एकदा काही कामासाठी मी सोलापूरला एकटीच गेले होते. काम थोडंसंच होतं पण समक्ष जाऊन सह्या करणं आवश्यक होतं. संध्याकाळी परत यायचं हे ठरवून मी पहाटे चार वाजताच घरातून निघाले होते. साडेदहाला त्या ऑफिसात पोहोचले. तिथलं कामसुद्धा अर्ध्या तासात आटोपलं आणि सकाळी अकराच्या आत मी त्या ऑफिसमधून बाहेर पडले. अजून कुठे जायचं नव्हतं. लगेच जेवण करून तासाभरात निघाले तर संध्याकाळी सहापर्यंत घरी पोहोचू असा मी अंदाज केला.
ड्रायव्हरला फोन करून यायला सांगितलं. उजवीकडे पाहत कारची वाट पाहू लागले. अचानक तिकडून अपर्णा येत असलेली दिसली. तिला पाहून मला खूप आनंद झाला. ती जवळ आल्यावर आम्ही दोघींनी आनंदाच्या भरात एकमेकींना मिठी मारली.
भावनावेग थोडा ओसरल्यावर मला मिठीतून दूर करत ती म्हणाली, "अगं, तू इथे कशी ? किती अचानक भेटलीस ? तुला पाहून मी आनंदाने धावतच पुढे आले. सात एक वर्षे झाली असतील ना गं आपण भेटल्याला ?"
मी म्हणाले, "हो गं, पण तू इथे कशी?"
ती म्हणाली, "अगं, आता मी इथेच राहाते. सात वर्षांपूर्वी माझ्या नव-याची औरंगाबादहून इथे बदली झाली होती. चार वर्षांपूर्वी तो रिटायर्ड झाला. त्याआधीच आम्ही इथे एक टुमदार, ऐसपैस नवीन घर बांधलं होतं. माझा मुलगा इथेच नोकरीला लागला. योगायोगाने सूनपण इथलीच मिळाली. मग आम्ही ठरवलं की आता इथेच सेटल व्हायचं. तू इथे कशी ?"
मी म्हणाले, "अगं, मी एका कामासाठी इथे आले होते. समक्ष यावं असं काम होतं. अर्ध्या तासात काम आटोपलं. आता जेवण करून घरी जायला निघत होते. तूपण चल जेवायला."
ती म्हणाली, "नको. माझं घर इथं आहे आणि बाहेर जेवू असं म्हणतेस ? चल, आता माझ्या घरी ! रात्री मुक्काम कर. खूप गप्पा मारू. सकाळी नीघ."
मी घरी फोन करून अपर्णा भेटल्याचं आणि आज तिच्याकडेच मुक्काम करणार असल्याचं सांगितलं.
ड्रायव्हर कार घेऊन आल्यावर आम्ही दोघी कारमध्ये बसलो. तिचं घर तिथून तसं जवळच होतं. तिच्या घरी गेल्यावर हाॅलमध्ये बसलो. तिच्या सुनेनं पाणी आणून दिलं. अपर्णाने माझी तिच्याबरोबर ओळख करून दिली. माझ्याबद्दल तिला बरंच काही सांगितलं.
तिची सून म्हणाली, "आधी मी चहा आणते, मग स्वयंपाकाला लागते."
तिचं घर तीन बेडरूम, एक गेस्टरुम, एक स्टोअर रुम, किचन, मोठा हाॅल असं खरोखर टुमदार व ऐसपैस होतं.
आमच्या गप्पा रंगल्या. एकमेकांच्या घरातल्या माणसांची चौकशी केली. काही जुन्या मित्र मैत्रिणींची चौकशी झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.
मी विचारले, "आपण सात वर्षे भेटलो नाही. हल्ली घरी येतच नाहीस की काय ?"
ती म्हणाली, "अगं, आठ वर्षांपूर्वी माझे आई वडील वारले हे तुला माहीत आहे. सहा महिन्यांतच हेमंतसुद्धा पुण्याला राहायला गेला. मोठी ताई बडोद्याला आणि कुसुम मुंबईला असते. मी इथं सोलापूरला.आम्ही प्रसंगी भेटत असतोच पण दिवाळी झाल्यावर आम्ही चार दिवसांसाठी पुण्याला जमतो. आता घरी कुणीच नसतं म्हणून चक्करच झाली नाही बघ माझी !"
तिचा नवरा आणि मुलगा घरात नव्हते. रिटायर्डमेंटनंतर तिचा नवरा एका फर्ममध्ये कन्सल्टिंगचं काम करत होता. मुलगा ऑफिसात गेला होता.
तिच्या सुनेनं अर्ध्या तासात स्वयंपाक केल्यावर आम्ही दोघींनी व ड्रायव्हरने जेवण केलं.
जेवल्यावर अपर्णा मला गेस्टरुमध्ये घेऊन गेली. पलंगावर आडवं होऊन आम्ही पुन्हा गप्पा मारत होतो.
गप्पाच्या ओघात अपर्णा म्हणाली, "शि-या कसा आहे गं ?"
अपर्णाच्या प्रश्नाने माझे डोळे भरून आले. ती पुढे म्हणाली, "तू खूप भाग्यवान आहेस. तुझ्यावर खूप प्रेम करणारा, तुला जपणारा असा भाऊ तुला लाभला. मला त्याचं खूप कौतुक वाटायचं. तुझ्यावरचं आंतरीक निर्लेप प्रेम आयुष्यभर जगण्यासाठी त्याने तुला बहिणीच्या नात्यानं बांधून घेतलं आणि ते व्यवहारापलिकडचं नातं जपतच जगत राहिला. तूसुद्धा त्याची बहीण म्हणूनच जगत आलीस. नशीब लागतं असं निरलस, निरपेक्ष, दुर्मिळ प्रेम लाभायला !"
आपल्या मित्रमैत्रिणींना शि-याचं व आपलं नातं माहीत आहे याची मला कल्पना होती तरी मी विचारलं, "तुला कुणी सांगितलं शि-याबद्दल ?"
असं विचारताना माझा आवाज कापरा झाला होता. शि-याच्या आठवणीने नकळत माझ्या डोळ्यांत आधीच अश्रू जमा झाले होते.
ती म्हणाली, "अगं, असं काय विचारतेस ? आपण हायस्कूलला होतो तेव्हा सगळ्या जणींना तुमच्या बहीण भावाच्या नात्याबद्दल माहीत झालं होतं ना ? आणि तो हेमंतचा मित्र होता. त्याच्याकडूनही नंतर तुझ्यावरच्या शि-याच्या प्रेमाबद्दल समजायचं थोडं थोडं मला !"
माझ्या डोळ्यांतले अश्रू गालावर ओघळले होते. मन उदास झालं होतं. माझ्या डोळ्यांतले अश्रू पाहून तिचं मन आशंकीत झालं पण ती गप्प झाली.
मनाला कसंबसं सावरत मी म्हणाले, "सहा वर्षांपूर्वी मी त्याला गमावून बसले."
धक्का बसून ती गप्प झाली. काय बोलावं हा प्रश्न तिला पडला असेल. माझे अश्रू पाहून 'बरंच काही घडलंय' याची तिला कल्पना आली असेल. मला आणि शि-याला ओळखणा-यांना हे अनपेक्षितच होतं.
थोड्या वेळाने भानावर येत ती म्हणाली, "काय सांगतेस ? सहा वर्षांपूर्वी तू त्याला गमावून बसलीस ? आपण नववीत होतो त्यावेळी त्याने तुला बहीण मानलं होतं. त्याला आता पंचेचाळीस वर्षे झाली. त्यातली शेवटची सहा सोडली तर एकोणचाळीस वर्षे तुम्ही एकमेकांच्या आयुष्यात होता, बरोबर ना ?"
मी मान हलवली तशी ती म्हणाली, "इतकी वर्षे नातं टिकवल्यावर तू त्याला कशी गं गमावून बसलीस ? काय झालं असं ? मी त्याच्याबद्दल विचारल्यावर तुझ्या डोळ्यांतून पटकन अश्रू ओघळले म्हणजे तूच तोडलंस ना गं त्याला ?"
मी म्हणाले, "जाऊ दे गं, खूप क्लेशकारी आठवणी आहेत त्या ! गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या आठवणीने मला खूप त्रास होतो. खूप घुसमट होते गं माझी !"
ती म्हणाली, "होणारच, तुला त्रास होणारच ! तो तुझा ना रक्ताचा नातेवाईक, ना तो तुझ्या जातीतला होता. तसा तो परकाच होता ना गं तुला ! पण त्याने एकोणचाळीस वर्षे बहीण भावाचं नातं निभावलं आणि तूच ते नातं तोडून टाकलं असशील तर त्याचा त्रास तुला होणारच !"
मी गप्प बसले. थोड्या वेळाने ती म्हणाली, "त्याच्याशी नातं तोडल्यावर आज तुला खंत वाटतेय, तुला आयुष्यात त्याची कमतरता जाणवतेय, तुझ्या मनात पश्चात्तापाची भावना आहे असंच मला जाणवतंय, खरंय ना !"
मी म्हणाले, "हो गं, माझं मन पश्चात्तापदग्ध आहे. त्याला गमावून बसल्याचं खूप मोठं दुःख पेलतच जगतेय मी !"
ती म्हणाली, "पण तू कुणाजवळही तुझी व्यथा बोलून दाखवली नसशील म्हणून तुझी घुसमट होत असणार ! मनात अजून किती साचवून ठेवणार आहेस तू ? आज माझ्याकडे मन मोकळं कर. तुझ्या सगळ्या चुकांची कबुली दे. अगदी तुमच्या पहिल्या भेटीपासून शेवटच्या भेटीपर्यंत सगळं सांग मला. या अलौकिक नात्याचा शेवट का व कसा झाला ते ऐकायची मलाही खूप उत्सुकता वाटतेय. शि-या म्हणजे तुझ्या आयुष्यातला एक दुर्मिळ व दैवी योग होता ! सांग, मला आज सगळं सांग. अगदी तुमच्या पहिल्या भेटीपासून सांग."
मी म्हणाले, "तू म्हणतेस ते पटतं मला ! गेल्या सहा वर्षात मी शि-याबाबत कुणाही जवळ बोलले नाही आणि घरातलं कुणीही माझ्याबरोबर बोलायला धजावलं नाही. माझं वागणं घरात कुणालाही पटलं नव्हतं हेही तितकंच खरं होतं. माझ्या सुनेला तर खूप वाईट वाटलं होतं. तिला शि-याबद्दल अपार आदर वाटायचा पण मीच त्याच्याशी नातं तोडल्यामुळे सगळ्यांनी शि-याचा विषय बंद करून टाकला होता. चार वर्षे मी माझ्याच विश्वात वावरत होते पण आता गेल्या दोन वर्षापासून अधूनमधून त्याच्या आठवणीने माझी घुसमट होतेय. तुझ्याकडे माझं मन मोकळं झालं तर माझी घुसमट बरीच कमी होईल."
ती म्हणाली, "सांग मग, तुझ्या मनातून सगळं बाहेर पडू दे. तुमची पहिली आणि शेवटची भेट यामधलं सगळं सांग मला."
थोडं थांबून मी म्हणाले, "आपण नववीत होतो आणि शि-या अकरावीत होता. एकदा तो माझ्यासमोर आला आणि मला डोळे भरून पाहू लागला. त्याच्या चेह-यावर हलकंसं स्मित होतं. मला खूप विचित्र वाटलं होतं. मी लगेच तिथून निघाले. नंतर पाच सहा वेळा तो समोर आला. मला पाहून त्याचा चेहरा फुलून यायचा. गाल भरून हसू आणि आनंद त्याच्या चेह-यावर पसरायचं. त्याच्या चेह-यावरचं हसू पाहून मला त्याची भीती वाटायला लागली. मी त्याच्या समोरून लगेच लांब जायचे. त्याच्या गाल भरून हसण्याचा मला त्रास होऊ लागला. डोळे मिटले तरी त्याच्या चेह-यावरचं हसू मला दिसायचं. मला ते असह्य होत गेल्यावर मी घरी सगळ्यांसमोर माझ्या मोठ्या भावाला शि-याबद्दल सांगितलं. माझा मोठा भाऊ म्हणाला की 'तू घाबरू नकोस, उद्या बघतो कोण शिरीष आहे तो'."
