गुरुवार, २४ जुलै, २०२५

2092. प्रमोशन

     सनई चौघड्यांच्या आवाजासह शुभ मंगल सावधान ऐकलं आणि शारदाताईच्या डोळ्यातून समाधानाचे अश्रू ओघळू लागले.
      शरदरावांच्या अकाली निधनानंतर शारदाताईंनी चैतन्यला कसं सांभाळलय हे सगळ्यांनाच माहित आहे. चैतन्य केवळ दहा वर्षांचा होता तेव्हा. शारदाताई तेव्हा इस्रो मध्ये कनिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम करत होत्या. पण शरदरावांच्या अकाली मृत्यूनंतर इस्रोची नोकरी सोडून त्या पुण्यात आपल्याच कॉलेजमध्ये फिझिक्सच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या जेणेकरून चैतन्यच्या बाबतीत कुठेही कमी पडू नये. शारदाताई जन्मतःच हुशार. त्यावेळी मॅट्रिकला राज्यातून पहिल्या आल्या होत्या. राज्यसरकारची मानाची स्काॅलरशीप ही मिळवली होती. पुढे जाऊन मोठी शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न होत त्यांचं आणि आपल्या हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर त्या इस्रो मध्ये दाखल देखील झाल्या. खूप अभिमान वाटायचा त्यांना स्वत:बद्दल, लोक ही कौतुक करायचे. पण शरदराव गेले आणि त्यांच्या भरारीला खीळ बसली. पण म्हणून त्यांनी चैतन्यच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. लग्नानंतर जवळपास दहा वर्षांनी चैतन्य जन्माला आला होता तेव्हा त्याचे कोडकौतुक ही तेवढेच. चैतन्य आयआयटी मधून इंजिनीअर झाला आणि एका mnc मध्ये चांगल्या हुद्द्यावर होता. आता तिशीच्या आसपास आला, हेच लग्नाचं योग्य वय असतं म्हणून शारदाताईच्या पसंतीनेच रुहीशी आज लग्न झालं. रुही सुद्धा एक बँकर होती. फायनान्समध्ये एमबीए केलं होतं. लग्न अगदी छान पार पडलं. रितीरिवाज सगळेच सांभाळले गेले.
      चैतन्य-रुही मधुचंद्रासाठी मॉरिशसला गेले. पंधरा दिवसानंतर पुण्यात परत आल्यावर दोघांनीही आपआपल्या नोकरीवर रुजू व्हायचं ठरवलं. शारदाताई ही आपल्या कॉलेजमध्ये परत आल्या आणि रमल्या. कॉलेजमध्ये रुजू झाल्यापासून त्यांना ठीकठीकाणावरून खूप ऑफर्स येत होत्या पण चैतन्य आणि त्याचं शिक्षण यामुळे त्यांनी त्या नाकारल्या होत्या, मात्र आता सगळंच छान, स्थिर आहे म्हटल्यावर त्यांनी या वर्षी कॉलेजमध्ये प्रिन्सिपल पदाच्या शर्यतीत उतरायचं ठरवलं होतं. त्यासाठीची तयारीही त्यांनी सुरु केली होती. सगळ्याचं रुटीन सेट झालं होतं इतक्यात, रुहीच्या बँकेच्या वेळा, चैतन्यच ऑफिस,आणि शारदाताईचं कॉलेज. नव्याचे नऊ दिवस संपले आणि खऱ्या अर्थाने संसार सुरु झाला.
     रुहीला स्वयंपाकाची तेवढी आवड नसली तरी बऱ्याच गोष्टी ती शारदाताईं कडून मन लावून शिकली. महिन्याभरात सासू सुना एकमेकींशी चांगल्याच समरस झाल्या. त्या दिवशी रुही जरा उशीराच म्हणजे दोनेक तास उशिरा घरी आली आणि थोडी दुर्मुखलेली वाटली. आल्या आल्या आपल्या खोलीत गेली. शारदाताई च्या लक्षात आलं, काहीतरी बिनसलंय हे नक्की, पण काय? चैतन्य सोबत कि बँकेत ते काही कळेना. एकदा विचारावं का, असं त्यांना वाटलं, पण पुन्हा विचार केला की आपल्या पासून लपवून नाही ठेवायची रुही, सांगेल ती जेव्हा तिला कम्फर्टेबल वाटेल तेव्हा. आज त्या दोघीच जेवायला होत्या, चैतन्य ऑफिसमधूनच जेवून येणार होता. जेवतानाही रुही कमालीची शांत होती. शारदाताई ही फार काही बोलल्या नाहीत. रात्री अकराच्या सुमारास चैतन्य घरी आला. शारदाताई आपल्या रूम मध्ये काहीतरी वाचत होत्या. चैतन्य आल्याचं त्यांना कळले. पण त्या बाहेर नाही आल्या.  चैतन्य shower घेऊन फ्रेश झाला आणि आपल्या बेडरूममध्ये जाण्या आधी आईला बाहेरूनच गुड नाईट विश केल. शारदाताई ही आतूनच गुड नाईट म्हणाल्या आणि हातातलं पुस्तक बाजूला ठेऊन दिवा मालवला. चैतन्य बेडरूममध्ये आला, रुही त्याची कॉफीसह वाट बघत होती. चैतन्यला झोपण्याआधी कॉफी लागते हे एव्हाना तिच्या अंगवळणी पडले होते. कॉफीचा मग त्याच्या हातात देऊन तिने विचारलं, 
“आज खूप बिझी होता, मी दुपारी फोन करत होते, उचलला नाही.”
“मी मेसेज केला होता तुला, मी मिटींगमध्ये आहे म्हणून.” चैतन्यने थंडपणे उत्तर दिले. 
“ह्म्म्म, मी सुद्धा तुला मेसेज केला होता.” रुही थोड्या दबक्या आवाजात म्हणाली.  
चैतन्य-“हो पाहिला.” 
रुही- “मग?” 
चैतन्य- “मग काय, मी काय करू?”
रुही- “चैतन्य, पिरीयड मिस होऊन चार दिवस झालेत, म्हणून आज संध्याकाळी मी प्रेग्नन्सी टेस्ट केलीय आणि इट्स पोझीटीव.”
चैतन्य- “ओके”
रुही- "फक्त ओके?.”
चैतन्य- “मग मी काय करू?
रुही- “आपण पुन्हा विचार करायला हवा चैतन्य. माझं करिअर आणि ईतर. आपण ठरवलं होतं ना, मी त्या दिवशी ही तुला म्हटलं होत प्रोटेक्शन शिवाय नको म्हणून. तेव्हा तूच म्हटला होता, काही होणार नाही.
चैतन्य- “मग काय? आता तू ठरव. शेवटी तुझं शरीर आहे, ठेवायचं की काढायचं.”
रुही- “काय बोलतोय तू चैतन्य. काढून टाकू? हे आपलं पहिलं बाळ आहे.”
चैतन्य- “मग? काय हवंय तुला नेमकं, करिअर की मुल?”
रुही- “मी कंफ्यूज आहे रे. मला पाडायचं ही नाही आणि जॉबही राखायचा आहे. आजच मला प्रमोशन ऑफर मिळालीय असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून.”
चैतन्य- “मला वाटते हे पाडावे?” एवढंच बोलून कुस बदलून तो झोपी गेला.   
      रुहीच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. ज्याच्या कडून पाठींबा मिळावा असं वाटतंय तोच पाठ करून झोपी गेला. विचार करता करता कधी झोप लागली तिला कळलंच नाही. दोन तीन दिवस असेच गेले, रुही अधिकाधिक दुर्मुखलेली राहू लागली. शारदाताईनी आज ठरवलं, रुहीशी बोलायला हवं आता, काहीतरी बिनसलंय हे नक्की. आज त्या कॉलेज वरून दुपारी लवकरच आल्या होत्या. रुही संध्याकाळी पाचच्या सुमारास आली. शारदाताईंनी आज दोघींसाठी स्वतःच चहा ठेवला होता. रुहीला फ्रेश व्हायला सांगून त्यांनी कपात चहा ओतायला घेतला. रुही फ्रेश होऊन आली आणि शारदाताई नी सरळ मुद्द्यालाच हात घातला.
शारदाताई- "रुही, गेली चार पाच दिवस मी पाहतेय, तू खूप डिस्टर्ब आहेस, काही झालंय का, चैतन्य सोबत काही बिनसलंय.”
रुही- "नाही, तसं काही नाही."
शारदाताई-“मग कसं आहे? मला नाही सांगू शकत का?” 
आता रुहीला रडूच कोसळलं. शारदाताई आपल्या जागेवरून उठल्या आणि रुहीला पोटाशी कवटाळलं. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून म्हणाल्या, “काय झालंय बाळ, मनमोकळेपणाने सांग.”
रुही- "आई, मला दिवस गेलेत."
शारदाताई- “अरे व्वा, इट्स गुड न्यूज. मग रडण्यासारखं काय आहे त्यात. चैतन्य ला सांगितलं का?”
रुही- “हो, तो म्हणतो तुझा निर्णय तू घे, ठेवायचं की पाडायचं. मला कळत नाही काय करू ते, मला प्रमोशन ऑफर ही आहे. बाळ तर हवंय पण करिअरची संधी पण सोडायची नाही.”
शारदाताई- "अच्छा, एवढंच ना. मग असं उदास राहायचं का?”
रुही- "आई मला नाही कळत काय करायचं ते."
शारदाताई- "नको टेन्शन घेऊ. मी आहे ना." 
      शारदाताईंच्या या धीराच्या शब्दाने जरा दिलासा मिळाला पण रूहीने काय करावं याचं उत्तर अजूनही तिला मिळालं नव्हतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चैतन्य ला शारदाताईनी लवकरच बोलावून घेतलं होतं. ताई कॉलेज वरून येतांनाच रुहीला बँकेतून घेऊनच आल्या. आल्या आल्या आपल्या पर्समधून मिठाई काढली, दोघांच्या हातावर मिठाई ठेवत म्हणाल्या, “आता माझं प्रमोशन होणार आहे.” चैतन्य रुही दोघांनाही कळत नव्हतं नेमकं काय चाललंय.
“मी आज माझा राजीनामा दिलाय.” चैतन्य आणि रुही या वाक्याने उडालेच. 
चैतन्य धीर करून म्हणाला, “आई असं अचानक! आणि तुझं प्रिन्सिपलच्या पोस्टचं सिलेक्शन.” 
     शारदाताई चैतन्यकडे पाहून म्हणाल्या, “मला वाटलं होतं, तू माझा मुलगा आहेस, त्यामुळे स्त्रीमन तुला चांगलं कळत असेल, पण तू ही पुरुषच. 
     स्त्री आपल्या पुरुषाकडून काय अपेक्षा करते, तर आत्मसन्मान. असो, जे मी केलं ते रुहीच्या वाट्याला नको. दहा वर्ष वाट पाहिली तुझ्या जन्माची, सुशिक्षित असून ही देव देव केलं, आता नातवासाठी एवढ थांबायला नको आणि तुझी बाबा व्हायची तयारी नसली तरी आजी होण्यासाठी मी तयार आहे. रुही, तुला नोकरीची काळजी करण्याचं कारण नाही, केवळ मॅटर्निटी लिव्ह पर्यंतच घरी थांबायचं. त्या नंतर बाळाची जबाबदारी माझी.” 
      चैतन्य मान खाली घालून तसाच उभा होता आणि रुही सरळ ताईच्या गळ्यात पडून रडत राहिली.    
      
© पांडुरंग म. जाधव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...