शनिवार, २३ मे, २०२६

2868. सातां जन्माचे नाते

     आज महिना झाला आजी कोमात जाऊन. आजोबा नित्यनेमाने त्यांच्या बेड जवळ बसून असतात. कधी त्यांच्या निष्प्राण हातावर हात ठेवून तर कधी निर्विकार कपाळावर हळूवारपणे थोपटत त्यांच्याशी गप्पा मारत बसतात. आमच्या स्टाफच्या टेबल खुर्ची वर बसून मी रोज आजोबांना कौतुकाने बघायचो. एक दिवस मलाच रहावलं नाही आणि मी आजोबांना विचारलं," आजोबा रागावणार नसलात तर एक विचारू. खुप दिवसांपासुन मी बघतोय तुम्हाला. आजींशी काय येवढं बोलता तुम्ही? त्या तर सध्या काही कळण्याच्या पलिकडे आहेत. तुमच्या बोलण्याला कसलाच प्रतिसाद देत नाहीत त्या."
चेहऱ्यावर मंद हसू आणत त्यांनी मला विचारले," लग्न झालंय ना तुझं?
मी म्हणालो, हो झालंय. दोन मुलं आहेत मला".
थोडावेळ थांबून आजोबा म्हणाले," अरे आमचं नाही कोणी. एकुलता एक मुलगा शिक्षण सुरू असतानाच अपघातात गेला. ते दुःख पचवून आजवर जगत आलोय आम्ही एकमेकांना आधार देत आणि एकमेकांची समजूत काढत. मी अजूनही छोटीशी नोकरी करून घरखर्चाला हातभार लावायचो. गेल्या महिन्यात गावच्या जत्रेला म्हणून ही आमच्या नातेवाईकांसोबत गेली खरी पण परतताना एसटीला अपघात झाला आणि हीची अशी अवस्था करून टाकली.
इथे सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत तिच्यावर.माझे मालक दयाळू आहेत. हवी तेवढी रजा घे म्हणाले. वर उपचारासाठी पैसे पण दिलेत.  घर खायला उठतं म्हणून ठरवलं की जेवढं जमेल तितका वेळ तिच्या सोबत काढायचा. जुन्या जुन्या आठवणी तिला सांगत बसायचं. तिचं मन रमवायचं. तु म्हणतोस की ती काही प्रतिसाद देत नाही. पण ते चुकीचे आहे. तिच्याशी बोलताना तिच्या हातावर किंवा कपाळावर हात ठेवला की जाणवतं मला की ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत आहे म्हणून. आतल्या आत तिला नक्की आनंद मिळत असेल माझं बोलणं ऐकून. आज जरी ती काही प्रतिसाद देत नसली तरी ती औषधांना प्रतिसाद देत तिचा प्रवास सुरू ठेवायचा आटोकाट प्रयत्न करते ह्याचा अर्थ एकच आहे की माझं बोलणं बारीक आवाजात का होईना पण तिला ऐकू जातं.
अरे सातां जन्माची साथ देण्याचं आम्ही एकमेकांना कबूल केले होते आमच्या लग्नात. हा तर पहिलाच जन्म आहे आमच्या दोघांचा. आजवर तीचं बोलणं, तिच्या सुचना ऐकतच संसार केला. कधीही तिचं मत डावललं नाही. ती जास्त शिकलेली नाही‌.  पण तिचे बोलणे विचारपूर्वक असतं नेहमी . शिवाय ती व्यवहार चतुर आहे. आता मात्र दुर्दैवाने माझं बोलणं ऐकण्याची पाळी तिच्यावर आली आहे. बघ कशी शांतपणे ऐकून घेते आहे माझं बोलणं. जेवढं आयुष्य ती परमेश्वराकडून येताना घेऊन आली आहे तेवढं ती नक्कीच जगणार ह्यात शंकाच नाही. मी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत वाट बघीन ती डोळे उघडण्याची. मला खात्री आहे की तो दिवस नक्की येईल."
भेटीची वेळ संपत आली होती. आजोबांनी आजीला थोपटायला सुरवात केली आणि म्हणाले तिला," येतो ग उद्या सकाळी परत नेहमीच्या वेळेला. जास्त विचार करू नकोस. शांत झोप. म्हणजे मग उद्या परत नेहमीप्रमाणे ताजीतवानी होशील माझं बोलणं ऐकायला."
आजोबा बोलायचे थांबले. सोबत आणलेल्या पिशवीतून रुमाल काढून भावनांच्या उचंबळून आलेल्या लाटांनी भरून आलेले दोन्ही डोळे हळूवारपणे पुसले.
"येतो मी. काळजी घे रे तिची मी उद्या सकाळी येईस्तोवर".
असं म्हणत एकेक पाऊल शांतपणे टाकत आजोबा वाॅर्डाच्या बाहेर पडले. जाताना माझ्या हातात एक कागद देऊन गेले. आजोबांची पाठमोरी आकृती बघत मी अलगदपणे कागद उघडला. त्यावर आजोबांनी काहीतरी लिहिले होते. वाचून डोळे पाणावले माझे आणि साता जन्माच्या नात्याचे अर्थ उलगडत गेले:

ऐकायला जर नसेल कोण
तर जगण्याला अर्थ नाही
अवघ्या देहातून तो उगाच
मात्र श्वास कोंडून राही.

भावनांची उमललेली इंद्रधनुष्य
ती दाखवू मी कोणाला 
आयुष्याचा व्यवहार आजवर
पुन्हा पुन्हा मी तपासला.

तिने एकदा तरी उघडून डोळे
किंचीत मंद हास्य तरी करावे
सातां जन्माच्या गाठीचे वचन
तिला एकदा तरी स्मरावे.

पुत्र वियोगाचे दुःख एकमेकांच्या
साथीने कसेबसे ते पचवले.
पण तिच्या एका हास्यासाठी
मन माझे अजून हे भुकेले.

अहो देवा करा काहीतरी
माझे छोटेसे मागणे ऐका ते
इतक्यात नको संपायला असे 
आमचे सातां जन्माचे नाते. 

वाचता वाचता माझ्याच ओघळलेल्या अश्रूंनी ओला झालेला तो कागद मी घडी करून खिशात ठेवला आणि मनांतल्या मनांत आजींसाठी देवाकडे प्रार्थना केली.

© सतीश बर्वे
    १६.०५.२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...