माझी आई म्हणाली, "विकी, चांगलं बदडून काढ त्याला ! मानूला त्रास द्यायची त्याची हिंमत कशी झाली ?"
थोडं थांबून मी म्हणाले, "दुस-या दिवशी माझा भाऊ शाळेत आला. मला घेऊन त्याने शि-याला वर्गाबाहेर बोलावलं. माझ्या भावानं बाजूला नेऊन त्याची काॅलर पकडली त्याला दरडावून विचारलं की 'माझ्या बहिणीला त्रास का देतोस ?' शि-या खूप घाबरला होता. तो तत फफ करायला लागला मग तो कसंबसं बोलून गेला की 'मी मानूवर प्रेम करतो.' त्याचं बोलणं ऐकून माझ्या भावाने त्याच्या गालावर दोन चपराक मारून विचारलं की 'काय म्हणालास ? हिच्यावर प्रेम करतोस तू ? तुझी हिंमत कशी झाली हे बोलण्याची ?' असं विचारून माझ्या भावाने त्याला अजून मारलं. तो रडायला लागला. 'मला मारू नका, मला मारू नका' असं विनवत होता. मग त्याने रडत रडतच आपल्या दफ्तरातून एक कागदाची छोटीसी पुडी बाहेर काढली. ती उघडून त्याने एक राखी बाहेर काढून माझ्या हातात राखी दिली आणि मला थांबत थांबत म्हणाला की 'तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तू माझी लहान बहीण आहेस अशी माझी भावना झाली आणि तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो. मी ही राखी सतत माझ्या जवळ ठेवतो, संधी मिळताच माझ्या हातावर बांधायला तुला सांगणार होतो.' त्याचं बोलणं ऐकून आणि माझ्या हातातली राखी पाहून माझ्या भावाचा राग निवळला. तो शांत झाला. जे घडलं ते अकल्पित व अनपेक्षित होतं. माझ्या भावाने त्याच्याकडे पाहिलं. तो प्रामाणिकपणे खरं बोलतोय याची त्याला खात्री पटली. मग भानावर येऊन त्याच्या गालावर हळुवारपणे हात फिरवत तो मला म्हणाला की 'मानू, ठेव ती राखी तुझ्याजवळ.' मग तो शि-याला म्हणाला की 'संध्याकाळी घरी ये आमच्या.' शि-याला मी कुठे राहते हेही माहीत नव्हतं म्हणून त्याने विचारलं की 'तुम्ही कुठे राहाता ?' मग माझ्या भावाने त्याला आमच्या घराच्या खाणाखुणा सांगितल्या."
"मी हातात राखी घेऊनच भावाबरोबर घरी आले. माझ्या भावाने घरी आल्यावर माझ्या आई वडिलांना, वहिनीला, मोठ्या बहिणीला शाळेत काय घडलं ते सगळं सांगितलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं तसा आनंदही झाला. माझा दादा हसत म्हणाला की 'आता मानूला अजून एक भाऊ मिळाला. आता ती आम्हाला विसरणार असं दिसतंय !' त्यावर मी आईला म्हणाले होते की 'आई, दादाला सांग ना, मला रडवू नकोस म्हणून'."
"संध्याकाळी शि-या माझ्या घरी आला. बाहेरच्या खोलीत आम्ही सगळे बसलो होतो. शि-या घरी आल्यावर माझ्या वहिनीनं ओवाळायचं ताट तयार केलं. त्याला पाटावर बसवलं. मी त्याला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधली. त्याला पेढा भरवला. त्याने एक पेढा मला भरवला आणि मला एका हाताने जवळ घेऊन तो म्हणाला की 'मी मरेपर्यंत तुला बहीण म्हणून जपत राहीन आणि तुझ्यावर प्रेम करत राहीन.' नंतर तो आमच्याबरोबर जेवला आणि मग घरी गेला."
थोडं थांबून मी म्हणाले, "नंतर दररोज जरी नाही तरी एक दोन दिवसाआड तो माझ्याकडे यायचा. सगळ्यांशी बोलून माझ्याशी बोलत बसायचा. मलाही तो आवडायला लागला होता. मी त्याची बहीण आहे असं मानूनच मी त्याच्याशी वागाय-बोलायला लागले होते."
"नंतर दोन महिन्यांनी राखी पौर्णिमा आली. मी त्याला दुपारी जेवायलाच बोलावलं होतं. मी त्याला राखी बांधली. तो बहिणीच्या घरी समाधानानं जेवला. नंतर अडीच महिन्यांनी भाऊबिज आली. मी त्याला भाऊबिजेला ओवाळायला बोलावलं. पण का कोण जाणे, तो म्हणाला की 'तुझं माझं नातं राखीचं आहे. भाऊबिजेचं नाही.' त्याच्या बोलण्याचा अर्थ आम्हाला कळला. तो रक्ताचं नातं आणि मानलेलं नातं यातला फरक आम्हाला दाखवत होता. तो भाऊबिजेच्या दिवशी आला पण त्याने माझ्याकडून ओवाळून घेतलं नाही. नंतर त्याने कधीही भाऊबिजेला माझ्याकडून ओवाळून घेतलं नाही. दिवाळीत तो मला भेटायला मात्र यायचा. मी आवडीने त्याला फराळाचं खाऊ घालायचे. एकदा तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. मला त्याच्या आईचीही ओढ मला वाटायला लागली होती. दरवर्षी दिवाळीचा सगळा फराळ घेऊन त्याच्या आईला भेटायला त्याच्या घरी जायचे. अधूनमधूनही तिला भेटायला जायचे. तिच्याबरोबरही माझं एक अनोखं नातं तयार झालं होतं."
थोडं थांबून मी म्हणाले, "मी त्याला पहिल्यांदा राखी बांधल्यानंतर तो आमच्या घरातलाच एक झाला. माझ्या घरच्यांनीही आमचं नातं स्वीकारलं. तो अकरावी झाल्यावर पुण्याला शिकायला गेला. तिथे तो सहा वर्ष होता. पोस्ट ग्रॅज्युएट केल्यावर तिथेच एका काॅलेजात नोकरीला लागला."
"तो पुण्याला असताना मी अधूनमधून त्याच्या आईला भेटायला त्याच्या घरी जायचे. मी पण त्याच्या घरातलीच एक झाले होते. त्याचे आई वडील मला मुलगीच मानायचे. त्यांना मुलगी नव्हती. त्याची आई अपार मायेनं मला खूप जीव लावायची. माझं कौतुक करायची. त्याच्या नातेवाईकांत मी शि-याची बहीण म्हणूनच ओळखली जाऊ लागले होते."
"मी ग्रॅज्युएट झाल्यावर सहा एक महिन्यात माझं लग्न झालं. तुला माहीत आहे, माझा नवरा एम एस सर्जन आहे ते. माझ्या नव-यानेही मनात विकल्प न आणता माझं शि-याबरोबरचं नातं मनापासून स्वीकारलं. शि-या शिक्षक आहे म्हणून माझा नवरा त्याला खूप रिस्पेक्ट द्यायचा. माझ्या सासरी आणि सासरच्या गोतावळ्यात शि-या माझा भाऊ म्हणूनच ओळखला जाऊ लागला."
"माझ्या लग्नानंतर दोन वर्षांनी त्याचं लग्न झालं. मुलगी पाहायला तो मला घेऊन गेला होता. मला आवडली हे मी त्याला सांगितल्यावरच त्याने होकार दिला होता. त्याच्या लग्नात करवली व्हायचा मान मला मिळाला. खूप मनमिळाऊ बायको त्याला मिळाली. ती मनापासून सगळी नातीगोती जपते. नणंद म्हणून तिने कायम माझा मान ठेवला. ती कायम मला आदर, सन्मान देत आली. मी तिच्यापेक्षा वयाने लहान होते पण ती मला 'अहो मानसीबाई' असंच म्हणायची. पाया पडायचे प्रसंग आले की ती माझ्या पाया पडायची. तिने मला कधीही तिच्या पायाशी वाकू दिलं नव्हतं. तिच्या माहेरी, नातेवाईकांमध्ये मला तिची नणंद हीच ओळख मिळाली."
"मी त्याला गमावण्यापूर्वी तो दरवर्षी राखी पौर्णिमेला सकाळी अकरा वाजता माझ्याकडे पुण्याहून यायचा. एकही वर्ष त्याने माझी राखी चुकवली नाही. तो माझ्या ओवाळणीचे अकरा रुपये टाकायचा. त्या अकरा रुपयाचंही मला खूप अप्रुप वाटायचं. मी खूप खुश व्हायचे. नोकरीला लागल्यानंतर मात्र तो न चुकता माझ्यासाठी एक चांगली साडी भेट म्हणून घेऊन यायचा."
"मला एक मुलगी व एक मुलगा आहे. त्याला दोन मुलं आहेत. माझा मुलगा एम.डी डाॅक्टर आहे. मुलगीसुद्धा एम.एस. डाॅक्टर आहे. मला सुनसुद्धा डाॅक्टरच मिळाली. जावई डाॅक्टर मिळाला. मुलगी व जावई दोघेही अमेरिकेत न्यूयाॅर्कला एका मोठ्या हाॅस्पिटलला नोकरीला आहेत. सुनेच्या माहेरी व मुलीच्या सासरी शि-याची ओळख 'शिरीषमामा' अशीच आहे. त्याला सगळे माझा भाऊ म्हणून मान देतात."
"शि-या एका ज्युनियर काॅलेजला लेक्चरर म्हणून नोकरी करत होता. त्याची बायकोही शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. त्याची दोन्ही मुले शिक्षकच आहेत."
थोडं थांबून मी म्हणाले, "अपर्णा, तुला सांगते, माझा नवरा एम एस डाॅक्टर, त्याचं एक नावारुपाला आलेलं हाॅस्पिटल, माझा मुलगा एम डी डाॅक्टर, माझी सुन डाॅक्टर आणि माझी मुलगी एम.एस. डाॅक्टर व जावाईसुद्धा हार्ट स्पेशालिस्ट डाॅक्टर, तेही अमेरिकेत याचा मला अभिमान वाटायला लागला. तो अभिमान नकळत अहंकाराच्या रुपात माझ्या मनात, माझ्या वागण्याबोलण्यात भिनत गेला. माझ्या मैत्रिणींचं सर्कलही असंच हाय-फाय आहे. माझ्या वागण्याबोलण्यात त्या अभिमानापायी काहीसा तोरा येत गेला आणि तिथेच मी शि-याला गमावण्याला सुरुवात केली. कळत नकळत त्याच्याशी, त्याच्या बायकोशी माझ्या वागण्याबोलण्यात एक विचित्र त्रयस्थपणा येऊ लागला. ते दोघे हळुहळू माझ्या मनातून बेदखल होत गेले. मी त्याला गमावण्यापूर्वी वर्षभरात तो बायकोबरोबर दोनदा आला होता. राखीला आल्यावर मी त्याला राखी बांधली पण त्यात कोरडेपणा होता. मी त्याचं तोंडही गोड केलं नव्हतं. पेढा त्याच्या हातावर ठेवला होता. त्याला 'जेवून जा' असंही बोलले नव्हते. तो लवकर जाईल तर बरं अशी माझी भावना होती. कारण त्या दिवशी घरात माझ्या डाॅक्टर परिवाराचा सगळा गोतावळा एकत्र आला होता. नंतर तीन एक महिन्यांनी तो पुन्हा एकदा बायकोला घेऊन माझ्या घरी आला होता. माझ्या सुनेनं दोघांना चहा नाष्टा दिला. ती त्यांच्याबरोबर थोडंसं बोलली. मी टीव्हीवर एक मालिका बघत होते. अॅड लागल्या तर मी अॅडही बघू लागले. पंधरा मिनिटांनी ते दोघे उठले. 'सोनाली, आम्ही येतो गं, तुझी सासू टिव्ही पाहण्यात गुंगलीय. बघू दे तिला टिव्ही.' असं सहजपणे हसतच त्याची बायको माझ्या सुनेला बोलली आणि ते दोघे बाहेर पडले. त्यावेळी मी त्याला माझ्या निर्ममतेचा अजून एक धक्का दिला. मी त्याला म्हणाले, 'आधी फोन करून यायचं असतंस ना !' अपर्णा अगं, माझ्या बोलण्यावर मागे वळून न पाहाता तो बायकोबरोबर निघून गेला. ती त्याची माझी शेवटची भेट. नंतर तो परत कधी आला नाही. त्याने फोनसुद्धा कधी केला नाही. आमचा संपर्क पार तुटला होता."
अपर्णा म्हणाली, "आधी फोन करून यायचं असतंस ना असं सांगितलंस तू त्याला ? अगं, त्याचा अर्थ समजतो का तुला ? इतका औपचारिकपणा दाखवायचा याचा अर्थ त्याने त्याच्या इच्छेने तुझ्या घरात यायला तू त्याला मज्जाव केलास !"
मी म्हणाले, "हो. माझ्या मनात होतं ते मी बोलून गेले. एकोणचाळीस वर्षे माझ्या माहेरी आणि माझ्या घरी घरातलाच एक म्हणून त्याचा मुक्त वावर होता याचा मला विसर पडला होता. त्याने माझ्या घरी फोन करून यावं हेच मला अभिप्रेत होतं."
माझा आवाज कातर झाला होता. मला उमाळा दाटून आला. मी तिच्याजवळ सरकले. तिला एका हाताने जवळ ओढत मी हुंदके देत रडायला लागले.
अपर्णा म्हणाली, "रडून घे. आता तुझं रडू आवरू नकोस. तुझ्या पश्चात्तापाचे अश्रू आहेत हे ! ते वाहू दे. तुझ्या मनातली सगळी घुसमट दूर होऊ दे."
बराच वेळ मी हुंदके देत रडत होते. मनातला पश्चात्ताप अश्रूंच्या रुपाने बाहेर पडत होतं. माझ्या मनावर कणभर शिल्लक राहिलेली अहंकाराची काजळी दूर होत होती.
ब-याच वेळाने मी शांत झाले. अपर्णाने मला प्यायला पाणी दिलं आणि विचारलं, "तुझ्या मनात पहिल्यांदा पश्चात्तापाची भावना कधी उमटली ? आठवतंय का काही तुला ?"
मी म्हणाले, "हो. दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा माझ्या मनात पश्चात्तापाची भावना अतिशय वेगाने दाटून आली होती. अगं, ती कल्याणी आठवते ना तुला ? तिचा नवरा वारला तेव्हा दोन दिवसांनी मी तिला भेटायला गेले होते. त्यावेळी ती सांगत होती की 'तिच्या नव-याची शेवटची इच्छा काही पुरी झाली नाही. तिच्या नव-यानेही पैशाच्या घमेंडीत आपल्या मोठ्या गरीब भावाशी संबंध तोडले होते पण आजारपणात त्याला त्याबद्दल खूप पश्चात्ताप वाटत होता. भावाला भेटण्याचा व आपल्या वागण्याबद्दल त्याची माफी मागण्याचा ध्यास तिच्या नव-याने घेतला होता. तिच्या नव-याची तब्येत बरीच बिघडल्यावर कल्याणीने तिच्या दिराला फोन करून सांगितलं. तिचा दीर पण तिच्या नव-याला भेटायला ताबडतोब आला पण त्याने घरात पाऊल ठेवण्याआधी एक तास तिच्या नव-याने 'दादा ... दादा ...' असं पुटपुटत प्राण सोडला होता. अभिमान व अहंकारापायी तिच्या नव-याने मोठ्या भावाशी संबंध तोडले आणि भावाला भेटण्याची, भावाची माफी मागण्याची त्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही याबद्दल तीन चारदा बोलून कल्याणीने तिची खंत बोलून दाखवली होती. ती हे पण बोलली की 'काय करायचा पैसा आणि प्रतिष्ठा ! पैसा प्रतिष्ठेच्या घमेंडीपायी आपलीच माणसं आपण दूर करायची का ? आणि त्याबद्दल पश्चात्ताप घेऊनच मरायचं का ?' अपर्णा, त्याक्षणी मला शि-याची तीव्रतेने आठवण झाली आपण आपल्या पैशाच्या, प्रतिष्ठेच्या घमेंडीपायी त्याला गमावल्याच्या पश्चात्तापाच्या भावनेनं माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले होते. त्यावेळी कल्याणीला वाटलं होतं की मी तिच्या दुःखाने रडतेय पण माझे अश्रू शि-यासाठी होते हे तिला कसं सांगू शकणार होते ! मी शि-यासाठी खूप व्याकूळ झाले होते."
अपर्णा म्हणाली, "तुला पश्चात्ताप झाला होता तरी दोन वर्षे तू शि-याला भेटायला का गेली नाहीस ? स्वतः थोडी झुकली असतीस तर सहा वर्षांचा तुमच्यातला दुरावा मिटला नसता का ?"
मी म्हणाले, "त्याला भेटायचं धाडस मला झालं नाही. अगं, मी त्याला गमावून बसल्यानंतरही मी एक फार मोठी घोडचूक केली होती. ती माझी चूक नव्हती तर तो माझा खूप मोठा अपराध होता. तीन वर्षांपूर्वी शि-याची आई वारली. मला ताबडतोब निरोप आला होता पण तिचं शेवटचं दर्शन घ्यायलाही मी गेले नव्हते. अगं, त्या माऊलीनं मला मुलगी म्हणून खूप जीव लावला होता गं आयुष्यभर ! मी शि-याची बहीण आहे याचं तिला माझं खूप कौतुक होतं. ती माझ्यावर खूप प्रेम करायची. तरीही मी ... ... ! मनातल्या अहंकारापायी माझी मति भ्रष्ट झाली होती, मी भरकटली गेले होते. कशी कोण जाणे पण मी शि-या, त्याच्या आईबद्दल निर्मम होत गेले होते. माझ्यातली ऋजुता मीच संपवली होती. त्याचं प्रेम मी व्यावहारिक पातळीवर नेलं होतं. त्याच्या आईला मी बघायले गेले नाही आणि त्यालाही भेटायला गेले नव्हते. त्याच्या दुःखात मी सहभागी व्हायला हवं होतं पण अहंकारापायी आलेल्या निर्ममतेनं मी गेले नव्हते."
ती म्हणाली, "काय बोलू मी तुला ! ज्या माऊलीनं तुला मुलगी मानून तुला अपार प्रेम दिलं तिच्या अंत्यदर्शनासाठी तू गेली नाहीस ? तू गेली असतीस तर तिच्या प्रेतावर पडून तू कदाचित ढसढसा रडली असतीस. ''आई' अशी एक हाक तिला मारली असतीस तर तिची मुलगी म्हणून जगल्याचं सार्थक झालं असतं ना ? तू त्यालाही भेटली असतीस तर कदाचित तो आई गेल्याच्या दुःखाने तुला बिलगून ढसढसा रडला असता. तूसुद्धा त्याला बिलगूनच रडली असतीस. एकमेकांचं दुःख वाटून घेतलं असतंस. तसं झालं असतं तर तुमच्यातला दुरावा तुमच्या अश्रूंबरोबर वाहून गेला नसता का ?"
"माझ्या मनातल्या घमेंडीपायी माझी मती भ्रष्ट झाली होती. माझी, ऋजुता, संवेदनशीलता मी हरवून बसले होते गं !" असं म्हणून मी पुन्हा रडायला लागले.
मला समजावत अपर्णा म्हणाली, "खूप रडून घे. तुझ्या पश्चात्तापाच्या भावनेला आता मनात कोंडून ठेवू नकोस. तुझे हे अश्रूच तुझं मन नितळ करायला उपयोगी येतील."
थोड्या वेळाने मी शांत झाले. दोन घोट पाणी पिऊन म्हणाले, "अपर्णा, अजून एका प्रसंगात मी त्याच्या व त्याच्या बायकोच्या मनाला खूप घायाळ केलं होतं. त्यावेळी माझ्या ते लक्षातही आलं नव्हतं. नंतर माझ्या लक्षात आलं पण विशेष महत्व द्यावं असं काही मला वाटलं नव्हतं. पण माझ्या मनात पश्चात्तापाची भावना उमटल्यावर मी त्यांच्यावर केलेला आघात मला तीव्रतेनं जाणवायला लागला होता. मला खंत वाटली होती. त्या दिवशी त्या दोघांचं संवेदनशील मन किती घायाळ झालं असेल ते आज मला जाणवतंय ! मी बेपर्वाईने त्यांच्या भावनांशी, प्रेमाशी खेळले होते !"
तिने विचारलं, "काय झालं होतं असं ?"
मी म्हणाले, "ते दोघे शेवटचे आले होते तेव्हा त्यांच्या कपबशा उचलण्यासाठी व टी पाॅय साफ करण्यासाठी माझी मोलकरीण बाहेर आली होती. त्यावेळी तीन महिन्यांपूर्वी मी राखी बांधल्यावर शि-याने मला दिलेली साडी माझ्या मोलकरणीच्या अंगावर होती."
अपर्णा म्हणाली, "मानसी, काय बोलतेयंस तू हे ? खूप धक्कादायक आहे हे ! आपण राखीच्या निमित्ताने बहिणीला दिलेली साडी आपल्या बहिणीच्या मोलकरणीच्या अंगावर पाहून त्या दोघांचं मन किती विदीर्ण झालं असेल गं ! तुझ्यावर प्रेम करण्याची इतकी मोठी शिक्षा तू त्याला व त्याच्या बायकोला दिलीस होतीस ? तो घायाळ झाला असेल पण इतकी वर्षे तुझ्याशी नणंदेचं नातं जपल्याबद्दल त्याच्या बायकोला घोर पश्चात्ताप झाला असेल !"
मी म्हणाले, "अगं, कळत नकळत आदल्याच दिवशी त्या मोलकरणीचा वाढदिवस होता म्हणून कपाटात वरच असलेली ती साडी मी तिला देऊन बसले होते. दुस-या दिवशी मला दाखवायला तीच साडी नेसून ती आली होती. खूप बेपर्वा वागले होते मी ! त्या दोघांच्या भावनेशी मी निर्ममतेनं खेळले होते. माझ्या नशिबी आता फक्त पश्चात्ताप उरलाय !"
ती म्हणाली, "मला मान्य आहे की तुझ्या प्रतिष्ठेला शोभतील अशाच वेगवेगळ्या रेशमी साड्या नेसून तू दररोज वावरत असणार पण त्याने दिलेली साडी इतक्या कमी दर्जाची नक्कीच नसावी. तरी तू ती साडी तू मोलकरणीला द्यायला निवडलीस ? क्षणभरही तुझं मन थरथरलं नाही का गं !"
मी म्हणाले, "नाही गं, ते नकळत नाही घडलं पण मोलकरणीपुढे मोठेपणा दाखवायची माझी भावना असावी. असावी नाही तर मी तशाच भावनेत जगायला लागले होते."
अपर्णा म्हणाली, "ती कल्याणी बोलली तेच खरं ! माणूस पैसा आणि प्रतिष्ठेच्या आहारी गेला की तो आपल्या जिवाभाच्या माणसांना आधी दूर करतो. तुझीही तीच गत झाली होती. तुला पश्चात्ताप झाल्यावरही त्याला, त्याच्या बायकोला भेटावं, त्याची माफी मागावी असं नाही वाटत तुला ?"
मी म्हणाले, "त्याला भेटावं, त्याच्या गळ्यात पडून त्याची माफी मागावी असं सतत मनात यायचं गं, पण मला एकटीला त्यांच्या समोर जायची हिंमत नाही नव्हती माझ्यात ! सोबत चल असं माझ्या सुनेला बोलण्याचं धाडस मला होत नव्हतं. माझं वागणं, शि-याला तोडणं तिला अजिबात आवडलं नव्हतं. आता धैर्य एकवटून माझ्या सुनेला एक दिवस वेळ काढायला सांगते."
अपर्णाने विचारलं, "त्याचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे ? मला दे. मी फोन लावते त्याला. हवं तर मी येते तुझ्यासोबत पुण्याला. मलाही हेमंतकडे जायचं आहे. आपण उद्या त्याच्याकडे पुण्याला जाऊ."
मी तिला शि-याचा नंबर देऊन म्हणाले, "सहा वर्षांपूर्वीचा नंबर आहे. त्याने बदलला नसला तर बरं होईल."
अपर्णाने त्याला फोन लावला. फोनचा स्पीकर ऑन केला. ती म्हणाली, "शि-या बोलतोयंस ना रे तू ?"
तो म्हणाला, "हो, मला शि-या म्हणालात याचं आश्चर्य वाटतंय. ब-याच वर्षांनी ही हाक कानावर पडली. कोण बोलताय तुम्ही ?"
अपर्णा म्हणाली, "ओळख, मी कोण आहे ते !"
तो म्हणाला, "नाही गं, नाही ओळखता येणार मला ! हायस्कूलला होतो तेव्हा मला शि-या म्हणणा-या तीन चार जणी होत्या. नंतर मी पुण्याला आलो. मग मला शि-या म्हणून हाक मारणारं कुणीच राहिलं नाही. हो, फक्त एक होती, मला सतत प्रेमाने गोड आवाजात शि-या म्हणणारी ! तिच्या मंजूळ आवाजातली साद अजून घुमत राहाते माझ्या मनात पण आठ एक वर्षांपासून त्या सादेतला गोडवा हरवत गेला. सहा वर्षांपासून तर तीपण पूर्णपणे हरवलीय. तीच नाही तर सगळं काही भूतकाळात हरवलंय. तू कोण बोलतेयंस ते सांग ना !"
ती म्हणाली, "अरे, मी अपर्णा बोलतेय."
त्याने विचारलं, "अपर्णा म्हणजे हेमंतची बहीण ना ? हेमंत मला भेटत असतो अधूनमधून. इतक्या वर्षांनी आज माझी आठवण कशी झाली तुला ?"
ती म्हणाली, "अरे, सहजच. खरं तर मला मानसीची आठवण झाली आणि तिची आठवण झाल्यावर मला तुझी आठवण होणारच ना ? तिला, तुला भेटावं असं मला वाटलं. पण माझ्याकडे आहे तो तिचा नंबर लागत नाहीये. तू कसा आहेस ? ती कशी आहे रे !"
तो म्हणाला, "मी ठीक आहे. मी तिचा नंबर पाठवतो तुला. तिने नंबर बदलला असेल तर तो नवीन नंबर माझ्याकडे नाहीये."
ती म्हणाली, "ती कशी आहे हे नाही सांगितलंस तू !"
तो म्हणाला, "अगं, ती मजेतच असणार ! पैशाने मिळणा-या सुखात ती लोळत असणार ! खरं सांगू, हल्ली आम्ही एकमेकांच्या संपर्कात नाही आहोत. आपापल्या विश्वात रमलोय आम्ही ! नात्यागोत्याबाहेरचं कुणी आता माझ्या विश्वात नाहीये. तिच्याही विश्वात कुणी नसेल. अगं, आपण वयाचा असा टप्पा गाठलाय, तिथे फक्त आपली मुलं मुली, सुना जावई, नातवंडं इतक्यापुरतंच आपलं विश्व तयार होणार."
तिने विचारलं, "शि-या, इतका उदासीपणानं, टाकून दिल्यासारखं बोलतोयंस, तू बरा आहेस ना ? अरे, ती तुझी लाडकी बहीण आहे ना !"
तो म्हणाला, "हो गं, पण खूप मोठा काळ उलटून गेलाय. हल्ली सख्ख्या नात्यातही फारसं सख्ख्य पाहायला मिळत नाही. ती तर माझी मानलेली बहीण होती. ना रक्ताच्या नात्याची ना गोतावळ्यातली ! पंचेचाळीस वर्षांचा काळ उलटून गेलाय. गेल्या सहा वर्षात तर माझ्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झालीय."
ती म्हणाली, "उद्या सकाळी मी हेमंतकडे येणार आहे. मी संध्याकाळी येते तुला भेटायला. मग बोलू आपण !"
तो म्हणाला, "अगं, पण आता मी पुण्याला नाहीये. आम्ही तुळजापूरला आलोय. आताच देवीचं दर्शन झालंय. जेवण करून सोलापूरला जायला निघणार आहे. मग परवा तिथून निघून संध्याकाळपर्यंत पुण्याला मी जाईल. तू परवा संध्याकाळी ये माझ्याकडे हेमंतला घेऊन !"
ती म्हणाली, "काय विलक्षण योगायोग आहे बघ. मला मानसीची आठवण झाली तशी तुझीही आठवण आली. तुला आणि तिलाही भेटावं असं मला वाटलं तर तू माझ्यापासून फक्त चाळीस किलोमीटर दूर आहेस आणि तू सोलापूरला म्हणजे माझ्याकडेच यायला निघाला आहेस. तू लगेच तिथून निघालास तर तासाभरात माझ्या घरी पोहोचशील. तिथून सरळ माझ्या घरी ये. मी तुला माझा पत्ता आणि लोकेशनचा स्क्रीन शाॅर्ट पाठवते आणि तुझी वाट बघते."
तो म्हणाला, "खरोखर हा विलक्षण योगायोग आहे. मी दोन तासांत तुझ्या घरी पोहोचतो. चल, बाय."
फोन ठेवून अपर्णा म्हणाली, "आज तुझं नशीब जोरावर आहे. तू काही कामासाठी इथे येतेस काय, योगायोगाने मी तुला भेटते काय, गप्पाच्या ओघात तुझं पश्चात्तापदग्ध मन मोकळं करतेस काय आणि शि-याला भेटण्याचा योग येतो काय ! खरोखर आजचा दिवस तुला खूप शुभ आहे."
मी म्हणाले, "तू शि-याचा विषय काढलास म्हणून हे घडून येतंय. पण हे सगळं योगायोगाने घडून आलं. त्याला भेटावंसं मला वाटतं पण माझ्या वागण्यामुळे त्या दोघांच्या काळजावर जे घाव पडले आहेत, तो ते विसरलेला नसणार. घाव कदाचित भरले असतीलही पण त्या घावाचे व्रण तरी तसेच त्याच्या आठवणीत असतील ना ! ते दोघं माझ्याशी कसे वागतील याची मला भीती वाटायला लागलीय. ते माझ्याशी निर्ममतेनं कोरडेपणाने वागले तर माझं काळीज फाटून जाईल गं !"
अपर्णा म्हणाली, "आता मनात विकल्प आणू नकोस. तो आला की त्याची, त्याच्या बायकोची माफी मागून मन साफ करून घे. कधी त्याच्या बायकोच्या पायाशी वाकली नाहीस ना, मग आज तिच्या पायावर डोकं टेकून तिचीही माफी माग. तो तुझ्यावर खूप आंतरीक प्रेम करत होता ना, मग त्याचं प्रेम अजून जीवंत असणार ! तू त्याच्या गळ्यात पडून रडलीस तर तो नक्कीच तुला माफ करेल. त्याने तुला माफ केलं तर त्याची बायकोही तुला माफ करेल."
मी विचारलं, "पण आमच्यातलं हृदयांतर मिटेल ना गं ? का आमच्यात आलेला परकेपणा तसाच राहील ?"
ती म्हणाली, "तुमच्या दोन हृदयात पडलेलं अंतर नक्कीच मिटेल. तू शंका कुशंकेत अडकू नकोस."
मी म्हणाले, "तो यायला अजून दीड दोन तास तरी आहे. आपण एक झोप काढू या. तुला सवय असेल ना, दुपारी झोपण्याची ?"
ती म्हणाली, "हो, चल झोपू या."
अपर्णा लगेच झोपली पण शि-या आज आपल्याला भेटणार आहे या विचारानं माझं मन इतकं पुलकित झालं होतं की मला झोप लागली नाही. मन त्याच्या आठवणीत रमलं होतं. मी कशी वागले होते हे मीच माझ्या मनावेगळं करत होते. मनात शिल्लक होती ती फक्त त्याला भेटण्याची तीव्र ओढ !
एक तासाने मी त्याची आतुरतेने वाट पाहू लागले. दोन वेळा गेस्ट रुममधून बाहेरच्या गेटपर्यंत जाऊन त्याची वाट पाहत उभी राहिले.
माझी उत्कट प्रतीक्षा शिगेला पोहोचत होती. मन प्रसन्न होतं म्हणून मनात विचाराची घालमेल नव्हती. मनात फक्त शि-याला भेटण्याची ओढ होती. मला एक कार येताना दिसली तशी मी आत गेले.
दरवाज्यावरची बेल वाजली तशी जागी होत अपर्णा म्हणाली, "मी बघते. दहा एक मिनिटे तू इथेच थांब. त्यांना आधी बसू दे मग ये तू सावकाश बाहेर."
शि-या व त्याची बायको आले होते. अपर्णाने त्यांना पाणी दिलं आणि त्यांच्याशी बोलायला लागली.
पाच मिनिटांनंतर मी गेस्टरुमबाहेर पडले आणि हाॅलजवळ पॅसेजमध्ये उभी राहून अनिमिष नजरेने शि-याकडे पाहत होते. माझे डोळे अश्रूंनी दाटले होते.
थोड्या वेळाने त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. मी तिथे असेन हे त्याला अनपेक्षित होतं. तो माझ्याकडे आश्चर्याने पाहत उभा राहिला. त्याच्या बायकोचं माझ्याकडे लक्ष गेल्यावर तीसुद्धा उठून उभी राहिली.
माझ्या भावना अनावर झाल्या आणि मी धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि रडायला लागले. रडत रडतच त्याला म्हणाले, "शि-या, माफ कर तुझ्या लाडक्या बहिणीला !"
त्यानेही मला मिठीत घेतलं. आमची ऊर भेट होती ती ! तिथेच आमच्या हृदयातलं अंतर मिटलं होतं ! आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत कालातीत समाधानाची अनुभूती निरलस मनाने अनुभवत होतो !
ब-याच वेळाने आम्ही एकमेकांच्या मिठीतून दूर झालो. मी तशीच त्याच्या बायकोच्या पायाशी वाकले. तिच्या पायावर डोकं टेकून म्हणाले, "माफ कर तुझ्या जीवाभावाच्या नणंदेला !"
तिने मला वर उचलून मिठीत घेतलं आणि म्हणाली, "वेड्या आहात तुम्ही वन्सं ! तुमची जागा माझ्या पायाशी नाही तर माझ्या हृदयात आहे."
सहा वर्षे आमच्या बहीण भाऊ नात्यातल्या प्रेमाचे झाड पूर्णपणे वठलं होतं. आता त्या झाडाला पालवी फुटली होती. त्या पालवीनं ते वठलेलं प्रेमाचं झाड पूर्णपणे बहरून आलं होतं !!
© रमेश नागपुरे,
मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१
मोबाईल # 90822 57262
What'sApp 98690 75238
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा