शलाकाचं लग्न अमेरिकेत असणाऱ्या संकेत बरोबर झालं व ती परदेशी गेली..नंतर दोनच वर्षात तिचा भाऊ अमित पण शिकायला अमेरिकेत गेला आणि वामनकाका आणि साधनाकाकूंना घर खायला उठले. येणारे जाणारे अभिनंदनाच्या शालजोडीतून सुंदर टोमणे हाणत, “तुमची दोन्ही मुलं अमेरिकेत आता आणि म्हातारे आई-वडील बिचारे भारतात एकटे!”
झूमवर बोलून मुलांचे चेहरे दिसत पण त्यात प्रत्यक्ष भेटीची मजा नव्हती. सणासुदीला तर फार एकटं वाटायच. पण शलाकाला मीरा झाली तेव्हा काका काकू जवळजवळ वर्षभर अमेरिकेत होते. नातीबरोबर दिवस बरे गेले पण परत आपल्या घरी येण्याचे वेध मात्र लागले होते. परत आल्यावर तिच्या आठवणीत डोळ्यात पाणी जमू लागे. कसं करायचं डिटॅच हा यक्ष प्रश्न होता. असेच एक दिवस काका विमनस्क अवस्थेत बसलेले असताना बेल वाजली. काकू “यावेळी कोण ग बाई” म्हणत दुखणाऱ्या गुडघ्यावर हात ठेवत उठल्या. शेजारच्या फ्लॅट मध्ये नुकतीच राहायला आलेली आंध्र मधील ऐश्वर्या बाहेर उभी होती.
"काकू, माज्या नवऱ्याला ॲक्सिडेंट झाली. या माज्या डॉटरला बघेल का तासभर?" मोडक्या तोडक्या मराठी मध्ये ऐश्वर्याने विचारले. तिच्या कडेवर वर्षाची मुलगी होती. काकूंनी क्षणभर विचार केला व हो म्हणून त्यांनी छोटीला कडेवर घेतलं. "काव्या नेम त्याचे." ऐश्वर्यानं तिच्या दुधाची बाटली व काही खेळणी असलेली बॅग काकूंना दिली व ती चार चार वेळा थँक्यू म्हणून नमस्कार करत बाहेर पडली.
आई जाताच काव्यानं मोठ्ठा गळा काढला. "ही जबाबदारी कशाला आता?” काका वैतागले होते पण काकू मात्र काव्याला चिऊ काऊ दाखवत तिला शांत करत होत्या. दूध पिऊन काव्या काकूंच्या मांडीवर झोपली. अगदी मीरा सारखी! काव्याचे गुबगुबीत गाल, कुरळे केस व तिच्या गालावरील खळ्यात काकू हरवून गेल्या. त्या छोट्या बोटांनी काकूंचं बोट घट्ट पकडलं होतं. कधी न सोडण्यासाठी..
तीन तासांनी ऐश्वर्या आली. ऐश्वर्याचा नवरा वृंदावन घरी येत असताना त्याच्या गाडीला बस धडकून त्याच्या पायाचे हाड मोडले होते. वृंदावन बरा होईपर्यंत काव्या काकूंच्या घरची होऊन गेली होती. हल्ली तर काकांना पण काव्याने गुंडाळून टाकले होते. काकांचे पेन घेऊन काव्या पळत होती व काका "लब्बाड मुलगी- आलोच मी..म्हणून तिच्यामागे धावत होते..काकू ते दृश्य डोळ्यात साठवून घेत होत्या.
तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये राहणारी निशा कामत जाता येता काव्या व काका काकूंचा खेळ बघत असे. एक दिवस निशा तिच्या दहा वर्षाच्या मुलाला, अजयला, घेऊन काकांकडे आली. “काका, याला गणित शिकवाल का हो?” इंजिनीयर असलेले काका मनापासून हो म्हणाले.
काव्या व अजय मधे काका काकू रमून गेले होते. काकूंचा गुडघा काव्यामागे धावताना दुखत नाही हे काकांना दिसत होते. काव्या आता तीन वर्षांचा झाली होती. आई वडिलांशी उत्तम तेलगु बोलणारी काव्या काका काकूंमुळे उत्तम मराठी बोलत होती. शाळेचं मिडीयम इंग्रजी त्यामुळे इंग्रजीही येत होते.
मीरा लहान म्हणून शलाका आणि शिक्षण सुरु असल्याने अमित दोन वर्ष भारतात आले नव्हते पण काका काकूंना इतकं उत्साही बघून त्यांना बरं वाटत होतं. काव्या पण फोनवर त्या दोघांशी बोलायची. आपण आई-काका च्या जवळ नाही ही शलाका व अमितची रुखरुख थोडी कमी झाली होती.
त्या दिवशी सकाळी अजयला गणित शिकवत असताना काकांच्या छातीत जोरात कळ आली व ते जमिनीवर कोसळले. काकूंनी पटकन ॲम्ब्युलन्स बोलावली. तेवढ्यात वृंदावनने स्वत:ची गाडी काढली व काकांना श्री हॅास्पिटलमध्ये ॲडमिट केले. तातडीने काकांची बायपास करण्याची जरूर होती. काकूंनी शलाकाला फोन केला. तिनं लगेच पैसे ट्रान्सफर केले. बायपास होईपर्यंत काकू श्रीकृष्णाचे नाव घेत बाहेर बसल्या होत्या. निशा कामत जेवण घेऊन आली होती. बायपास यशस्वी झाली कळताच काकूंनी चार घास खाऊन घेतले..
रात्री झोपण्यासाठी वृंदावन आला होता. ऐश्वर्या काकूंना गाडीतून घरी घेऊन आली. अमितचा जीव काकांना बघण्यासाठी कासावीस झाला होता पण नोकरीसाठी त्याला दोन इंटरव्ह्यू आले होते ते करून त्याने यावे असे काकांनीच सांगितले. शलाका मात्र एका आठवड्यात मीरासह हजर झाली.
"तुम्हाला कसं थॅंक्यु म्हणू” म्हणणाऱ्या शलाकाला वृंदावन म्हणाला,” ताई, ते आमचे पण आई वडील आहेत..काव्याचे आवडते आजा-आजी आहेत. आमचे आई वडील आम्हाला भेटत नाहीत पण ती उणीव काका काकूंनी भरून काढली आहे. आम्ही एकमेकांना मदत केली तर त्यात काय विशेष!”
काका ठणठणीत बरे झाले होते.. त्यांनी व्हॅाटसॲप वर एक लेख लिहण्यास सुरूवात केली..
का धरिला परदेश..
“आपली मुलं परदेशात का गेली हा प्रश्न कित्येकांना सतावतो. सणासुदीला किंवा जरूर पडेल तेव्हा ती भेटत नाहीत. उद्या आपण आजारी पडलो तर काय असं वाटतं. ती पटकन येऊ शकत नाहीत हे खरं आहे..
..अहो पण आपलं मुलं रक्ताचच असायला हवं असं कुणी सांगितलंय?
आमच्या फ्लॅट शेजारी आयटी मधे काम करणारं एक आंध्र मधलं तरुण जोडप राहतं. त्यांची मुलगी काव्या तिचे आई बाबा कामात असताना बरेचदा आमच्याकडे असते. त्यांचे आई वडील जवळ नाहीत आणि आमची मुले जवळ नाहीत.. त्या चिमुकलीनं आम्हाला काय दिलय हे शब्दात सांगता येणार नाही..
माझ्या हार्ट बायपासच्या वेळी काव्याचे आई वडील, वृंदावन-ऐश्वर्या, रात्रंदिवस माझ्या उशा पायथ्याशी बसून होते. चार दिवस सुट्टी टाकून..अमित सारखाच वृंदावन! ऐश्वर्या खाण पिणं, डबा बघत होती..आता थोडं तिखट रसम् भात कधीमधी खायला लागत पण ती दटावते,” काका, वरण वरण म्हणता तसंच केला.. खा आता!” माणसाला नुसतं अन्न नको असतं हो! प्रेमाचं दटावणं पण तेवढंच हवं असतं..
आपली मुलं देशाबाहेर आहेत याचे वाईट वाटून न घेता शेजारी पाजारी नवी नाती जमवा. चाळ संस्कृती अशीच तर होती. तरुणांची जेवढी मदत आपल्याला लागते तेवढीच आपली मदत तरुणांना लागते हे लक्षात असुदे.
गौतम बुध्दांची एक गोष्ट वाचनात आली.. एक बाई तिचा दहा वर्षांचा मुलगा अपघातात गेला म्हणून रडत, छाती पिटत बुध्दांकडे आली..”काय वाटेल ते करा पण माझा मुलगा परत आणा नाहीतर तुम्ही शिकवता ते सगळं थोतांड आहे असं मी म्हणेन..
बुध्द हसले..”आई, तुला तुझा मुलगा हवा आहे ना? देतो.. गावात एक दहा वर्षाचा मुलगा आहे..त्याचे आई वडील नाहीत. त्या मुलात स्वत:चा मुलगा बघ.. तुझा मुलगा त्याच्या रूपात तुला परत देतो!” हात जोडून ती बाई ते दहा वर्षाचं मुल घेऊन घरी गेली..
आम्हाला जसे अमित, शलाका आहेत तसेच वृंदावन, ऐश्वर्या आहेत. निशा व तिचा नवरा सुधीर आहेत. काव्या आणि अजय अशी आमची नातवंडं आहेत. तेच आमच्या इमर्जन्सीला धावून येणार आहेत..ही माणसं आमच्या शेजारी राहायला आली कारण आमचं त्यांच्याशी जुने नाते आहे.. जे ओळखायला थोडा वेळ लागला एवढच!
आम्ही अमेरिकेत वर्षभर होतो..त्या काळात आई वडीलांना बरं नाही असा भारतातून फोन आला की जीव कासावीस होणारी मुलं-मुली आम्ही बघितल्या आहेत.. सगळं सोडून भारतात धावत जाणारी.. 'That dreadful phone call' साठी सर्व योजना करून ठेवणारी.. तरी भारतात यायचं म्हणजे निदान तीस चाळीस तास लागतात..जीव मुठीत घेऊन विमानात देवाचं नाव घेत बसलो व एकदा लँड होताच “ बाबा आहेत ना“ हा प्रश्न व “स्टेबल आहेत” या उत्तराने जीवात जीव आला सांगणारे अनेकजण बघितले आहेत..
पण मित्रांनो.. आपल्या इमर्जन्सीच्या वेळी ते लगेच भेटू शकणार नाहीत याची तयारी ठेवा! मुल वाढवताना माझ्या मृत्युप्रसंगी ते माझं बघेल या भावनेने आपण मुलं वाढवत नाही.. त्यांना पंख द्या व त्यांना मोकळेपणाने उडू द्या.. पण त्यांना घराची ओढ नाही असे आरोप त्यांच्यावर करू नका.. काही अपवाद असतील पण सरसकट सगळी मुलं अशी नसतात.. अमित शलाका काय आणि ऐश्वर्या वृंदावन काय.. काय फरक असतो? हॅास्पिटलमधे माझ्या पायाशी वृंदावन बसला होता पण मला अमितच दिसत होता! ऐश्वर्या भरवत होती पण शलाकाच वाटत होती..
एका चैतन्यापासून बनलेले आपण सर्व..आपले नाते रक्ताचे नाही कसे म्हणू शकतो? आयुष्यात बदल सतत येणार आहेत. त्याला सामोरे जायची आधीच तयारी करा..काहीवेळा एखाद्या नवख्या माणसाबद्दल इतकी जवळीक का वाटते याचा विचार करा..
हे विश्व खरोखरीच आपले घर आहे या भावनेने...
काकांनी पेन बंद केले. त्यांनी पेन बाजूला ठेवताच काव्या धावत पेन घ्यायला आली आणि "लब्बाड मुलगी.. आलो मी पकडायला म्हणत धावताना काका डिटॅचमेंट मधली अटॅचमेंट अनुभवत पळत राहिले..
©® ज्योती रानडे
2025 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा