शनिवार, २३ मे, २०२६

2832. लीडर

   सभोवताली फक्त शुभ्र पांढरा बर्फ, हाडं गोठवणारी थंडी आणि कानाला बहिरं करणारा वादळाचा शिट्टीसारखा आवाज. १९१५ सालची ती एक काळरात्र होती. अंटार्क्टिकाच्या अथांग पसरलेल्या बर्फाळ समुद्रात ‘एंड्युरन्स’ नावाचं एक जहाज अडकलं होतं. जहाजाच्या लाकडी फळ्या बर्फाच्या प्रचंड दबावामुळं करकर वाजत होत्या, जणू एखादा अक्राळविक्राळ राक्षस त्या जहाजाला आपल्या जबड्यात चिरडतोय. या जहाजावर २८ लोक होते आणि त्यांच्या नजरेसमोर त्यांचं हक्काचं घर, म्हणजेच त्यांचं जहाज, हळूहळू तुकडे होऊन बर्फात गाडलं जात होतं. अशा जीवघेण्या परिस्थितीत सामान्य माणूस घाबरून ओरडला असता किंवा हातपाय गाळून बसला असता, पण तिथं एक माणूस शांत उभा होता. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, तर आपल्या सहकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्याची जिद्द होती. त्याचं नाव होतं, सर अर्नेस्ट शॅकल्टन.
     गोष्ट अशी आहे की, शॅकल्टन हा काही साधासुधा माणूस नव्हता. त्याला अंटार्क्टिका खंड एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पार करायचा होता. १९१४ मध्ये तो आपल्या २७ सहकाऱ्यांसह या ‘इंपिरिअल ट्रान्स-अ‍ॅटलांटिक एक्स्पेडिशन’साठी निघाला खरा, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असताना त्यांचे जहाज बर्फात अडकलं. जहाज अडकल्यावर त्यांनी काही दिवस तिथंच काढले, पण अखेर बर्फाच्या दाबामुळं जहाजाचे तुकडे झाले आणि ते अथांग समुद्रात बुडालं. आता हे २८ लोक उघड्यावर होते. त्यांच्याकडे फक्त काही छोट्या बोटी, थोडं अन्न आणि अफाट इच्छाशक्ती उरली होती.
     विचार करा, उणे ४५ अंश तपमान आणि राहण्यासाठी फक्त बर्फाच्या तरंगत्या लाद्या. पहा काय होतं, अशा वेळी कोणताही नेता आधी स्वतःचा जीव वाचवायचा विचार करेल. पण शॅकल्टन वेगळा होता. त्यानं ठरवलं की, माझ्या एकाही सहकाऱ्याला मी मरू देणार नाही. तब्बल २२ महिने हे लोक त्या बर्फात जगत होते. खाण्यासाठी सील मासे आणि पेंग्विनची शिकार करावी लागायची. पण शॅकलटननं आपल्या टीमचा उत्साह कधीच कमी होऊ दिला नाही. तो त्यांच्यासोबत खेळायचा, गाणी म्हणायचा आणि त्यांना आशा दाखवायचा. जेव्हा परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली, तेव्हा शॅकलटननं एक असा निर्णय घेतला, जो आजही जगातील सर्वात धाडसी निर्णयांपैकी एक मानला जातो.
     त्याने एका छोट्याशा लाकडी होडीत (जिचं नाव 'जेम्स केअर्ड' होतं) आपल्या पाच सहकाऱ्यांना घेतलं आणि ७२० नॉटिकल मैलांचा, म्हणजे सुमारे १३३३ किलोमीटरचा प्रवास सुरू केला. समोर अक्राळविक्राळ लाटा आणि सोसाट्याचा वारा होता. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर ते ‘साउथ जॉर्जिया’ बेटावर पोहोचले. परंतु तिथं पोहोचल्यावरही त्यांचं संकट संपलं नव्हतं. त्यांना मदतीसाठी बेटाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या व्हेल मासे पकडणाऱ्यांच्या तळावर जायचं होतं. त्यासाठी त्यांनी बर्फाळ डोंगर पार केले. अखेर मदत मिळाली. पण शॅकल्टन तिथेच थांबला नाही. त्यानं लगेच आपल्या उरलेल्या २२ सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी मोहीम आखली. पुढचे काही महिने त्यानं सलग प्रयत्न केले. तीन वेळा त्याला अपयश आलं, पण चौथ्या प्रयत्नात तो आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचला. जेव्हा त्याची बोट त्या बर्फाळ बेटाजवळ पोहोचली, तेव्हा त्याने दुरूनच विचारलं, “सगळे जण ठीक आहेत ना?” आणि पलीकडून उत्तर आलं, “हो, आम्ही सगळे जण जिवंत आहोत.”
     या संपूर्ण मोहिमेत, जिथं मृत्यू पावलापावलावर उभा होता, तिथे शॅकलटननं एकाही माणसाचा बळी जाऊ दिला नाही. म्हणूनच आजही मॅनेजमेंटच्या शाळांमध्ये ‘लीडरशिप’ शिकवताना शॅकल्टनचं उदाहरण दिलं जातं. खरा नेता तो नसतो, जो फक्त हुकूम सोडतो. तर खरा नेता तो असतो, जो संकटाच्या वेळी आपल्या टीमच्या पुढं ढाल बनून उभा राहतो. १९२२ मध्ये एका दुसऱ्या मोहिमेवर असताना शॅकलटनचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्याला अंटार्क्टिकाच्या त्याच दक्षिण जॉर्जिया बेटावर दफन करण्यात आलं. आजही त्याचं थडगं तिथं येणाऱ्या प्रत्येक संशोधकाला एकच गोष्ट सांगतं.
‘संकट कितीही मोठं असलं, तरी माणसाची जिद्द आणि आपल्या माणसांवरचं प्रेम त्यापेक्षा मोठं असतं.’
     आजच्या धावपळीच्या जगात, जिथं प्रत्येक जण दुसऱ्याला मागं टाकून पुढं जाण्याचा विचार करतो, तिथं शॅकल्टनची ही गोष्ट आपल्याला थांबून विचार करायला लावते की, आपण आपल्या टीमसाठी, आपल्या माणसांसाठी किती उभे राहतो?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...