शनिवार, २३ मे, २०२६

2843. आई, मला माफ कर !

     मागच्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाची तेहेतीस वर्षे नोकरी करून मी सेवानिवृत्त झाले. काल सकाळी पोटच्या मुलाचे, सुनेचे व एका नातवाचे सगळे पाश तोडून मी एकटी घराबाहेर पडले. आई मुलगा या नात्याचं बंधन तोडून मला माझं स्वतःचं आयुष्य स्वतःसाठी जगण्यासाठी. आज माझीच कथा मी सांगणार आहे. सरळ आयुष्याची ... दोन चार वळणं असणारी ... काही सुखद तर काही धक्कादायक ... शेवटचं वळण तर इतकं क्लेशकारी, यातनामय, धक्कादायक होतं  की त्यावेळी मी माझं मानसिक संतुलन हरवून बसले होते. त्या वळणानंतरही माझ्या आयुष्यात दोन वळणं आली. त्यातलं दुसरं म्हणजे मी एकटीने घराबाहेर पाऊल टाकण्याचं. माझी कथा सांगायला कुठून सुरुवात करायची हा प्रश्न आहे. बालपणापासून करू का ? छे .. नाही ! बालपण जसं सगळ्यांचं जातं, तसंच माझं पण गेलं. वेगळेपण असं त्यात काही नव्हतं. मी बी.ए. ची शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली तिथून माझ्या आयुष्याची खरी सुरुवात झाली. तिथूनच माझी कथा सांगणं उचित ठरेल !
       पण आधी कुटुंबाबद्दल सांगायला हवे. माझ्या घरात आई वडील, एक मोठा भाऊ, दोन मोठ्या बहिणी. भावाचं लग्न झालं, वहिनी घरात आली. नंतर मोठ्या बहिणीचं कृष्णाताईचं लग्न झालं. ती गावातच सासरी निघून गेली. नंतर दुस-या बहिणीचं कावेरीचं लग्न झालं. कुणालाही हेवा, मोह वाटावा असा नवरा तिला मिळाला. दिसायला सुंदर, रुबाबदार ! मुंबईला शासकीय नोकरीत अधिकारी. चार खोल्यांचं घर. दाराशी एक दोनचाकी व एक चारचाकी गाडी.
कृष्णाताईला तिचा खूप हेवा, मत्सर वाटायचा. इतका की तिच्या वागण्या-बोलण्यातून सहज उघड होत राहावा. हेवा, मत्सराबरोबर ती कावेरीचा खूप राग व द्वेष करायची.
माझी आई कधी कधी म्हणायची, "जळतुकडी आहे ती ! लहान बहिणीचं इतकं चांगलं झालं यात समाधान मानायचं सोडून तिच्यावर मत्सराने, द्वेषाने जळून हिला काय मिळणार आहे ?"
आमच्या आई वडिलांच्या नात्याचा सगळा गोतावळा आमच्याच गावी किंवा आसपासच्या पंचक्रोशीतच होता.
माझं काॅलेजचं पहिलं वर्ष संपत असताना माझ्या बहिणीचं, कावेरीचं लग्न झालं, ती मुंबईला नव-याकडे गेली. मी शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली तेव्हा ती गरोदर होती, तिचा नववा महिना संपत आला होता. तिचं गरोदरपण खूपच त्रासदायक ठरलं होतं. सतत अंथरुणावर असायची. ती सुखरुप बाळंत होईल की नाही याबद्दल डाॅक्टरांच्या आणि आमच्या सगळ्यांच्याही मनात शंका होती. 
मी आणि आई तिच्या डिलीव्हरीच्या दहा दिवस आधी मुंबईला गेलो. नंतर तिची सासूसुद्धा तिथे आली होती. तिची सासू खरं तर भावोजींची सावत्र आई आहे. लोकलाजेखातर ती सुनेची काळजी घ्यायला आली होती. घरात तिचं अस्तित्व होतं इतकंच पण पुढाकार घेऊन कुठल्याही कामाला ती हातभार लावत नसे.
कावेरीच्या डिलीव्हरीच्या वेळी बरीच काँप्लिकेशन झाल्यामुळे आणि अति रक्तस्राव झाल्यामुळे बाळाला जन्म देताच तिचा मृत्यू  झाला. आम्हाला खूप दुःख झालं. भावोजी तर कोलमडून पडले होते, हताश झाले होते पण त्यांनी दोन तीन दिवसांत स्वतःला सावरलं. कावेरीच्या गरोदरपणातच तिची डिलीव्हरी सुखरुप होईल की नाही याबद्दल त्यांनाही शंका होती. डाॅक्टर मॅडमने असं होऊ शकतं अशी त्यांना आधीच कल्पना दिली होती.
कावेरीच्या अस्थि विसर्जनाला माझे आई वडील, दादा वहिनी, कृष्णाताई, तिचा नवरा आले होते. दुस-या दिवशी ते सगळे परत गेले.
कावेरीचं बाळ तीन पौंडापेक्षा कमी वजनाचं होतं त्यामुळे ते खूप अशक्त होतं. त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. अकराव्या दिवशी बाळाला घरी आणलं. आम्ही तिघी बाळाला सांभाळत होतो पण चार दिवसांनंतर बाळाची प्रकृती बिघडली. त्याला पुन्हा हाॅस्पिटलला इन्क्युबेटरमध्ये ठेवलं. चार दिवसांनंतर बाळाला पुन्हा घरी आणलं.
नंतर चार दिवसांनंतर सकाळी आम्ही सगळे नाष्टा करत होतो तेव्हा आई मला म्हणाली, "शरयू, तू इथेच थांब. तुम्ही दोघी आहात इथे बाळाची काळजी घ्यायला. मी आठ दहा दिवस घरी जाऊन परत येते."
मी म्हणाले, "ठीक आहे आई. आम्ही दोघी घेऊ बाळाची काळजी. तू ये परत दहा दहा दिवसांनी."
त्यांची आई व मी घरात आहे म्हणून भावोजींनी माझ्या आईच्या जाण्याला सहज संमती दिली.
दुस-या दिवशी सकाळी आई निघाली तेव्हा ध्यानी मनी नसताना अचानक भावोजीची आईसुद्धा आईबरोबर निघाली.
ती म्हणाली, "मीसुद्धा आठ दहा दिवस घरी जाऊन येते. अनायासे मला यांची सोबत पण आहे."
त्यावेळी आईने थोडा विचार करायला हवा होता. मी आणि भावोजी दोघेच दिवस रात्र घरात असणार होतो पण आईच्या मनात तो विचारही आला नाही. ती निघून गेली.
खरं तर माझ्याही मनात तसा विचार त्यावेळी आला नव्हता.
भविष्यातल्या काही संकेताची ती चाहूल होती.
दुस-या दिवशी बाळाची तब्येत पुन्हा बिघडली. त्याला पुन्हा हाॅस्पिटलला हलवलं पण काही उपयोग झाला नाही. दोन तासात बाळाने प्राण सोडला.
भावोजींनी निर्विकार मनाने बाळाच्या पार्थिवाला मूठमाती दिली.
घरी आलो तेव्हा ते म्हणाले, "तुझ्या बहिणीबरोबर तिचं बाळही गेलं. ते जगेल याबद्दल डाॅक्टरांना खात्री नन्हती तशी मलाही नव्हती.
दोन आघातातून त्यांनी स्वतःला लवकर सावरलं हे पाहून मला बरं वाटलं. मी आईची वाट पाहू लागले. मला घरी जायचं होतं. बी.ए. च्या निकालाची तारीख जवळ येत होती. मला एम.ए. अॅडमिशन घ्यायची होती.
चार दिवसांनी सकाळी मी डोक्यावरून आंघोळ केली, माझे लांबसडक केस शांपूने धुतले आणि ब्लाऊज, परकर नेसून व साडी हातात घेऊन बाथरुममधून बाहेर पडले. अचानक भावोजी समोर आले. मला पाहून ते थबकले. भावजींना अचानक समोर पाहून मी भांबावले. माझ्या कमरेच्या खालपर्यंत असलेल्या ओल्या केसातून पाणी निथळत होतं. ब्लाऊज आणि परकरही बराच ओला झाला होता. मला त्या अर्धवट ओलेत्या अवस्थेत पाहून भाऊजी मोहाधिन झाले. नकळत पुढे सरकून त्यांनी मला मिठीत घेतले. मीसुद्धा नकळत त्यांच्या मिठीत सुखावले. एका पुरुषाने मला मिठीत घेण्याचा माझ्या आयुष्यातला रोमांचित करणारा तो पहिलाच प्रसंग होता. मी एक वेगळीच अनुभूती अनुभवत होते.
त्यांनी मला उचलून त्यांच्या खोलीत नेलं. माझा परकर काढून टाकला. पण माझ्या ब्लाऊजच्या बटनाला हात लावताच ते भानावर आले. ताडकन माझ्यापासून दूर होत त्यांनी माझा परकर उचलून माझ्या कमरेपर्यंत पायावर टाकला आणि ते तीव्र स्वरात म्हणाले, "नाही, नाही ! हे पाप आहे, अनैतिक आहे. तू कपडे घाल आणि तुझ्या खोलीत जा."
ते मला पाठमोरे झाले. मी अचंबित होऊन परकर घातला, साडी नेसली आणि दुस-या रुममध्ये गेले.
घडलेला प्रसंग अचानक घडला होता. त्यांनी स्वतःला सावरल्याबद्दल त्यांच्याबद्दलच्या माझ्या आदरात भर पडली होती पण त्या प्रसंगाने ते विचाराभिमुख झाले होते. चार दिवस आम्ही एकमेकांशी एक शब्दही बोललो नव्हतो याला मी कंटाळले होते. मी आईची वाट पाहत होते. शेवटी मी लज्जा, संकोच बाजूला ठेवून भावोजींबरोबर बोलून मन मोकळं करायचं ठरवलं. घडलेल्या प्रसंगानंतर मुक्यासारखं जगण्यानं माझी घुसमट होत होती.
दुस-या दिवशी सकाळी चहा घेताना मी बोलण्याआधीच ते म्हणाले, "शरयू, त्या दिवशी मला भान राहिलं नव्हतं म्हणून मी थोडासा वाहावत गेलो. मला माफ कर."
माझी त्यावेळची अवस्था माझ्या डोळ्यांसमोर आली. माझ्या अंगावर त्यावेळी फक्त ब्लाऊज व पँटी होती. मला त्यांच्याबरोबर बोलायचं होतंच. मी धीर करून पटकन म्हणाले, "भावोजी, तुम्ही माझी माफी मागू नका. मीसुद्धा तेवढीच जबाबदार आहे. मीसुद्धा तुमच्याबरोबर वाहवत गेले होते. तुम्हाला विरोध केला नाही ही माझी मूक संमतीच होती ना ?"
ते म्हणाले, "हो, पण विपरीत काही घडलं नाही याचं मला समाधान वाटतं. त्या प्रसंगानंतर चार दिवस आपण एका शब्दानेही बोललो नाही. अपराधीपणाची भावना माझ्या मनात होती. त्यावेळी मी भानावर आल्यावर माझ्या कृत्याची मलाच शरम वाटली होती. त्यावर मी खूप विचार केला. त्यावेळचं तुझं ते रुप मला विसरता येणार नाही हे मी कबूल करतो. मला वाटतं, तो क्षण तूसुद्धा विसरू शकणार नाहीस. काही काळानंतर तुझं लग्न होईल. लग्नानंतरही तो क्षण तू कदाचित विसरू शकली नाहीस तर तुला दुभंगलेल्या मनानं जगावं लागेल."
मी धीर एकवटून म्हणाले, "हो भावोजी, तो क्षण मला कधी विसरता येईल असं मला वाटत नाही. एका पुरुषाने मला मिठीत घेण्याचा तो माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव होता. मी तारुण्यसुलभ भावनेच्या आधिन झाले होते. तुमची मिठी, तुमचा स्पर्श अनोखा आणि भान विसरायला लावणारा होता."
ते म्हणाले, "त्या दोन्ही क्षणांना आपण मूर्त रूप देऊ शकतो. तुझ्या मनाची तयारी असेल तर आपण लग्न करू. मी तुला सुखात ठेवेन."
त्यांचा प्रस्ताव ऐकून मी चकित झाले. मी थोडा वेळ विचार केला. त्यांच्या विचारात मला काही वावगं वाटलं नाही. ते सभ्यपणानं मला लग्नाचा प्रस्ताव देत होते. मी केव्हा तरी, कुणाबरोबर तरी लग्न करणारच होते मग दुस-या कुणा अनोळखी माणसाबरोबर लग्न करून भावोजींबरोबरचे ते दोन क्षण मनात जपत राहाण्यापेक्षा भाऊजीबरोबर लग्न करण्यात वावगं काय आहे असा प्रश्न मीच स्वतःला केला. आमच्या वयात आठ वर्षांचं अंतर होतं पण लग्नाला नकार द्यायला वयातला फरक हे कारण तकलादू होतं. भावोजींबरोबर लग्न करून मला सर्व प्रकारचे स्थैर्य लाभणार होतं. त्यांनी माझ्या बहिणीला जसं सुखात ठेवलं होतं तसं मलाही ते सुखातच ठेवतील असं मला वाटलं. कृष्णाताई कावेरीवर खूप जळत होती. आता ती माझ्यावर जळत राहील.
मी बोलत नाही असं पाहून ते म्हणाले, "तुझी मनापासून इच्छा असेल तरच होकार दे. अगतिक होऊन होकार देऊ नकोस. तुला पुढे शिकायची इच्छा असेल तर लग्नानंतरही मी तुला शिकवेन. तुला नोकरी करावी असं वाटत असेल तर मी तुझ्या इच्छेआड येणार नाही."
अजून थोडा वेळ गप्प राहून मी लग्नाला रुकार दिला.
माझे हात हातात घेऊन ते म्हणाले, "आपण लग्न करून त्या क्षणांना मूर्त रुप देतोय याचा मला खूप आनंद झाला."
मी म्हणाले, "भावोजी, मलाही खूप आनंद झाला. खरं तर मला तुम्ही खूप आवडायचे. माझ्या मनात तुमची सुप्त ओढ होती. दुसरं असं की माझं दुस-या कुणाबरोबर लग्न झाल्यावर तो प्रसंग आठवून मला खंत वाटत राहिली असती कारण माझ्या आयुष्यातली एका पुरुषाच्या स्पर्शाची ती पहिलीच अनुभूति होती. तो प्रसंग डोळ्यांसमोर आल्यावर मला तुमची आठवण येत राहिली असती मग कदाचित मी माझ्या नव-याबरोबर जगताना दुभंगलेल्या मनाने जगत राहिले असते."
दुस-या दिवशी त्यांनी माझ्या आई वडिलांना बोलावून घेतलं आणि त्यांच्यासमोर आमच्या लग्नाचा विचार मांडला. ते म्हणाले, "शरयूने मला होकार दिला आहे तरी तुम्ही शरयूबरोबर काय चर्चा करायची ती करून निर्णय घ्या. मी जातो माझ्या खोलीत."
मी आधीच होकार दिलाय याचा विचार करून माझ्या आईवडिलांनी माझ्याबरोबर चर्चा केली व आमच्या लग्नाला सहमती दिली. "जावयांनी अचानक तुझ्याबरोबर लग्न करायचा निर्णय कसा घेतला" या आईच्या शंकेला माझ्याकडे उत्तर होतं पण मी ते सांगू शकत नव्हते.
तीन आठवड्यांनी नोंदणी पद्धतीने आमचं लग्न झालं. लग्नाला फक्त माझे आईवडील हजर होते. माझ्या वडिलांनी माझ्या भावाला आणि मोठी बहिण कृष्णाला फोनवर आमचं लग्न नोंदणी पद्धतीने करायचं असं सांगितलं होतं.
लग्नानंतर आमची दीड वर्षे खूप सुखात गेली. माझे भावोजी माझ्यावर खूप प्रेम करायचे. मला आई होण्याची चाहूल लागली. मी गरोदर असल्याचं त्यांना सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला पण लगेच ते धास्तावले आणि म्हणाले, "शरयु, मला भीती वाटते."
मी म्हणाले, "भावोजी, मनात अजिबात भीती बाळगू नका. ताईच्या बाबतीत जे घडलं ते माझ्या बाबतीत घडणार नाही. ताई व तिचा मुलगा तुमच्या आयुष्यातून जाणं हा नियतीचा खेळ होता. त्यात आयुष्यभरासाठी आपल्या सहजीवनाचे संकेत दडले होते. ताई तुमच्या आयुष्यात अपघाताने आली होती. तुमचा आणि तिचा सहवास तेवढ्यापुरताच मर्यादित होता असं समजायला हवं. आता आपलं बाळ व्यवस्थित जन्माला येईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही बिनघोर राहा."
मी त्यांना दिलेल्या दिलाशाने त्यांचं मन स्थिर झालं होतं. त्यांनी आपल्या मनातल्या शंका कुशंका बाजूला सारल्या होत्या.
लग्नानंतरही मी त्यांना 'भावोजी' असंच म्हणायचे. का कोण जाणे पण मला 'भावोजी' म्हणायला खूप आवडायचं. माझे मेव्हणे म्हणून मी त्यांची थट्टा मस्करी करते असं मला वाटायचं. मी खूप सुखावायचे. एकदा आमचं त्याबद्दल बोलणं झालं. माझी मनातली भावना त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, "तू माझी मेव्हणी म्हणूनच जगतेयंस हे ऐकून मला बरं वाटलं. तू मला भावोजी म्हणतेस तेव्हा तू माझी लाडकी मेव्हणी आहेस ही भावना मलाही खूप सुखावते."
माझं बाळंतपण अगदी सुखरुप झालं. साडेसात पौंडाच्या गुटगुटीत बाळाला मी जन्म दिला. आम्ही दोघे खूप आनंदात होतो. आमच्या आयुष्यात आनंदाचा परिमळ दरवळला म्हणून आमच्या मुलाचे नाव आम्ही "आमोद" असं ठेवलं. 
आमोदच्या जन्मानंतर आपलं आयुष्य परिपूर्ण झालं हे समाधान आम्ही दोघेही अनुभवत होतो. त्या परिपूर्णतेच्या समाधानात आम्ही दोघांनी पुन्हा मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आणि डाॅक्टरकडून माझं ऑपरेशन करून घेतलं.
मधल्या काळात मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून माझं एम.ए. पूर्ण केलं होतं.
आमोदच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या आयुष्यात अजून एक वळण आलं. मला शासकीय नोकरीचे अपाॅईंटमेंट लेटर आलं. त्यात दहा दिवसांनी मेडिकल झाल्यावर सात दिवसांत ऑफिसला हजर व्हायचं असं लिहिलं होतं. त्यावर आम्ही दोघांनी साधकबाधक बरीच चर्चा केली.
मला नोकरी करण्याची इच्छा होतीच पण मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावं असं भावोजींनाही वाटत होतं. त्यांना तसं का वाटत होतं याबद्दल मी एकदा त्यांना खोदून खोदून विचारलं पण ते एवढंच म्हणाले की "काही काळ जाऊ दे, मग आपण यावर बोलू."
मी नोकरी करावी यावर आमच्या दोघांचं एकमत झालं पण आमोदची काळजी घेणं, त्याला मोठं करणं ही जबाबदारी महत्वाची होती. ती मला टाळता येणार नव्हती. माझी प्राथमिकता माझा आमोद होता. त्याच्या विचारापुढे नोकरी करण्याची माझी इच्छा गौण ठरली होती.
माझ्या विचारावर व निश्चयावर मी ठाम असल्याचे पाहून भावोजी म्हणाले, "तुझ्या अपाॅईंटमेंटला पंधरा दिवस अवकाश आहे तोपर्यंत आपण काही मार्ग शोधू शकतो का ते बघू. काहीच मार्ग दिसत नाही हे निश्चित झाल्यावर तू नोकरीला नकार दे."
मला त्यांचा विचार पटला. नाही तरी आमोदच्या विचारामुळे नोकरी करण्याची माझी इच्छा डळमळीत झाली होती.
थोडं थांबून भावोजी म्हणाले, "माझ्या ऑफिसमध्ये श्रीकांत पवार म्हणून माझा एक सहकारी आहे. तो आपल्या अडचणींवर मार्ग काढू शकेल असं मला वाटतं. त्याच्यापुढे असलेल्या अडचणीवर आपण मार्ग काढू. त्याच्या घरी त्याची बासष्ट त्रेसष्ट वर्षांची विधवा आईसुद्धा राहते. अकरावीनंतर तिने डी.एड. केलं होतं. ती शिक्षिका म्हणून नोकरी करायची. तिला श्रीकांत झाल्यावर तिने त्याचा सांभाळ करता यावा म्हणून आपली नोकरी सोडली होती. तीन वर्षांपूर्वी श्रीकांतचं लग्न झाल्यावर महिन्याभरातच त्याचे वडील वारले. त्याची बायको कजाग व भांडकुदळ आहे. तिचं म्हणणं एकच आहे, घरात सासू नको. त्यापायी घरात दररोज होणा-या बायकोच्या कटकटीमुळे श्रीकांत पूर्ण वैतागलाय. त्याची आईसुद्धा सुनेचं बोलणं ऐकून ताणतणावाखाली जगत आहे. आईला घराबाहेर काढायची त्याची इच्छा नाही. त्याला कुणी बहीण भाऊ नसल्यामुळे आई कुठे जाणार या विचाराने तो सतत ताण तणावाखाली असतो. श्रीकांतने त्याची व्यथा, घरातल्या कटकटी, स्वतःचा ताणतणाव दीड महिन्यांपूर्वीच मला मोकळेपणाने सांगून आपलं मन हलकं केलं होतं."
ते पुढे म्हणाले, "जर आपण त्याच्या आईला इथे आणलं तर ती आमोदचा सांभाळ खूप मायेनं करेल आणि तीसुद्धा इथे सुखाने राहील. तुझा काय विचार आहे ?"
मी म्हणाले, "भावोजी, तिची व आपलीही सोय होईल हे तुमचं म्हणणं मला पटतं पण आपला आमोद मोठा झाल्यावर 'तू आता जा, तुझी गरज संपली' असं आपण तिला म्हणू शकणार नाही यासाठी तुमची तयारी आहे का ? तिचं दुखणं खुपणं आपल्यालाच बघावं लागेल हे स्वीकारण्याची पण तुमची तयारी आहे का ? तुम्हाला या बाबींचा निर्णय आजच ठामपणाने घ्यायला हवा."
ते म्हणाले, "तुझी संमती असेल आणि तूसुद्धा तिची जबाबदारी स्वीकारायला तयार असशील तर मी होकारच देईन."
मी म्हणाले, "भावोजी, तुम्ही तुमच्या मित्राबरोबर बोला. इथे त्याच्या आईला घरच्यासारखं राहावं लागेल असं सांगा. ती तयार झाली तर तिची जबाबदारी आपण स्वीकारू."
भावोजी म्हणाले, "ठीक आहे. मी उद्या बोलतो त्याच्याशी."
चार दिवसांनी श्रीकांतची आई आपले कपडे घेऊन त्याच्याबरोबर आमच्याकडे आली तेव्हा मी म्हणाले, "मावशी, हे घर तुझं आहे असं समजून तू हक्काने इथे राहायचंस. तुझं खाणं पिणं, हवं नको ते तुझं तूच बघायचंस. मला विचारत बसायचं नाहीस. आमोदला तुझा नातू समजून त्याला सांभाळायचंस. आपलं घर समजून तुला जमेल तितकं काम करायचंस. तुझं दुखणं खुपणं सगळं आम्हाला सांगत जायचंस. समजलं ?"
ती म्हणाली, "हो, आपलं घर समजून मी हक्काने इथं राहीन. तुला तक्रारीला वाव देणार नाही."
नंतर मावशी आमच्या घरात रुळली. आपलंच घर समजून हक्काने वावरायला लागली. ती सुनेच्या ताणतणावातून पूर्ण मुक्त झाली होती. घरातल्या जवळजवळ सगळ्याच कामाची जबाबदारी उचलली होती. ती आमोदची खूप काळजी घ्यायची. तो थोडा मोठा झाल्यावर तिला आजी म्हणायचा. ती त्याला श्लोक, कविता शिकवायची. प्रेरणा देणा-या गोष्टी त्याला सांगायची. खेळही शिकवायची. कोडी सोडवायला द्यायची. कोडी कशी सोडवायची हे त्याला शिकवायची. तो शाळेत जायला लागल्यावर ती त्याला शाळेत सोडायला आणायला जायची. घरी त्याचा अभ्यास घ्यायची. तिने त्याला अभ्यासाची गोडी लावली. तो अभ्यासात खूप हुशार होता. वयाच्या मानाने त्याची आकलन शक्ती प्रचंड होती.
एक आदर्श शिक्षिका आमच्या आमोदला एक माणूस म्हणून घडवत होती. त्याला सुशिक्षित, सुसंस्कृत करत होती. सकाळी उठल्यावर आधी श्रद्धेने आई वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा ही भावना तिने त्याच्या मनात खोलवर रुजवली होती. तो तेवढ्याच श्रद्धेने मावशीच्याही पाया पडायचा.
आमोद दुसरी पास झाला तेव्हा त्याची हुषारी, अभ्यासातली रुची व आवड, आकलन शक्ती पाहून शाळेच्या प्रिन्सिपालने आम्हाला भेटायला बोलावलं. आम्ही दोघे मावशीला घेऊन त्याच्या प्रिन्सिपालला भेटलो. त्यांनी व त्याच्या वर्ग शिक्षिकेने आमच्यासमोर एक विचार ठेवला.
पुढच्या वर्षी पहिल्या सहामाहीत आमोदचा तिसरीचा अभ्यास पूर्ण करायचा. दुस-या सहामाहीत तो चौथीचा अभ्यास पूर्ण करेल व वार्षिक परीक्षा देऊन सरळ पाचवीत जाईल. असाच प्रयोग आपण त्या पुढच्या वर्षी करू. असं केलं तर तो दोन वर्षे आधी दहावी होईल. आमोदबरोबरच आम्ही अजून दोन मुलांची निवड केलीय. 
मावशी प्रिन्सिपालला म्हणाल्या, "मी शिक्षिका होते. मीपण अनुभव घेत आलेय की आमचा आमोद त्याच्या वयापेक्षा खूप जास्त हुशार आहे, त्याची आकलन शक्तीसुद्धा त्याच्या वयाच्या मानाने खूप जास्त आहे. तुम्ही खूपच योग्य विचार केलात. त्याला एक चांगली संधी देताहात. मी तुमच्या विचाराला पुरेपूर साथ देऊन घरी त्याचा एका एक वर्षात दोन दोन इयत्तेचा अभ्यास घेऊन त्याला तयार करेन."
आमोदच्या शाळेतल्या दोन शिक्षिकांनी आणि मावशीने विडा उचलून आमोदला शिकवायला सुरुवात केली आणि दोन वर्षांनी आमोद सरळ सहाव्या इयत्तेची परीक्षा देऊन सातवीत गेला. 
माझी नोकरी सुरळीत सुरु झाली. मी मावशीच्या अंगावर घराची जबाबदारी टाकून नोकरीला जात होते. आठ वर्षांनी मला प्रमोशनही मिळाले. माझ्यावर ऑफिसच्या जबाबदा-या वाढल्या होत्या.
अजून चार वर्षे अशीच सुखा-समाधानात गेली. मावशी आमच्या तिघांच्या आयुष्याचा एक अतुट हिस्सा बनली होती.
आमोद अकरावी सायन्सचा अभ्यास करत होता. मेडिकल शाखेत जाऊन पदव्युत्तर डाॅक्टर व्हायचं त्याचं ध्येय होतं.
मावशीचा मुलगा श्रीकांत महिन्यांतून दोनदा तरी आईला भेटायला यायचा. आम्ही पंधरा वीस मिनिटे गप्पा मारायचो. मग त्या दोघांना बोलता यावं म्हणून आमच्या खोलीत जायचो. त्याची आई आमच्याकडे आल्यापासून त्याची बायको खूप निवळली होती. त्याच्या घरातला ताणतणाव संपला होता. दोघे नवरा बायको आणि दोन मुले सुखाने जगत होते.
एक दिवस मावशीला हार्ट अॅटक आला. भावोजींनी ताबडतोब अॅम्ब्युलन्स बोलावून तिला एका सुसज्ज हाॅस्पिटलला नेलं. तिथे तिला आयसीयुमध्ये ठेवलं. श्रीकांतला फोन करून कळवल्यावर तो ताबडतोब हाॅस्पिटलला आला. 
तिला तपासून तिच्या काही टेस्ट व अँजिओग्राफी केल्यावर ताबडतोब बाय पास सर्जरी करावी लागेल असं डाॅक्टरांनी सांगितलं. आम्ही रुकार दिला. दुस-याच दिवशी तिचं ऑपरेशन कराययचं ठरलं पण चार तासांनी मावशीला दुसरा जोराचा अॅटॅक आला आणि तिने जीव सोडला.
तिचे सगळे विधी श्रीकांतने पार पाडले. आई गेल्याचं दुःख त्याला झालं होतंच पण आम्ही तिघेही दुःखात बुडालो होतो. चौदा पंधरा वर्षाच्या सहवासामुळे ती आमच्या जीवनाचा एक अभिन्न हिस्सा बनली होती.
आमचे सांत्वन करताना श्रीकांत म्हणाला, "माझी आई जाण्याने माझ्यापेक्षा तुमच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण होईल याची मला जाणीव आहे पण तुम्ही एक समाधान माना की तुम्ही तिला खूप सुखात ठेवलं होतं. ती तृप्त व समाधानी आयुष्य जगली आणि शांतपणाने ती गेली."
मी म्हणाले, "श्रीकांत, मावशी जाण्यानं खरोखर आमच्या आयुष्यात पोकळी निर्माण होईल. काळ उलटत जाईल तसं आमचं दुःख कमी होईल. आम्ही तिला विसरू शकणार नाही, ती कायम आमच्या आठवणीत राहील."
चार आठ दिवसांत आमच्या दुःखाची तीव्रता कमी होत गेली. आमोदची अकरावीची परीक्षा जवळ आली होती. तो अभ्यासात  गुंतून गेला होता.
आमोद अकरावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन आला. सगळे पेपर्स सोपे गेले म्हणून तो खुशीत होता.
रात्री जेवताना तो म्हणाला, "आई, पुढच्या वर्षी माझं बारावीचं वर्ष. सतत अभ्यासात गुंतून पडावं लागेल. मी दोन एक आठवडे गावी जाऊन राहू का ? तीन वर्षे होऊन झाली, मी गावी गेलो नाही."
मी म्हणाले, "ठीक आहे. दोन तीन आठवडे गावच्या वातावरणात राहिलास तर मनाने फ्रेश होशील. इथे आल्यावर उत्साहाने अभ्यासाला लागशील."
भावोजी म्हणाले, "परवा शनिवारी आपण निघू. रविवारी दुपारी आम्ही तिथून परत येऊ. तू थांब तिथे."
शनिवारी आम्ही त्याला कारने गावी सोडलं. रविवारी दुपारी तिथून निघताना मला कल्पनाही आली नव्हती की आमोद परत येईल तेव्हा एक मोठं विध्वंसक झंझावाती वादळ घेऊन येईल आणि माझ्या आयुष्यातलं ते अतिशय अवघड वळण ठरेल, ज्या वळणावर काही काळ तरी माझं आयुष्य अस्तव्यस्त होऊन जाईल.
एकच आठवड्यांने आमोद अचानक गावावरून परत आला तो अतिशय अस्वस्थ होऊनच ! खूप बेचैन होता तो ! स्वतःशीच धुमसत होता तरीही तो भावोजींच्या पाया पडला.
तो माझ्या पाया पडत नाही हे पाहून मी त्याला विचारले, "आठच दिवसांत तू परत आलास. दोन आठवडे तरी तिकडे थांबणार होतास ना ?"
तो काही बोलला नाही तसं मी म्हणाले, "बराच अस्वस्थ दिसतोयंस तू ! काय झालं, गावी काही झालं का ?"
त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत राग भरलेला होता, एक उपेक्षित व तिरस्काराची विखारी भावनासुद्धा मला जाणवली. ती मी सहन करू शकले नाही आणि मी ग्लानी येऊन खाली पडून बेशुद्ध झाले.
भावोजी शेजारीच उभे होते पण मला सावरायला त्यांना वेळच मिळाला नाही. त्यांनी आमोदकडे पाहिलं. त्यांनाही त्याच्या चेह-यावरच्या भावात वेगळेपणा जाणवला होता.
त्यांनी माझ्या तोंडावर पाणी शिंपडून मला शुद्धीवर आणलं. तसा आमोद त्याच्या खोलीत निघून गेला.
आमोदचं वागणं भावोजींनाही विचित्र वाटलं होतं पण त्यावर विचार न करता त्यांनी मला पाणी प्यायला दिलं. मी जमिनीवरून उठून सोफ्यावर बसले.
भाऊजी घाईनं स्वयंपाकघरात गेले आणि माझ्यासाठी सरबत घेऊन आले. मी सरबताचा पेला ओठाला लावला तसं एका हातानं जवळ घेत त्यांनी काळजीच्या स्वरात मला विचारलं, "शरू, तुला अचानक काय झालं ? आपण डाॅक्टरकडे जाऊ या."
मी म्हणाले, "भावोजी, डाॅक्टरकडे जायला नको. मी बरी आहे. मला आमोदच्या नजरेत माझ्याबद्दल राग, तिरस्कार, द्वेषाचा विखार जाणवला. मी ते सहन करू शकले नाही आणि ग्लानी येऊन मी खाली पडले. आता ठीक आहे मी !"
ते म्हणाले, "मलाही त्याच्या चेह-यावर वेगळेच भाव जाणवले. आपल्याशी एक शब्द न बोलता तो त्याच्या खोलीत निघून गेला. आज पहिल्यांदा असं झालं की तो तुझ्या पाया पडला नाही. आता तू एक काम कर. तो बोलत नाही तोपर्यंत तू त्याला एका शब्दानेही काही विचारायचं नाही."
मी म्हणाले, "ठीक आहे भावोजी, त्याचं त्यालाच मोकळं होऊ द्या. आपण शांत राहू."
दोन दिवस आमोद माझ्यासमोर आला की खूप अस्वस्थ व्हायचा. मला पाहताच त्याच्या चेह-यावरचे हावभाव बदलायचे हे मला जाणवायचं. त्याच्या चेह-यावर राग, तिरस्कार, द्वेष उमटायचा. गावी असं काय घडलंय हा विचार माझ्या मनाला अस्वस्थ करत राहायचा. भावोजींबरोबरही तो मोजकंच बोलायचा. त्याचं अस्वस्थ असणं आम्हा दोघांनाही जाणवायचं.
दोन दिवस आम्ही दोघांनी त्याच्या वागण्यावर खूप खल केला पण आम्हाला काहीच अंदाज करता आला नाही. आम्ही तर आधीच ठरवलं होतं की तो बोलत नाही तोपर्यंत आपण त्याला काही विचारायचं नाही.
