शनिवार, २३ मे, २०२६

2898. अधिकस्य अधिक फलम्

 एक दिवस माय लेकी बोलत होत्या. गरोदर मुलीने पोटावरून हात फिरवत आईला विचारलं, "सर्व व्रतात श्रेष्ठ असं कोणतं व्रत जेणेकरून माझं येणारं बाळ सुदृढ, हुशार तर होईलच शिवाय मी केलेल्या व्रताचं पुण्य बाळ जन्मल्यापासून बाळाला मिळेल? "
आई म्हणाली, "छान प्रश्न विचारलास बाळा. मी आज हे व्रत तुला सांगते पण तू प्रॉमिस कर, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाहीस. मनोभावे हे व्रत करशील आणि चार  सखींना पण करायला लावशील. ह्या व्रताने तेजस्वी, निरामय, प्रज्ञावान संतती होते जी दीर्घायुषी व तुझ्या पुण्याने यशस्वी होते " 
"हो आई, नक्की करेन मी हे व्रत, कधी सुरु करावं?" 
"हे व्रत गरोदर राहिलं की सुरु करावं आणि बाळ निदान दोन वर्षाचं होईपर्यंत सुरु ठेवावं. आटपाट नगर असो वा मेट्रो शहर असो, हाऊसवाईफ असो वा वर्किंग वूमन असो, झोपडीतली असो वा बंगल्यातली, काळी असो वा गोरी असो कुठलीही स्त्री गरोदर राहिली की तिने संकल्प करावा, मी बाळाला सहा महिने फक्त आणि फक्त माझंच दूध (exclusive breastfeeding ) पाजणार आणि कमीत कमी दोन वर्ष तरी स्तनपान चालू ठेवणार ! हा संकल्प तिने तिच्या घरच्यांना विशेषतः आई व सासूला आणि तिच्या स्त्री रोग तज्ञाला ठासून सांगावा म्हणजे व्रत मनोभावे करता येतं वं खंड पडत नाही.  गरोदरपणात संकल्प केला की  व्रताची सुरुवात डिलिव्हरी झाल्या झाल्या करावी. त्यासाठी काय करावं? थोडं स्ट्रॉंग व्हावं, नॉर्मल होवो अथवा सीझर, बाळाला लगेच छातीला लावावं, चीक दूध पाजावं - ही पूजेतील पहिली फलदायी पायरी आहे. साखर पाणी वा मध असे दुसरे काही आजीने चाटवल्यास कोप होऊन व्रताचा भंग होतो त्यामुळे आधीच तशी कल्पना सगळ्यांना द्यावी. पूजेचे मुख्य पद म्हणजे बाळाला पाळण्यात न ठेवता आईच्या कुशीतच ठेवावे व भूक लागेल तेव्हा अंगावरच पाजावे " आई म्हणाली.
"त्याने काय होते आई? " मुलीने विचारले. 
" बाळ जेवढे जास्त छातीवर ओढणार तेवढे आईचे दूध वाढते. ह्या व्रतादरम्यान फॉर्मुला पावडर, गायी म्हशीचे पाणी टाकलेले दूध वं बाटली ह्या गोष्टी बाळासाठी पूर्णपणे वर्ज्य कराव्या. व्रतादरम्यान एकदा तरी लॅकटेशन तज्ञाचे दर्शन जरूर घ्यावे त्यामुळे व्रत पूर्ण होण्यासाठी मदत होते. मोदक खाल्याने गणपती बाप्पा मोदक देणाऱ्यावर खुश होतो तसा बाळंतीणीला पौष्टिक आहार दिल्याने आई सासू ह्यांनाही पुण्य लाभते. हे व्रत मनापासून, न कंटाळता कमीत कमी दोन वर्ष केल्यास बाळाला पुढची सत्तर ऐन्शी वर्षे आरोग्य लाभते, बाळ हुशार होते, ऍलर्जी - जंतू संसर्ग - स्थूलता - डायबेटीस ह्या सटव्या त्याचं काहीही वाकडं करू शकत नाहीत. तू देखील हे व्रत श्रद्धेने कर... " आई 
" आई, जसं अधिक मासात अधिक पुण्य करावं तसं ह्या व्रतात मी अधिक काय करू शकते? " लेकीने विचारलं. 
"बरवा प्रश्न केलास बाळा. आपल्या बाळाचं पोट भरण्याचं व्रत तर अगदीच साधं आहे पण आपल्याबरोबरीने दुसऱ्या बाळांचं क्षुधाशमन केल्यास तुला अगणित पुण्य लाभेल " आई म्हणाली.
" तेच! त्यासाठी काय करावं? " 
" तुला भरपूर दूध येऊ लागलं, बाळाचं पोट भरून जर दूध एक्सट्रा उरू लागलं तर मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस, आईचं बहुमूल्य दूध फेकू नकोस ! मिल्क बँकेत म्हणजेच मानवी दुग्ध पेढीत जा आणि ते दूध दान कर. तुझ्या बाळाची झोळी आशीर्वादाने भरून जाईल " आईने सांगितलं. 
" पण आई, असं कसं कुणाचं दूध कुणाला वापरणार? आणि माझ्या बाळाला कमी पडलं तर? शिवाय ह्याचा मला काय फायदा? " लेकीने साशंक होऊन विचारलं. 
" दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे मानवी दुग्ध दान! दान केलेल्या दुधावर प्रक्रिया करून ते निरजंतूक करून मगच वापरतात. तू जर दुग्ध दान केलंस तर तुझं दूध वाढतं शिवाय तुला छाती भरणे, दुधाच्या गाठी होणे अशा समस्या होत नाहीत आणि पुण्य मिळतं ते वेगळंच. हे अत्युच्च दान तू केल्यास तुला श्रेष्ठतम फळ मिळेल " 
" आई, तू केलं होतंस हे दान? " मुलीने आईला विचारलं.
आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली, " बाळा, तू काचपेटीत आणि मी ICU त होते तेव्हा एका अज्ञात मातेने मिल्क बँकेत दान केलेल्या दुधाने तुला मरणाच्या दारातून परत आणलं, मी आजही त्या  मातेची आभारी आहे आणि तिच्या लेकरासाठी आजही मी सुख मागते. " 
"हो आई? " लेकीने हात जोडून मनोमन त्या मातेचे आभार मानले.
"माझी इच्छा आहे तू हे दान करावं. रक्तदान, अवयव दान हे सुद्धा महत्वाचे पण लक्षात ठेव दुग्ध दान हे तू आई म्हणून बाळाला पाजत असतानाच करू शकते, नंतर कधीच नाही म्हणून ही गुपित दानाची संधी सोडू नकोस आणि तुझ्या बाळाचं भविष्य उज्वल कर "
"हो आई, माझ्या घराजवळ कोणती मिल्क बँक आहे हे मी गुगल मातेला प्रश्न विचारून नक्की शोधेल, गरज पडली तर माझी भगिनी गुगल जेमिनी हिची मदत घेईन.  अधिक महिन्याप्रमाणे अधिक फळ देणारं दुग्धदानाचं महाव्रत मी नक्की करेल " 
जशी ह्या ' शिशु क्षुधा शमन' व्रताची महती तिला कळली तशी प्रत्येक स्तनदा मातेला ती कळो आणि त्या मिल्क बँकेत दुग्धदान करोत. 
ही शेकडो जीव वाचवणारी कहाणी लाईक शेयर कमेंट करून करा सुफळ संपूर्ण 

©️®️ डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...