शनिवार, २३ मे, २०२६

2875. मायरा

 “Excuse me, are you Mr. Ajay…?”
न्यूयॉर्कच्या एका भव्य शॉपिंग मॉलमधे ब्लॅक टी शर्ट अन ब्ल्यु जीन्स मधे थोडा तिरकस पाठमोरा उभा असलेल्या उंच देखण्या पन्नाशीतल्या गृहस्थाला तिनं विचारलं. त्याच्या डाव्या दंडावर ‘Mayra’ लिहिलेला टॅटू होता.
“Yes, I am Ajay.”
“Oh my God अजय…! अरे कित्ती वर्षानंतर पाहतेय तुला! ओळखलंस का? नसशीलच ओळखलं म्हणा. कारण तीस वर्षांनंतरही तू आहे तसाच आहेस. पण माझ्यात बघ ना किती बदल झालाय.”
ती बोलतच सुटली, त्याला बोलू न देता.
“मोठ्या घरात जाऊन पडलेय ना. भरपूर पैसा-अडका,  नोकर-चाकर. काडीचं काम नसतं. नुसता आराम, आराम आणि आराम. म्हणून झालंय असं. ह्याच वर्षी अमेरिकेत आलोय. तिकडे घरात एवढी श्रीमंती आहे पण माझ्या मिस्टरांना अमेरिकेतच जॉब करायचा होता.”
ती हसत हसत बोलत होती. अजयनं ओळखलं होतं तिला, पण दाखवलं नाही. तो शांतच होता. ती बोलत होती ते तो ऐकत होता. त्याला बघून ती जेवढी एक्साईटेड दिसत होती  त्यामानानं त्याचा चेहरा निर्विकार होता, उलट थोडा उदासच दिसत होता.
अजून त्यानं आपल्याला ओळखलेलं दिसत नाही, असं वाटून तिनं शेवटी त्याला आठवण करुन दिली…
“अरे मी सपना ! आपण कॉलेजमधे नव्हतो का एकत्र सलग दोन वर्षं? तू आणि मी. किती जवळ आलो होतो आपण, किती धमाल करायचो, स्टडी सोडून बाकी सगळं... हा हा… तू तरी सिन्सियर होतास. मी तर नुसता दंगाच करायचे कॉलेजमधे. पिरेड्स बंक करायचे अन खुशाल कँटीन मधे खिदळत बसायचं!
“अन् गुलमोहराच्या त्या मोठ्या झाडाखाली होतंं ते ‘मायरा’ कॉफी हाऊस? त्या ‘मायरा कॉफी हाऊस’मधे तर आपण दोघंच तासनतास गप्पा मारत बसायचो. भोवतालच्या जगाशी काही संबंधच नसायचा. शेवटी तो वेटर येऊन सांगून जायचा… ‘पाच दहा मिन्टात बंद करतोय मॅडम…’ तेव्हा कुठे आपण हलायचो तिथनं…!
“तेव्हा तू एकदा काय बोलून गेला होतास, ते तरी आठवतं न? ‘मायरा’ नाव ठेवणार आहे मी तुझं लग्नानंतर!’ हा…हा… अन् येता येता एका साध्या फूटपाथवर बसलेल्या टॅटूवाल्याकडून तू दंडावर हा टॅटू पण करून घेतला होतास… मिटला नाही बघ अजून… पण फेड झालाय थोडा !
“आणि आठवतं…? असंच एकदा मी तुझ्याबरोबर तुझ्या त्या अडचणीच्या चाळीतल्या घरी आले होते, तेव्हा तुझे आई बाबा होते घरी. ते कसे ना बघतच राहिले माझ्याकडे. ‘ही आपली भावी सून तर नाही ना?’ अशा नजरेनं एकटक न्याहाळत होते, असं वाटत होतं मला…
“तेव्हा मी होतेच रे सुंदर ! घरची श्रीमंती, घरंदाजपणा चेहऱ्यावरच दिसायचाच. त्यांनाही वाटलं असेल, अशी जर श्रीमंताघरची देखणी सून आपल्या लेकाला मिळाली, तर त्याचं नशीबच चमकून जाईल. नाहीतर आपल्यासारखं बसेल खर्डेघाशी करत…!”
त्यानं नुसतं स्थिर नजरेनं तिच्याकडे पाहिलं.
“मैत्री-दोस्ती म्हणत आपण दोघं मनानं किती जवळ आलो होतो ना एकमेकांच्या? माझ्या फ्रेंड्स तर म्हणायच्याही मला, ‘त्या अज्यानं पटवलं-बिटवलंय की काय तुला? सतत बघावं तर आपलं बरोबरच. पण बघ हां सपने, तुझ्या मॉम-डॅडला चालणार आहे का असा गरिबीत वाढलेला चाळीत रहाणारा साधा सरळ मुलगा? तुम्ही एवढे गडगंज श्रीमंत अन ते लोक साध्या चाळीतल्या टिचक्या घरात राहणारे. तुझा मेकअपचा खर्च तरी भागेल का ह्याच्या घरात राहून? पटेल का तुझ्या घरी? तुला तरी चालेल का…?’
“हा…हा… पण मी सगळं चेष्टेतच घेत होते तेव्हा… केवळ टाईमपास होता रे तो माझ्यासाठी!”
त्यानं झपकन एकदम तिच्याकडे रोखून पाहिलं… थेट तिच्या डोळ्यात अन् मान फिरवून पुन्हा दुसरीकडे पाहू लागला.
‘टाईमपास’ शब्दानं दुखावला गेला तो. त्याचं मनापासून तिच्यावर प्रेम होतं… पण तिच्यासाठी तो केवळ ‘टाइमपास’ होता, हे ऐकून तो अजूनच गंभीर झाला.
अजूनपर्यंत तो एक शब्दही बोलला नव्हता, म्हणजे बोलूच दिलं नव्हतं तिनं!
“पण अरे, नंतर मला खरच असं वाटू लागलं होतं की माझं तुझ्यावर प्रेम होतं चाललंय… तुझं माझ्यावर खूप खूप प्रेम होतं, हे तर मला कधीच जाणवलं होतं… पण आपल्यात खूपच तफावत होती रे सगळ्याच बाबतीत!
“अन् मलाही त्या श्रीमंतीची इतकी सवय झाली होती ना, की मी विचारच करू शकायची नाही, चाळीतल्या एका गरीब कुटुंबात मी राहू शकेन ह्याचा!
“पुढं मग तू इंजिनिअरिंग की कुठं कडे गेलास… मी बी.कॉम केलं. झालं, आपल्या वाटा वेगळ्या झाल्या. चोविसाव्या वर्षी, डॅड चे एक फ्रेंड होते- मोठ्ठे बिझिनेसमन. त्यांच्या मुलाशी त्यांनी माझं लग्न लावून दिलं. आम्ही इथंच न्यूयॉर्क मधे सेट्ल झालोय आता!
“सध्या आम्ही एका साध्या रेंटेड घरातच रहाताहोत, दोन-तीन वर्षात घेऊ स्वतःचं नवं घर. इथली खूप नावाजलेली एक रिच मोठ्ठी कंपनी आहे… त्यात चांगल्या मोठ्या पोस्टवर आहे माझा नवरा. अर्थातच मोठं पॅकेज आहे. विशेष म्हणजे बॉस खूप खुश आहे ह्याच्यावर. हा पण सतत त्या बॉसची तारीफ करत असतो. हा… हा… मला भेटवणार आहे एकदा त्याच्या त्या बॉसला.
“अरे हे काय, मी एकटीच बोलत बसलीये केव्हाची! बाय द वे तू इकडे न्यूयॉर्क ला काय करतोयस? एकटाच आलायस की बायको-मुलांनाही घेऊन आलायस यू.एस. दाखवायला… पण एवढ्या सगळ्यांचा खर्च तुला झेपणं जरा…
“काय पण योगायोग बघ… तीस-पस्तीस वर्षांनी भेटतोय आपण अचानक! ते पण कुठं…? न्यूयॉर्कच्या एका मॉलमधे! हा… हा… ते बरं की, नवरोबासोबत गेले नाही मी आत वाइन आणायला, नाहीतर भेटच झाली नसती आपली! तुझी बायको बघायची इच्छा आहे रे माझी… पण ती केव्हा पूर्ण होईल माहीत नाही!”
तेवढ्यात तिला तिचा नवरा समोरून येतांना दिसला. अजय त्याच्या पाठमोरा होता.
“तो बघ आलाच माझा नवरा. तू बघच… तुझ्याएवढा स्मार्ट नसेल… पण मला साजेसा आहे!”
अजयनं मागं वळून पाहिलं. तिचा नवरा अगदी त्याच्या जवळ पोहोचला होता.
अजयला पाहताच त्यानं आदरानं त्याचे हात पुढं केले…
“Oh Oh Oh… हॅलो सर, हॅलो सर… Wow... व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज सर…! हाऊ कम यु आर हियर सर? Wow, व्हेरी नाइस सर…!
“मीट माय वाईफ सर, शी इज सपना… माय वाईफ. तिची इच्छा होतीच सर एकदा तुम्हाला भेटायची. मी तिला भेटवणारच होतो तुम्हाला, ते कल्पना नसतांना… आज अचानक योग आला… आणि इथं मॉलमधे भेट झाली!
“सपना, हे माझे बॉस… देवासारखे आहेत मला… मिस्टर अजय! इंडियातलेच आहेत. आपल्या जुन्नरचेच आहेत. किती सरळ आणि साधे आहेत बघ… इथं येऊन काही वर्षं नोकरी केली. मग स्वतःच्या हुषारीवर आधी एक स्वतः ची लहान कंपनी सुरू केली. अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर ती मोठी केली. आज जी इथली सर्वात मोठी नावाजलेली कंपनी आहे– ‘मायरा इन्फोटेक’, त्या कंपनीचे हे ओनर आहेत. हेच सीईओ आहेत. हेच सर्वेसर्वा आहेत.
“एवढे मोठे असून त्याचा ना त्यांना गर्व, ना माज ना मोठेपणा… शांत आणि दिलदार माणूस. फार दयाळू आहेत. मी जेव्हा आलो, तेव्हा मला जॉब मिळत नव्हता. ह्यांना नुसतं कळलं, मी पण जुन्नरचा आहे… यांनी तडक मला बोलावून घेतलं अन त्यांच्याच कंपनीत जॉब दिला…”
तेवढ्यात अजयला एक फोन आला, म्हणून तो थोडा बाजूला होऊन शांतपणे फोनवर बोलत होता. इकडे तिचा नवरा सांगतच होता अजयबद्दल…
“तुला सांगतो सपना, हे एका गजबजलेल्या जुन्या चाळीत राहायचे… छोट्याश्या घरात. आता इथं न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी दहा एकराच्या जागेत एक भव्य विला आहे ह्यांचा स्वतःचा. एक राजवाडाच जसा काही… तू कल्पना कर, किती पैसा कमावला असेल ह्या माणसानं कष्टाच्या जोरावर… करोडो डॉलर्सचा मंथली टर्नओव्हर आहे आमच्या सरांच्या ‘मायरा इन्फोटेक’ कंपनीचा!
“इथं आपल्या आई-वडिलांसोबत राहतात ते एवढ्या मोठ्या राजवाड्यात! लग्न नाही केलं त्यांनी. त्यांचं एका मुलीवर जीवापाड प्रेम होतं, जिचं नाव ते लग्नानंतर ‘मायरा’ ठेवणार होते… पण ती मुलगी खरी नव्हती. मतलबी होती. तिनं नुसता टाईमपास केला… खेळ केला सरांच्या भावनांसोबत. खरं प्रेम नव्हतंच तिचं!
किती निर्दयी असतात बघ काही मुली… देव करो, अशा मुली कुण्णाला ना मिळो! त्या मुलीला म्हणे पैसेवाला, गडगंज श्रीमंत नवरा हवा होता. सरांना सोडून तिनं पैशासाठी एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाशी लग्न केलं, सरांना कळवलंही नाही… पण सरांचं तिच्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. तिच्या आठवणीत स्वतः च्या ह्या भल्या मोठ्या उद्योगाला त्यांनी तेच नाव दिलं, जे ते तिचं ठेवणार होते… ‘मायरा’… ‘मायरा सॉफ्टटेक’!”
तो एकटाच बोलत होता. अजय फोन आटपून आला होता पण शांतच होता. एक शब्दही बोलला नव्हता तो अजूनपर्यंत… आत्ताही तो ऐकतच होता.
आता मात्र सपनाही शांत झाली होती… एकाएकी अबोल झाली होती. उदास झाली होती. आलेल्या अश्रूंना आपल्या गालांवरून खुशाल ओघळू देत होती. तिनं खूण करून नवऱ्याला जवळ बोलवून त्याच्या कानात काहीतरी सांगितलं.
नवऱ्यानं अजय ला नम्रपणे विचारलं, “सर, सपना म्हणतेय तिला तुम्ही देवासारखे वाटताहात. तुमच्या पाया पडायची इच्छा आहे तिची.”
“No… No…” म्हणत अजय दोन पावलं मागं सरकला, तरी सपना पुढं होऊन त्याच्या पाया पडलीच. त्याच्या सॉफ्ट लेदर शूज वर डोकं ठेऊन तिनं अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आज एवढ्या मोठ्या मॉलमधे सगळ्यांसमोर त्याच्या पाया पडतांना तिच्या श्रीमंतीचा अहंकार गळून पडला होता !

- डॉ. संजय जहागीरदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...