तिस-या दिवशी रात्री जेवताना आमोदने अचानक विचारलं, "बाबा, कावेरी कोण होती हो ?"
त्याने अशा स्वरात विचारलं की नकळत माझ्या काळजाचा एक ठोका चुकला.
त्याचे बाबा म्हणाले, "तुला काय समजलं कावेरीबद्दल ?"
तो म्हणाला, "मला तुमच्याकडून ऐकायचंय."
ते म्हणाले, "ठीक आहे, तुला काय समजलंय ते मला माहीत नाही. कावेरी माझी पत्नी होती. तुझ्या आईची सख्खी मोठी बहीण होती. आमच्या लग्नानंतर तीन वर्षाच्या आत तिचा बाळंतपणात मृत्यू झाला. एकोणीसाव्या दिवशी आमच्या बाळाचाही मृत्यू झाला. मग मी तुझ्या आईशी दुसरं लग्न केलं. नंतर दोन वर्षाच्या आत तुझा जन्म झाला."
तो त्वेषाने म्हणाला, "बाबा, तुम्ही खोटं बोलताय. ही तुमची दुसरी बायको तुमच्यावर आधीपासून प्रेम करत होती. तुमच्यासाठी ही पागल झाली होती. तुमच्याशी लग्न करता यावं म्हणून कोणत्याही थराला जायची हिची तयारी होती म्हणून हिने माझ्या आईवर विष प्रयोग करून तिला मारून हिच्या प्रेमातला अडथळा दूर केला आणि तुमच्याशी लग्न केलं असं मला समजलंय."
मी म्हणाले, "आमोद, तुला समजलं ते खोटं आहे. मीच तुझी आई आहे. मी तुला जन्म दिलाय. कावेरीने नाही."
तो म्हणाला, "तू तर काही बोलूच नकोस. माझ्या आईला जीवंत मारण्यापर्यंत तुझी मजल गेली होती ? मी तिरस्कार करतो तुझा, घृणा वाटते मला तुझी !"
त्याच्या बोलण्याचा मला जबरदस्त धक्का बसला. मला ग्लानी येऊन मी बसल्या जागी कलंडले. भावोजी शेजारच्या खुर्चीत बसले होते. त्यांनी मला लगेच सावरलं. तसंच मला उचलून खोलीत बेडवर झोपवलं. त्यांनी माझ्या चेह-यावर पाणी शिंपडून मला शुद्धीवर आणलं. माझा भकास चेहरा पाहून त्यांना दुःख तर झालंच पण आमोदची चीड जास्त आली.
भावोजींनी एक ताट व पाण्याचा ग्लास आणून त्यात माझे हात धुतले. मला पाणी प्यायला दिलं. मी पूर्ण शुद्धीवर आल्याचं पाहून ते म्हणाले, "शरू, तू काही काळजी करू नकोस. त्याच्या मनात कुणी तरी जाणूनबुजून हे विष भरलंय. त्याचा मनातून हे विष काढणं खूप अवघड नाहीये. त्याचा गैरसमज दूर झाला की तो मूळपदावर येईल. तू शांत पडून राहा. मी बोलतो त्याच्याशी !"
भावोजी बाहेर गेले. आमोदच्या मनात इतकं विष कुणी भरवलं असेल याचा विचार मी करत बसले. माझ्या मोठ्या बहिणीचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला. माझी मोठी बहीण कृष्णाताई. आधी ती कावेरीवर खूप जळायची. ती कावेरीच्या सुखाचा दुःस्वास करायची. माझं भावोजींबरोबर लग्न झाल्यावर कावेरीचं सुख मला मिळालं म्हणून ती माझ्यावर जळत होती. माझा द्वेष करत होती. माझं लग्न झालं तेव्हा तिने आई, वहिनींसमोर मला विचारलं होतं की "तू तुझ्या भावोजीवर प्रेम करत होतीस ना ? कावेरी गेली हे तुझ्या पथ्यावर पडलं. ती खरोखर बाळंतपणात गेली की तू तिला विष देऊन तुझ्या मार्गातून हटवलंस ?"
आई तिच्यावर रागावून म्हणाली होती, "काय बरळतेस हे तुझं तुला तरी समजतं का ?"
कृष्णाताई म्हणाली होती, "आई मला जे दिसतं तेच तर बोलले. मी म्हणते ते खरं आहे ना शरयू ? तूच मारलंस ना कावेरीला ?"
त्या माझ्या कृष्णाताईनेच आमोदच्या मनात विष भरलं होतं. 
भावोजी आमोदबरोबर बोलले असतील असा विचार करून थोड्या वेळाने मी बाहेर गेले. भावोजी आणि आमोद बाहेर बसले होते. भावोजींच्या हातात काही कागदपत्रे होती.
मी बाहेर गेल्यावर आमोद उठून आत जायला लागला. मी थोड्या कठोर आवाजातच त्याला म्हणाले, "थांब आमोद. बैस तिथंच."
मी कृष्णाताईला फोन लावला. स्पीकर ऑन केला आणि तिला विचारलं, "काय गं, काय गरळ ओकलीस माझ्या मुलाच्या मनात ?"
ती म्हणाली, "मी कशाला गरळ ओकू माझ्या लाडक्या भाच्याच्या मनात ? जे खरं आहे तेच मी त्याला सांगितलं."
मी विचारले, "मी त्याची सावत्र आई आहे असं सांगितलंस त्याला ?"
ती म्हणाली, "कावेरी त्याची आई आहे हेच मला माहीत आहे, हे तुला मी एकदा आई, वहिनीसमोर बोलले होते."
मी म्हणाले, "हो, तू चेष्टेने बोलली होतीस. सगळ्यांबरोबर मीसुद्धा त्यावेळी हसण्यावारी नेलं होतं. आणि काय गं, कावेरीला विष देऊन मी मारलं असं आमोदला बोललीस तू ?"
ती म्हणाली, "तू भावजीवर प्रेम करत होतीस, भावोजींसाठी तू वेडीपिशी झाली होतीस म्हणून तुला त्यांच्याबरोबर लग्न करायचं होतं असं मला वाटायचं. मग कावेरी तुला मोठा अडथळाच होती ना ? तूच तिला मारलंस ना ? आणि तुझ्या भावोजीबरोबर लग्न करून मजेत जगते आहेस ना ?"
मी विचारले, "तुला वाटायचं ते खरं समजून मी तिला विष देऊन मारलं असं आमोदला सांगितलंस तू ?"
ती म्हणाली, "जाऊ दे गं ! जुन्या गोष्टी कशाला उगाळत बसायचं आपण ? त्यातून काय मिळणार आहे आपल्याला ? जे खरं आहे ते मी आमोदला सगळं सांगितलं ते मात्र माझं चुकलं. मी सत्य दडवून ठेवू शकले नाही. मला माफ कर. मी आमोदला सांगायला नको होतं. चल, ठेवते फोन."
तिने फोन ठेवला तसं आमोद माझ्याकडे विखारी नजरेनं पाहत म्हणाला, "अजूनही सत्य लपवायचंय तुला ? तूच मारलंस ना माझ्या आईला ?"
माझ्या उत्तराची वाट न पाहता तो आत निघून गेला.
भावोजी म्हणाले, "शरू, तुझ्या बहिणीनं खोट्या गोष्टींचं गरळ आमोदच्या मनात ओकलंय. तेच खरं आहे असं मानून अमोद बसलाय. ते त्याच्या मनातून लवकर निघेल असं मला वाटत नाही. मी त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो समजून घ्यायच्या मनःस्थितीतच नाहीये."
मी विचारले, "भावोजी, हे खूप धक्कादायक आहे. भविष्यात काय काय वाढून ठेवलंय ते भोगत राहायचं एवढंच आपल्या हातात आहे. हे कसले पेपर्स आहेत ?"
भावोजी म्हणाले, "मी त्याला कावेरीचं मृत्यू सर्टिफिकेट, मृत्यूचं कारण असलेलं डाॅक्टरांचं सर्टिफिकेट, बाळाचं मृत्यू सर्टिफिकेट तसंच त्याचं जन्म सर्टिफिकेट आणि आपलं मॅरेज सर्टिफिकेट दाखवून त्यावरच्या तारखेवरून सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तुझ्या बहिणीनं त्याला जे सांगितलं त्यालाच तो खरं मानतोय. त्याचं जन्म सर्टिफिकेट, बाळाचं मृत्यू सर्टिफिकेट हे दोन्हीही बनावट आहेत व कावेरीचं ते बाळ म्हणजे मीच आहे असं त्याने मला ठामपणानं सांगितलं. तो अकरावी झाला म्हणजे तो सतरा वर्षांचा आहे, पंधरा वर्षांचा नाही म्हणजेच तो कावेरीचा मुलगा आहे असंही गणित त्याने मांडलं. मी त्याला त्याने दोन वर्षांत चार इयत्ता पास केल्या हे पटवून द्यायचा प्रयत्न केला पण ते स्वीकारायला तयार नाही. तो त्याच्या मतावर ठाम राहिला."
मी म्हणाले, "भावोजी, नशिबात काय वाढून ठेवलंय ते आपण सोसत राहायचं. पण भावोजी, माझ्या पोटचा मुलगा माझं मातृत्व नाकारतोय ही भावना मला स्वस्थपणे जगू देणार नाही. माझ्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झालीय."
ते म्हणाले, "काळ उलटत जाईल तसतसं तू परिस्थिती स्वीकारत जाशील. तुझ्या भावनेची तीव्रता कमी कमी होत जाईल. तू आशा सोडू नकोस. एक दिवस अशी परिस्थिती निर्माण होईल की त्याला सत्य स्वीकारावं लागेल."
मी विचारलं, "पण तोपर्यंत मी कशी जगू, भावोजी ?"
ते म्हणाले, "शेवटी मुलं लग्न झालं की आई वडिलांपासून दूर जातात. त्यांच्या नव्या आयुष्यातच रमतात. ही जगाची रीत आहे. तुझा मुलगा तुझ्यापासून लवकर दूर गेला हे आपण स्वीकारायचं. तुला माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी जगायचंय."
मी म्हणाले, "भावोजी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण माझ्या हृदयातल्या आईच्या ममतेला मी कसं समजावू ?"
ते म्हणाले, "तू फक्त माझी पत्नी म्हणून जगायला लागलीस तर आईची ममता तू बाजूला सारू शकशील."
मी म्हणाले, "मी प्रयत्न करेन, भावोजी."
आठ दिवसांनी भावोजींनी माझ्या आई वडिलांना बोलावून घेतले. त्या दोघांनी आमोदला सत्य सांगितलं. ते ऐकून आमोद म्हणाला, "तुम्ही सगळे खोटं सांगताय. मावशीनं जे सांगितलं तेच सत्य आहे. मला खोटंनाटं सांगण्याची तिला काही गरज आहे का ? आणि त्याच दिवशी फोनवर ही मावशीशी बोलली. त्यावेळी मावशीनं मला सत्य सांगितलं असंच ती बोलली. मग ही माझी सख्खी आई आहे हे तुम्ही माझ्यावर कशाला बिंबवताय ?"
त्याच्या बोलण्यावर भावोजी म्हणाले, "आमोद, आपण तुझी व हिची डीएनए टेस्ट करू. मग तर खात्री होईल ना तुझी ही तुझीच आई आहे म्हणून ?"
आमोद म्हणाला, "बाबा, डीएनए टेस्टबद्दल तुमचं ज्ञान ऐकीव आहे. मी सायन्सचा विद्यार्थी आहे. मला माहीत आहे की डीएनए टेस्ट करून मी हिचा मुलगा आहे हे सिद्ध होईल कारण माझी आई आणि ही या दोघी सख्या बहिणी आहेत. या दोघी एकाच आई वडीलांच्या मुली असल्यामुळे माझ्या आईचा आणि हिचा डीएनए एकच असेल ना ! त्यामुळे डीएनए टेस्टमुळे मी हिचाच मुलगा आहे हे सिद्ध होईल. माझ्या ख-या आईच्या डीएनए बरोबर माझी टेस्ट केली तरी मी तिचाच मुलगा आहे हेच सिद्ध होईल. माझा जन्म दोन आईच्या उदरातून झाला यावर तर तुमचाच विश्वास बसणार नाही. मग मी तरी त्यावर कसा विश्वास ठेवणार ? कृष्णा मावशीनं सांगितलं ते म्हणजे मी कावेरीचा मुलगा आहे आणि तुमच्यासाठी ही वेडी झाली होती म्हणून हिने विष देऊन माझ्या जन्मदात्या आईला मारलं आणि तुमच्याशी लग्न केलं हेच सत्य आहे."
माझ्या बहिणीने असत्याचं जहर मधामध्ये घोळवून आमोदला पाजलं होतं. आमोद ते सहज प्राशन करून गेला होता. आपल्या मनाच्या कणाकणात ते विष भिनवून बसला होता. माझ्या बहिणीने गोड बोलून, सहज सांगतेय असं भासवून एक मिथ्या कथित त्याला सांगून आपला डाव साधला होता. तिच्या मनातल्या माझ्याबद्दलच्या असूया, विद्वेषापायी तिने माझा असा जीवघेणा सूड घेतला होता. आमोदची विचार शक्ती, तारतम्य शक्ती पूर्ण संपुष्टात आणण्यात ती यशस्वी झाली होती. माझं कुटुंब अस्तव्यस्त करण्याचं अघोरी समाधान तिने मिळवलं होतं.
मीच तुझी जन्मदाती आहे हे आमोदला पटवून देण्यात आम्ही सफल झालो नाही ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी शोकांतिका ठरली. मला मनस्वी दुःख झाले. ही विदारकता पचवणे मला खूप जड गेले. मी मनाने कोलमडून पडले. सतत तोच विचार करून मी मनोरुग्ण झाले. घरात तर नाहीच पण ऑफिसच्या कामातही माझं दुर्लक्ष व्हायला लागलं.
भावोजींना माझ्या अवस्थेचं अतोनात दुःख झालं. बराच विचार करुन ते मला एका मनोवैज्ञानिक महिला डाॅक्टरकडे घेऊन गेले. तिथे त्यांनी आधी सगळे पुरावे दाखवून काय घडतंय ते सांगितलं.
ती मनोवैज्ञानिक डाॅक्टर दीड तास माझं प्रबोधन करत होती. तिचा सांगण्याचा सगळा रोख याकडे होता की मी मुलाचं म्हणणं जसंच्या तसं बरोबर आहे, जी वस्तुस्थिती आहे ती चुकीची आहे हे स्वीकारलं तरच मी यातून बाहेर पडू शकते, नव-याबरोबर सुखाने राहू शकते. आपल्याच मनाशी आपण झगडत जगणं व्यर्थ आहे. स्वीकारणं आणि नाकारणं हे मनातलं द्वैत संपवलं नाही तर मी मनातल्या विरोधापायी माझी मनःशांती हरवून बसेन. मी कायमची मनोरुग्ण होईन. माझा नवरा माझ्यावर अतोनात प्रेम करतोय ही जाणीव ठेवून मी माझा एकटीचा विचार करत बसण्यापेक्षा माझ्या नव-याचाही विचार करावा आणि आयुष्यात आपला नवराच फक्त आपला आहे हे सत्य स्वीकारून या मनोवस्थेतून बाहेर यावं. सत्य काय आहे आणि मुलगा काय समजतो हे आपण ठरवत बसण्यापेक्षा मुलाची असत्य असणारी धारणा हीच सत्य समजावी. मुलाला मुलाच्या धारणेत जगू द्यावं आणि आपल्या मनातला संघर्ष संपवून टाकावा.
त्या मनोवैज्ञानिक डाॅक्टरने भावोजींना हे सुचवलं की आठ दहा दिवस आम्ही एखाद्या हिल स्टेशनला सेकंड हनिमूनसाठी जाऊन यावं. तिथल्या निसर्गाचा, थंड व शांत वातावरणाचा, स्थल दर्शनाचा, नयनरम्य प्रवासाचा आनंद घ्यावा. सेकंड हनिमून समजून आम्ही खूप मजा करावी. रात्रंदिवस आम्ही दोघेच एकमेकांच्या सहवासात असल्यावर आमच्यातलं बंधन अजून घट्ट होईल. आपला जोडीदारच फक्त आपला आहे ही जाणीव आम्हाला होईल. पती पत्नी हेच नातं प्राथमिक आहे, बाकी नाती ही आपल्या आयुष्याला लावलेली ठिगळं आहेत याचं प्रत्यंतर आम्हाला येईल. मग मुलगा काय समजतो हा प्रश्न तुमचं मन गौण ठरवेल.
आम्ही बाहेर पडलो तेव्हा माझं मन तसं प्रसन्न झालं होतं. आमोद म्हणतो ते आपण स्वीकारावं. तो आपला करत असलेला तिरस्कार, घृणा, रागसुद्धा स्वीकारावा. त्याला त्याच्या धारणेत जगू द्यावं. त्याला बदलवण्याचा प्रयास करू नये. त्याच्या नाकारण्याने मी त्याची आई आहे ही वस्तुस्थिती माझ्यासाठी तरी बदलणार नाहीये. फक्त ते सत्य त्याच्यावर लादण्याचा विचार आपल्याला सोडायला हवा अशी मनोवस्था माझी झाली होती.
दुस-या दिवशी भावोजींनी अमृतसर, डलहौसी, धर्मशाळा, नैनीताल असा टूरचा प्लॅन बनवला. विमानाची तिकिटे व तिकडच्या प्रवासासाठी एक कार बुक केली. हाॅटेलमध्ये सुपर डिलक्स रूम्स बुक केल्या.
आम्ही निघण्याच्या आदल्या दिवशी भावोजींनी आमोदला सांगितलं की, "उद्या आम्ही नऊ दिवस नैनीतालच्या टूरवर जातोय. तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघण्यासाठी तुझ्या सावत्र आईने एक कामवाली बाई ठरवलीय."
'तुझ्या सावत्र आईने' हे शब्द ऐकून त्याने आपली मान किंचित वर केली पण भावोजींच्या बोलण्यावर तो काहीच बोलला नाही.
आम्ही दोघेच एकमेकांचे आहोत हा विचार मनात ठेवून नऊ दिवस आम्ही खूप मजा केली. आम्ही खरोखर सेकंड हनिमून मनावला. प्रवासाचा व स्थळ दर्शनाचा आनंद घेतला. निसर्ग व माझे भावोजी यांच्या सांन्निध्यात मी खूप सुखावले. माझे भावजीच फक्त माझे आहेत ही माझी भावना अजून दृढ झाली. इतर नाती फक्त कारणवश आहेत, त्यांना किती महत्व द्यायचं याचीही मला जाणीव झाली. तीन चारदा आमोदचा विचार मनात आला पण क्षणभरही मी अस्वस्थ झाले नाही. आहे ती परिस्थिती स्वीकारून मी माझ्या मनोवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडले याचं अतीव समाधान भावोजींना मिळालं होतं. ते खूप खुश, आनंदी होते.
आम्ही परत आल्यावर त्या डाॅक्टरांना जाऊन भेटलो. मला पाहून त्या चकित झाल्या. त्या म्हणाल्या, "एका सिटिंगमध्ये तुमच्यात इतकं परिवर्तन होईल असं मला वाटलं नव्हतं इतकी तुमची मनोवस्था विकल झाली होती. तुम्ही मनाने खंबीर आहात आणि नव-यावर तुमचं अतीव प्रेम आहे म्हणून असं घडलं."
मी म्हणाले, "मॅडम, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायचा हा तुमचा सल्ला माझ्यासाठी अमृतवाणी ठरली म्हणून मी माझ्या मुलाच्या धारणेशी मनाने पूर्णपणे अलिप्त होऊ शकले."
आम्ही दोघांनी डाॅक्टर मॅडमना मनापासून धन्यवाद देऊन बाहेर पडलो.
नंतर आमोद व माझ्यामध्ये संवाद जवळजवळ संपत गेला. अगदी कारणाकारणीच आम्ही दोन चार वाक्य बोलायचो.
सहा महिन्यांनी आम्हा तिघांना एका लग्नासाठी गावी जावं लागलं होतं. तिथे गेल्यावर कृष्णाताई समोर आली तेव्हा आमोदने तिला मिठी मारली ते पाहून मला थोडं वैषम्य वाटलं पण लगेच माझ्या मनानं त्रयस्थपणा स्वीकारला.
मी आमोदसमोरच तिला म्हणाले, "ताई, तू माझ्या पोटच्या मुलाच्या मनात मधात घोळून विष भरवलंस. आम्ही एकमेकांना मनाने दुरावलो. हे तू चांगलं केलं नाहीस. एक दिवस तुला पश्चात्ताप नक्कीच होईल."
आमोद समोर होता म्हणून की काय ती गप्प बसली.
ती गप्प बसलेली पाहून मी म्हणाले, "आमोदच्या आईला मी विष पाजून मारलं आणि तिचा नवरा मी हंशील केला असंच तू त्याला सांगितलंस ना, मग मला अजून काय शिक्षा द्यायची तेसुद्धा तू त्याच्या मनात भरव. तो तुझ्या तंत्राने नक्कीच वागेल व मला शिक्षा देत राहील. आम्ही दोन दिवस आहोत येथे ! या दोन दिवसांत तुला अजून काही हवं ते घडवून आण."
भावोजी म्हणाले, "शरू हिला दोष देऊ नकोस. हिच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आपला आमोदच आहे."
तेवढ्यात आई तिथे आली आणि म्हणाली, "शरयू, लग्नाला आलीयंस ना, मग वादावादी नको."
मी म्हणाले, "हो आई, वाद करून काही बदल होणार नाही हे मी जाणते. आई, अजून एक सांगते. मी हिला आणि माझ्या आमोदला माफ करून बसलेय. माझ्या मनात आता राग, दुःख, खंत असं काहीही शिल्लक नाहीये. माझे भावोजीच फक्त माझे आहेत, दुसरं कुणीही माझं नाही, माझा मुलगासुद्धा माझा नाही हे मी स्वीकारलंय."
आई म्हणाली, "दुस-याच्या घोर अपराधाला विसरून त्याला माफ करणं यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते तुझ्याकडे आहे म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो.
दोन दिवस तिथे थांबून आम्ही घरी परतलो.
पुढची दोन तीन वर्षे माझं आणि आमोदचं बोलणं अगदी क्वचित, तेही कारणाकारणीच व्हायचं.  आमची नजरानजर झाली की मी त्याच्या चेह-यावर लगेच प्रकटलेला राग पाहायचे. रागाबरोबरच त्याच्या चेह-यावर माझ्याबद्दल त्याच्या मनात असलेला तिरस्कार, घृणा या भावनासुद्धा अनुभवायचे पण मी ते स्वीकारले असल्यामुळे त्याकडे त्रयस्थाच्या नजरेने पाहायचे. मी क्षणभरही विचलित होत नसे.
नंतर त्याच्या चेह-यावर प्रकटणा-या माझ्याबद्दलच्या भावना, तिरस्कार, राग कमी कमी व्हायला लागल्या. त्याला मेडिकलला अॅडमिशन मिळाली होती. तो खूप खूष होता. त्याचं काॅलेज, घरी अभ्यास यात तो पूर्ण गुरफटला होता. इतर विचार करायला त्याला वेळच मिळत नव्हता. मी ऑफिसात स्वतः ड्राईव्ह करून कारने जायचे. त्याचं काॅलेज माझ्या ऑफिसच्या रस्त्यावरच होते. कधी कधी तो मला काॅलेजबाहेर दिसायचा.
काळ उलटत होता. त्याच्या काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला मी आठ दहा वेळा त्याला एका मुलीबरोबर पाहिलं. मला हसू आलं होतं. मेडिकलचा अभ्यास करत असताना त्याला प्रेम करायला वेळ बरा मिळतो ! त्याचबरोबर मला याचं समाधान वाटायचं की त्याच्या मनात प्रेम भावना जीवंत आहे !
त्याची इन्टर्नशीप संपल्यावर त्याला त्याच्याच काॅलेजला पीजीला अॅडमिशन मिळाली. तो खूप खुश असायचा.
मी ऑफीसला जाता येताना कधी कधी तो त्या मुलीबरोबर बोलताना, हसताना पाहायचे. तीसुद्धा पीजी करत असणार. गाडी थांबवून त्या दोघांकडे पाहत राहावं असं क्षणभर वाटायचं आणि माझ्या विचाराचं मलाच हसू यायचं. एक खरं, तिथून जाता येताना माझ्या गाडीचा वेग आपोआप कमी व्हायचा. ती मुलगी दिसायला सुंदर होती. तिच्या चेह-यावर मार्दव असायचं. मला सून म्हणून आवडली होती.
तो पीजी झाला तेव्हा तो उत्साहाने घरात शिरला होता. त्याच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण मला समोर पाहून त्याच्या चेह-यावरचे हावभाव बदलले तशी मी उठले आणि माझ्या खोलीत निघून गेले. आपल्यामुळे याच्या चेह-यावरचा आनंद हरपला याचं मला क्षणभर वाईट वाटलं होतं.
नंतरच्या सहा महिन्यांत दोन दुःखद घटना घडल्या. आधी माझे वडील वारले. मग आई वारली. आता आपलं माहेर संपलं ही भावना मला दुःखी करून गेली.
सहा महिन्यांनी आमोदचं त्या मुलीबरोबर लग्न झालं. लग्नासंबंधी गप्पा मारताना तो भावोजींबरोबर बोलायचा. त्या बोलण्यात तो मला अजिबात सामील करत नव्हता. मुलीचा फोटोसुद्धा त्याने मला दाखवला नाही. मीसुद्धा तिथून उठून माझ्या खोलीत जायचे. "लग्नाचा ये" असं तो मला एकदाही बोलला नाही. मीसुद्धा त्याच्या लग्नाच्या कुठल्याही सोहळ्याला गेले नव्हते. लग्न झाल्यावर तो बायकोला घेऊन घरात शिरला तेव्हा भावोजींनीच दोघांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं होतं. तिला माझ्या व आमोदच्या संबंधाबद्दल थोडी फार कल्पना असावी. घरात शिरून दोघे भावोजींच्या पाया पडले. मग घरातल्या देवाला नमस्कार करून ती माझ्या खोलीत शिरली. माझ्या पायाशी वाकून ती म्हणाली, "आई, मी तुमची सून, मुग्धा."
मी आश्चर्याने विचारले, "काय ? मुग्धा नाव आहे तुझं ? खरं ?"
तिला आशीर्वाद देऊन मी तिला वर उचललं तसं तिने मला मिठी मारली. माझे डोळे अश्रूंनी डबडबले होते. मीसुद्धा तिला मिठीत घेऊन अवरुद्ध स्वरात म्हणाले, "सुखी हो, सौभाग्यवती हो."
दहा एक दिवसांनी आम्ही दोघी स्वयंपाकघरात होतो तेव्हा तिने विचारलं, "आमच्या लग्नाला का आला नाही तुम्ही ? मला तुमची उणीव जाणवली."
काय उत्तर देणार होते मी तिला ? मी गप्प बसले. थोड्या वेळाने तिने विचारले, "लग्नाला आला नाहीतच पण इथेही मी बघतेय, तुम्ही दोघं एकमेकांशी बोलतही नाही. नेमकं काय घडलंय इतका दुरावा येण्यासारखं !"
तेवढ्यात भावोजी तिथे आल्यामुळे तिचं बोलणं तिथेच थांबलं.
नंतर पंधरा एक दिवसांनी आम्ही दोघीच घरात होतो तेव्हा तिने तो विषय काढला आणि म्हणाली, "आज मला सगळं ऐकायचंय. तुम्ही बोलला नाही तर मीसुद्धा  आमोदसारखंच तुमच्याशी अबोला धरून दुराव्याने वागेन."
मी म्हणाले, "काय करणार आहेस जाणून घेऊन ?"
ती म्हणाली, "घरात कुणी असं दुराव्याने वागत असेल तर मला वाईट वाटतं. माझ्या घरी असं वातावरण नव्हतं म्हणून मला तुमच्या दुराव्याचं कारण मला जाणून घ्यायचंय."
मी म्हणाले, "तुला माझ्याबद्दल थोडं फार तरी माहीत झालं असेल ना ?"
ती म्हणाली, "हो, तुम्ही आमोदच्या सावत्र आई आहात, त्याची आई तुमची मोठी बहीण होती. आमोदची आई वारल्यावर तुम्ही आमोदच्या वडिलांबरोबर लग्न केलंत हे मला माहीत आहे पण तुमच्यात नेमक्या कुठल्या कारणाने इतका दुरावा निर्माण झाला हे मला माहीत नाही."
मी म्हणाले, "माझ्या पोटच्या मुलाने मला सावत्र आई समजावं यासारखं त्याच्या जन्मदात्या आईचं दुसरं दुर्दैव ते कोणतं असेल ?"
ती आश्चर्याने म्हणाली, "म्हणजे ? तुम्ही आमोदची सख्खी आई आहात ?"
मी म्हणाले, "हो, मी त्याची जन्मदाती आई आहे. पण त्याच्या मनातला गैरसमज दूर करण्यात मी आणि भावोजी, आम्ही दोघेही कमी पडलो. मी तुला सगळा घटनाक्रम सांगते पण तूसुद्धा दुराव्याची भाषा करू नकोस. आधी तुझ्याबद्दल सांगते, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आमोदची बायको माझ्याशी आदराने व इतकं चांगलं वागेल असं !"
ती म्हणाली, "वाद किंवा गैरसमज तर तुमच्या दोघांचे आहेत, माझ्याशी तर नाहीत ना ? तुम्ही सावत्र का होईना पण माझ्या सासू आहात. त्या नात्याने तुम्हाला योग्य तो मान देणं हे माझं कर्तव्य आहे. मला नाही जमणार, दुराव्यानं वागणं ! माझा स्वभाव नाही तसा !"
मी म्हणाले, "तुला एक सांगू ? तुम्ही मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होता ना, तेव्हा मी तुला त्याच्याबरोबर ब-याच वेळा पाहिलं होतं. तेव्हाच तू मला आवडली होतीस. माझ्या ऑफिसच्या रस्त्यावरच तुमचं कालेज आहे."
ती म्हणाली, "काय सांगताय ? खरं ?"
मी म्हणाले, "हो. तुला अजून एक योगायोग सांगते. तुला मी पहिल्यांदा आमोदबरोबर पाहिलं तेव्हा माझ्या मनात विचार आला की हिचं नाव मुग्धा असेल तर त्या नावात हिचं सगळं काही सामावलेलं असेल."
ती आश्चर्याने म्हणाली, "काय सांगताय ? खरं आहे हे ? पहिल्या दिवशी तुम्हाला नमस्कार करून मी माझं नाव सांगितल्यावर तुम्ही खूप आश्चर्यचकित झाला होता हे माझ्या लक्षात आलं होतं."
मी म्हणाले, "काही योगायोगाची कारणे आपल्यासाठी अनाकलनीय असतात. त्याचा उलगडा कधीच होत नाही."
ती म्हणाली, "आता सांगा मला सगळा घटनाक्रम. त्याच्या तिरस्काराचं कारण जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे."
मी बराच वेळ बोलत होते. ती शांतपणे ऐकत होती. माझं बोलणं संपल्यावर ती म्हणाली, "खूप धक्कादायक आहे हे ! गेल्या अकरा वर्षात तुमचं आईचं हृदय प्रत्येक प्रसंगाला किती विदीर्ण होत गेलं असेल ! हे सगळं सहन करत तुम्ही कशा जगला असाल ?"
मी म्हणाले, "आमोदच्या गैरसमजामुळे व त्यातून त्याच्या बदललेल्या वागण्याने मी मनोरुग्ण झाले होते. एका मनोविज्ञान चिकित्सकाची ट्रिटमेंट मला घ्यावी लागली होती. आहे त्या परिस्थितीचा व मुलाच्या धारणेचा स्वीकार करा, तुमच्या मुलाला त्याच्या समजुतीप्रमाणे जगू द्या, त्याला सत्य पटवून देण्याच्या फंदात पडू नका किंवा विरोधही करू नका असं मला त्या मनोवैज्ञानिक डॉक्टर मॅडमने सल्ला दिला होता तो मला पटला होता. मी तशी जगत गेले. मी सुखी आहे. शिवाय माझे भावोजी सतत माझ्यासोबत राहून माझं मनोबल वाढवत राहिले."
ती म्हणाली, "हो, आपण स्वीकारण्याची भूमिका घेतली की आपल्या मनातला संघर्ष संपतो. एकदा मन शांत झालं की आपल्याला स्वस्थपणाने जगता येते. तुम्ही योग्य त्या धारणेवर जगलात. खूप मॅच्युअर्ड आहात तुम्ही ! मला एक सांगा, तुम्ही मामंजींना भावोजी म्हणता ते थोडं जगावेगळं नाही वाटतं तुम्हाला ?"
मी हसत म्हणाले, "हो, जगावेगळंच आहे ते ! लग्नाआधी मी त्यांना भावोजी म्हणत होते. लग्नानंतरही तेच संबोधन माझ्या अंगवळणी पडलं. त्यांना भावोजी म्हणून हाक मारताना माझं मन खूप सुखावतं. त्यांनाही कधी वावगं वाटलं नाही."
ती हसत म्हणाली, "बायको आणि मेव्हणी असा दुहेरी फील त्यांना येत असणार ना, आणि तुम्हालाही !"
मी म्हणाले, "चेष्टा करतेस माझी ?"
ती म्हणाली, "नाही गं बाई, माझ्या मनातला खट्याळपणा थोडा उफाळून बाहेर आला."
ती पुढे म्हणाली, "योग्य संधी आहे असं मला वाटेल तेव्हा मी याबद्दल आमोदबरोबर नक्की बोलेन."
मी म्हणाले, "नको बोलूस त्याच्याशी ! त्याची धारणा, समज बदलणार नाही. दोन वेगवेगळ्या विचार धारेवर तुमच्यात वागणं बोलणं नको, या विषयावरून तुमच्यात होणारे मतभेद टाळणं योग्य ठरेल."
ती म्हणाली, "ठीक आहे. मी विचार करून ठरवेन."
मुग्धा या विषयावर आमोदशी बोलली की नाही ते मला समजलं नाही. मीसुद्धा तिला कधी विचारलं नाही.
एक दिवस भावोजी मला म्हणाले, "शरु, उद्या रविवार आहे. आपण बाहेर जाऊ. तुला एक सरप्राईझ द्यायचंय."
"काय ?" असं विचारल्यावर ते म्हणाले, "आधी सांगितलं तर ते सरप्राईझ कसं राहाणार ?"
दुस-या दिवशी ते मला एका नवीन बिल्डींगमधल्या एका प्लॅटमध्ये घेऊन गेले आणि म्हणाले, "हा फ्लॅट मी तुझ्या नावाने घेतलाय. पुढच्या आठवड्यात रजिस्ट्रेशन करायचंय. भविष्यात तुला गरज पडली तर तू इथे राहू शकशील. तोपर्यंत हा फ्लॅट आपण भाड्याने देऊ."
मी म्हणाले, "भावोजी, काय बोलताय हे ? भविष्यात मला गरज पडेल ? माझ्या गरजा पु-या करायला तुम्ही आहात ना !"
ते म्हणाले, "शरू, खरं सांगायचं तर माझं वागणं मलाच आकलन झालेलं नाही. आपण या विषयावर नको बोलायला."
अजून काही काळ गेला. भावोजी रिटायर्ड होऊन एका कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम करत होते.
एक दिवस पहाटे भावोजींना कसं तरी व्हायला लागलं. त्यांच्या हालचालीने मला जाग आली. त्यांची अवस्था बघून मी घाबरले. तशीच उठून आमोदच्या खोलीचं दार वाजवलं. मुग्धाला काय झालं ते सांगितलं. तिच्यापाठोपाठ आमोदही आमच्या खोलीत आला. त्याने भावोजींना तपासले. भावोजींना हार्ट अॅटक येऊन गेला हे दोघांच्या लक्षात आलं. त्याने लगेच अॅम्ब्युलन्ससाठी फोन केला. भावोजींना हाॅस्पिटलला नेत असताना त्यांना दुसरा सिव्हियर अॅटॅक आला. त्यांनी माझा हात गच्च आवळून धरला आणि प्राण सोडले. त्यांचा हात सैल पडला होता. मला जाणवलं, माझे प्रिय भावोजी मला सोडून गेले होते.
माझ्यावर दुःखाचा पहाड कोसळला. भावोजी मला असं अचानक सोडून जातील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझं मन कोलमडून पडलं आणि अॅम्ब्युलन्समध्येच मला ग्लानी येऊन मी कलंडले.
भावोजी मला सोडून गेल्याचं मला अतोनात दुःख झालं होतं. आमोद मुग्धालाही दुःख झालं होतं. पण आमोद काही मला सांत्वना द्यायला माझ्याजवळ आला नाही आणि त्याच्या जवळ जाऊन त्याचं सांत्वन करावं असं मलासुद्धा वाटलं नाही.
तिस-या दिवशी अस्थि विसर्जन झाले. मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र उतरावयाला नकार दिला. अस्थि विसर्जनाला माझा भाऊ व वहिनी आले होते. ते मला आग्रहाने माहेरी घेऊन गेले.
आठ दिवस मी माहेरी होते. सगळे नातेवाईक मला भेटायला आले होते. माझी मोठी बहीण कृष्णाताई मला भेटायला दररोजच यायची. आमच्या थोड्या गप्पाही व्हायच्या. एक दिवस मी तिच्याकडे जेवायलाही गेले होते पण एकदाही आमोदविषयी आमचं बोलणं झालं नाही. कदाचित माझ्या त्या अवस्थेत आमोदचा विषय काढायला तिचं मन धजावलं नसेल.
माहेराहून मी घरी आले. मी खूप सावरले होते. गळ्यातल्या मंगळसूत्राच्या रुपानं माझे भावोजी माझ्यासोबतच आहेत अशी माझी भावना झाली होती.
दोन दिवसांनी मी ऑफीसला जायला लागले. माझी नोकरी अजून दहा महिने शिल्लक होती. ऑफीसच्या कामामुळे मी जास्त जास्त सावरत गेले.
भावोजी नसताना आमोदबरोबर एकत्र राहून माझी घुसमट होईल व मला स्वतंत्र राहाता येईल असं त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी माझ्या नावावर छोटासा फ्लॅट घेतला असा विचार माझ्या मनात आला.
मी भाडेकरूला फोन केला तेव्हा तोच म्हणाला की "मी तुम्हाला फोन करणारच होतो. तीन आठवड्यांनी आपलं अॅग्रीमेंट संपेल. त्यापूर्वी मी तो फ्लॅट रिकामा करून तुमच्या ताब्यात देईन."
नोकरीतून रिटायर्ड झाल्यावर मी त्या फ्लॅटमध्ये राहायचं ठरवलं.
ऑफिसातून घरी आले की मी भूतासारखी एकटी राहू लागले. दिवस दिवस बोलायला कुणी नसायचं. आमोद व मुग्धा त्यांच्या हाॅस्पिटलच्या व्यापात अडकले होते. दोघेही जोडीने हाॅस्पिटल चालवत होते. त्यांचं हाॅस्पिटल बरंच नावारुपाला आलं होतं. आमोद बालरुग्ण व स्त्रीरुग्ण तज्ज्ञ होता आणि मुग्धा गायनॅकॉलॉजिस्ट होती.
माझा फ्लॅट माझ्या ताब्यात आल्यावर मी तिथे आवश्यक त्या सोयी करून घेतल्या होत्या. फ्लॅटला कलर करून घेतला. गरजेचं सगळं सामान घेतलं होतं. अगदी फ्रिज, टिव्हीसुद्धा घेतला होता. वाणसामानही भरून ठेवलं होतं. चार महिन्यांनंतर मी महिन्यातून दोन रविवार तरी तिथे राहायचे. सकाळी जाऊन रात्री आठपर्यंत घरी यायचे.
मी नोकरीतून रिटायर्ड झाले. दिवसभर घरात एकटीने राहाणं मला अंगवळणी पडत गेलं पण आमोद घरात असेल तर का कोण जाणे पण मला त्याचं थोडंसं दडपण यायला लागलं होतं. त्याच्या पाशातून पूर्ण मुक्त व्हायची मला ओढ वाटू लागली.
आठ दिवसांनतर रविवारी सकाळी मी मुग्धाला बोलले की "आज आपण तिघे एकत्र चहा नाष्टा घेऊ. मला आमोदशी थोडं बोलायचं आहे."
ती "बरं" म्हणाली आणि नाष्ट्याच्या तयारीला लागली.
हाॅलमध्ये नाष्टा करत मी म्हणाले, "आमोद, जवळजवळ अठरा वर्षे झालीत, तू माझ्याबरोबर त्रयस्थासारखा वागत आलास. माझी आईची माया खूप रडायची पण तू माझ्या डोळ्यांसमोर आहेस यात समाधान मानायचे. माझ्याबरोबर माझे भावोजी होते तोपर्यंत मला एकाकी कधी वाटलं नाही, शिवाय नोकरीतही मी व्यस्त असायचे पण गेले आठ दिवस मला इथे खूप एकाकी वाटायला लागलंय. पोटच्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर इथे राहाताना मला आता परकेपणा जाणवतोय. मीच तुझी जन्म देणारी आई आहे आणि तुझ्या मनातल्या त्या तुझ्या आईवर विष प्रयोग करून मी तिला मारलं नाही हे सत्य तुला पटवून देण्यात माझे भावोजी आणि मी कमी पडलो. गेली अठरा वर्षे तू माझा तिरस्कार करत आलास. मी मात्र माझ्या भावजीच्या सोबतीने तुझा तिरस्कार सहन करत आले. माझ्या मनात पोटच्या मुलाबद्दलची आईची ती माया, ममता होती. पण आता मी पोटच्या मुलाच्या माया, ममतेतून पूर्ण मुक्त व्हायचं ठरवलंय. मी उद्यापासून दुसरीकडे राहायला जाणार आहे. एकटी राहाणार आहे. मला आता पोटच्या मुलाचे कुठलेही पाश नकोयंत."
आमोदने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. तो माझ्या अंतःकरणाचा ठाव घेतोय असं मला त्याची नजर पाहून वाटलं. त्याचे डोळे पाणावले होते.
त्याने कसंबसं विचारलं, "कुठे जाणार आहेस तू ?"
मी म्हणाले, "मुंबईतच राहाणार आहे मी !"
नाष्टा अर्धवट टाकून उठत तो म्हणाला, "मुग्धाकडे तुझा पत्ता देऊन जा."
मी म्हणाले, "नाही. मी माझा पत्ता कुणालाही द्यायचा नाही असं ठरवलंय. तिच्याकडेे माझा फोन नंबर आहे."
"ठीक आहे." असं म्हणून तो त्याच्या खोलीत निघून गेला.
मुग्धा म्हणाली, "आई, तुम्ही एकट्या कुठे व कशा राहणार ? तुमचं काही दुखलं खुपलं तर कोण असणार आहे सोबत ? नका ना जाऊ !"
मी म्हणाले, "मुग्धा, मी मनाने खूप थकलेय गं ! माझे भावोजी होते तोपर्यंत मला थकल्यासारखं कधी वाटलं नाही पण आता खूप जाणवतंय. माझी पोटच्या पोराबद्दलची माया ममताही कोरडी पडलीय, त्याच्या मनात माझ्याबद्दल स्नेह नाहीये मग एकत्र राहाण्यात काय अर्थ आहे ?"
ती म्हणाली, "तुमचा पत्ता तरी मला देऊन जा."
मी म्हणाले, "तुझ्याकडे माझा फोन नंबर आहे. तू निवांत असशील तेव्हा फोन करत जा."
तिच्या डोळ्यांत अश्रू डबडबले. ती रुद्ध आवाजात म्हणाली, "आमोदला कदाचित तुमचं नसणं जाणवणार नाही पण मला खूप जाणवेल !"
दुस-या दिवशी सकाळी आमोद, मुग्धा घरी असताना मी माझ्या सामानाच्या दोन मोठ्या बॅगा उचलल्या. आमोद व मुग्धा पुढे आले व त्यांनी माझ्या दोन मोठ्या बॅगा घेतल्या. मी एक छोटी बॅग हातात घेऊन खाली उतरले. मी कार घेऊन आले व डिकी उघडली आमोदने माझ्या तिन्ही  बॅगा डिकीत ठेवल्या.
मुग्धा माझ्या पाया पडली. मी तिला वर उचललं तसं तिने मला मिठी मारली आणि ती रडू लागली.
मी तिच्या पाठीवर थोपटून, तिच्या केसांवरून हात फिरवून तिला शांत केलं तेव्हा ती मिठीतून दूर झाली. तसा आमोद माझ्या पायाशी वाकला.
त्याच्या डोक्यावर हात ठेवून मी म्हणाले, "सुखी राहा. मुग्धाला जप."
मी कारमध्ये बसले व कार चालू करून दोघांना हात हलवून निरोप दिला.
आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर मी पाऊल टाकलं होतं. ते वळण सुखावहही नव्हतं आणि दुःखावहही नव्हतं पण मुक्तीची भावना माझ्या मनाला सुखावत होती. मनावरचा सगळा ताण संपुष्टात आला होता !
मी माझ्या घरात रमले. मुलाचे पाश तोडल्यापासून मला एका बंधनातून मुक्त झाल्याचा आनंद वाटत होता. मी खुश होते. भावोजी गेल्यावर दहा महिने मी मुलाच्या बंधनात का अडकले होते हा प्रश्न आता मला पडू लागला होता.
दोन दिवसांनी मुग्धाचा फोन आला. ती सांगत होती की मला निरोप दिल्यावर दोघे वर गेल्यावर आमोद रडायला लागला होता. तो म्हणत होता की त्याला काही समजेनासं झालंय. तुमच्या बोलण्यात त्याला प्रामाणिकपणा जाणवतो असं तो म्हणाला पण कृष्णा मावशीने सांगितलं ते खोटं आहे असंही त्याला वाटत नाही असंही तो म्हणाला.
मी तिला म्हणाले, "मुग्धा, आता मी या सत्यासत्याच्या गुंतावळ्यातून मोकळी झालेय. माझा बोलणं प्रामाणिक असल्याचं त्याला जाणवतोय पण कृष्णा मावशीच्या सांगण्यावर विश्वासही ठेवतोय. तू त्याला या द्विधा मनःस्थितीतून बाहेर काढ. अठरा वर्षे तो ज्या धारणेत जगत आला, त्याच धारणेत जगायला तू त्याला प्रवृत्त कर म्हणजे तो स्थिर राहील आणि हाॅस्पिटलच्या कामात जास्त लक्ष देईल."
ती म्हणाली "हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्याला द्विधा मनःस्थितीत राहू देणं हे अहिताचं ठरेल. तुम्ही तुमची काळजी घ्या. काही लागलं सवरलं, दुखलं खुपलं तर मला फोन करत जा. सात आठ दिवसांनी आपण एकदा भेटत जाऊ."
मी म्हणाले, "हो, जरूर भेटू. चल, बाय."
मुग्धाकडून मला काही बातम्या मिळायच्या. नंतर दोनच दिवसांनी तिने फोन करून सांगितलं की आज कृष्णा मावशीचा आमोदला फोन आला होता व आमोदने तिला तुम्ही घर सोडून गेल्याचं सांगितलं व तुमचा पत्ता माहीत नाही असंही त्याने सांगितलं.
दुस-या दिवशी दादाचा फोन आला. त्याला आदल्या दिवशी कृष्णाताईने माझ्याबद्दल सांगितले होते. दादाने विचारल्यावर मी त्याला सगळं समजावून सांगितलं. त्याला माझं बोलणं पटलं. तो म्हणाला, "तू योग्य निर्णय घेतलास. अठरा वर्षे घुसमटत जगलीस. आता मुक्त झालीस ही समाधानाची गोष्ट आहे. मी कृष्णाला बोललो की तू जे केलंस त्याची माफी तुला शरयूने दिली असेल पण परमेश्वर तुला माफ करणार नाही हे लक्षात ठेव."
मी म्हणाले, "दादा, मी तिला माफ केलंय ना मग परमेश्वरसुद्धा तिला माफ करेल. तूसुद्धा मनात काही ठेवू नकोस. तिला माफ करून टाक."
आठ दहा दिवसांनी मी मुग्धाला तिच्या हाॅस्पिटलजवळच्या एका हाॅटेलात भेटायला जायचं. दोन चार महिन्यांनी मी दोन चार दिवसांसाठी दादा वहिनींना, बहिणीला व इतर नातेवाईकांना भेटून यायचे.
काळ पुढे सरकत होता. एकदा दादाचा फोन आला. "कृष्णा खूप आजारी आहे, जमलं तर एकदा तिला भेटायला ये" असं तो सांगत होता. मी "येते" असं त्याला म्हणाले.
दुस-याच दिवशी मी गावी गेले. मी दादा वहिनींबरोबर कृष्णाताईकडे गेले. मला पाहून कृष्णाताईचे डोळे पाणावले. तिची तब्येत खूप खराब दिसत होती. तिला पाहून माझेही डोळे पाणावले.
ती म्हणाली, "मला खात्री होती की तू मला भेटायला येशील अशी !"
मी म्हणाले, "हृदयात बहिणीची माया शिल्लक आहे तोपर्यंत नाही गं तुला तोडता येणार ! अजूनही मी तुझ्यावर खूप प्रेम करतेय."
तिने विचारले, "आमोदला तोडलंस ते त्याच्यावरची आईची माया आटली म्हणून का ?"
मी म्हणाले, "तुझी प्रकृती बरी नाही हे समजलं म्हणून मी तुला भेटायला आले. आमोदचा विषय नको काढून तू केलेल्या अपराधाची बोच तुझ्या मनाला लागेल. तुला क्लेश होईल असा विषय तू काढू नकोस."
ती कशीबशी अंथरुणावरून उठली आणि माझ्या पायावर डोकं ठेवून म्हणाली, "शरू, मी आता फार दिवस जगेन असं मला वाटत नाही. मला मनापासून माफ कर. मी तुझी घोर अपराधी आहे. गेली एकवीस वर्षे मी तुला तुझ्या मुलापासून दूर केलं. मी कावेरीवर आणि तुझ्यावर खूप जळत होते. तुमचं सुख मला पाहावलं जात नव्हतं, तुला सुखानं जगू द्यायचं नाही या हेतूनेच मी तशी वागले."
ती सावकाश बोलत होती पण इतक्या बोलण्याच्या प्रयासानेसुद्धा तिला खूप धाप लागली. मी तिला अंथरुणावर झोपवलं. तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाले, "ताई, मी तुला व आमोदला त्याच वेळी माफ केलं होतं. तू मनात काही ठेवू नकोस, मनावर कुठलंही ओझं ठेवू नकोस आणि स्वतःला क्लेश करून घेऊ नकोस."
श्रांत होऊन तिने डोळे मिटले होते. थोडा वेळ तिच्याजवळ बसून मी तिथून निघाले. कारमध्ये बसल्यावर दादा म्हणाला, "आता तिला पश्चात्ताप होतोय पण काय उपयोग ? एकवीस वर्षे तर तुलाच भोगावं लागलं ना ! आजही भोगते आहेस ना ?"
मी म्हणाले, "नाही दादा, भावोजी होते तोपर्यंत मी आमोदपासून तशी अलिप्तच झाले होते आणि मी घर सोडलं तेव्हा मी आमोदच्या पाशातून पूर्ण मुक्त झाले होते."
दोन दिवस तिथे राहून मी घरी परत आले.
चौथ्या दिवशी दादाचा फोन आला. तो सांगत होता, "परवा रात्रीपासून कृष्णाची प्रकृती खूप खराब झालीय. काल रात्री तिने आमोदला फोन करून त्याला तिच्या प्रकृतीबद्दल सांगून ताबडतोब भेटायला बोलावलं. तो आणि मुग्धा दोघेही तासाभरापूर्वी इथे आले. ते दोघे आणि आम्ही दोघे कृष्णाला भेटायला गेलो. आता तिच्याकडून परत आलो. आमोद घरात शिरलाय. मी तुला बाहेरूनच फोन करतोय. कृष्णाने आमोदला सांगितलं की ती कावेरीवर आणि शरयूवर खूप जळायची, दोघींचा ती खूप हेवा करायची. दोघींचं सुख तिला पाहवत नव्हतं म्हणून तिने त्याच्या मनात विष पेरून त्याच्या मनात शरयूबद्दल तिरस्कार, घृणा निर्माण केली आणि तिला हवं तसं तिने घडवून आणलं. शरयूला दुःखी केल्याचं समाधान तिला मिळालं होतं. ती त्याला म्हणाली की मी आज मृत्यूच्या दारात आहे. मी खोटं बोलणार नाही. आज तुला सगळं सत्य सांगते. तू कावेरीचा मुलगा नाहीस तर शरयूचाच मुलगा आहेस आणि तुझ्या आईने कावेरीला विष देऊन मारलं नव्हतं तर कावेरी बाळंपणातच वारली होती. तिचं बाळही एकोणीस दिवसांनी गेलं होतं. तुझी आई लग्नाच्या आधी तुझ्या वडिलांवर प्रेम करत होती हेसुद्धा मी तुला खोटंच सांगितलं होतं. एकवीस वर्षे तुला आईपासून दूर केलं म्हणून मी तुझी आणि तुझ्या आईची क्षमा मागते. तुझ्या आईनं मला माफ केलंय तसं तूसुद्धा मला माफ कर. इतकं बोलल्यावर तिला खूप धाप लागली. वीस एक मिनिटे ती अर्धवट बेशुद्ध होती. नंतर ती शुद्धीवर आल्यावर ती त्याला म्हणाली की आमोद, मी तुझी आणि तुझ्या आईची घोर अपराधी आहे, मी पाप केलंय. मला माफ कर. शरू, कृष्णाचं बोलणं ऐकत असताना आमोदच्या डोळ्यांतून पश्चात्तापाचे अश्रू वाहत होते. खूप रडला तो ! तो म्हणाला की, माझ्या आईनं तुला माफ केलं ना, मग मीसुद्धा तुला माफ केलं."
दादा बोलत होता तेव्हा माझ्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मी गदगदलेल्या स्वरात म्हणाले, "दादा, कृष्णाताईनं आमोदच्या मनातलं सगळं विष बाहेर काढलं याबद्दल मी तिची ऋणीच राहीन." 
दुस-या दिवशी सकाळी मुग्धाचा फोन आला. ती म्हणाली, "आई, कशा आहात तुम्ही ?"
मी म्हणाले, "मी चांगली आहे. पण यावेळी तू फोन कसा केलास ? तुझी ओपीडी असते ना ?"
ती म्हणाली, "मला तुमची खूप आठवण येतेय. मला तुमचा पत्ता द्या. मी येते तुम्हाला भेटायला."
मी म्हणाले, "तू दगदग करू नकोस. तुला एक दीड तास लागेल ड्राईव्ह करायला. परत जायला तेव्हढाच वेळ. म्हणून मी म्हणते, तू येऊ नकोस, मीच येते तिकडे. आपल्या नेहमीच्या हाॅटेलात भेटू आपण. किती वाजता येऊ मी तिथे ?"
ती म्हणाली, "नको, आज मीच येते तुम्हाला भेटायला. तुमचं घरही मला बघता येईल. गेली तीन वर्षे मी तुम्हाला तुमचा पत्ता मागतेय पण तुम्ही देत नाही. मला तुमचा पत्ता आता हवाय. आताही तुम्ही तुमचा पत्ता देणार नसाल तर मी तुम्हाला कधीच फोन करणार नाही आणि तुम्हाला कधी भेटणारही नाही."
मी म्हणाले, "ए वेडाबाई, इतकी नको रागावूस माझ्यावर ! मी सगळ्यांचे पाश तोडले होते ना, मग तुझ्या पाशात का अडकवलंस मला ? आणि आता मला कधीच भेटणार नाहीस असं म्हणतेस तू !तुझ्या फोनवर पाठवते मी माझा पत्ता. ये तू, मी वाट बघते तुझी."
"ये तू, मी वाट बघते तुझी" असं मी तिला बोलले पण मी खरोखर तिची वाट बघायला लागले. मला माहीत होतं, काल आमोद व ती गावी होते, कृष्णाताईने दोघांना सत्य सांगितलं. ते ऐकून आमोद पश्चात्तापाने खूप रडला. आज सकाळी दोघे तिथून निघाले असतील. तो मला भेटायला खूप आतुर झाला असेल ! मुग्धाने आपला पत्ता घेतला. दोघे सरळ इथेच येतील.
दोघे येतील तेव्हा जेवायची वेळ असेल, ते काही रस्त्यात जेवून येणार नाहीत असा विचार करुन मी स्वयंपाकाला लागले.
मी दोन दोन पाच पाच मिनिटांनी गॅलरीत डोकवायला जायचे. मी त्याला भेटायला उत्सुक झाले. विचार केल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्या मनात त्याच्याबद्दल आई म्हणून ममता होती पण त्याच्याबद्दल प्रेम, ओढ अतिशय तीव्रतेनं उफाळून आली नव्हती तरी मी त्याची उत्सुकतेने वाट पाहत होते  माझ्यावरच्या आरोपातून मी मुक्त झाले होते व त्याच्या मनात आता माझ्याबद्दल तिरस्कार, घृणा शिल्लक राहिली नसेल, मग आता तो मला कसा भेटेल, काय बोलेल हा अनुभव घ्यायला मी उत्सुक झाले होते.
अडीच तासाने त्याची कार खाली उभी राहिली आणि माझी प्रतीक्षा संपली. थोड्या वेळाने दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं. समोर आमोद व मुग्धा उभे होते. आमोद माझ्याकडे अनिमिष नजरेनं पाहत उभा होता. दुस-याच क्षणी तो उन्मन होऊन पुढे झाला आणि त्याने मला मिठी मारली आणि रडू लागला. रडतच तो म्हणाला, "आई, मला माफ कर."
एकवीस वर्षांनी गैरसमजाचं सगळं धुकं विरलं होतं. एकमेकांच्या मिठीत आमचे अश्रू अखंड वाहू लागले होते !

© ...रमेश नागपुरे,
मुलुंड (पूर्व), मुंबई ४०० ०८१
मोबाईल # 98690 75238

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...