शनिवार, २३ मे, २०२६

2828. दोन प्रवाह, एकच स्पंदन

 रात्र हळूहळू पृथ्वीवर उतरली होती. आकाशात तारे डोळे मिचवावून एकमेकांना काहीतरी सांगत होते. पण त्यांची भाषा अजूनही  समजलेली नव्हती. त्या शांततेत, एक तरुण टेकडीवर बसला होता,  प्रश्नांनी भरलेला, उत्तरांच्या शोधात हरवलेला ! त्याने आकाशाकडे पाहिलं आणि विचारलं.
“हे सगळं नेमकं काय आहे?”
त्याच्या प्रश्नाला प्रतिसाद देत, कुठूनतरी दोन आवाज उमटले.
एक स्पष्ट, ठाम; दुसरा शांत, खोल.
“मी सांगतो,” पहिला आवाज म्हणाला,
“मी विश्व उलगडतो.
कणांच्या नृत्यातून, ताऱ्यांच्या प्रवासातून.
मी तुला सांगतो -हे सगळं कसं घडतं।”
तरुणाने वळून पाहिलं.
त्याच्या समोर एक तेजस्वी व्यक्ती उभी होती,
डोळ्यांत जिज्ञासेची ज्योत.
“तू कोण?”
“मी— विज्ञान!”
इतक्यात दुसरा आवाज हळूच उमटला.
जणू वाऱ्याने मनाला स्पर्श केला
“आणि मी तुला सांगतो,” तो म्हणाला,
“हे सगळं का आहे. ”
तरुणाने डोळे मिटले.
आणि त्याला एक शांत अस्तित्व जाणवलं,
अगदी स्वतःच्या आत आत.
“तू?”
“मी— अध्यात्म!”
क्षणभर तिघेही शांत बसले.
तारे वरून पाहत होते,
जणू या भेटीची साक्ष देत.
तरुण थोडा गोंधळला.
“तुम्ही दोघं वेगळं का बोलता?
एक ‘कसं’ सांगतो, दुसरा ‘का’…
मग खरं कोण?”
विज्ञान हसलं.
“मी तुला विश्वाचं चित्र दाखवतो,
पण त्या चित्राचा अर्थ तो कदाचित माझ्याही पलीकडे आहे.”
अध्यात्म शांतपणे म्हणालं
“मी तुला त्या अर्थाचा अनुभव देतो.
पण तो कसा घडतो हे मला शब्दात सांगता येत नाही.”
तरुणाच्या मनात एक लहर उठली.
त्याने पुन्हा आकाशाकडे पाहिलं, 
आणि मग.. 
 स्वतःच्या आत. 
त्याला जाणवलं
बाहेरचं विश्व आणि आतलं मन एकमेकांपासून वेगळं नाहीत.
त्या क्षणी,
विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांकडे पाहून हसले !
“आपण विरोधक नाही,” विज्ञान म्हणालं,
“आपण दोन दिशांनी चालणारे एकच प्रवासी आहोत।”
“हो,” अध्यात्म म्हणालं,
“तू प्रकाश देतोस, मी शांतता.
पण प्रकाशाला अर्थ देणारी शांतता,
आणि शांततेला दिसणारा प्रकाश—
दोन्ही एकत्रच पूर्ण होतात।”
तरुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली.
तो आता उत्तर शोधत नव्हता.
तो समजत होता.
त्याने डोळे मिटले,
आणि त्या क्षणी त्याला जाणवलं.
ना केवळ तारे दूर आहेत,
ना केवळ मन आत आहे;
दोन्ही एकाच स्पंदनाचे दोन स्वर आहेत.
रात्र अजूनही होती,
तारे अजूनही चमकत होते,
पण आता त्या तरुणासाठी अंधार नव्हता.
कारण त्याने दोन प्रकाश शोधले होते.
एक बाहेर,
एक आत.
आणि त्या दोन्हींच्या संगमात त्याला सापडलं एकच सत्य. 
शेवट नाही.
कारण हा प्रवास थांबत नाही.
प्रश्न पुन्हा जन्म घेतात,
उत्तरं पुन्हा बदलतात.
पण आता भेद इतकाच
तो एकटा नाही.
त्याच्यासोबत आहेत
विज्ञानाचा प्रकाश
आणि अध्यात्माची शांतता !
आणि त्यांच्या मध्ये धडधडतंय.
एकच, अखंड स्पंदन !!

©️ दिवाकर बुरसे, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...