सकाळपासून ऋताची खूप घालमेल सुरू होती. आज तिचा MD चा रिझल्ट लागणार होता.
तसं आजकाल या परिक्षेत फारसे कोणी नापास होतच नाही.तिला युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडल हवे होते. तिने आणि तिच्या आजोबांनी मिळून हे स्वप्न कित्येक वर्षांपासून एकत्र पाहिले होते.
ऋताला तिचे लहानपण आठवत होते. तिचे आई बाबा दोघेही इंजिनिअर. त्यांची स्वतःची सॉफ्टवेअर कन्सल्टन्सी होती.ऋताची आत्या शहरातली निष्णात वकील होती.ऋताचे आजोबा मात्र डॉक्टर होते. घरच्या जबाबदाऱ्यांमुळे इच्छा असूनही उच्चशिक्षण घेणे त्यांना शक्य झाले नव्हते. ते कित्येक वर्षे जनरल प्रॅक्टिस करत असत. अनेक कुटुंबांच्या तीन पिढ्यांचे ते फॅमिली डॉक्टर होते.त्यांच्या परिसरात त्यांना खूप मान होता. कधीही एखादा सिरियस पेशंट असेल आणि पेशंटला रुग्णालयात दाखल करावे लागणार असेल तेव्हा अनेकदा ऋताचे आजोबा स्वतः पेशंट बरोबर जात आणि त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायला मदत करत असत. तिथून घरी आल्यावर मात्र ते अस्वस्थ असत. "अगं,आज तो हा भेटला हॉस्पिटलमध्ये,काय रुबाब गं त्याचा !मोठ्ठा कन्सल्टन्ट झालाय.तुला सांगतो मेडिकल कॉलेजमध्ये अनेकदा त्याच्या अभ्यासातल्या डिफिकल्टीज् मी सोडवायचो. फायनल इयरला मला त्याच्यापेक्षा जास्त मार्क होते. पण काय करणार?"
"जाऊ दे हो.तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. आपलं पण तर चांगलच चाललंय नं?दोन्ही मुले छान शिकली . स्वतःच्या पायावर उभी आहेत.आणखी काय हवंय आपल्याला आयुष्यात?"आजी त्यांची समजूत काढायची.
"अगं पण त्यांच्यापैकी एकजण सुद्धा डॉक्टर नाही. अगदी सून, जावई सुद्धा नाही. मला किती वाटायचे ,एकाने तरी डॉक्टर व्हावे. बरे मुलं नाही तर नाही निदान सून किंवा जावई तरी डॉक्टर असतील. पण तिथे सुद्धा नन्नाचाच पाढा!"
"आजोबा ,फिकर नॉट,मी होईन नं डॉक्टर."लहानगी ऋता नेहमी म्हणायची. ती असे म्हणाली की आजोबांची कळी खुलायची.
"हे बघ ऋता, आत्तापासूनच काही ठरवू नकोस. आठवी नववीत गेलीस की मग ठरवता येईल.तुला ज्या क्षेत्रात जावेसे वाटेल तिथेच जा. उगाच कोणाच्या सांगण्यावरून काही करू नकोस. "तिची आजी,आईबाबा तिला नेहमीच सांगायचे पण का कोणास ठाऊक ऋताला मात्र डॉक्टरच व्हायचे होते.
तिच्या आजोबांचा तिच्यावर जीव होताच पण जेव्हा तिने NEET चा अभ्यास सुरू केला तेव्हापासून तर त्यांचे सारे लक्ष तिच्यावरच केंद्रीत झाले होते.
तिचे खाणेपिणे,अभ्यास इतकेच नाही तर ती अभ्यास करून कंटाळू नये म्हणून विरंगुळ्यासाठी तिला योग्य ती मोकळिक मिळते आहे ना?सगळ्यांवर त्यांचे लक्ष असायचे.
ती अभ्यास करताना ते जागे रहायचे. कधीही स्वयंपाकघरात न जाणारे आजोबा तिच्यासाठी कॉफी करायला शिकले.
बारावीच्या वर्षात ऋताला विशेष कोचिंग साठी मोठ्या शहरात पाठवायचे ठरल्यावर ते आणि आजी ऋता बरोबर वर्षभर त्या शहरात राहिले.
या साऱ्या कष्टाचे चीज झाले. ऋताला मुंबईतल्या वैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळाला.
आजीआजोबांना तर तिला कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले होते.आजोबांना एवढे खूश तिने कधीच बघितले नव्हते. त्यांना शक्य असते तर त्यांनी अख्ख्या शहराला हत्तीवरून साखर वाटली असती.
ऋता शिक्षणासाठी मुंबईला गेली आणि आजोबांना घर खायला उठायला लागले. ते हळूहळू कमी बोलू लागले. स्वतःच्या विचारांमध्येच मग्न राहू लागले.
ऋताच्या मुंबईत जाण्यामुळे ते थोडे अस्वस्थ असावेत, त्यांना तिची उणीव भासत असावी असेच सगळ्यांना वाटत असे.
ऋता सुद्धा तिला जमेल तशी आजीआजोबांना भेटायला घरी येत असे. ती आली की आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असे. पण ते आता पूर्वीसारखे बोलत नाहीत हे ऋताच्याही लक्षात आले होते.
कितीही यावेसे वाटले तरी ऋता अभ्यासात गुंतत गेली आणि तिचे घरी जाणे कमी झाले. सुरुवातीला आठ पंधरा दिवसांनी तिची खेप व्हायची. ती आता महिना दोन महिन्यांनी व्हायला लागली.
अशीच अभ्यासात वर्षे सरली.ऋता मेडिकलच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास करत होती. तिची उत्तम प्रगती होत होती.
इथे आजोबांना मात्र अनेक गोष्टी विसरण्याची सवय लागत होती.वयोमानाप्रमाणे हे व्हायचेच असा विचार करून घरातल्या कोणीही विशेष दखल घेतली नाही.एक दिवस ते शर्टाची बटणे लावताना गडबडले. त्यांना बटणे कशी लावायची हेच आठवेना.त्यामुळे बटणे लावायलाच जमेना.
एके दिवशी घरी येताना स्वतःचा पत्ताच विसरले . तेव्हा मात्र घरचे सगळे हादरले.
त्यांनी ऋताला फोन केला .
ऋता लवकरात लवकर घरी पोहोचली. आजोबांच्या डोळ्यातला हरवलेला,हरलेला भाव बघून ती मुळापासून हादरली.
पण "अहो, पाहिलत का आपली ऋता आलीय तुम्हाला भेटायला."असे आजीने म्हणताच आजोबांच्या डोळ्यात चमक आली. ते ऋताच्या हाताला हातात पकडून कितीतरी वेळ बसून राहिले.
ऋताला तिच्या आत्तापर्यंतच्या अभ्यासानुसार एवढे नक्की कळले होते की आजोबांना अल्झायमर (Alzheimer )किंवा तसाच काहीतरी आजार झाला असावा.
आजोबांना डॉक्टरांकडे नेऊन गेल्यावर त्याना पण अल्झायमरचीच शंका आली. काही तपासण्या नंतर अल्झायमर (alzheimer)या निदानावर शिक्कामोर्तब झाले.
औषधोपचार सुरू झाले. आजोबांमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसू लागली. तरीही पेशंटच्या जीवाशी खेळ नको म्हणून त्यांनी दवाखान्यात जायचे बंदच केले. आजोबांचा आजार आटोक्यात येत आहे असे वाटून सगळे थोडे निश्चिंत झाले.
ऋताची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली. ती उत्तम मार्कांनी पासही झाली.
आताशा अनेक गोष्टी न समजणाऱ्या आजोबांना हे मात्र व्यवस्थित कळले.त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसायला लागले.
"ऋता तू पुढे शिकणार ना?" त्यांनी तिला विचारले.कितीतरी दिवसांनी आजोबा स्वतःहून काही बोलले होते.
"म्हणजे काय आजोबा, मी आणखी शिकणार आहेच.नुसतीच शिकणार नाही तर गोल्डमेडलिस्ट होणार आहे.त्यानंतर मी कार्डिऑलॉजिस्ट होणार आहे"ऋताने आजोबांचा हात आपल्या हातात घेत म्हटले.आजोबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
एकीकडे ऋता यशाच्या पायऱ्या चढत होती आणि दुसरीकडे आजोबांचा आजार बळावत चालला होता. आताशा ते जवळच्या माणसांची ओळखही विसरत होते.आईबाबा,घरातला केअरटेकर दादा आणि आजी एवढेच त्यांचे विश्व झाले होते.ऋताचे नाव काढले की क्षणभर चमक दिसायची पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.
ऋता MDची परीक्षा देऊन घरी आली तोपर्यंत आजोबा कोणालाच ओळखेनासे झाले होते.ऋताचे लहानपणीचे फोटो पाहिले की कधीतरी माझी बबडी एवढंच म्हणायचे.कधीतरी खूप रागवायचे,चिडायचे,समोर येईल त्याच्या अंगावर धावून जायचे. कधी एकदम शांत असायचे.त्यांना सांभाळताना सगळ्यांचीच तारांबळ होत असे.
रिझल्टची वाट बघता बघता ऋता अनेक वर्षांची सफर करून आली.तिने लॅपटॉप सुरूच ठेवला होता. रिझल्ट लागला. ऋताबरोबर तिचे आईबाबा पण रिझल्ट पहायला थांबले होते. ऋता युनिव्हर्सिटीत पहिली आली होती. इतकी वर्षे तिने आणि आजोबांनी पाहिलेले स्वप्न पुरे झाले होते.
ती धावत आजी आजोबांच्या रुममध्ये गेली."आजोबा मी MDझाले. तुम्हाला म्हणाले होते नं,मी गोल्ड मेडल मिळवीन,पहा आजोबा मी पहिली आले. आजोबा ,तुमची बबडी Consultant झाली."
"अहो उठा ना,ऐकलंत का,आपली बबडी काय म्हणतेय ते?"आजीने आजोबांना उठवायचा प्रयत्न केला.
एवढा आवाज ऐकून आजोबांनी डोळे उघडले,त्यांनी पूर्ण अनोळखी नजरेने ऋताकडे पाहिले. ही कोण व्यक्ती आपल्या जवळ आलीय?का बरं आवाज करते आहे?अशा नजरेने त्यांनी आजीकडे पाहिले आणि ऋताकडे पाठ करून गादीवर वळले.
ऋता एकदा लॅपटॉपवरच्या तिच्या नावाकडे आणि एकदा आजोबांकडे पहातच राहिली.
आईबाबांनी बळेबळे तिला रुम बाहेर नेले."आजोबा,एकदातरी मला व्हेरी गुड गर्ल म्हणा नं,आपण किती सेलिब्रेट करणार होतो ते आठवा नं..आजोबा तुमच्या बबडीला नका ना विसरू....आजोबा ऐका नं.."
ऋताचा आकांत आसमंतात भरून राहिला होता
पण ....आजोबांचा Alzheimer या सगळ्याला पुरून उरला होता...
(अल्झायमरशी दोन हात करणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना समर्पित )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा