शनिवार, २३ मे, २०२६

2888. राघवच्या मॅडम

 अंजलीला आठवी, नववी मराठी आणि दहावीच्या दोन वर्गाचे इतिहासाचे तास मिळाले. शिवाय ती नववी A ची क्लासटीचर पण होती. मराठी शिकवायला मिळणार म्हणून ती आंनदीत होती. कारण ती कथा कविता मध्ये रमणारी होती. पुस्तके वाचायची तिला लहानपणापासूनची आवड.
   रत्नागिरी कॉलेजमधून तिने M. A. केले, बी. एड केले. पण तिला नोकरी मिळाली नाही. सगळीकडे पैसे घेऊन नोकरी. रत्नागिरीत ती क्लास मध्ये शिकवायची. नोकरीची पाच वर्षे वाट बघून शेवटी तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न करून दिले आणि ती मुंबईत आली.
उमेश तिचा नवरा एका फार्मा कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर होता. तिचे सासरे शिक्षण खात्यातून निवृत्त झाले होते,सासू बँकेतून निवृत्त झाली होती.
खरं तर तिला नोकरी करायची गरज नव्हती, पण तिला घरी करमत नव्हते. तिला शिकवायची आवड होती.. तिला अनेक कविता तोंडपाठ होत्या. नाटकातले सवांद तोंडपाठ होते. मराठीसोबत इंग्लिश वाचन होते. या सर्वांचा उपयोग व्हावा असे तिला वाटायचे.
ती शिक्षिकेचा नोकरीसाठी प्रयत्न करत होती.. अनेक ठिकाणी अर्ज, इंटरव्हू झाले.. पण काम होत नव्हते.. पण.. आणि अचानक एका इंग्लिश स्कुलमध्ये मराठी शिक्षकाच्या नोकरीसाठी जाहिरात आली. तिच्या सासऱ्यांनी ती जाहिरात पाहिली.. आणि ते तिला म्हणाले..
'अंजली.. या सेंट थॉमस स्कुल 
मध्ये मराठीसाठी शिक्षक हवाय.. तू अर्ज कर..
'पण बाबा.. मी किती अर्ज केले? त्त्यांचे कुणाला घ्यायचे हे आधीच ठरलेले असते.. उगाच त्रास होतो..
'पण या शाळेत तू अर्ज कर.. या शाळेला वरच्या वर्गाची परवानगी माझ्या काळात मी दिली होती. त्या संस्थेशी अजून माझे चांगले संबंध आहेत.. तू सर्व सर्टिफिकेट जोडून अर्ज तर कर.. पुढचे मी पहातो.
   अंजलीने अर्ज केला.. तिचा इंटरव्हू झाला आणि तिची मराठी विषयासाठी निवड पण झाली. तिच्या नवऱ्याला उमेशला ते फारसे आवडले नव्हते.. पण स्त्री स्वातंत्र्यची त्याला जाणीव नव्हती. त्याने तिला सांगितले..
'अंजली..आपली परिस्थिती उत्तम आहे आणि तूझ्या नोकरीवर आपण अवलंबून नाही.. पण तुला नोकरी करायची आहे, तुझे वाचन, लेखन याचा तुला उपयोग व्हावा.. यासाठी तुला मुलांना शिकवता शिकवताना स्वतःला आनंद मिळवायचा आहे..या साठी तू नोकरी करणार आहेस हे उत्तम पण एक लक्षात ठेव, तुला काही त्रास होत असल्यास कधीही नोकरी सोडू शकतेस..
त्याचा हात हातात घेत अंजली म्हणाली..
'होय रे अमित.. तुमच्या पाठिंब्यावरच मी नोकरी स्वीकारणार आहे.
अंजली खूपच आनंदात होती, बऱ्याच दिवसापासूनचे तिचे स्वप्न पुरे झाले होते.. तिने ठरवले मुलांसमोर जाताना टापटीपीत जायचे, ती कॉलेजमध्ये असताना काही प्रोफेसरमंडळी आणि मॅडम गबाळ्या वेशात यायचे, शाळेत असतानाचे शिक्षक चारचार दिवस दाढी पण करायचे नाहीत.. बाईकडे दोन नाहीतर तीन साड्या असायच्या.. त्यावर म्याचिंग करायचे पण त्यांना जमायचे नाही, चप्पल कसल्यातरी प्लास्टिक्सच्या असायच्या.. आपण तसे करायचे नाही.. त्यात ही इंग्लिश शाळा, इथे मध्यमवर्ग आणि श्रीमंतांचीच मुले येणार.. मग आपण अव्यवस्थित राहून कसे चालेल?
तिने काही चांगल्या साडया निवडल्या, त्यावर मॅचिंग ब्लाउज शिवून घेतले. छान रंगाचे पंजाबी ड्रेस विकत घेतले.चार प्रकारचे सॅन्डल्स घेतले.
एक तारिखला ती शाळेत जॉईन झाली. स्टाफ मधील सह शिक्षकांची तिने ओळख करून घेतली. बरीच सिनियर मंडळी होती.पण तिच्याच वयाची एक शिक्षिका होती.. स्वाती. 
  अंजलीने ठरविले, स्वाती बरोबर दोस्ती करायची. एक तर ती मराठी भाषिक होती आणि तिचेपण दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.
ती स्वाती बरोबर कॅन्टीनमध्ये गेली.
'स्वाती.. तुझे कुठले विषय ग?
'मॅथ्स.. आठवी आणि नववी..
'तुझे?
'मी मराठी आठवी आणि नववी.. दहावी एक वर्ग इतिहास.. नववी क्लासटीचर. कसा आहे ग नववीचा वर्ग?
'मला काही त्रास नाही.. पण हे इंग्लिश स्कुल.. बहुतेक श्रीमंतांची पोर..आपण पण सांभाळून राहायचं..
'हो.. मी तशी तयारीतच असणारं ग आणि मी रत्नागिरीत क्लास मध्ये शिकवलंय.. पण हा साठ मुलांचा वर्ग..
त्या दिवशी वर्गावर जायचे नव्हते.फक्त नवीन मुलांची ओळख आणि स्वागत करणे. दुसऱ्या दिवशी अंजली छान साडी नेसली, त्याला मॅचिंग ब्लाउज घातला, मस्त लाल गुलाब केसात माळला. स्टाफ रूममध्ये तिला स्वाती भेटली.
'छान दिसतेस ग अंजली..
'हो ग स्वाती.. मला टापटीप राहायला आवडत.. आणि ही माझी पहिलीच नोकरी ना.. मी एक्सायटेड आहे पहिल्या दिवसाला.. आज नववीला मराठी तास..
'बेस्ट लक अंजली..
'थँक्स.. तुला पण बेस्ट लक..
     नववीची हजेरीपट घेऊन अंजली वर्गात गेली. तिने आपली ओळख करून दिली.
'मी मिसेस अंजली कामत... याच वर्षी या शाळेत जॉईन झाले. तुमची क्लासटीचर आणि मराठी विषय शिकविणार.. तुमची ओळख करून द्या..
एक एक मुलगा, मुलगी आपली  ओळख करून देत होती. अंजलीच्या लक्षात आले.. ही मुले खात्यापित्याची असल्याने तशी थोराड होती.. तेराचवदा वर्षांची मुले. तिने हजेरी घेतली आणि मराठी कविता शिकवायला घेतली.. तिला कविता फार आवडायच्या.. विशेष करून प्रेमकविता. त्या कविता वाचताना ती रंगून जायची. आज तिने कुसुमाग्राजाची कविता शिकवायला सुरवात केली..
....'पुरे झाले चंद्रसूर्य.. पुऱ्या झाल्या तारका.....
'पुरे झाले नदी नाले.. पुरा झाला वारा..
'मोरासारखा छाती फाडून उभा रहा.. जाळासारखा नजरेत नजर बांधून..
सांग तुला, तूझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा..
 अंजली भान हरपून कविता शिकवत होती.. एका पुरुषाला प्रेमात आव्हान देणारी कविता ही.. अंजलीच्या तोंडून ते प्रेमरस ऐकता ऐकता ती तेराचवदा वर्षांची मुले उत्तेजित झाली होती.. वातावरण धुंद झाले होते.. एव्हड्यात एका कोपऱ्यातून एक हलकीशी शीळ ऐकू आली..
ती शीळ ऐकताच सर्व वर्गाचे लक्ष तिकडे गेले. अंजली पटकन थांबली.. तिने शीळ आलेल्या दिशेने पाहिले.. एक क्षणभर.. आणि झटक्यात मान फिरवली आणि ती मटकन खुर्चीत बसली..
मुले ओरडली..
'मॅडम.. राघव तो.. राघव. राघव बंगेरा.
अंजलीचे हृदय धडधडू लागले.. आता आपल्याला उलटी होणार असे वाटतं असताना तास संपल्याची बेल वाजली.
मुले घोळक्याने बाहेर पडली.. मग हळूहळू अंजली बाहेर पडली आणि स्टाफरूममध्ये येऊन खुर्चीत बसली. सुदैवाने तिला पुढील दोन तास नव्हते.
   ती डोळे मिटून होती.. मघा नववीच्या वर्गातील प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत राहिला... ती तोंडाने म्हणत होती..' सांग तुला तूझ्या मिठीय स्वर्ग आहे सारा..
ही ओळ म्हणत असताना कोपऱ्यातून हलकीशी शीळ आली.. आणि आपण चमकून त्या दिशेने पाहिले.. क्षणभरच..
  तो मुलगा.. उंच, पिंक केसवाला.. भोरा.. त्याच्या नजरेत दिसलेली वासना.. वासनेने डबडबलेले त्याचे डोळे.. लाल गळते आहे की काय असे वाटणारे, आपल्याकडे बभूक्षित नजरेने पहाणारे...
एक क्षणभरच..
त्याची ती नजर पहाताच आपण लटपटलो.. तेरा चौदा वर्षाचा नववीतील हा मुलगा.. असेल उंच, धडधाकट.. पिंक केसाचा, पण आपले वय जवळपास दुप्पट.. तरी ही कामुक नजर?
दुसरा तास संपला तशी स्वाती स्टाफरूममध्ये आली, अंजली डोके धरून बसलेली पाहून ती म्हणाली...
'अंजली.. बर वाटतं नाही काय?
'नाही, तस नाही. दोन तास ऑफ आहेत ना, त्यामुळे स्वस्थ बसले झाल..
'बर.. मी जाते दुसऱ्या तासाला..
स्वाती गेली.. तिसऱ्या तासाची बेल वाजली तशी अंजली उठली आणि दहावीवर इतिहास शिकवायला गेली. पण तिचा आज लक्ष नव्हता.. सतत त्या नववीतील राघव आणि त्याची नजर तिचा पाठलाग करत होती..
रात्री तिचा नवरा उमेश पटकन झोपला पण तिला झोप येईना... या राघवचे काय करायचे हे तिला कळेना.. आता त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, तो जिथे बसतो... त्या दिशेने पाहायचेच नाही असे तिने ठरवले. 
दुसऱ्या दिवशी ती नववीच्या वर्गावर गेली. हजेरी घेताना तिच्या लक्षात आले, राघव बंगेरा हजर आहे.. कालची अर्धवट राहिलेली कविता तिने शिकवायला सुरवात केली..
'..... सांग तिला, तूझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा..
आज पण राघवच्या दिशेने हळूच शीळ आली..
पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तिने कविता पुरी केली, तास संपला.. नववीचा पुढील तास स्पोर्ट्स होता.. त्यामुळे मुले घोळक्याने बाहेर पडू लागली.. अंजली पण मुलामधूनच बाहेर पडत होती.. एव्हड्यात तिच्या पाठीला कुणाचा तरी स्पर्श झाला.. हा मुद्दाम केलेला स्पर्श हे तिने ओळखले आणि झटक्यात मान फिरवली... राघव तिच्या मागेच होता.. तसेच लालची हसू डोळ्यात घेऊन.. त्यानेच मुद्दाम पाठीला स्पर्श केला हे तिने ओळखले आणि त्याच्या कानाखाली एक ठेवून द्यावी असे तिच्या मनात आले.. पण तिने तसे केले नाही.. उगाचच आपल्या पहिल्या नोकरीच्या आठवड्यात आपली वाईट हेतूने चर्चा झाली असती.. एव्हड्यात त्याच वर्गातील शरयू ने तिला विचारले..
'मॅडम.. कुसुमाग्रज नाशिकला राहायचे ना?
त्या घोलक्यात ती तिच्याकडे पहात म्हणाली..
'होय ग.. बरोबर आहे तुझं.
आणि ती क्लासरूमच्या बाहेर पडली आणि स्टाफरूमकडे गेली.
अंजलीचे डोके भणाणले होते.. ती कशीबशी स्टाफरूममध्ये खुर्चीत येऊन बसली. स्वाती तिच्या बाजूलाच होती..
'काय झाले अंजू? चेहेरा असा का? काही झाले का?
'चल माझ्याबरोबर वॉशरूमपर्यंत?
स्वाती तिच्याबरोबर बाहेर पडली.
'स्वाती, तू पण नववीला शिकवतेस ना?
'हो ना.. मॅथ्स घेते ना मी नववीचे..
'मग त्या वर्गातील राघव बंगेरा तुला माहित असेल..
'राघव? तो पिंक केसवाला?
'तोच.. इतर मुलांच्या मानाने थोराड दिसणारा.... अग तो सतावतोय, मी कविता शिकवत होते कुसुमाग्रज्यांची.. तर तो शीळ घालत होता, मी त्याच्याकडे पाहिले तर त्याची नजर.. लाळघोटी पुरुषासारखी, वासनेने ओथंबलेली..
'काय म्हणतेस?
'अग आज तर क्लास सुटला आणि मूल घोळक्याने बाहेर पडत असताना त्याने हेतपुरस्कर माझ्या पाठीला स्पर्श केला.. मी रागाने पाहिले तर.. त्या दिवसासारखीच विषारी नजर..
'मग तू गप्प बसलीस?
'त्याच्या थोबाडीत मारावेसे वाटले मला... पण तो थोराड दिसत असला तरी कोवळा मुलगा आहे ग तो? तेरा चवदा वर्षाचा.. असा कसा काय वागू शकतो तो माझ्याशी?
'खरं सांगू अंजली.. मी त्याला दोन वर्षे शिकवतेय.. किंवा अजून बऱ्याच लेडी टीचर त्या वर्गावर जातात.. पण कुणालाच असा अनुभव आलेला नाही.मग तू प्रिन्सिपॉल कडे तक्रार दे ना..
'नको.. अजून लहान आहे तो.. त्याची बाजू पण समजायला हवी.
तिने ठरवले, नवऱ्याला उमेशच्या कानावर पण घालावे, कारण यदाकदाचित अशा परिस्थितीमुले नोकरी सोडायची आली तर नवऱ्याला आपली बाजू माहित असावी.
     रात्री तिने उमेशला राघव बंगेरा बंद्दल सांगितले.त्याची चटकन प्रतिक्रिया..
'दोन थोबाडीत द्यायला हव्या होत्यास तू.. अग, तेरा चवदा वर्षांची मुले म्हणजे लहान नव्हेत.. मुली जशा अकरा बाराव्या वर्षी वयात येतात तसेच मुलगे पण.. त्याना स्त्री देहाचे आकर्षण वाटायला लागत.. हल्ली अशा बऱ्याच बेबसिरीज आल्या आहेत.. त्यात विदयार्थी आणि तरुण टीचर यांचे रोमान्स दाखवतात.. ते ही मुले पाहतात आणि त्याना वाटते.. मी पण टीचरसोबत असा रोमान्स करू शकेन.. अशी स्वप्ने ती पहातात.. मी तुला मागेच सांगितले आहे.. तुला त्रास होत असेल तर नोकरी सोडून दे म्हणून..
उमेश झोपी गेला पण अंजलीला झोप येईना. सतत राघवचा चेहेरा डोळयांसमोर येत राहिला.. राघव इतर लेडी टीचरसोबत कधीही असा वागलेला नाही.. त्याचा वर्गातील परफॉर्मन्स उत्तम आहे.. मग माझ्याशीच असा का वागतोय?
काही तरी कारण असणारं.. पहाटे पहाटे तिला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी ती नववीच्या वर्गावर गेली तेंव्हा तिने मुलांना कवितेखालच्या प्रश्नांची उत्तरे लिहून आणायला सांगितली होती.. मुले आपल्या वह्या आणुन देत होती.. तिचे लक्ष होते.. राघवने पण वही तिच्याकडे दिली. तिने हळूच त्याची वही उघडली.. पहिल्याच पानावर वर्गात शिकवणाऱ्या टीचरचे चित्र त्याने काढले होते.. त्या खाली लिहिले होते.आय लव्ह यू.. पुढे परत लिहिले होते.. आय हेट यू... परत आय लव्ह यू.. आय हेट यू..
या मुलाच्या मनात काही तरी वादळ असल्याचे तिच्या लक्षात आले.
लव्ह. पाठोपाठ हेट.. हा मुलगा इतर लेडी टीचरना सोडून आपल्यालाच का त्रास देतोय?
    लंचटाइम मध्ये तिने शाळेचा शिपाई केशव याला बोलावले..
'केशव.. माझे एक काम कर.. नववी मध्ये राघव बंगेरा नावाचा मुलगा आहे.. त्याच्या आईबाबा विषयी आणि त्या कुटुंबा विषयी माहित काढ..
केशव दुसऱ्यादिवशी अंजलीला म्हणाला..
'मॅडम.. या बंगेरा सायबाचे चार पाच पेट्रोलपम्प हाईत.. हा तिकडे लोखंडवाला मध्ये राहतो.. लय श्रीमंत हाईत.. पर त्याची बायको त्याच्याबरोबर न्हाय राहत..
केशवने राघवच्या वडिलांच्या ऑफिसचा पत्ता दिला. अंजलीने ठरवले.. त्याच्या बाबांना भेटायचे.
दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर ती बंगेराना भेटायला म्हणून अंधेरीला गेली. बाहेरच्या माणसाला तिने 'राघवची टीचर ' असा निरोप दिला. दुसऱ्या मिनिटाला तिला आत बोलावलं गेलं..
आत बंगेरा आणि त्त्यांचा एक माणूस बसला होता..
का कोण जाणे पण ती आत जाताच बंगेरा चपापला..
'या मॅडम.. तुम्ही अंजलीमॅडम काय?
'होय.. पण तुम्हाला माझे नाव कुणी सांगितले?
'राघवने..'
'राघवने? अहो, त्याच्या तक्रारी मी तुम्हाला सांगायला आले होते..
'राघवच्या तक्रारी? त्याने काय केले?
तिने पहिल्या दिवसापासूनच्या राघवच्या गोष्टी त्याना सांगितल्या.. तसेच तिने सोबत वही आणली होती.. त्यातील,'आय लव्ह यू.. आय हेट यू.. असे लिहिलेले आणि पहिल्या पानावर तिचे चित्र दाखवले..
बंगेरानी ती वही पाहिली.. मग तो बोलू लागला..
'मॅडम.. हे आय लव्ह यू.. आय हेट यू.. हे त्याने आपल्या आईला लिहिलेय, तुम्हाला नाही..
'म्हणजे?
बंगेराने आपल्या पॉकेटमधून एक फोटो काढला आणि तो अंजलीसमोर ठेवला.. अंजली पहातच राहिली.... त्या फोटोतली बाई बरीचशी अंजलीसारखी दिसत होती किंवा अजून दहा वर्षांनी अंजली कशी दिसेल तशी ती होती.
'कोण आहे ही बाई? बरीचशी माझ्यासारखी दिसते..
', हा फोटो राघवच्या आईचा.. मघा तुम्ही आत येताच मी दचकलो कारण तुम्ही माझ्या पत्नीसारख्या दिसता..
'मग आता कुठे आहे राघवची आई?
'सहा महिन्यापूर्वी राघवच्या आईने आम्हाला म्हणजे मला आणि राघवला सोडल आणि तिने दुसरे लग्न केल..
'ओहो नो..
'अस आहे मॅडम... राघवची या आधी कसलीही तक्रार नाही आलेली.. पण तो मनातून उध्वस्त झालाय.. खूप विचार करत असतो.. त्याच्या आईचा त्याला खूप लळा होता, म्हणून तो, तुम्ही तिच्यासारख्या दिसता म्हणून.. तुम्हाला लव्ह यू म्हणतो आणि हेट यू अस सुद्धा म्हणतो. त्याला आपल्या आईला त्रास द्यायचा असतो..
तो तुम्हाला देतो.. तुम्हाला मागून स्पर्श करतो, खरं तर तो त्याच्या आईला मागून धक्का देत असतो. मी तुमची माफी मागतो मॅडम.. तुमच्या जागी दुसऱ्या मॅडम असत्या तर त्यानी प्रिन्सिपॉलना सांगून राघवला घरी बसवलं असत.. किंवा मुलासमोर थोबाडीत दिली असती.. पण मॅडम.. तो तुमचा आदरही करतो.. त्याने मला काल तुम्ही शिकविलेली मराठी कविता म्हणून दाखवली..
'पुरे झाले चंद्र सूर्य.. पुरे झाले तारे..
अंजलीच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले.
'बंगेरासाहेब... मला क्षमा करा.. मला काहीच कल्पना नव्हती हो... खरं सांगू.. मला सोबतच्या शिक्षिका अशा मुलांना शिक्षा करावी अस सांगत होत्या.. माझा नवरा या मुलाच्या दोन थोबाडीत द्यायला सांगत होता, पण.. माझे मन.. कदाचित एका आईचे मन सांगत होते, हा मुलगा असा नाहीये.. काहीतरी चुकत होते, त्यांच्याबाबतीत.. त्याच्या आईच्या वयाची मी.. तो असा कसा वागेल?
'झाले ते झाले मॅडम.. मी माझ्या मुलाला दुसऱ्या शाळेत घालतो.. परत तुम्हाला त्रास..
'अस करू नंका बंगेरा साहेब.. त्याला आमच्याच शाळेत पाठवा.. त्याच्या आईसारखी दिसते ना मी.. आता त्याची आईच होईन. तुम्ही निश्चिन्त रहा.

    प्रदीप रामदास केळुस्कर... 9422381299/9307531152.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...