शनिवार, २३ मे, २०२६

2883. आला आळ जनीवरी

     शनिवार संध्याकाळची सुस्तावलेली वेळ. स्मिता गॅलरीमध्ये मोबाईल पहात बसली होती. दुपारचा स्वयंपाक होताच, फक्त वेळेला पिठलं टाकायच होते. सासूबाई फिरून आल्यावर बिल्डींगच्या खाली मैत्रिणींशी गप्पा मारत बसल्या होत्या. सासरे त्यांच्या रूममध्ये TV पहात होते. संतोष आज त्याच्या मित्रांसमवेत 'ओल्या' पार्टीला गेला होता. मुलेही बाहेर गेली होती. एकंदरीतच आळसावलेला सूर होता.
      अचानक स्मिताला आठवले कि तिचा एक ड्रेस शिवायचा होता, थोडासा उसवलेला होता. वेळ आहे तर करून टाकू, असे म्हणत ती बेडरूममध्ये आली. दारातच तिने पाहिले कि तिच्या कपाटाचे दार उघडे होते. त्याच्यामागे तिचे सासरे काहीतरी करत होते. ते दारामागे असल्याने स्मिताला नीट दिसत नव्हते. ती दारातच थबकली. तेवढ्यात तिच्या सासर्यांनी कपाटाचे दार बंद केले आणि आता स्मिताला सासरे संपूर्ण दिसले. त्यांच्या हातामध्ये (स्मिताच्या पर्समधून घेतलेल्या) नोटा होत्या आणि दार बंद करतानाच ते त्या नोटा स्वतःच्या खिशामध्ये ठेवत होते. त्यांना दारात उभी असलेली स्मिता दिसली तसे ते बावचळले. खिशात ठेवत असलेल्या नोटा त्यांनी बाहेर काढल्या आणि अचानक स्मिताच्या पायावर हात ठेवत ओरडत म्हणाले 
"मला माफ कर. माझी चूक झाली. संतोषला सांगू नकोस, हिलापण सांगू नको. माझ्या मुलीसारखी तू, मला माफ कर."
स्मिता त्यांचा स्पर्श होणार नाही इतकी मागे सरकली. त्यांनी त्या नोटा तिथे बेडवर ठेवल्या आणि निघून आपल्या खोलीत गेले आणि धाडकन (स्मिताला ऐकू जाईल इतक्या आवाजात) दार बंद करून घेतले. जे पाहिले ते स्वप्न कि सत्य हेच स्मिताला समजेना. हातापायातील त्राण जाऊन ती तशीच बेडवर बसली.
     सासूबाई नेहमीप्रमाणे घरात आल्या. हळूहळू बाहेर गेलेली मुलेही आली. स्मिताने पिठलं केलं आणि सगळ्यांना जेवायला बोलावलं.
"मला जेवायचं नाहीये..." सासऱ्यांनी ओरडत खोलीतूनच सांगितलं.
"जेवतील ते भूक लागली कि" असे म्हणून सासूबाईंनी आपले जेवण सुरु केलं. तश्याही सासूबाई आपल्या नवऱ्याला फार किंमत देत नसत.  जेवणानंतर स्मिता सगळे आवरून तिच्या खोलीत आली. संतोष उशिरा घरी येणार होता. स्मिता बराच वेळ विचार करत राहिली, नंतर तिने उठून एक वही आणि पेन घेतला आणि ती लिहू लागली.
    दुसऱ्या दिवशी सकाळी चहा होऊन, पेपर वाचणाऱ्या संतोषला सासूबाई सांगत होत्या "काय झालंय काय माहिती? काहीतरी विचित्रंच वागताहेत बाबा कालपासून. नुसती चिडचिड चालू आहे."
पोहे करताना स्मिता शांतपणे ऐकत हे होती.
"संतोष, खाऊन झाल्यावर जरा वेळ आहे का?"
"काय काम आहे?"
"काम नाहीये रे.. पण तुला कुठे बाहेर वगैरे जायचे नसेल तर जरा बोलायचे आहे."
घराचा सगळा कारभार स्वतःच्या हातात ठेवणाऱ्या सासूचे कान लगेच वर झाले. त्या लगेच लेकाला म्हणाल्या "कुठे जाऊ नको आता. आधीच काल उशिरा आलाहेस तर विश्रांती घे. बघ ती काय म्हणतीये ते..."
"बरं..."
कदाचित खोलीमध्ये बसलेल्या सासऱ्यांच्या कानावर हा संवाद पडला असेलही.
    पोहे खाताना सगळेच शांत होते. मुले भराभरा खाऊन बाहेर गेली. कॉलेज आणि नोकरीचे दिवस. एखादा दिवसच निवांत असतो त्यांना. सासरे पोहे खायला बाहेर आलेच नाहीत. कालपासून उपाशी म्हणून सासूबाईंनी त्यांना आत नेऊन दिले, तेव्हा खाल्ले. स्मिता संतोषशी काय बोलते, हे ऐकण्यात सासूबाईंना भारी उत्साह होता. ती त्याला बोलायला आत बेडरूममध्ये नेतीये का इथेच बोलतीये, हे फक्त पहायचं.
"बाबा, बाहेर येता का? मला जरा बोलायचं आहे." स्मिताने आहे तिथूनच ओरडून सांगितलं. हा स्मिताचा स्वभाव नाही, तेव्हा सासूबाईंना ते खटकलं. संतोष निवांत सोफ्यावर बसला. बायको काय नेहमीचेच काहीतरी विषय बोलेल, असे वाटून.
(कोणतेही आढेवेढे न घेता, आरडाओरडा चिडचिड न करता) बाबा बाहेर आले आणि एका स्वतंत्र खुर्चीत बसले. 
"मी ऐकलं तुम्ही संतोषला सांगताना कि कालपासून बाबा नीट वागत नाहीयेत ते. पण तुम्ही बाबांना त्याचे कारण विचारले का?" स्मिताने सासूबाईं विचारले.
सासूबाई एकदम गडबडल्याच. स्मिता थेट आपल्यालाच प्रश्न विचारेल हे त्यांना वाटलेच नव्हते. "मला नाही माहिती." त्या उतरल्या.
"तुम्ही सांगणार आहात का बाबा?" स्मिताने पुढचा प्रश्न बाबांनाच विचारला.
"स्मिता, काय चाललंय? माझे आई-बाबा आहेत ते. त्यांना असे प्रश्न का विचारतीयेस?" संतोष चिडून म्हणाला.
"संतोष, शांत रहा. मी पण तुझी बायको आहे. माझाही तितकाच आदर कर जितका तू ह्यांचा करतोस." स्मिताचा आवाज, नजर हे नेहमीपेक्षा वेगळे होते. संतोष धुसपूसतच गप्प बसला.
"तुम्ही सांगणार आहात का बाबा कि तुम्ही कालपासून इतकी चिडचिड का करत आहात? रात्री जेवायला तुम्ही का आला नाहीत?" स्मिताने शांतपणे पुन्हा बाबांना विचारले.
आता संतोष आणि सासूबाई दोघेही एकमेकांकडे पाहून 'हे काय चाललंय' असे हाताने, डोळ्याने विचारू लागले. बाबांची चुळबुळ वाढली. ते एकदम उठून संतोषच्या पायावर पडले आणि दोन्ही हाताने त्याचे पाय पकडून त्याची क्षमा मागू लागले. हे पाहून सासूबाईंची जीभ टाळ्यालाच लागली. संतोषने गडबडीने आपले पाय मागे घेतले. स्मिता तशीच शांत उभी होती.
"काय चाललंय हे? स्मिता काय आहे हे?" संतोषने विचारले.
"तू अजूनही मलाच प्रश्न विचारत आहेस तर मीच उत्तर देते. बाबा तुम्ही आता खुर्चीमध्ये बसा. नाटक पुरे झालं."
आणि स्मिताने बोलायला सुरुवात केली.
"आमच्या लग्नाला २० वर्षे होऊन गेली. तरी मी नवी कारण तुम्ही जुन्या. आमची मुलेहि लग्नाला आली तरी माझा आत्मविश्वास कसा खालीच राहील हे तुम्ही, हो तुम्ही सगळे, संतोष तू आणि तुझे आईबाबा नेहमीच पहात आले. मला स्वतःपेक्षा कधीच वरचढ होऊन दिले नाही तुझ्या आईने. खाली बसून शांतपणे मी काय बोलतीये ते ऐकायचं. मध्ये मध्ये बोलायचं नाही." तिने अतिशय जरबेच्या सुरात सांगितलं, तसं उभा राहीलेला संतोष खाली बसला आणि सासूबाई तोंडातल्या तोंडात बोलत गप्प झाल्या.

"माझा तो स्वभाव नाही तेव्हा आहे ते निमूटपणे मी सहन केलं.  मी वयाने लहान, स्वयंपाकाचा अनुभव नाही, त्यातही नुकतीच लागलेली पूर्णवेळची जबाबदारीची नोकरी. पण हे समजून न घेता मला स्वयंपाकाची 'संपूर्ण' जबाबदारी दिली तुझ्या आईने. चाणाक्षपणा हा कि हे करताना किराणा सामान, भाजी खरेदी स्वतःकडे ठेवलं. त्यामुळे झालं असं कि घरात ज्या भाज्या आहेत, त्या वेळखाऊ असतील, झटपट न होणाऱ्या असतील, पूर्वतयारी कराव्या लागणाऱ्या असतील तरी मला कराव्या लागल्या. मला भाज्या आणायचा चॉईस नव्हता. बरं भाज्या पण इतक्या कमी आणायच्या की एक वेळेलाच कशाबशा पुरतील. झक् मारत मला दोन्ही वेळचा स्वयंपाक करावा लागायचा. ह्यामध्ये तुझ्या आईने कधी काहीच मदत केली नाही. संसाराला माझा पैसाही हवा आणि माझ्यातली कामवालीही. तू पहिल्यापासूनच साधा, ह्या गोष्टी तुझ्या डोळ्याला दिसल्या नाहीत आणि तुला दाखवल्याही गेल्या नाहीत. कामवाली बाई ठेवण्याची माझी, हो माझी, पैशाने ऐपत होती आणि आहे पण तुझ्या आईने एकही बाई टिकवली नाही, हे सत्य! धुणं-भांडीवाल्या बाईशिवाय आपल्याकडे कामाला बाई नाही. घरामधील अनंत कामे मी कशी करते, हे तुला माहिती नाही. तुला पहिल्यापासूनच घरातल्या कामांना 'तू हात लावायचा नाही', असं शिकवलेलं; तेव्हडं तू तंतोतंत पाळतोस."
संतोष, सासूबाई ह्यांचे चेहरे गोंधळले दिसले.
"हे विषयांतर नाही. तुला ऑफीसमध्ये मिळायचे जेवण म्हणुन फारसे सत्य समजले नाही. लग्न झाल्यापासून मी केलेला स्वयंपाक तुझ्या आईला आवडला नाही तर त्या माझ्याबद्दल तुझ्याकडे 'गुपचूप' तक्रार करायच्या. जणू त्या दिवसभर काहीही न खाता उपाशीच राहिल्या आहेत, असे तुला वाटायचे. तू मला ओरडायचास, सोडून द्यायच्या धमक्याही द्यायचास. पण तू खरे काय आहे किंवा असे का घडले, हे मला कधीही विचारले नाहीस. मलाही खरेखोटेपणा सिद्ध करत आपल्यामध्ये भांडणे नको असायची.
     ऐक, मी केलेल्या भाज्या ह्या चांगल्या आणि चविष्टच असल्याने मुळात कमी आणलेल्या आणि एकच वेळ पुरेल इतक्या भाज्या त्यांना पुरायच्या नाहीत. ज्या दिवशी ऑफिसमधले माझ्या स्वयंपाकाचे कौतुक करायचे, त्या दिवशी आपले भांडण होणार हे मला आधीच समजायचे. तुझी आई तेव्हाही धडधाकट होती आणि आताही. माझा स्वयंपाक त्यांना आवडला नाही तर तो तसाच ठेऊन दुसरा करायची त्यांची ताकत होती. त्यांनी एकदाही तसे केले नाही ना तु कधी तसे सुचवले. बाई नाही ठेवायची आणि मी कामावरून उशिरा येते तर मला मदतही करायची नाही, हि त्यांची प्रवृत्ती. उलट मला अपराधी भाव कसा द्यायचा हे त्यांना माहिती. "मुले भेकेने अगदी कळवळली" असे म्हणायच्या पण कधी ह्याच नातवंडांसाठी कुकर लावला नाही पुढे होऊन. एक दिवसही त्यांना काही करून ठेवावे, असे वाटले नाही. त्यांनी मला सून म्हणूनच वागवले, मुलगी म्हणून नाही. तोंडदेखलं देखील नाही." श्वास फुलून आला म्हणून स्मिता बोलायची थांबली. 
सासूबाई एका अक्षरानेही काही बोलत नव्हत्या. संतोषही शांतपणे ऐकत होता.
"हे सांगायचं कारण म्हणजे काल तुझे बाबा 'तू माझ्या मुलीसारखीच' असे मला म्हणाले. तुझे बाबा, नीट लक्षात घे, तुझे बाबा. पण हे सगळं आपल्या लग्नापासून घडत असताना ते एकदाही माझ्या बाबांसारखे वागले नाहीत. डोळ्यांना दिसत असूनही आपली भांडणे होत असताना मध्ये पडावे, भांडण थांबवावे किंवा तुला चार शब्द वडील म्हणून सांगावे, निदान तुला खरे काय झालं घडलं ते तरी सांगावं असे त्यांना वाटलं नाही. दोघांनाही घरातील एखादे काम करावे, नातवंडे लहान असताना निदान त्यांना मदत करावी असेही वाटले नाही. ती जितकी माझी मुले आहेत, तितकीच तुझीही आहेत ना?" स्मिताने संतोषला विचारले.
सासुबाई खाली मान घालुन बसल्या होत्या.
“तू पैसे वाचवत नाहीस, खूप खर्च करतेस...हे मी माझे लग्न झाल्यापासून ऐकत आहे. त्यासाठी माझे सगळे पैसे मी लग्न झाल्यापासून तुझ्या आईच्या हातात द्यायचे आणि मग त्यांनी मला खर्चाला द्यायचे, असे तू ठरवले. प्रत्यक्षात तुला पुढे करून कोणी असे ठरवले, ते मला माहिती आहे. स्वतः पैसे कमावून माझ्याकडे पैसे नाहीत, हि माझी दयनीय अवस्था पाहून तुझ्या आईला नेहमी आनंद व्हायचा आणि होतो. त्यानंतर पगार डायरेक्ट बँकेत जाऊ लागला. तुझ्या आईचा 'कंट्रोल' लूज झाला. घरामध्ये खर्चाला मी पैसे देऊ लागले आणि उरलेले पैसे माझ्या बँकेत तसेच पडू लागले. ऐकतोस ना तू, पैसे पडून राहू लागले, वाचू लागले. अजून विश्वास बसत नाही, तर हे ऐक. माझा पगार वाढला कि स्वतःचा चांगुलपणा दिसावा म्हणून तुझ्यासमोर नेहमीचे वाक्य "वाढलेल्या पगाराची FD  कर." तुला खोटं वाटेल पण तुझी आई अतिशयी धोरणी आणि संयमी आहे. एरव्ही हे गुण असतात माणसांचे पण तसेच अवगुणही असतात. FD कधी वर्षाच्या वर करून दिली नाही. FD संपली के ते पैसे मला पुन्हा दिसलेही नाही. आम्ही जेष्ठ नागरिक, जास्त इन्टेरेस्ट रेट, आमच्या नावावर ठेवतो म्हणून सगळे पैसे ह्यांच्या नावावर. आपण  गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेतला तर किती कौतुकाने सांगितलेस ना सर्वांना "आईने पैसे  दिले.." पण नोकरीही न करता आले कसे रे तुझ्या आईकडे पैसे? केला का कधी विचार?
मी जास्त बोलले नाही रे कधी, आपलेच दात आणि आपलेच...! स्वतःचा मोठेपणा सिद्ध करत का होईना पण गरजेला दिले हे पण पुष्कळ. 
ह्यांनी मला छळण्यासाठी बाई न टिकवणे, सुट्टीच्या दिवशी पाहुणे-रावळे बोलावून स्वयंपाक करायला लावणे, नातवंडांकडे लक्ष न देणे, अनेक दिवस गावालाच जाऊन राहणे वगैरे सुरु केले. मी तरीही धड राहिले, खंबीर राहिले.” स्मिता सासुबाईंकडे पहात म्हणाली.
“आठवतंय तुला संतोष, एकदा माझ्या मावसबहिणीच्या लग्नाला गेले असता माझी सोन्याची अंगठी तिथे हरवली. तिथून आल्यावर मी तुला हे सांगितलं आणि गहजब झाला. तू तर बोललासच पण तुझे आई-बाबाही मला खूप बोलले. ‘किमंत नाही.., निष्काळजी आहे’ वगैरे. आता अश्या गोष्टी कोणीही मुद्दामून करत नाही, पण चालायचेच.
गंमत म्हणजे, आठवड्याभरात मावशीचा फोन आला कि तुझी अंगठी सापडली आहे. पण त्या आठवडाभरात मला तुझ्या आई-बाबांची अनेक रूपे दिसली. 
प्रत्येक लग्नाला, कार्याला जाताना तुझ्या आईने नकळतपणे ह्या प्रसंगाची आठवण करूनच दिली. तेव्हापासून ती अंगठी मी वापरत नव्हते, ठेऊन दिली होती. अगदी तुझ्या आईची मोहनमाळ प्रवासात हरवली तरीही मी हि अंगठी घातली नव्हती. 
आज घातली पुन्हा, हि बघ. कारण ह्या अंगठीमागे लपवलेले चेहरे उजेडात आले." स्मिताने हात पुढे करून आपला हात दाखवला.
“एकदा माझी सोन्याची कानातली मी TV जवळ ठेवली होती, विसरून गेले नंतर. दोन दिवसांनी आठवली तर तिथे नव्हती. मला वाटलं तू किंवा आई-बाबांनी उचलून ठेवली असतील. पण कोणीच ती ठेवली नव्हती. कानातली कधीच सापडली नाहीत पण त्यावर कोणी काही बोललेही नाही जास्त. आश्चर्य वाटले मला कि अंगठी हरवली तर इतका त्रास देणारे सारे चूप कसे झाले?  बदलले असतील, मी तशी नाही हे त्यांना समजले असेल.. अशी स्वतःची समजूत करून घेतली होती मी. मग असं होतंच राहिलं.
कधी कोणासाठी (वॉचमन, कामवाली,गाडीवाला) काढून ठेवलेले पैसे नाहीसे व्हायचे. मुलांनी घेतले असतील, सासूबाईंनी भाजीला वापरले असतील असं वाटून विषय सोडून दिला. कधी खरे-खोटे केलं तर खरंच घेतलेलं असायचे मुलांनी किंवा सासूबाईंनी. चालायचेच, संसार आहे. 
कधीकधी माझ्या पर्समधूनही पैसे जायचे. मी तुला विचारायची, कधी मला वाटायचे मीच खर्च केले असतील कुठेतरी. ह्या विषयावर फारसे कधी बोललो नाही आपण एक कुटुंब म्हणून. 
आताश्या सगळ्यांकडेच कार्ड असतात. फक्त घरखर्चासाठी पैसे असतात, ते पण माझ्याकडे नाहीतर सासूबाईंकडे. मुलेही मोठी झाली. आदित्य तर नोकरीलाही लागला, छोटी असेलही नोकरी पण पगार मिळतो त्याला. राधा बिनधास्त मागून घेते. तू सुद्धा सांगोतसंच कधी पर्समधून पैसे घेतलेस तर.
मग पर्समधून पैसे घेतात आणि सांगत नाही, ते कोण?” स्मिता सगळ्यांकडे पहात म्हणाली.
टाचणी पडली तरी आवाज होईल, इतकी शांतता.
एकदम संतोषने बाबांना विचारले "बाबा, तुम्ही घेतले हिच्या पर्समधून पैसे?"
"चुकला तुझा प्रश्न, संतोष. ‘बाबा, तुम्ही नेहमी घेता हिच्या पर्समधून पैसे?’ असे विचार" स्मिता शांतपणे म्हणाली.
सासूबाई उठल्या आणि बाबांना हाताने मारायला सुरुवात केली. संतोष उठून आईला थांबवू लागला. बाबा दोन्ही हाताने तोंड लपवून बसून राहिले.
"संतोष, सासूबाई तुम्ही दोघेही शांत व्हा. हा प्रश्न मी आज सगळ्यांना विचारला कारण काल मी माझ्या पर्समधून बाबांना चोरासारखे गुपचूप पैसे घेताना, चोरताना पाहिले. काल मी घरात नाही, असे वाटल्याने बाबांनी हे धाडस केले पण मी घरातच होते आणि माझ्या डोळ्याने हे पाहिले. म्हणूनच बाबा कालपासून चिडलेले आहेत, चोरी पकडली गेली म्हणून. हे काही आजच झालेले नाही. हे आपल्या घरात नेहमीच घडत होते पण कळेल नकळेल असे.
समजा, मी हे पाहिलेच नसते तर? चोरी पचली असती. नेहमीप्रमाणे पैसे कुठे गेले, असे विचारून पुन्हा आपण पुढे सरकलो असतो. पण मुळात हा प्रश्न येतो कि असे का घडले? कोणी सांगू शकेल का ह्याचे कारण? आपल्याच घरात चोरी करावी असे तुझ्या बाबांना का वाटले?" स्मिता बोलायची थांबली. उत्तरासाठी संतोषकडे पाहू लागली.
संतोष डोके धरून बसला होता. सासूबाई अद्वातद्वा बाबांना बोलायला लागल्या.
"मी सांगते." असे म्हणत स्मिताने त्यांना शांत केलं.
"हे काही एका दिवसात बदललेले नाही किंवा हि मनस्थिती, परिस्थिती ह्या माणसावर एका दिवसात आलेली नाही. हे हळूहळू घडत गेलं. मुळातच घर स्वतःच्या ताब्यात ठेवण्याच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे तुझ्या आईने ह्यांच्या हातात पैसे ठेवले नाही. मी पैसे वाचवते, मी पैशाचे व्यवहार सांभाळते असे म्हणत तुझ्या आईने त्यांच्या पगाराचे पैसे स्वतःकडेच ठेवले. म्हणजे नोकरी हा माणूस करणार आणि पैसे बायको स्वतःकडेच ठेवणार, असा त्यांचा संसार. संसार कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. तुझ्या आईने कधीही नोकरी केली नाही. तेव्हा नोकरी करण्याचे कष्ट त्यांना माहिती नाही. कष्ट करून, पैसे कमावून बायकोकडे लाचारीने पैसे मागण्यासारखे दुसरे अपमानास्पद नाही. त्याकाळी बँकेमध्ये पैसे असले तरी व्यवहार कार्डाने होत नसत. हातात पैसा हवा आणि तोच नाही, हि परिस्थिती ह्यांची तुझ्या आईमुळे झाली.
नंतर हे निवृत्त झाले आणि मग 'तुम्हाला कशाला हवेत पैसे?' हेच ऐकत आले. माणसाच्या गरजा असतात. कधी बाहेर खावेसे वाटते, काही घ्यावेसे वाटते, नातवंडांसाठी खरेदी करावीशी वाटते. एक एक पैशाचा हिशोब मागणाऱ्या तुझ्या आईमुळे हि लाचारी ह्यांच्यावर निवृत्तीनंतरही आली. 
तुझ्या आईने तुला हवे तेव्हा तू मागशील तसे पैसे दिले. त्यामुळे तुला हे समजले नाही आणि समजणारही नाही. तुला ताब्यात ठेवणे हे महत्त्वाचे होते, पैशासाठीही आणि सत्तेसाठीही. पण मी ह्यामधून गेले आहे. 
घर माझे, सर्वांनी कमावलेला पैसाही माझा आणि कमावता मुलगाही माझा.. हि आहे तुझ्या आईची महत्वाकांक्षा. त्यासाठीच त्यांनी मलाही ताब्यात ठेवलं आणि आपल्या दोघांमधील संबंधही. ते फार प्रेमाचेही होऊन दिले नाहीत आणि फार ताणाचेही.” बोलायचे थांबून स्मिताने एक दीर्घ श्वास घेतला.
“आता मला अनेक गोष्टी सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट झाल्या आणि लख्ख दिसल्या आहेत. आता मी ह्या दोघांसोबत राहणार नाही. हा माझा निर्णय आहे आणि तू मला साथ द्यावीस, कारण तू माझा नवराही आहेस. आपली मुले आता मोठी झाली आहेत आणि अजूनही अश्या मेन्टॅलिटीच्या माणसांसह मी ऍडजेस्ट करत रहावे, हि जबरदस्ती मला नकोय. आपले भाड्याने दिलेले घर आहे, तिथे हे दोघे राहतील. त्यांचा महिन्याला जितका खर्च होईल, तो आपण देऊ. 
तू त्यांचा मुलगा आहेस, त्यांना माफ कर किंवा करशीलही. पण मी त्यांची मुलगी नाही. मी ह्यांना माफ करणार नाही. 
दुसरे म्हणजे, जे घडले ते मी मुलांना आणि गरज पडल्यास नातेवाईकांनाही सांगणार आहे. मी काय सांगावे किंवा काय लपवावे ह्याचे मला बंधन नाही, जसे तुझ्या आईलाही कधी नव्हते. 
अर्थात, ह्यामुळे आपले संबंध बिघडतील, संसार ढासळेल. असू दे, प्रत्येक प्रसंगाचे collateral damage असतेच. निदान माझ्या मनाला शांती मिळेल, ह्यापुढील संसार माझ्यासाठी सुखाचा, शांतीचा आणि मानाचा असेल, हे नक्की. हे तुला मान्य नसेल आणि पुरुष,नवरा म्हणून तुला माझ्यावर हक्क दाखवून 'मीच हे घर सोडावे', अशी तुझी इच्छा असेल तर ते सांग. मी ते सुद्धा करिन. पण आता 'ह्यांना माफ करून आपण असेच काही न घडल्यासारखे राहू', हा पर्याय मला मान्य नाही. तुझा निर्णय घ्यायला तुझ्याकडे वेळ आहे आणि तु माझे मतपरिवर्तन करू शकशील, असे नाही. मला तुझा निर्णय आता आणि लगेचच हवाय, इथेच.
तू मला सहकार्य केलं नाहीस, माझा निर्णय स्वीकारला नाहीस तरीही माझी काही हरकत नाहीये. तू तुला हवा तो निर्णय घे.
मी अशी अजिबात अपेक्षा ठेवणार नाही की या एका प्रसंगानेच तुझे डोळे उघडतील, तुला सत्य परिस्थिती किंवा गेल्या वीस वर्षांपासूनची माझी दयनीयता समजेल पण निदान त्या दृष्टीने तु विचार तरी करायला लागशील, एवढीच अपेक्षा आहे.
सासूबाई, त्या घराचे निर्णय तुम्ही घ्या. ह्या घराचे निर्णय मीच घेणार. आणि हाच माझा निर्णय आहे." स्मिता बोलायची थांबली. 
सासूबाई, संतोष आणि सासरेही हताशपणे तिच्याकडे पहात राहिले. स्मिताने घेतलेला हा निर्णय केवळ एका घटनेची प्रतिक्रिया नव्हता. लग्न झाल्यापासून तिने सोसलेल्या प्रत्येक प्रसंगाचा तो शेवट होता. तिला समजलेला अर्थ होता. तिने न केलेल्या अनेक गोष्टींचे आळ तिच्यावर येत होते आणि ती समजूनही सहन करत होती, त्याचा हा स्फोट होता.
संतोषने उठून तिला मिठीमध्ये घेतले आणि स्मिताचा बांध फुटला. सासू-सासरे काय समजायचे ते समजले.
 
समाप्त
 सौ आरती अत्रे-कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...