शनिवार, २३ मे, २०२६

2821. भक्ष्य

      मडगांवच्या मार्केटमधून फेरफटका मारत, रमत गमत अविनाश त्याच्या रुमवर पोहोचला. आज दुपारीच तो काम करत असलेल्या ऑफिसमधून, झालेल्या त्याच्या बदलीवर मुंबईहून मडगांवला आला होता. ही बदली खरंतर मिळणार्‍या प्रमोशनच्या संधीखातर त्यानंच  स्विकारली होती. अविनाशच्या लग्नाला जेमतेम एकच वर्ष झालं होतं आणि तेवढ्यात हे बदली प्रकरण उद्भवलं होतं. बायकोला नाना परीनं समजावून, कामावर हजर व्हायच्या दोन दिवस आधी, ऑफिसनंच केलेल्या रुमच्या सोयीची प्रत्यक्षात येऊन खातरजमा करायला तो अखेर इथं आला होता. इथं सारं काही व्यवस्थित मार्गी लागल्यावर तीन-चार महिन्यांनी अविनाश आश्लेषालाही त्याच्यासोबत मडगांवला नेणार होता. हो-नाही करता करता अखेर, आश्लेषाही तयार झाली होती. 
      दुपारी रूमवर सामान ठेऊन काही अत्यावश्यक वस्तू आणण्याकरता लगोलग अविनाश बाहेर पडला होता कारण आज नाही पण निदान उद्यापासून तरी घरी त्याचंच त्याला सगळं करावं लागणार होतं. त्याप्रमाणं स्वैपाकपाण्यासाठी लागणारे, थोडे थोडके जिन्नस घेऊन तो आला होता आणि आजच आलोयत तर रात्री जरा घसा शेकावा, म्हणून त्यानं ओल्डमंकची एक क्वार्टर नी एक थम्सअपची बाटलीही आणली होती. मुंबईहून स्वतःच्या सामानाखेरीज, तो त्याच्या त्या आवडत्या लव्हबर्ड्सच्या जोडीचा पिंजरा घेऊन आला होता. त्याला त्यांचा तो अखंड चिवचिवाट कमालीचा आवडत असे, नी आश्लेषासाठी तीच प्रचंड डोकेदूखी होती. त्यामुळं आश्लेषानंही अगदी हसतच, तो पिंजरा घेऊन जायला अविनाशला होकार दिला होता. सध्या तो पिंजरा अविनाशनं स्वयंपाकखोलीच्या ड्राय बाल्कनीत, एका स्टुलावर ठेवला होता. हातात सामानाच्या दोन पिशव्या घेऊन अविनाश दाराशी पोहोचला तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते. पॅसेजमध्ये असलेली ट्यूब अतिशय भकासपणे पेटली होती, नी मध्येच फडफडतही होती. अविनाशला शेवटच्या मजल्यावर घर मिळालं होतं आणि तिथं त्याचा एकच फ्लॅट होता; ज्याच्या वर टेरेस होती. बर्‍याच जुन्या अशा त्या चार मजली बिल्डिंगला अर्थातच लिफ्ट नव्हती. चार मजले चढून आलेल्या अविनाशनं धापा टाकतच दोन्ही पिशव्या एका हातात घेतल्या, नी खिशातून चावी काढली. त्यानं चावी की-होलमध्ये टाकली, आणि त्याला आत खोलीत झालेली कसलीशी हालचाल जाणवली.
       क्षणभरच त्यानं कानोसा घेतला नी भास झाला असेल, असं स्वतःशी ठरवत दरवाजा उघडून तो आत आला. आत अंधार होता पण पॅसेजमधली ती भकास ट्यूब किंचितसा का होईना उजेड पुरवत होती. घर नविनच असल्यानं त्याच्या हाताला स्विचबोर्डच्या दिशेची सवय नव्हती, की तो आपोआप तिथं वळेल. अविनाश डोळे मोठे करून पहातच होता की, त्याला उघडलेला दरवाजा जिथं संपतो तिथून फुटभर अंतरावर उजव्या भिंतीला स्विचबोर्ड दिसला. अविनाश बटण ऑन करायला आत शिरला अन् तितक्यात त्या पॅसेजमधल्या ट्यूबनं तिचा उरला सुरला प्राण सोडला. 
       आता मात्र गुडूप अंधार झाला होता. इतका की अविनाशला त्याचं स्वतःचंही अंग दिसत नव्हतं. उघडपणे एक ‘भ’ची पाठोपाठ ‘म’ची शिवी हासडून तो तसाच अंदाजानं स्विचबोर्डपर्यंत आला. हातानं चाचपडत त्यानं एक बटण लावलं… मग दुसरं लावलं… मग तिसरं, चौथं, पाचवंही लावलं… पण एकही लाईट लागला नाही. थोडक्यात पाॅवरच कट झाल्याचं, अविनाशच्या लक्षात आलं. आणखी दोन-चार शिव्या हासडत, तो दरवाजा बंद करण्यासाठी वळला. पण उघडलेला दरवाजा त्याच्या हातालाच लागेना. तो ज्या भिंतीवर उघडला होता, तिथं वरपासून खालपर्यंत त्यानं चाचपडलं, पण त्याला काही दरवाजा मिळेना. तसाच तो आणखी पुढं गेला, नी दाणकन बंद दरवाजावर आपटला.  
‘अरे ! दरवाजा कसा बंद झाला? मी तरी नव्हता लावला. बरं वार्‍यानं बंद झाला म्हणावा, तर मग तो आपटल्याचा नाही, निदान लागल्याचा तरी आवाज आला असता!’ असा विचार मनात येऊन अविनाश चमकला. तो भांबावून असा विचारच करत होता की, त्याला त्याच्या बरोब्बर मागं कसलीशी हालचाल पुन्हा जाणवली. तो गर्रकन मागं वळला, पण अर्थातच काळोखाशिवाय डोळ्यांना काहीही दिसत नव्हतं.
‘मी पण स्साला कीती मूर्ख…’ असं मनात म्हणत अविनाशनं पँटच्या खिशातून मोबाईल काढत त्याचा टाॅर्च ऑन करून तो त्यानं त्याच्या छातीच्या रेषेत आणला आणि त्याच्या हातातून मोबाईल खालीच पडला. अविनाश कमालीचा भेदरला होता. त्या टाॅर्चच्या क्षणभराच्या उजेडातच त्याला मोकळे सोडलेले केस तोंडावर घेतलेली, एक बाई दिसली होती. मोबाईल खाली पडल्यामुळं अर्थातच टाॅर्च बंद होऊन, पुन्हा सभोवताली काळाकुट्ट काळोख पसरला होता. अविनाश आता पुरता थिजला होता, जागच्याजागी खिळला होता. मिनिटभरानं भानावर येत, तो पडलेला मोबाईल उचलण्यासाठी अविनाश खाली वाकतच होता, की लाईट्स आले. अविनाशनं झपाझप इथं तिथं पाहिलं. हाॅलमध्ये कुणीही नव्हतं. तो तातडीनं स्वयंपाकखोलीत गेला, त्यानं तिथला दिवा लावला. घाईघाईनं बेडरुममध्ये जाऊन, तिथला दिवाही लावला. पण त्याला ना कुणी दिसलं, ना कुणाची चाहूल लागली. बेडरुममधून बाहेर येतांना काहीतरी सुचून, त्यानं एकत्रच असलेल्या टाॅयलेट-बाथरुमचा दरवाजाही उघडून पाहिला. परंतु तिथंही कुणीच नव्हतं.
“काय पण च्यायला भास होतायत एकेक... जीवच जायचा…!” असं म्हणतच अविनाशनं बाहेरचे कपडे बदलून, घरातले कपडे अंगावर चढवले. स्वयंपाकखोलीत जाऊन एक प्लेट घेतली, एक स्टीलचाच ग्लास घेतला. नी तो बाहेर हाॅलमध्ये आला. सोफ्यावर बसत त्यानं समोरच्या टिपाॅयवर ती प्लेट ठेवली, नी त्यात आणलेले चणे नी खारे दाणे काढले. ओल्डमंकची बाटली उघडून ग्लासमध्ये एक पेग भरला. त्यात थम्सअप ओतलं. ग्लास उचलून तो स्वतःलाच चिअर्स म्हणाला, नी पुन्हा लाईट्स गेले !
अविनाशच्या चहूबाजूला पुन्हा एकदा गर्द अंधार दाटला. पण ‘चिअर्स केल्यानंतर, एक घोट घेतल्याशिवाय ग्लास खाली कसा ठेवायचा?’ असा विचार करून, पहिला घोट मारत त्यानं ग्लास टिपाॅयवर ठेवला आणि मोबाईलचा टाॅर्च लावत, त्यानं तो स्वतःच्या बाजूला ठेवला. प्लेटमधले दोन चार चणे-दाणे त्यानं तोंडात टाकले आणि टिपाॅयवर ठेवलेला ग्लास तो उचलायला जाणार. तोच त्याला दिसला एक हात. एका बाईचा हात. त्या ग्लासभोवती ! पुढं नेलेला हात अविनाशनं झटक्यात मागं आणला आणि दुसर्‍या हातानं बाजूला ठेवलेला मोबाईल उचलत, त्यानं टाॅर्च समोरच्या दिशेला मारला. ती मघा दिसलेली, केस मोकळे सोडलेली बाईच पुन्हा अविनाशला दिसली. तोंडावर आलेल्या उजेडामुळं, त्या बाईनं तिच्या तोंडावर एक पंजा उपडा ठेवला होता. पांढर्‍या साडीतल्या त्या बाईकडे बघून, आता मात्र अविनाशची पुरती बोबडी वळली होती. काहीच न सुचून, तो तसाच तिच्या चेहर्‍यावर टाॅर्चचा झोत ठेवून बसला होता.
      तेवढ्यात त्या बाईनं तोंडावरचा उपडा हात बाजूला केला नी अतिशय कर्कश्य आवाजात, दात विचकत ती हसली. अचानक हसणं थांबवून, ती जोरात किंचाळली. आणि अविनाशचा मोबाईल त्याचवेळी, बॅटरी पुर्णपणे संपल्यामुळं बंद पडला. अविनाश पुर्णतः गलितगात्र झाला होता एव्हाना. तो तसाच जागेवर बसून होता, त्याला वेढून असलेल्या काळोखाच्या विळख्यात. आता अविनाशच्या सभोवतालीभयाण शांतता होती. कुणीही समोर वा आजूबाजूला असण्याची, पुसटशीही चाहूल नव्हती. अविनाश देवाचा जप करत, काही वेळापुर्वी त्याला दिसलेला तो चेहरा आठवत बसला होता. चेहरा अर्थात झाकला गेला होता, त्यावर आलेल्या केसांमुळं. पण ते विकट हसतांना, नी नंतर किंचाळतांना दात मात्र दिसले होते त्याला त्या बाईचे... पुर्णतः रक्ताळलेले.... जसं नुकतंच काहीतरी... अगदी ताजं ताजं कोणाचं तरी मांस. आणि तेवढ्यात सण्णकन अविनाशच्या डोक्यात आलं की, ‘अरे ! इतकावेळ झाला… मला माझ्या लव्हबर्ड्सचा चिवचिवाट कसा ऐकू नाही आला? म्हणजे त्या बाईनं त्या इवल्या पक्ष्यांना. आय मीन दॅट ब्लडी बिच.’  अविनाशच्या डोक्यात हा विचार आला आणि पाठोपाठ त्याच नी तशाच आसूरी हास्याचा आवाज पुन्हा आला. ह्यावेळी आणिक मोठा कानठाळ्या बसवणारा. तो आवाज आता वाढत जात होता हळूहळू… की… की हळूहळू जवळ येत होता अविनाशच्या? आता तर तो आवाज त्याच्या अगदी कानाशी आला. फक्त भेसूर, कर्णकर्कश्य असा आवाज. काळोखात विरघळून गेलेल्या शरिराचा आणि पुन्हा आली पाठोपाठ, एक काळीज चिरत जाणारी किंकाळी. अविनाशनं आपले दोन्ही हात, दोन्ही कानांवर घट्ट दाबून ठेवले. आणि त्या गर्द काळोखातही, आपले दोन्ही डोळे त्यानं गच्च बंद करुन घेतले.  अविनाशच्या मिटल्या डोळ्यांभोवती जसा उजेड पसरत गेला, त्याला ऐकू येऊ लागला एक घोगरा आवाज, जो हळू हळू नाॅर्मल होत गेला…
“अहो, अहो... उठा आता. सात वाजून गेले. तुमची आज बस आहे ना, बारा वाजताची मडगांवसाठी? आणि ते हात का बरं कानांवर घेतलेत? अहो, ऐकताय का? चला उठा पाहू, नी आवरुन घ्या बरं.” आश्लेषा अविनाशला जागं करत होती.
अविनाशनं गच्च मिटून घेतलेले डोळे उघडले. दोन्ही कानांवर ठेवलेले हात खाली घेतले अन् ताडकन तो पलंगावर उठून बसला. त्यानं घड्याळात पाहिलं, सव्वासात वाजायला आले होते.
‘म्हणजे... म्हणजे आपण स्वप्न पहात होतो…? ते सगळं… ते… ते सगळं खोटं होतं…? ओ ग्गाॅड… थँक यू सो मच… मी वाचलो… मला वाटलेलं की ती हडळ, आता मला ही खाणार... मलाही? म्हणजे आणखी कुणाला खाल्लेलं तिनं?’ त्याला काही केल्या ते आठवत नव्हतं. 
तो हा विचार करतच होता की, आश्लेषाने जवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अविनाश कमालीचा दचकला, भानावर येत तो आश्लेषाला म्हणाला,
“हे प्रमोशनवर बाहेरगावी जायचं, इतक्यात नकोच असं वाटतंय मला. सो ॲम गोईंग टू टेल माय बाॅस टू लूक फाॅर समबडी एल्स. मला जमेल असं वाटत नाहीये. आश्लेषा, माझा चहा ओतून ठेव. मी. मी आलोच बाॅसला काॅल करुन.”
आश्लेषानं आपला एक हात अविनाशच्या छातीवर ठेवला, नी त्याला म्हणाली, “हेच तर मी तुम्हाला सांगून दमले. अहो, आत्ता कुठं वर्ष होतंय लग्नाला आपल्या, नी तुम्ही मला सोडून चाललेलात. पण मला खात्री होती, तुम्ही नाही जाणार त्याची.अशी बरी जाऊ देणार होते मी तुम्हाला." 
“आणि हो... तुम्हाला सांगायचं म्हणजे... अहो, आपल्या लव्हबर्ड्सचा पिंजरा रिकामा दिसतोय. पिसं पडलीयेत त्यात... त्या खालच्या मांजरीनं अखेरीस डाव साधलेला दिसतोय. पण तुम्ही नका नर्व्हस होऊ.. अहो, आपण आहोत ना एकमेकांसाठी... वुई बोथ आर ऑल्सो लव्हबर्ड्स... आरन्ट वुई?”
एवढं बोलून आश्लेषा हसू लागली… आणि… आणि अविनाशच्या लक्षात आली, ती तिच्या दातांची ठेवण. पुढचे दोन दात किंचितसे आत, नी ते टोकदार सुळे... आश्लेषा अजूनही हसत होती आणि अविनाश पाहत होता तिच्या मागं दिसणार्‍या, गॅलरीत टांगलेल्या त्या हेलकावे खाणार्‍या रिकाम्या पिंजर्‍याकडे. 
‘बघितलेलं स्वप्न जास्त भयानक होतं, की आता सामोरं जावं लागणारं सत्य?’ गात्र न गात्र थंडगार पडलेला आणि आता कुणाच्यातरी भक्ष्यस्थानी पडण्यासाठी स्वतःच पिंजर्‍यात अडकलेला अविनाश हा विचार करत होता.

- सचिन देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...