बघा...निघालेले 99 काटे व विसरून राहिलेले दोन काटे म्हणजे 101 मधमाशा चावल्या होत्या. आता यांना पुढिल आयुष्य कमीत कमी एकशे एक वर्ष तरी जगताना काळजी करण्याचे कारण नाही. जबरदस्त लसीकरण झालं आहे.
या धावपळीत मी ही सत्यवानाच्या सावित्रीची मानसिकता काय असते. ते प्रत्यक्ष जगले. अनुभवले होते. सगळ चांगलच होणार आहे. हे क्षणोक्षणी जाणवत होतं. आत्मविश्वास होता. आम्ही फक्त प्रयत्न करत राहीलो. एवढंच.
डाॅ.भोसले डोळे उघडून शुद्धीवर आल्यावर म्हणाले. "आज माझा नवा जन्म झाला."
...........................
उषा भोसले
8806225643
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा