शनिवार, २३ मे, २०२६

2887. अर्थ

 मध्यरात्री वगैरे त्याला, असा धप्पकन आवाज आला... आणि झोपेतच अंग थरथरलं त्याचं. त्याला वाटलं... आपण कुठलंसं स्वप्न पाहिलं असावं, नी त्यातच बहूतेक कुठेतरी पडलो - बिडलो आपण. जराशी चुळबूळ झाली त्याची, त्याने कूस बदलली... अगदी स्वाभाविकपणे "आई गं" पुटपुटंत. आणि अचानक अस्पष्टसा कण्हण्याचा, आवाज ऐकू आला त्याला. 
तो ताडकन उठून बसला पलंगावर... आणि काॅर्नरपीसवरच ठेवलेला मोबाईल हातात घेत, त्याच्या उजेडात बघू लागला तो खोलीत. त्याला दिसली शेजारीच त्याची बायको, शांतपणे निजलेली. त्याने पलंगावरुन उठत तडक जाऊन पाहिलं, त्यांच्या मुलांच्या रुममध्येही. तर दोन्ही मुलंही व्यवस्थित झोपलेली दिसली त्याला, आपापल्या बेडवर. त्याच एकूण अस्वस्थतेत, किचनमध्ये जाऊन पाणी प्यायला तो. उघडलेल्या फ्रिजचं दार तो बंद करतच होता की... त्या उजेडातच कोणीतरी आपल्या बाजूला काही अंतरावर उभं असल्याचा, भास झाला त्याला. बंद करत असलेलं फ्रिजचं दार, त्याने पुन्हा झप्पकन उघडलं... आणि झर्रकन मान वळवत पाहिलं डाव्या बाजूला. 
त्याला दिसले होते, त्याचे चार वर्षांपुर्वी गेलेले बाबा. क्षणभरंच चर्रर्र झालं त्याच्या छातीत... आणि जागीच थिजून पाहू लागला तो, बाबांकडे डोळे विस्फारुन. बाबा काहीही बोलत नव्हते... पण चेहर्‍यावरुन मात्र, प्रचंड हवालदील झालेले वाटत होते ते. एकटक बघत होते बाबा त्याच्याचकडे, डोळेही भरुन येत होते आता बाबांचे. बाबांच्या हनुवटीवर एक मोठाला डागही दिसला त्याला, लालसर - जांभळा असा. तो स्तंभित झाला होता... ह्या सगळ्या प्रकाराचा, नेमका अर्थ न लागून. 
त्याने त्याच्या बाबांना ते असेपर्यंत, इतकं हतबल क्वचितच पाहिलं होतं. अगदी दोन - तीन वेळाच, मुख्यत्वे त्याच्या आईच्या आजारपणांत. आणि एकदम जोरजोराने कण्हू लागले बाबा. कण्हण्याचा जोर वाढत गेला त्यांचा... आणि अचानक डोळ्यांसमोरुन, नाहीसे झाले ते. त्याने पटकन फ्रिजचा दरवाजा बंद करुन, किचनचा लाईट लावला. बाहेर जात हाॅलचा लाईट लावला, पण बाबा आता कुठेच नव्हते. 
तो विचार करु लागला की... "काही वेळापुर्वी आपण झोपेतून, दचकून जागे झालो. अंग एकदम थरथरलं आपलं, जसं आपण कुठेतरी खोल पडतोय. आपल्या तोंडून 'आई गं' निघालं, नी पाठोपाठ कण्हण्याचा आवाज ऐकू आला. आत्ताही बाबा आपल्याकडे, फक्त बघत होते आधी. त्यांचे डोळे भरुन येऊ लागले, तसं आपल्याला आईची आजारपणं आठवली... म्हणजे आई आठवली. आणि लगेचच बाबांनी कण्हायला सुरुवात केली. ह्याचा अर्थ आई... आई तर बरी असेल ना?". त्याने रात्रीचे अडीच वाजलेत वगैरेची फिकीर न करता, लगेच आईला फोन लावला. 
काही रिंग्ज झाल्यावर, आईने फोन उचलला... आणि फोनवर त्याला, आईच्या कण्हण्याचाच आवाज ऐकू आला पहिला. त्याने घाईतच विचारलं आईला की... काय झालंय तिला. तेव्हा आई म्हणाली, अतिशय क्षिण आवाजात की... ती झोपेत पलंगावरुन खाली पडलीये, आणि तिला आता उठता येत नाहीये. आईकडून हे ऐकलं, नी तो तसाच नाईट ड्रेसवर बाहेर पडला. गाडी काढून, दहा मिनिटांचं ड्राईव्ह करत... तो आईकडे गेला. खालच्या सिक्युरिटी वाल्याच्या ताब्यात गाडी देऊन, तो तसाच पळत आई राहायची त्या तिसर्‍या मजल्यावर गेला. स्वतःकडल्या आईच्या घरच्या किल्लीने, त्याने दरवाजा उघडला. पळतच बेडरुममध्ये गेला तो... आणि लाईट लावताच त्याला दिसली, त्याची आई अशी खाली जमीनीवर पडून असलेली. 
त्याने मग आईच्या दोन्ही बगलेत आपले हात घालत, तिला अलगद उठवलं. पलंगावर बसवलं आईला... आणि शेजारी बसला तो आईचे खांदे, हात, पाय हळूवारपणे दाबत. तो नेहमी तिला विचारत असे... रात्री झोपतांना दरवाज्यांना, आतून कड्या न लावण्याचं कारण. आणि आई कारण देत असे त्याला... खाली एवढी कडक सिक्युरीटी असतांना, कोण येणारेय घरात वगैरे. पण त्याला आज, आत्ता कळलं होतं अखेरीस की... असं अपरात्री काही घडल्यास कोणालातरी घरात येता यावं, म्हणूनच ती कदाचित दरवाजांना कड्या लावत नसावी. 
पण आता मात्र त्याने, पक्क ठरवून टाकलं होतं मनाशी की... आई जर हे बाबांच्या आठवणींचं घर सोडून आपल्या घरी यायला तयार नसेल, तर आता रोज रात्रीचं आपणच यायचं आईकडे निजण्यापुरतं. त्याच्या मनातील हा विचार कळूनच की काय... आईने आपली मान कलती करत, त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. आणि त्याला दिसलं... आईच्या हनुवटीला चांगलाच मार लागून, तिचं तिथलं रक्त साकळल्याचं. 
त्याला नेमका कळला होता आता... मघा त्याने बघितलेला त्याच्या बाबांच्या हनुवटीवर उमटलेल्या, त्या लाल - जांभळ्या अशा मोठाल्या डागाचा 'अर्थ'.

---सचिन श. देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...