शनिवार, २३ मे, २०२६

2817. निशिगंध

 अगं दोन महिने झाले मला तुझ्या कडे सतार शिकायला येवून, आपला क्लास संपायला अन् तुझा नवरा घरी यायला एकच वेळ होते. रोज बघते, तुझा नवरा ऑफिस मधून येतांना तुझ्यासाठी काहीना काही घेऊन येतोच ..!
कधी गजरा, कधी गुलाबाची फुलं, कधी भरभरून फुललेल्या निशिगंधाचा बुके तर कधी खायचंच काही, कधी रस मलाई, कधी खव्याची जिलबी कधी समोसे तर कधी बटाटे वडे..!
 असा एकही दिवस जात नाही की तो तुझ्यासाठी काही न आणता आला आहे. किती नशिबवान आहेस तू , नवऱ्याचं अजूनही एवढं प्रेम आहे तुझ्यावर लग्नाला चार वर्ष होऊन गेलीत तरी..! "
"हो अगं त्याला आता माझ्या सगळ्या आवडीनिवडी माहीत झाल्या आहेत तर आणतोच काहीना काही रोज मला आवडणारं, निशिगंधाची फुलं खूप आवडतात म्हणून बरेचदा तेच आणतो..! "
"काय करतेस ग तू की त्याला अजूनही तुझ्या प्रेमात एवढं गुरफटून ठेऊ शकली आहेस ..? "
"कसं असतं ना आपण चुका करत असतो तेव्हा आपण चुकतोय ह्याची जाणीवच नसते आपल्याला. आपलंच बरोबर असं वाटत असतं. तुला पटणार नाही पण सहा महिन्यांपूर्वी आम्ही वेगळे झालो होतो. त्याला क्रिकेटचा नाद , ऑफिसहून तो घरी न येता डायरेक्ट क्रिकेट अकॅडमीत जायचा. घरी यायला रोज दहा साडे दहा वाजायचे. घरी आल्या आल्या चहा जेवण लागायचं. तुला माहितीच आहे महिन्यातून तीन चार वेळा माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्सर्ट्स असायच्या. कधी सोलो तर कधी इतर वादकांबरोबर जुगलबंदी. त्यानंतर जेवणं गप्पा, तेव्हा यायला मला कधी अकरा कधी बारा वाजायचे ..! तरी जातांनाच मी ह्याचा चहा, जेवण टेबलावर काढून जायची ..! तरी हा आल्यावर मी दिसली नाही घरी की आपला पारा चढवून घ्यायचा. मी घरी आल्यावर ह्याची टण टण सुरू व्हायची , एवढ्या रात्री  वेळेचं भान न ठेवता जोरजोरात ओरडायचा माझ्यावर. मग मीही चिडायचे, हा रोज अकराला घरी येतो ते ह्याला चालायचं पण मी महिन्यातून चार एक दिवस थोडी लेट घरी आलेली चालायची नाही ह्याला. ह्याला काय अर्थ आहे. माहीत नाही का मला वाटतं की माझं चार दिवसातलं मानधनच ह्याच्या महिन्याभरातल्या सॅलरी हून जास्त होत होतं म्हणून त्याची चिडचिड व्हायची ..!
     हळूहळू ते सगळं वाढत गेलं. सारखी वादावादी कोण सहन करेल ग म्हणून मी बोलले आपण वेगळं होऊ या. त्याला धक्काच बसला असं त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटलं पण तरी तो खोटं हसत वा अगदी माझ्या मनातलंच बोललीस म्हणत बेडरुम मधे जाता जाता थांबून सोफ्यावर जाऊन झोपला..!
दुसऱ्याच दिवशी पासून आम्ही वेगळं राहू लागलो. मी एका 1bhk furnished फ्लॅट मधे शिफ्ट झाली. घर त्याच्याच नावावर असल्याने तो इथेच राहू लागला ..!
     दोन महिने खूप वाईट गेले , मला रोज दहादा तरी त्याची आठवण यायची. मी कॉन्सर्ट्स नंतर तिथे वेळ न घालवता लगेच घरी यायला हवं होतं असं मला वाटू लागलं. तसा प्रेमळ होता ग तो, मला खात्री आहे की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे तो दाखवत नसला तरी. पण आता तो तिकडे मी इकडे, एक दिवस फोन हातातच असतांना त्याचा कॉल आला मी थोडी रिंग होऊ दिली अन् मग उचलला तो काहीच बोलला नाही. मी पण काही न बोलता नुसता कानाला लाऊन बसली होती. एक मिनिट वाट बघून मी बंद केला..!
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी एक माणूस नुसत्या निशिगंधाचा  बुके देऊन गेला ..! मला अचानक त्याला खूप भेटावसं वाटू लागलं. माझं ही खूप प्रेम होतंच ग त्याच्यावर ..!
'मी कॉन्सर्ट्स करायचे बंद करते अन् आता घरीच सतारीचे क्लासेस घेते.' असा त्याला मेसेज टाकला त्यावर त्याचा काही रिप्लाय आला नाही ..!
दोन दिवस गेले असतील सकाळी बेल वाजली म्हणून मी दुधाचं भांडं घेऊन गेली दार उघडायला तर तो होता. थोड्या वेळ कोणीच काही बोललो नाही, आम्ही दारातच उभं होतो. मी हळूच वर बघितलं त्याच्याकडे तर डोळ्यात पाणी भरलं होतं. त्याच्या मला रहावलं नाही ग , मी त्याच्या गळ्यात पडले , त्यानीही मला घट्ट धरलं ..!
" तू क्लासेस ही घे आणि मिळतील त्या कॉन्सर्ट्स ही घेत जा, मी इतका क्षुद्र मनाचा नाही ग , आई नेहमी म्हणायची मला..
" तू फार तापट आहेस. लहान सहान कारणाने एकदम भडकतोस पण तितकाच प्रेमळही आहेस. तुला कोणाच्या काही गोष्टी पटत नसल्या तरी तुझा राग शांत झाला की दुसऱ्यांसाठी तू त्याकडे डोळेझाक करतो फक्त त्यांनी उलटून बोलायला नको."
पुन्हा आम्ही आमच्याच घरी एकत्र राहू लागलो. दोघांनीही आपल्यात बदल केला होता. तो सकाळी जाऊ लागला अकॅडमीत, मी घरी क्लास घेऊ लागले, अगदीच कोणी मागे लागलं तुम्ही कॉन्सर्ट द्या तर ह्याला विचारून हो म्हणते. तसं तेव्हापासून एकदाही त्यानी नाही म्हटलं नाही, त्याचं प्रमोशन झालं. सॅलरी दीडपट झाली. माझे क्लास मधून मिळणारे उत्पन्न आणि कार्यक्रम कमी देऊ लागल्याने मानधनातून मिळणारं उत्पन्न बरंच कमी झालं त्याच्या वाढलेल्या सॅलरी हून पण हरकत नाही. मी खुश आहे , तो ही खुश आहे , अजून काय हवं..!
    माझ्या अनुभवा वरून तुला सांगते नवरा बायकोना लग्नानंतर एकत्र असतात तेव्हा एकमेकांना धरून चालतात. आपण एकच आहोत, आपण काहीही केलं तरी दुसऱ्याने ऑब्जेक्शन घ्यायचं काहीच कारण नाही असं त्यांना वाटत असतं जे चुकीचं असतं ..! जे काय करायचं ते एकमेकांच्या संमतीने केलं पाहिजे नाहीतर पुढे असे वाद उद्भवू शकतात. कधी कधी वाद विकोपाला जाऊ शकतात मग आपलं कोणावाचून काही अडत नाही असा खोटा आत्मविश्वास वाढून डिव्होर्स घेण्या इतपत निर्णय घेतल्या जातात अन् घेऊन होतातही वेगळे. आम्ही ती मजल मारली नाही , फक्त वेगळं झालो..!
      काही काळ दूर राहिल्या शिवाय आपल्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत. दूर राहणं त्यांच्यातल्या प्रेमाला पटलेलं नसतं म्हणून ते अस्वस्थ असतं. पुन्हा पाहिल्यासारखं भेटायला ते तळमळत असतं, तेच त्यांच्यातला अहंकार काढून घेऊन त्यांना लागेल तो समझोता करायला तयार करतं अन् मग पुन्हा मनं जुळू लागतात. एकमेकांविषयी आदर वाढू लागतो आणि संसाराचा गाडा सुरळीत पणे योग्य मार्गाने पुढे जाऊ लागतो ..! "
"कोणालाही वाटणार नाही ग की तुमच्यासारखी जोडी कधी एकमेकांपासून वेगळी झाली असेल. आत्ताचं तुमचं एकमेकांवरचं प्रेम बघून, पण एका ह्यानी बरं झालं वाईटातली वाईट गोष्ट एकदा घडून गेल्यानंतर तुमच्या जीवनातली घडी आता पुन्हा मोडू शकणार नाही. आता वाईट गोष्टी पुन्हा तुमच्या वाटेला जायची हिंमत करणार नाहीत..!
तुला माहितीये का आज तुझ्या नवऱ्यानी पुन्हा निशिगंध आणलेला दिसतोय तुझ्यासाठी, घरभर बघ कसा सुंदर मंद सुगंध दरवळला आहे..! "

- डॉ संजय जहागीरदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...