मध्यम उंची, सडपातळ बांधा, गव्हाळ वर्ण, शोल्डर कट आणि आकर्षक पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या नेहाने रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला तेव्हा एकही टेबल रिकामे नव्हते. निदान १५-२० मिनिटे थांबावे लागणार होते. उजव्या कोपऱ्यातील टेबलसमोर एक रुबाबदार तरुण एकटाच बसला होता. “सर, मी या खुर्चीवर बसले तर चालेल का?” नेहाने विचारले. “हो, बसा की. माझी काहीच हरकत नाही. प्लीज बसा आणि बी कम्फर्टेबल,” तो तरुण म्हणाला.
नेहाने वेटरला दोन-तीनदा खुणावत आवाज दिला आणि तिची नजर सारखी घड्याळाकडे जात होती हे पाहून तो तरुण म्हणाला, “मॅम, तुम्ही खूप घाईत दिसता. सगळं ठीक तर आहे ना?” “हो सर, मी खरंच घाईत आहे. मी एमबीए करतेय नि आज माझा शेवटचा पेपर आहे. परीक्षेचे सेंटर एस. पी. कॉलेज आहे आणि मला तिथे ११ वाजेपर्यंत पोहोचायचे आहे.”
ऑर्डर घ्यायला आलेल्या वेटरने विचारले, “काय हवे आपल्याला?” “कांदा उत्तप्पा,” नेहा म्हणाली. “भय्या, दोन कांदा उत्तप्पा, जरा लवकर द्या,” तो तरुण म्हणाला. उत्तप्पा खाता खाता त्या तरुणाने विचारले, “मॅम, चहा घेणार की कॉफी?” “नको सर, काहीच नको. आभाळ भरून आलेलं आहे आणि पाऊस सुरू झाला तर मला रिक्षा मिळणार नाही. मी लगेचच निघालेलं बरं.”
“सर, हे माझ्या उत्तप्पाचे १०० रुपये, मी निघते,” असे नेहा म्हणत असतानाच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. नेहाच्या चेहऱ्यावरील काळजी पाहून तो तरुण म्हणाला, “काळजी करू नका, मी सोडतो तुम्हाला माझ्या कारने. रिलॅक्स, आपण चहा पिऊन लगेच निघू.”
“मी गाडी आणतो, तुम्ही इथे थांबा,” नेहा पावसात भिजू नये म्हणून तो तरुण म्हणाला. तीन-चार मिनिटे झाली तरीही तो आला नाही. तो आलाच नाही तर? नेहा चिंताग्रस्त झाली. तेवढ्यात एक मर्सिडीज तिच्या समोर येऊन थांबली. “प्लीज कम,” अगदी अदबीने त्याने आवाज दिला. नेहा गाडीत बसताच तो तरुण म्हणाला, “फक्त १५ मिनिटांत आपण पोहोचू, काळजी करू नका.”
“सर, आपण काय करता?” नेहाने विचारले. “मी शेतकरी आहे, शेती करतो.” हा आणि शेती करणारा शेतकरी? नेहाला आश्चर्य वाटले. पांढरा शुभ्र हाफ बाह्यांचा टी-शर्ट, डार्क निळी जीन्स, स्पोर्ट्स शूज, अगदी रुबाबदार पेहराव, गव्हाळ वर्ण, उंच नि भक्कम शरीरयष्टी, डोळ्यांवर आकर्षक चष्मा, जणू चित्रपटसृष्टीतील हिरोच.
“तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट लक,” म्हणताना त्याने त्याचे कार्ड नेहाला दिले. “बाय, सी यू. तुमचे नाव विसरलो मी.” “अहो, मी सांगितलंच नाही तुम्हाला माझं नाव आणि तुम्हीही विचारले कुठे? मी नेहा,” म्हणत नेहाने त्याचा निरोप घेतला.
नेहाला पेपर अपेक्षेपेक्षा जास्त छान गेला. पेपर संपल्यावर नेहाने पर्समधून कार्ड काढले. कार्डवर नाव होते डॉ. राज. त्याने चुकून दुसऱ्या कुणाचे कार्ड दिले की काय? नेहा गोंधळली. राज डॉक्टर होता, एम.एस्सी., पीएच.डी. (कृषी विज्ञान). फोन करून नेहाने राजचे पुनश्च आभार मानले. राजनेही पेपर कसा होता वगैरे चौकशी केली.
नेहाला दिल्लीच्या कंपनीची ऑफर परीक्षेआधीच मिळाली होती. पुढच्या आठवड्यात जॉइन करायचे होते. कपडे खरेदी, इतर वस्तू खरेदी, मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी यात नेहा मग्न होती. दिल्लीला जाण्यापूर्वी राजला भेटायची इच्छा होती पण राजचा फोन लागला नाही.
कंपनीत वेळ कसा जायचा ते समजत नव्हते पण रूमवर आल्यावर नेहाला घरची आठवण यायची. राजला फोन करायचा नेहाने दोन-तीनदा प्रयत्न केला पण फोन लागला नाही. हळूहळू नेहा नवीन मित्र-मैत्रिणींमध्ये रमू लागली.
एके दिवशी संध्याकाळी अचानक राजचा फोन आला. “नेहा, येत्या रविवारी भेटायचे का? मी गेले दोन आठवडे कामासाठी दुबईला गेलो होतो आणि आता २-३ दिवस दिल्लीला आहे, शनिवारी पुण्याला येईन.” “राज, आपण आज डिनरला भेटूयात का?” “नेहा, मी पुण्याला नाही, दिल्लीला आहे.” “राज, मीही दिल्लीतच आहे,” असे म्हणत तिने राजला सुखद धक्का दिला. पुढचे २-३ दिवस छान गेले. एकत्र फिरणे, जेवण, मुव्ही, मनसोक्त गप्पागोष्टी. जवळीक वाढली, अहोची जागा अगं नि अरेने घेतली. राजला निरोप देताना नेहाचे डोळे पाणावले.
प्रत्येक विकेंडला फोनवरील मनसोक्त गप्पागोष्टींत दोघेही रमत होते. नेहाच्या वाढदिवसासाठी राज दोन दिवस दिल्लीला आल्याने नेहा सुखावली. कळत नकळत नेहा राजच्या प्रेमात पडली होती. तसा पहिल्या भेटीतच तो तिला आवडला होता.
सुदैवाने नेहाला पुण्यातील नामांकित कंपनीची मोठ्या पगाराची ऑफर मिळाली नि नेहा पुण्याला आली. “नेहा बेटी, आता उरकून टाकू. आपल्या सोसायटीतील वरद आणि दोन-तीन चांगली मुलं आमच्या नजरेत आहेत.” “आई-बाबा, केवढी घाई? नुकतेच तर मी पुण्याला आले, थांबा ना थोडे.”
“राज, आई-बाबा माझ्या लग्नाचा प्लॅन करताहेत. नंतर म्हणू नकोस मी तुला सांगितले नाही म्हणून. आपण उद्या भेटायचे का? आणि काय हा योगायोग, उद्या तुझा वाढदिवस! माझ्या वाढदिवसाला तू पुण्याहून दिल्लीला आलास नि तुझ्या वाढदिवसाला मी दिल्लीहून पुण्याला आले. कुठे करायचे सेलिब्रेशन? की माझ्या घरीच येतोस? आई-बाबांचीही भेट होईल.”
नेहा अधीर होती राजला भेटायला, परंतु राजने फारशी उत्सुकता दाखवली नाही. “नेहा, माझा प्लॅन आधीच ठरलाय, मित्रांबरोबर.” “हरकत नाही राज, मला आवडेल माझ्या जीवश्चकंठश्च मित्राच्या मित्रांना भेटायला आणि त्यांच्या समवेत तुझा वाढदिवस साजरा करायला.” “नको नको नेहा, आपण रविवारी भेटूया, फक्त तू आणि मी.”
रविवारी ठरल्याप्रमाणे दोघं भेटले. राजने नेहाला लाँग ड्राइव्हवर नेले, शहराबाहेरील पॉश हॉटेलमध्ये गप्पा रंगल्या. नेहाने लग्नाचा विषय काढल्यावर राजचा उत्साह कमी झाला. “नेहा, तू मला आवडतेस, खूप आवडतेस, एक जीवाभावाची मैत्रीण म्हणून. कशाला अडकायचे आपण लग्नबंधनात?” नेहाने राजला बरेच समजावले, परंतु लग्न या विषयावर राज बोलायला तयार नव्हता. त्याने नेहाला तिच्या अपार्टमेंटपाशी सोडले. नेहाने खूप आग्रह केला पण तो तिच्या घरी मात्र आला नाही.
नेहाने राजविषयी सर्व काही तिची जिवलग मैत्रीण रीना आणि मित्र वरदला सांगितले. “राज उच्च शिक्षित आहे, पण तो शेती करतो नि तू नोकरी करतेस. कदाचित तुमचे जमणार नाही असे त्याला वाटत असेल.” “पण मी त्याच्यासाठी नोकरी सोडून त्याच्या बरोबर राहायला तयार आहे.” नेहा राजसाठी काहीही करायला तयार होती.
“नेहा, महिनाभर राजला फोन करू नकोस आणि त्याचा फोनही घेऊ नकोस,” वरद आणि रीनाने सांगितले. राजने अनेकदा फोन केले, मेसेजेस पाठविले पण नेहाने त्याकडे दुर्लक्ष केले. वरद आणि रीनाने सांगितल्याप्रमाणे तिने एक महिन्याने राजला फोन करून सांगितले, “उद्या तुला भेटायला मी तुझ्या घरी येते.” “नो, नो नेहा, घरी नको येऊस. पानशेत धरणाजवळील माझ्या शेतावर ये. खूप शांत नि निसर्गरम्य परिसर आहे, आवडेल तुला.”
ठरल्याप्रमाणे वरद आणि रीनासह नेहा राजच्या शेतावर पोहोचली. हलकासा मेकअप, निळा स्लीव्हलेस टी-शर्ट, अॅश कलरची जीन्स आणि छानसा गॉगल घातलेली नेहा खूप सुंदर दिसत होती. राजचे शेत खूप छान होते. आजूबाजूला हिरवीगार झाडी, समोर दूरवर पसरलेले पाणी आणि गार हवा, अगदी विलोभनीय दृश्य. लांबवर पसरलेल्या एका टेकडीवर राजने टुमदार घर बांधले होते. नेहाने रीना आणि वरदची ओळख करून दिली. राजने आदराने विचारले, “कसे आहात? घरून केव्हा निघालात? प्रवास कसा झाला?”
“राज आणि नेहा, तुम्ही मनमोकळी चर्चा करा, एकमेकांना समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या,” वरद आणि रीनाने आत्मीयतेने सांगितले. “आम्ही कशाला बनायचं कबाब में हड्डी? आम्ही शेतात चक्कर मारतो.”
“नेहा, किती वेळाचा एकांत हवा तुम्हाला?” रीनाने विचारले. “एक तास,” नेहा नि:संकोचपणे म्हणाली. तासाभराने रीनाने फोन करून विचारले, “नेहा, येऊ का? की अजून वेळ हवा?” “अजून एक तास हवाय,” नेहा म्हणाली. तब्बल दोन तासांनी वरद आणि रीना पोहोचले तरीही दरवाजा आतून बंद होता. “गुड, म्हणजे यांची मने जुळलेली दिसतात. आपल्या येण्याचा फायदा झालेला दिसतो.”
आभाळात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. “नेहा, निघायचे का?” रीनाने आवाज दिला. सात-आठ मिनिटांनी दरवाजा उघडला. नाराजीतच नेहा बाहेर आली. “नेहा, अजून वेळ घालवायचा का राजसोबत? आम्ही थांबतो. टेक युवर टाइम.” “नाही, नाही, काही गरज नाही, निघू आपण,” नेहा म्हणाली. दोन तास राजबरोबर एकांतात काढलेल्या नेहाचा ना मेकअप बिघडला होता, ना कपडे चुरगळले होते, ना केस विस्कटले होते. रीनाला आश्चर्य वाटले.
अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे गाडीत बसेपर्यंत सर्वजण ओलेचिंब झाले होते. “सावकाश जा,” म्हणणाऱ्या राजला बाय करत वरदने गाडी सुरू केली आणि तो अतिशय शांतपणे गाडी चालवत होता.
न राहवून रीनाने विचारले, “नेहा, तू गप्प गप्प का? राजची आठवण येते म्हणून की थंडी वाजते म्हणून? की इतर काही कारण? राजबरोबर दोन तास कसे घालवलेस? इतका वेळ काय बोललात? फक्त बोललात की अजून काही? सांग, सांग, आम्ही उत्सुक आहोत ऐकायला.” नेहा मात्र गप्पच होती.
रस्त्यावर लाईट नव्हते पण पावसाचा जोर कमी झाला होता. एका दुकानापाशी गाडी थांबवून वरदने दोन टॉवेल्स आणि दोन पंजाबी ड्रेस आणून नेहा आणि रीनाला दिले. “आत ट्रायल रूम आहे, चेंज करून या.” कपडे बदलल्यावर दोघींनाही बरे वाटले. समोरच्या हॉटेलमध्ये गरम भजी, बटाटेवडे आणि कडक चहा प्यायल्यावर सगळ्यांना तरतरी आली.
वरदने गाडी सुरू केली. नेहा बाजूला नि रीना मागे बसली होती. गप्प गप्प असलेली नेहा बोलती झाली. “रीना आणि वरद, राजने तुमच्या या मैत्रिणीला फसवले. इतके दिवस त्याने लपवून ठेवलेले सत्य आज मी खोदून खोदून विचारल्यावर मला समजले. त्याचे लग्न झालेले आहे. त्याला ४ वर्षांची मुलगीसुद्धा आहे. त्याची बायको नि मुलगी कात्रजला राहतात. मी त्याला सांगितले की मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. तू तुझ्या बायकोला घटस्फोट द्यायला तयार असशील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. सांग मला तुझा निर्णय.”
“स्वार्थी नाही, महास्वार्थी आहे तो.
त्याला बायको हवी आहे घर सांभाळायला
नि मैत्रीण हवी आहे बाहेर फिरवायला.
मला म्हणत होता, ‘तुझ्यासारखी मनमोकळी, आधुनिक, हुशार नि सुंदर मैत्रीण मिळाली हे माझे भाग्यच. मी तुला राणीसारखं ठेवीन, काहीही कमी पडू देणार नाही, पण लग्नाचा आग्रह करू नकोस. ट्रस्ट मी.’
मी हे मान्य करेन असा विचारच कसा केला त्याने? नीच नि हलकट कुठला. आय हेट हिम. हे मात्र नक्की की ही माझी आणि त्याची शेवटची भेट. मी त्याचा नंबर ब्लॉक करून डिलीटही केला. मी विसरेन त्याला कायमची.”
“नेहा, राग येणार नसेल तर एक विचारू? तुला वरद कसा वाटतो? तो एम टेक आहे, तुम्ही दोघं एकाच सोसायटीत राहता, एकाच कंपनीत काम करता. वरद तुझा सिनियर आहे. मागच्या वर्षीच त्याने मला सांगितले होते की त्याला तू खूप आवडतेस नि तो तुला लग्नाविषयी विचारणारच होता, पण त्याला हे राज प्रकरण समजल्याने त्याने माघार घेतली होती. बघ, विचार कर.”
नेहा काहीच बोलली नाही. साधारणतः पाच मिनिटांनी नेहा म्हणाली, “वरद, गाडी साइडला घेऊन थांबव.” “काय झाले नेहा, मी दुखावलं का तुला?” घाबरतच रीनाने विचारले. “मी फक्त माझं प्रामाणिक मत सांगितलं. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस.”
वरदने गाडी थांबवली. “रीना, आता तू गाडी चालव.” वरद गुपचूप मागे जाऊन बसला. रीनाने गाडीचा ताबा घेतला, सीट नि आरसा अॅडजस्ट करून गाडी सुरू केली. “एक मिनिट रीना,” म्हणत नेहाने गाडीतील आरशावर पेपर नॅपकिन गुंडाळला आणि ती गाडीतून खाली उतरली. रीना आणि वरद घाबरले. बाहेर अंधार होता, आजूबाजूला दाट झाडी होती, रस्ता निर्मनुष्य होता. “नेहा, अगं काय झालं? असं काय करतेस? मी चुकले बाई, माफ कर मला आणि प्लीज पटकन गाडीत बस,” विनवणीच्या सुरात रीना म्हणाली.
काहीही न बोलता नेहा मागच्या सीटवर गेली, वरदशेजारी बसायला. वातावरणातील तणाव क्षणात नाहीसा झाला.
म्हणतात ना,
“दाने दाने पे लिखा होता है
खाने वाले का नाम.”
आज वरद त्याच्या नशिबावर जाम खुश होता. रीना जरा सावकाशच गाडी चालवत होती, थकवा आल्यामुळे नाही तर दोघा कबुतरांना जरा जास्त निवांत वेळ मिळावा म्हणून.
नेहाच्या चालाखीमुळे मागच्या सीटवर काय चाललंय ते रीनाला दिसत नव्हते; पण हे मात्र नक्की की वेळीच लाल सिग्नल दिसल्याने आणि झटपट मार्ग बदलल्याने संभाव्य धोका टाळून नेहाची गाडी मार्गी लागली होती.
-दिलीप कजगांवकर, पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा