मला आठवतंय… त्यावेळी मी चौथीत होतो. तेव्हा तू ‘हॅलोविन’ला घालायला मला ‘झोरो’ पोशाख शिवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागणं किंवा त्यासारख्या गोष्टी करत असायचीस, ते मला आठवतंय. तू चांगली ‘मॉम’ होतीस हे मला माहिती होतं; पण तू किती ‘महान स्त्री’ होतीस, ते मला समजलं नव्हतं.
मला आठवतंय… तू कधी कधी दोन दोन नोकऱ्या करायचीस आणि आपल्या घराच्या पुढच्या बाजूला ‘ब्यूटी शॉप’ चालवायचीस, जेणेकरून आपल्या कुटुंबाच्या हातात तोंडाची गाठ पडेल. तू कित्येक तास… कित्येक तास काम करायचीस आणि कसंही करून चेहऱ्यावरचं हास्यही टिकवायचीस. तू खूप कष्टाळू आहेस हे मला माहीत होतं; पण तू किती ‘महान स्त्री’ आहेस, ते मला समजलं नव्हतं.
मला आठवतंय… एकदा रात्री मी उशिरा… खरंतर मध्यरात्री किंवा त्याही नंतर… तुझ्याजवळ येऊन म्हणालो होतो, “उद्या शाळेत नाटक आहे. मी त्यात राजा झालोय.”
तू लगेच मला राजाचा जांभळा पोशाख शिवून दिलास. पण एवढं करूनही मी त्या नाटकाचा फज्जा उडवला आणि तुझी सगळी मेहनत कुणी पाहिली सुद्धा नाही. तरीसुद्धा तू असे प्रसंग हसून साजरे केलेस.
कुणाचीच ‘आई’ अशी असणार नाही. कुठल्याही प्रसंगाला माझ्यासाठी उभी राहणारी. हे मला माहीत होतं; पण तू किती ‘महान स्त्री’ आहेस, ते मला समजलं नव्हतं.
मला आठवतंय… मी सलग सहाव्यांदा खोक पाडून घेतली, त्यावेळी तू शाळेत सांगितलं होतंस, “तो बरा होईल. त्याला फक्त थोडी विश्रांती द्या… मी नंतर त्याच्याकडे बघून घेईन.”
तुझा खंबीरपणा त्यांना आणि मलाही माहित होता; पण तू किती ‘महान स्त्री’ होतीस, ते मला समजलं नव्हतं.
मला आठवतंय… ज्युनियर हायस्कूलमध्ये असताना तू मला गृहपाठ करायला मदत करायचीस… शाळेत विशेष प्रसंगासाठी पोशाख बनवून द्यायचीस. माझ्या सगळ्या क्रीडा सामन्यांना हजर असायचीस. तुझ्या मुलाला मदत होईल, अशी कुठलीही गोष्ट असेल, तर तू त्यासाठी जवळपास काहीही करशील, हे मला माहीत होतं; पण तू किती ‘महान स्त्री’ होतीस, ते मला समजत नव्हतं !
मला आठवतंय… मी ‘यंग लाइफ’ साठी काम करत होतो, तेव्हा एके दिवशी पहाटे साडेतीन वाजता मी त्रेचाळीस मुलांना घरी आणलं होतं आणि ती सगळी “इथंच झोपून सकाळी नाश्ता करून गेली तर चालेल ना?” असं विचारलं होतं.
तू पहाटे साडेचार वाजता उठून हे आव्हान पेलायला सज्ज झाली होतीस. त्यावेळी मला तू आनंदी व उदार आहेस, हे माहीत होतं; पण तू किती ‘महान स्त्री’ होतीस, हे मला समजलं नव्हतं !
मला आठवतंय… मी हायस्कूलमध्ये असताना तू माझ्या सगळ्या फुटबॉल व बास्केटबॉल सामन्यांना यायचीस आणि इतकी थरारून जायचीस की, एकदा तू तुझ्या समोरच्या माणसाला ‘पॉमपॉम’ चा तडाखा दिला होतास!
मला मैदानात तुझे प्रोत्साहन पर शब्द ऐकू यायचे. तू माझी सदैव सर्वोत्तम प्रोत्साहक आहेस, हे मला माहीत होतं; पण तू किती ‘महान स्त्री’ होतीस, ते मला समजलं नव्हतं !
मला आठवतंय… मला ‘स्टॅनफर्ड’ला जाता यावं म्हणून तू किती त्याग केलास… तू जादा काम केलंस. तिथं मला अगदी नियमित काहींना काही प्रेमानं पाठवत राहिलीस. मला, ‘आपण एकटे नाही’ असा दिलासा देणारी पत्र लिहिलीस.
तू चांगली ‘मैत्रीण’ होतीस हे मला माहित होतं; पण तू किती ‘महान स्त्री’ होतीस, हे मला समजलं नव्हतं !
मला आठवतंय… मी ‘स्टॅनफोर्ड’मधून पदवीधर होऊन ‘यंग लाइफ’च्या माध्यमातून गोड गोड चिमुकल्यांसाठी महिना दोनशे डॉलर्स वेतनावर काम करायचं ठरवलं, त्यावेळी डॅडींना व तुला ही माझी अधोगती वाटली होती, तरीही तू मला प्रोत्साहन दिलंस.
तू माझं एक खोलीचं घर लावून द्यायला आली होतीस. त्या साध्याशा घराला तू तुझा खास प्रेमळ स्पर्श दिलास. त्यावेळी आणि नंतरही… वेळोवेळी, मला तू किती अस्सल सर्जनशील आहेस, हे कळत गेलं; पण तू किती ‘महान स्त्री’ होतीस, ते मला समजलं नव्हतं !
काळ पुढं सरकत होता… मी मोठा झालो. लग्न केलं आणि घर थाटलं. तू ‘नना’ झालीस आणि तुझी नवी भूमिका तुला खूप आवडली; पण तू मात्र वयस्कर झालीस, असं कधीच वाटलं नाही.
देवानं तुला घडवलं, तेव्हाच त्यानं जीवनात तुझ्यासाठी खास स्थान निर्माण केलंय, हे मला त्यावेळी कळलं होतं; पण तू किती ‘महान स्त्री’ होतीस, ते मला समजलं नव्हतं !
अपघातामुळं माझी गती मंदावली… काही गोष्टी करणं मला जरा कठीण होऊन बसलं, पण तू नेहमीसारखीच माझ्या पाठीशी उभी राहिलीस. मला वाटलं, काही गोष्टी कधीच बदलत नाहीत.
मी अत्यंत ऋणी होतो. तू उत्तम परिचारिका होतीस, ही मला बराच काळ माहीत नसलेली गोष्ट तेव्हा माझ्या लक्षात आली होती; पण तू किती ‘महान स्त्री’ होतीस, ते मला समजलं नव्हतं !
मी काही पुस्तकं लिहिली. लोकांना ती आवडली असावीत. तुला व डॅडींना याचा इतका अभिमान होता की, तुम्ही लोकांना आपल्या मुलाची कामगिरी दाखवण्यासाठी त्यांना या पुस्तकाच्या प्रती दिल्या.
तू किती उत्तम ‘प्रवर्तक’ होतीस हे तेव्हा मला कळलं होतं; पण तू किती ‘महान स्त्री’ आहेस, मला समजलं नव्हतं !
काळ बदललाय… ऋतू सरलेत आणि माझ्या परिचयातला एक थोर माणूस आपल्यातून निघून गेलाय !
मला श्रद्धांजलीच्या वेळी तू अजूनही आठवतेस. तेजस्वी जांभळ्या पोशाखात ताठ मानेनं उभी तू लोकांना सांगत होतीस,
‘आमच्यावर देवाची केवढी कृपा होती आणि इतकं छान जीवन दिल्याबद्दल आम्ही त्याचे खूप खूप आभारी आहोत !’
त्या क्षणी मला अशा स्त्रीचं दर्शन घडलं, जी सर्वात खडतर परिस्थितीतही कृतज्ञ भावनेनं आणि ताठ मानेनं उभी राहू शकत होती. तेव्हा मला तू किती ‘महान स्त्री’ होतीस, ते समजायला सुरुवात झाली !
गेल्या वर्षी तुला एकटीला उभं राहावं लागलं. पहिल्यांदाच, त्यावेळी इतक्या वर्षांत अनुभवलेलं, पाहिलेलं सारं काही नव्याकोर्या रूपात समोर आल्यासारखं वाटलं.
तरीही, आता तुझं हास्य अधिक मधुर बनलंय… तुझी शक्ती अधिक वाढलीय… तुझं प्रेम अधिक सखोल बनलंय आणि तू किती किती ‘महान स्त्री’ आहेस, याचा मला शोध लागतोय !
- टिम हॅन्सेल
- अनुवाद : सुप्रिया वकील
(चिकन सूप फॉर द मदर्स सोल)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा