शनिवार, २३ मे, २०२६

2882. पासपोर्ट

 “कोण तुम्ही? काय काम आहे? कुणाकडे आलात?” लिफ्टमधून बाहेर पडताच नेहानं तिच्या फ्लॅटसमोरच्या फ्लॅटच्या दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या तरुणाला विचारलं.
अचानक विचारलेल्या अनेक प्रश्नांनी तो तरुण गोंधळून म्हणाला,
“मी वरद, माझ्याकडेच आलोय.”
गव्हाळ वर्ण, बऱ्यापैकी उंच आणि रूबाबदार दिसणाऱ्या त्या तरुणाकडे संशयाने पाहत नेहाने विचारलं,
“माझ्याकडे म्हणजे?”
“मी इथं या फ्लॅटमध्ये राहतो, मागच्या आठवड्यातच इथं राहायला आलो.” तो म्हणाला.
गोरापान वर्ण, मध्यम उंची, आकर्षक पंजाबी ड्रेस आणि स्टायलिश शोल्डर कट असलेल्या नेहाचं समाधान झालं नाहीये हे समजून तो तरुण म्हणाला,
“चावी घरातच राहिली म्हणून चावी बनवणाऱ्याची वाट पाहतोय… तुमचं काही ऑब्जेक्शन?”
हे स्पष्टीकरण ऐकून नेहा संकोचली. 
आजकालच्या बातम्या पाहता अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवणं धोक्याचं ठरू शकतं, हे नेहाला चांगलंच ठाऊक होतं. तरी त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि डोळ्यांतील प्रामाणिकपणा पाहून तिच्या मनातला संशय कमी झाला.
“बाहेर थांबण्यापेक्षा या माझ्याकडे, कॉफी पिऊ या,” फ्लॅटचा दरवाजा उघडत नेहा म्हणाली.
जरा संकोचतच तो नेहाच्या फ्लॅटमध्ये शिरला. नेहानं त्याला पाणी दिलं आणि नंतर कॉफीचे मग घेऊन ती बाहेर आली.
“साखर किती टाकू? १ चमचा की दोन? की त्याहून जास्त?”
शून्यात हरवलेला वरद काहीच बोलला नाही. नेहानं दुसऱ्यांदा विचारले तेव्हा तो उत्तरला,
“खूप मस्त, वेळ लागला पण शेवटी मनासारखी मिळाली.”
“अहो कोण मिळाली? कॉफीबद्दल बोलताय का?”
“नाही, नाही… तुमच्याबद्दल!” म्हणताना वरद नेहाकडेच पाहत होता.
“मला तुम्हाला भेटून, जिला मी काही दिवसांपासून शोधत होतो ती मिळाली.”
“कॉफी घ्या… थंड होईल!” विषय बदलत नेहा म्हणाली.
साखर न टाकताच त्यानं कप तोंडाला लावला.
“अहो, साखर चालत नाही का तुम्हाला?”
“नाही, नाही… चालते ना. गोडाचा भक्त आहे मी!” 
नेहाला वरदचा संशय येऊ लागला. ती एकटीच होती घरात. उगाचच बोलावलं याला, नेहाला स्वतःचाच राग आला.
“मी तुम्हाला एक सांगू?” वरदनं विचारलं.
‘आता काय सांगतो हा?’ प्रश्नार्थक मुद्रेनं नेहा म्हणाली, “हं, सांगा.”
“तुम्ही माझ्यासाठी लकी आहात,” वरद म्हणाला.
“मी आणि लकी? कशी काय? मला पाहून काही गवसलं का तुम्हाला?”
“हो, तुम्हाला पाहून मला मिळाली.”
“अहो कोण मिळाली?”
“सांगतो, ऐका… मी लेखक आहे आणि एका कादंबरीचा शेवट मला मागल्या काही दिवसांपासून सुचत नव्हता पण तुम्ही कॉफी आणली तेव्हा मला शेवट कसा करायचा ती कल्पना सुचली. एक नाही, चक्क दोन कल्पना!”
हे ऐकून नेहाचं टेन्शन कमी झालं.
“मी तो शेवट ऐकवू का?” त्यानं विचारलं.
“अहो शेवटाआधी काय ते माहीत नसेल, तर शेवट ऐकून काय समजणार?”
‘हे लेखक लोक जरा अर्धवटच असतात’, नेहा मनातल्या मनात म्हणाली. “आधीचा भाग अजिबात बोअर न करता अगदी थोडक्यात सांगा आणि मग शेवट ऐकवा.”
“चालेल, तुम्ही म्हणता तसं…
“एक मुलगी असते. खूप सुंदर… अगदी तुमच्यासारखी. ती आठ दिवसांसाठी सिंगापूरला जाते. सिंगापूर पाहणं, तिथल्या एमआरटीतून फिरणं, ‘मुस्तफा’तली खरेदी, ‘लिटल इंडिया’तला आस्वाद… अगदी मस्त चाललं असतं.
“सिंगापूरमधली पाचव्या दिवसाची संध्याकाळ मात्र तिच्यासाठी खूप वेदनादायक ठरते. ‘मेरलायन पार्क'ला छान फोटो काढल्यावर ती आईस्क्रीम खाते. अंधार पडला होता. आईचा फोन आला म्हणून ती पर्समधून फोन काढते आणि बोलत बोलतच एमआरटीतून प्रथम इंडियन रेस्टॉरंट आणि नंतर मुक्काम असलेल्या हॉटेलवर पोहोचते. 
“पर्स उघडल्यावर तिच्या लक्षात येतं, पासपोर्ट पर्समध्ये नाहीये! पर्स पुन्हा पुन्हा उघडून पाहूनही पासपोर्ट मिळत नाही. तिच्या हातापायांना अक्षरशः थरकाप सुटतो. परदेशात पासपोर्ट हरवणं म्हणजे जणू आपली ओळखच हरवण्यासारखं आहे, अशी भावना तिच्या मनात दाटून येते. डोळ्यांत नकळत अश्रू तरळलतात. तो कुठंतरी पडला असेल का? की चोरीला गेला असेल? तिला काहीच आठवत नसतं.
“घाबरून ती बाबांना फोन करते. तिचे बाबा ज्योतिष जाणणाऱ्या मित्राशी बोलून तिला सांगतात, ‘घाबरू नकोस. पुढच्या दोन दिवसांत पासपोर्ट मिळेल!’
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा मेरलायन पार्कला मोठ्या आशेनं गेली. बाबांनी सांगितलं तसंच झालं… एका भारतीय तरुणानं पासपोर्ट आणून दिला. ‘काल रात्री मला पासपोर्ट इथं सापडला. आपण पासपोर्ट शोधत इथं याल याची खात्री होती म्हणून मी इथं आलो.…’
“त्या रूबाबदार तरुणाचे आभार मानून नेहानं अत्यानंदानं बाबांना फोन लावला आणि ती बराच वेळ त्यांच्याशी बोलण्यात गर्क होती. फोन ठेवला तोपर्यंत तो तरुण निघून गेला होता. आपण त्याला त्याचं नावदेखील विचारलं नाही, तुम्ही काय करता? सिंगापूरलाच असतात का की फिरायला आला आहात? भारतात कुठं राहता? काहीच चौकशी केली नाही! एक मात्र खरं, त्या तरुणानं तिचं हृदय जिंकलं होतं.
“भारतात परत येताना तो तरुण तिला चांगी एअरपोर्टवर दिसला. नंतर मुंबई एअरपोर्टवर आणि दोन महिन्यांपूर्वी पुण्याला टिळक रोडवर. प्रत्येक वेळी अंतर जास्त आणि खूप गर्दीमुळे त्याची भेट झाली नाही. तो वारंवार दिसत होता, पण प्रत्येक वेळी नियती जणू त्यांना काही पावलं दूरच ठेवत होती. त्या मुलीच्या मनात एकच विचार घोळत राहिला…
“योगायोग म्हणावं की हा दैवाचा खेळ…?”
“कथानक खूप छान आहे!” नेहानं अभिप्राय दिला.
“आता शेवट ऐका…
“ती मुलगी त्याला शोधत राहिली, पण यश आलं नाही. आणि अचानक एका मैत्रिणीच्या लग्नात तो दिसला… मैत्रिणीच्या गळ्यात हार घालताना! बिचारी ती, किती कमनशिबी!
“हा पहिला पर्याय…”
“आणि दुसरा पर्याय?” नेहानं उत्कंठेनं विचारलं.
“योगायोगानं दोघांची भेट होते. तोही अविवाहित असतो. त्यालाही ती मुलगी आवडलेली असते आणि त्या दोघांचं मिलन होतं… हा दुसरा पर्याय.
“हे दोन्ही पर्याय मला तुम्हाला भेटल्यावर सुचले. मी पहिला पर्याय घेऊन कादंबरी पूर्ण करतो. एनी वे, थँक्स, निघतो मी… असं म्हणून उठणाऱ्या वरदला थांबवत नेहा म्हणाली,
“मला वाटतं तुम्ही दुसरा पर्याय वापरून कादंबरी पूर्ण करा.”
“मला पहिला पर्याय घ्यावा असं वाटतंय कारण त्यामुळं वाचक विचार करतील, असा शेवट करायला नको होता आणि ही कादंबरी त्यांच्या स्मरणात राहील.”
“नको, नको… तसं करू नका!” नेहाचा सूर आग्रही होता.
“पण, तुम्ही असा आग्रह का धरता?” त्यानं न राहवून विचारलं.
नेहाच्या डोळ्यांत अचानक ओलावा दाटला. काही क्षण ती शांत राहिली. मग हलक्या आवाजात ती म्हणाली…
“कारण ही कथा तुमची नाही तर माझी आहे!”
“म्हणजे तुम्हीही लिहिता?” त्यानं आश्चर्यानं विचारलं.
“नाही, नाही… मी लिहित वगैरे नाही. पण तरीही ही माझी कथा आहे.”
“मला नाही समजलं, तुम्ही काय म्हणता?” त्यानं विचारलं.
“मला सांगा, ही कथा काल्पनिक आहे का?” नेहानं विचारलं.
“नाही… मला २-३ महिन्यांपूर्वी बसमध्ये एक डायरी सापडली. मी डायरीत कुणाचं नाव आहे का ते पाहिलं. नाव किंवा फोन नंबर नव्हता पण या कादंबरीतला प्रसंग थोडक्यात लिहिला होता. फक्त शेवट नव्हता.
“त्या डायरीच्या शेवटच्या पानावर न समजणारं एक गणितातलं समीकरण होतं.”
“स्टार + स्टार = स्टार, असं होतं का?”
“हो, होतं… पण मला त्याचा अर्थ कळला नाही.”
“त्याचा अर्थ, दोन प्रेमी जीवांच्या भेटीचा शेवट त्यांच्या मिलनात व्हावा आणि म्हणून मी तुम्हाला ‘दुसरा’ पर्याय सांगितला. तुम्ही कादंबरी पूर्ण करा आणि कादंबरीला नाव द्या ‘पासपोर्ट’. ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे असा स्पष्ट उल्लेख करा. नायिकेचं नाव ‘नेहा‘ ठेवा.”
“आणि नायकाचं नाव?” वरदनं विचारलं.
“मला त्याचं नाव माहित नाही पण आजकाल ‘राज-नेहा’ जोडी प्रचलित आहे म्हणून नायकाचं नाव ‘राज’ ठेवा. लेखकाच्या परिचयात तुमचा फोन नंबर नक्की टाका.”

पुढच्या महिन्यात ‘पासपोर्ट’ कादंबरी मार्केटमध्ये आली आणि दुसऱ्याच दिवशी वरदला फोन आला…
“सर, मला तुमच्या ‘पासपोर्ट’ कादंबरीच्या १०० प्रती विकत घ्यायच्या आहेत. मला त्या कधी मिळू शकतील?” 
फोनवरल्या त्या अनोळखी आवाजात उत्साह होता, अधीरता होती आणि वरदसाठी ही तर खूप मोठी गुड न्यूज होती!
“तुम्हाला कादंबरी इतकी आवडली?” वरदनं विचारलं.
“सर, माझ्यासाठी ही कादंबरी हे खूप मोठं गिफ्ट आहे. सर, आज संध्याकाळी आपण भेटू शकतो का? डायमंड हॉटेलला ६ वाजता?”
“हो, नक्की भेटू. पण आपण एकमेकांना कसं ओळखणार?” वरदनं विचारलं.
“सर, तुमचा फोटो ‘पासपोर्ट’मध्ये आहे, मी तुम्हाला ओळखेन.”
वरद बरोबर सहा वाजता हॉटेल डायमंडला पोहोचला.
“वरद सर, मी राज…” एका रूबाबदार तरुणानं हस्तांदोलन केलं.
“सर, एक विचारू? ‘पासपोर्ट’मधील नेहा तुमची कोण?”
“मैत्रीण,” वरद उत्तरला.
“सर, मला नेहाला भेटता येईल का?”
“पण का भेटायचंय तुम्हाला?” वरदनं प्रतिप्रश्न केला.
राज संकोचला.
“वरद सर, ‘पासपोर्ट’मध्ये राज आणि नेहाचं मिलन होतं, तसं सत्यात होऊ शकेल का? परवापर्यंत मला ते अशक्य वाटत होतं… पण ‘पासपोर्ट’नं माझ्या मनात आशेचा नवा किरण जागवला!”
“राज, म्युझिकचा आवाज कमी करायला सांगाल का इथल्या मॅनेजरला?”
राज जागेवरून उठताच वरदनं नेहाला व्हिडिओ कॉल करून सांगितलं, “डायमंड हॉटेलला या, दोन बुके घेऊन. आजच प्रपोज करूया.”
“वरद, काय बोलता तुम्ही? मी आदर करते तुमचा… पण हे काय भलतंच!”
तेवढ्यात वरदनं कॅमेरा राजवर फोकस केला आणि नेहाला विचारलं, “येणार ना?”
चकीत झालेल्या नेहाच्या चेहऱ्यानं उत्तर दिलं होतं. 
“हॉटेलला पोहोचल्यावर मला फोन करा…” म्हणत वरदनं राज जागेवर परतण्यापूर्वीच फोन बंद केला.
गप्पा मारत कॉफी पिऊन झाली. त्यानंतर आलेले स्टार्टर्सही संपले.
“राज, मी आलोच…” म्हणत रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या नेहाचा हात धरून वरदनं तिला आत आणलं. ती हवीहवीशी वाटणारी, पण अशक्य वाटणारी अनपेक्षित भेट राज आणि नेहासाठी वरदच्या ‘पासपोर्ट’मुळंच शक्य झाली होती.
दोघांनी बुके देऊन प्रपोज केलं.
“नेहा, स्टार + स्टार  = स्टार झालं ना?” वरदनं विचारलं.
“वरद, झालं नाही… तुम्ही केलंत. म्हणून तुम्ही तर सुपरस्टार आहात!” नेहा म्हणाली. 
काही लोक स्वतः प्रेमात जगत नाहीत; पण इतरांच्या आयुष्यात प्रेमाचा सुंदर शेवट करून स्वतःचा मोठेपणा सिद्ध करतात.
“चला, तुम्ही जेवण करा. स्वीट डिश एकमेकांना भरवा. मी आपला निघतो आणि मला लग्नाला जरूर बोलवा. पण दोन्ही घरचा पाहुणा म्हणून उपाशी मात्र ठेवू नका.”
“लग्नाचं गिफ्ट म्हणून सगळ्यांना ‘पासपोर्ट’ देऊ,” राज आणि नेहा आनंदानं म्हणाले.
“आणि लागतील तेवढ्या प्रती या लेखक मित्राकडून तुम्हाला लग्नाचं गिफ्ट!” असं म्हणत वरदनं त्या दोघांना मोकळीक दिली. एकमेकांना समजून घेत दिलखुलास गप्पा मारण्याचा जणू पासपोर्टच त्यानं त्यांना दिला.
राजानं नेहाला हरवलेला ‘पासपोर्ट’ मिळवून दिला होता, तर वरदनं तिला हरवलेला जीवनसाथी मिळवून दिला होता.
वरदनं फक्त एक कादंबरी लिहिली नव्हती, तर दोन हृदयांना एकमेकांपर्यंत पोहोचवलं होतं आणि या सर्वांना जोडणारा मजबूत धागा होता- ‘पासपोर्ट’!

- दिलीप कजगांवकर, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...