शनिवार, २३ मे, २०२६

2844. हॉर्न प्लिज

 ही साधारणपणे अठरा वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. घरात मारूती 800 आल्या दिवसापासूनच गाडी शिकण्याची अनावर इच्छा माझ्या मनात उसळ्या मारत होती. नवर्‍याला माझा मनसुबा सांगितल्यावर.
“मग चालवायची ना ! त्यात काय विशेष आहे? स्कूटरला दोन चाकं, तशी ह्या गाडीला चार चाकं. बाकी काय वेगळं असतं…!!"”
अरे वा, म्हटलं सोप्पंच आहे अन काय मग.
मग येता जाता गाडी शिकायला जायचं टुमणं सुरू केलं. कधी तो गाडी शिकण्याचा क्षण येतो, अन कधी मी स्टिअरींग हातात घेते असं मला होऊन गेलं होतं. पण नवर्‍यानं तो क्षण शिताफीनं पुढं ढकलायला सुरूवात केली.  मग एके दिवशी ‘चूल बंद आंदोलन’ची धमकी दिल्यावर पोर्चमधे उभ्या असलेल्या गाडीत ड्रायव्हींग सिट वर मी स्थानापन्न झाले.
लगेच गाडी रस्त्यावर घेण्यापेक्षा नवर्‍यानं आधी मला ABC शिकवलं… एक्सिलेटर, ब्रेक, क्लच… ‘गाडी न्युट्रल वर ठेवायची, सेल मारायचा, गाडी स्टार्ट झाली की क्लच दाबून गाडी फर्स्टला टाकायची… मग हळूहळू क्लच सोडायचा आणि एक्सिलेटर वाढवायचा. त्याचप्रमाणं पुढचं नंतर करावं.’
आधी न्युट्रल टाकून गाडी स्टार्ट करायला शिकायचं असं ठरलं. त्याप्रमाणे मी न्युट्रल टाकला आणि सेल मारला. तोच गाडीने ढूप्पकन बेडूकउडी मारली, आणि बंद पडली.
न्यूट्रल पडलाच नव्हता. गाडी गिअर मधेच होती. गाडीला बसलेल्या गचक्यासरशी नवर्‍याचा जीव कंठाशी आलेला मला दिसला.
मग तो दिवस नुसतं गिअर, फर्स्ट, सेकंड, थर्ड, टॉप रिव्हर्स अशी पाच मिनिटं प्रँक्टीस घेऊन, नवर्‍यानं मला गाडीबाहेर काढलं. गाडी घाईघाईनं लॉक करून चावी खिशात टाकली. 
पुन्हा दुसर्‍या, तिसर्‍या दिवशी तेच… फर्स्ट- सेकंड-थर्ड… मला कंटाळा येऊन गेला. पण आधी गाडी चालवणं म्हणजे काही विशेष नाही म्हणणारा नवरा आता, “गाडी चालवणं म्हणजे काय तोंडच्या गप्पा आहेत का? कुणाला ठोकलं बिकलं तर नसती आफत.” वर येऊन पोहोचला.
शेवटी म्हटलं, हे काही जमायचं नाही. माझ्या एका मैत्रिणीला गाडी चांगली चालवता येत होती. तिच्याकडूनच शिकावी असा बेत केला.
तो बेत ऐकल्यावर घरात एकच गहजब झाला. त्या मैत्रिणीच्या ड्राइव्हिंगविषयी बरीच टिका टिपण्णी झाली. पण, मी माझ्या निर्णयावर ठाम बघून उगीच दोघी मैत्रिणी मिळून गाडीचा बट्ट्याबोळ नको, म्हणून नवर्‍यानं दुपारच्या वेळी जीवावर आल्यासारखी हळूच गाडी बाहेर काढली. गावाबाहेरचा एक रस्ता- गाडी शिकण्यासाठी माझ्या दोन्ही मुलींनी व त्यांच्या वडिलांनी मिळून ठरवला. तिथं गेल्यावर स्टिअरींग माझ्या हातात देण्यात आलं. मला आता आनंदासोबतच जरा टेन्शनही आलं… तसं आजुबाजूला शेतं, शेतवस्त्या, गोठे, त्याच्यात बांधलेली गुरंढोरं होतीे… रस्त्यावर मात्र चिटपाखरू पण नाही! नवख्या ड्रायव्हरसाठी अगदी स्वप्नवत, आनंदी दृष्य होतं ते…
ट्रेनिंग सुरू झालं… पहिला धडा- गाडी स्टार्ट करणे. 
“क्लच दाब, न्युट्रल टाक, सेल मार…”
मारला……
गाडीनं ढुप्पकन बेडूक उडी मारली. नवर्‍याच्या घशात आवंढा ! गटांगळ्या खाऊ लागलेला, मला न बघताही दिसला ! आता स्वत:च एकदा न्युट्रल पडल्याची खात्री करून घेऊन मला सेल मारायला सांगितलं.
गाडी सुरू झाली, आणि जागीच फुरफुरत उभी ठाकली. आता ABC… ॲक्सिलेटर, ब्रेक, क्लच… गिअर टाकण्याआधी पुन्हा जोरदार सूचना.
“ब्रेकवर लक्ष ठेवायचं. रस्त्यावर कुणी नाही म्हणून जोरात घेशील. कुत्रबित्रं आडवं आलं तर पंचाईत होईल !”
मी नंदीबैलासारखी मान डोलावली. आता गाडी शिकायचीच आहे म्हटल्यावर नवरा सांगेल ते ऐकणं भाग होतं. पण तशी ‘ऐकून घ्यायची’ सवय नसल्यानं जरा जड जात होतं.
“हं, क्लच दाब… फर्स्ट टाक.”
टाकला…
“आता क्लच सोड हळूहळू… आणि ॲक्सिलेटर दे.”
दिला…
गाडी एक आचका देऊन धुडूप्पकन पुन्हा बंद ! क्लच सोडून त्याच स्पीडनं ॲक्सिलेटर देणं ह्या दोन्ही क्रिया एकाचवेळी जमणे म्हणजे नव्या नवरीला लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी सासूला दीड तारी पाक करून दाखवावा लागावा, इतकं अवघड प्रकरण वाटलं मला.  दोन्ही क्रिया एकाचवेळी करणं काही केल्या जमेना. गाडीच्या अजून दोनचार बेडूक उड्या झाल्यावर मात्र गाडी नीट हळू हळू रस्त्यावर चालू लागली. पण मला गाडीत सगळंच खूपच अनकम्फर्टेबल वाटत होतं. बॉनेटचा फारच अडथळा वाटत होता त्याच्यामुळे रस्ता पण धड दिसत नव्हता.
गिअर खरं म्हणजे डोळ्यासमोर पाहिजे होते, असं वाटत होतं. रस्त्यावर नजर ठेऊन खाली न बघता गिअर टाकणं फारच बोअरींग प्रकार वाटत होता. सीट पण फारच खाली आहे, असं वाटत होतं. उशीवर बसुनही मला रस्ता समाधानकारकपणे दिसत नव्हता. सिट मागं पुढं करायची सोय असते, तशी वर खाली पण करायची सोय असायला पाहिजे होती. रस्त्यावरचे लोक जादूनं अदृष्य करता यायला पाहिजे होते. असे भयंकर इनोव्हेटीव्ह विचार माझ्या मनात दाटी करत होते. एखादा मिनिटभर गाडी चालली असेल तोच समोरून एक मोटरसायकलस्वार येताना दिसला. मी मनात म्हटलं… ‘आत्तापर्यंत कुत्रंही नव्हतं रस्त्यावर… आणि आत्ताच हा मुडदा कुठून उगवला…!’
मनातला सात्विक संताप शब्दांचं हिंस्त्र रूप घेऊन मनातल्या मनात नाचून गेला. त्याला पाहिल्याबरोबर माझी गाडी रस्ता सोडून साईडला जायला लागली.
नवरा म्हणे, “एवढा मोठा रस्ता सोडून तिकडं कुठं खड्डयात चाललीस?”
म्हटलं, “तो येतोय ना समोरून…!”
“येऊ दे ना… त्याला डोळे आहेत ना! आणि गाडीला ब्रेक पण आहे.” इती नवरा.
मी मनातल्या मनात, “ब्रेक… ब्रेक… ब्रेक…”
आता मोटरसायकलवाला बराच पुढं आला होता. मला ड्रायव्हिंग सीट वर बघून, माझ्यापेक्षाही सावधगिरीनं माझ्याकडे बघत बघत जीव वाचवत पसार झाला.
आता रस्त्यावर कुणीच नव्हतं. गाडी पण छान संथ गतीनं रमत गमत चालली होती. रस्ताभर झाडांनी छान गार सावली अंथरली होती. हवेत पिकांवरचा गंध दरवळत होता. सगळ्या आसमंतात माझ्या नावासारखीच नीलिमा दाटलेली होती. मला निवांत वाटत होतं. तोच शेजारून अरसिक सूचना आली, 
“सेकंड टाक!”
मला जीवावर आलं. म्हटलं, ‘चांगली चालतीये ना गाडी. मग कशाला आता मोसम तोडायचा?’ पण मग नाईलाजानं ‘सेकंड’ टाकला… तो सेकंड न पडता डायरेक्ट ‘फोर्थ' पडला. परत भयंकर झटापट करून सेकंड टाकला; तोच समोरून सायकलवर मागं ‘घास’ बांधून एक सायकलस्वार येताना दिसला.
त्याचा ‘घास’ अर्धा रस्ता अडवून चालला होता. माझ्या सेकंड-थर्डच्या घोटाळ्यातच तो जवळून जाऊ लागला. आणि अचानक… माझ्या गाडीच्या समोरच्या काचेवर मला हिरवागार ‘घास’ पसरलेला दिसला आणि दुसर्‍याच क्षणी तो ‘घास’वाला रस्त्यावर धारातिर्थी पडलेला दिसला!
तोपर्यंत गाडी वीस-पंचवीस फूट पुढं गेली होती. पण तरी 'माता-भगिनी' वरून त्यानं केलेलेे मंत्रोच्चार मला स्पष्ट ऐकू आले. इकडे नवर्‍याच्या कानशिलावर घर्मबिंदू गोळा झालेले. 
तेवढ्यात माझा मागचा कारनामा बघून घाबरलेला, दाढीला डोक्याला लाल मेंदी लावलेला, सायकलला दोन्हीकडे पावाच्या मोठाल्या पिशव्या लटकावलेला एक मुसलमान पाववाला नको भलत्या घोळात अडकायला, म्हणून घाईघाईनं मला ओव्हरटेक करून जायला लागला…
पण त्यालाही कसा काय माहीत, जरासा धक्का लागलाच, तसा तो पण कोलमडला. नशीब गाडीच्या पुढं नाही आला. रस्त्याच्या कडेच्या घळीत तो गेला. मी आपली व्रतस्थपणे गाडी पुढं नेली. मागून त्याच्या मोठमोठ्यानं बडबडण्याचा आवाज आला.
मी म्हटलं, “काय म्हणतोय तो?”
“काही नाही, ‘सलाम आलेकुम’ म्हणतोय तुला.” - नवरा.
असं रस्त्यानं कुणाला पाडत, कुणाला वाचवत मी गाडी बरीच दूर नेली… पण तोपर्यंत मला अगदी मानसिक थकवा आला. नवर्‍याचे पण पेशन्स संपत आले होते (जे आधीच कमी असतात). मग जास्त अंत न बघता मी साईडला गाडी थांबवली आणि अगदी साळसूदपणे नवर्‍याकडे गाडी सोपवली.
दुसर्‍या दिवशी पुन्हा त्याच वेळी, त्याच स्थळी गाडी घेऊन आम्ही हजर! मी स्टेअरींगवर स्थानापन्न. पुन्हा क्लच, ब्रेक, ॲक्सिलेटर… ट्रेनिंग सुरू. निघाली गाडी कडेकडेनं. कालचं ट्रेनिंग पाहिलेली आजुबाजूच्या वस्तीवरची लहान लहान मुलं, आजही काहीतरी एक्सायटींग बघायला मिळण्याच्या आशेनं रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर दबा धरून बसलेली. काही रिकामटेकडी टाळकी कामात असल्याचा आव आणत एक डोळा रस्त्यावर देऊन असलेली. मी सगळ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून माझ्या ध्येयाप्रती लक्ष केंद्रीत करून गाडी चालवू लागले.
आज तर कुणीच मधे पण आलं नाही. चांगली पाच मिनिटं गाडी निर्धोक चालली… तोच एक गॅस सिलिंडरचा डिलीव्हरी बॉय रस्त्याच्या कडेकडेनं रमत गमत जाताना दिसला; म्हणून मी गाडी जरा रस्त्याच्या मधून घेतली. तोच उजवीकडून शेजारच्या आडव्या रस्त्यावरून एक दुधाच्या किटल्या दोन्ही बाजूला लावलेला मोटारसायकलस्वार, मुक्त आकाशात भरार्‍या मारणार्‍या वैमानिकासारखा रस्त्यावर अगदी माझ्या गाडी समोर अवतीर्ण झाला!
नव-याचं सारखं ‘ब्रेक… ब्रेक…’ चालूच होतं. त्यामुळं मी ॲक्सिलेटरवरून पाय उचलल्यावर ब्रेक नाही सापडला तर काय घ्या, म्हणून क्लच वरचा पाय आधीच ब्रेक वर अल्लाद ठेवलेला होता.
वैमानिक समोर दिसल्याबरोबर जोरात ब्रेकची आज्ञा झाली, तसा मी कच्चकन ब्रेक दाबला. क्लच न दाबता नुसताच ब्रेक दाबल्यानं गाडीला एकदम थुडथुडी भरली. तेव्हा आधीपेक्षाही जोरात ऑर्डर सुटली, ‘क्लच… क्लच दाब पटकन…’ तसा मी ॲक्सिलेटर वरचा उजवा पाय डावीकडे क्लचवर टाकला. आणि अशा रितीने माझ्या पायांचा क्रॉस झाला.
पण एवढी धडपड करूनही मी डावीकडचा सिलिंडरवाला डिलीव्हरी बॉय आणि उजवीकडचा दुधवाला वैमानिक अचूक टिपले होते.
घटनेनंतरचं दृष्य साधारणपणे असं होतं… सिलिंडरवाल्याला मागून हळूच धक्का बसल्यानं तो जोरात पुढे ढकलला गेला आणि रस्त्याकडेच्या उतारात दोन्ही पाय आणि टाक्या जमिनीला टेकलेल्या अवस्थेत सायकलवरच त्रिकोनासनात पुतळ्यासारखा पाठमोरा उभा!
वैमानिक दुधाच्या किटल्यांसह गवतात तोंड घालून पालथ्या शवासनात पडलेला आणि मी स्टेअरींगच्या पलीकडे खाली पायांचा क्रॉस करून बधीरासनात बसलेली!
शेवटी समस्त नवरा जातीच्या प्राण्याचा जो ठेवणीतला वसकण्याचा स्वर असतो तो स्वर लावून नवर्‍यानं मला त्या अवस्थेतून बाहेर काढलं. माझ्या टिपलेल्या दोन्ही सावजांनी भानावर येण्याच्या आत आम्हाला तिथून अंतर्धान पावणं भाग होतं. त्यामुळे परत क्लच–ब्रेक–ॲक्सिलेटर करून गाडी स्टार्ट करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी झटकन स्टेअरींगचा मोह सोडून, दार उघडून, गाडीला वळसा घालून  दुस-या दाराशी गेले.
नवरोजींनी आतल्या आत सरकून स्टेअरींग ताब्यात घेतलं. आणि झटक्यात गाडी दोन्ही सावजांच्या नजरेच्या टप्प्याबाहेर काढली. 
घरी आल्यावर मी शांतपणे आत्मनिरीक्षण केलं… तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ड्रायव्हींग काही फारसं अवघड काम नाहीये. तरीही आपल्याकडून एवढा धांदरटपणा का झाला असेल बरं?
दोन दिवसांचा घटनाक्रम मी पुन्हा नजरेपुढं प्ले केला… आणि ‘युरेका युरेका’च झालं मला एकदम! मी ड्रायव्हींगला बसले की शेजारच्या सीटवरून ‘ए के फोर्टीसेव्हन’मधून गोळ्या सुटाव्यात, तशा सूचना सुटत होत्या. इतक्या गोळ्या झाडल्यावर तर मायकेल शूमाकर पण स्टीअरींग व्हील सोडून पळाला असता.
‘नवरा सोबत असताना बायकोनं गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नये’, हा मोठा धडा मी शिकले आणि सरळ ड्रायव्हींग स्कूल जाॉईन केली.
तिथं शिकवायला नेमका माझ्या पार्लर मधे येणार्‍या एका क्लाएंट कम मैत्रिणीचा मुलगाच होता. त्यानं सकाळी सातची बॅच मला दिली…
मी आपली पहाटेच उठून, स्नानादी कर्मं उरकून, देवाला दिवा-बिवा लावून मनोभावे नमस्कार केला आणि रणांगणावर जावं, त्या आवेशात ड्रायव्हींग स्कूलवर पोहोचले.
माझ्यासारखेच काही नवखे लढवय्ये तिथं होते. त्यातला एक लढवय्या आणि एक लढवय्यी गाडीत मागे बसले. मला त्या शिकवणार्‍या मुलानं हातानंच खूण करत स्टेअरींगवर बसायला सांगितलं आणि तो पुढं माझ्या शेजारी येऊन बसला.
ट्रेनिंग परत सुरू झालं… परत ABC… म्हटलं, “ते माहीत आहे. पुढं बोल…”
म्हणे, “गिअर्स टाकून दाखवा.”
दाखवले.
“करा गाडी स्टार्ट.”
केली. विशेष म्हणजे एकही बेडूक उडी नाही!
“टाका फर्स्ट… सेकंड… चला कडेकडेनं.”
गाडी डायरेक्ट हायवेवर. सकाळची वेळ असल्यानं रस्त्यावर रहदारी जवळजवळ नव्हतीच. शिकवणारा मुलगा शांतपणे बसलेला. बरंच पुढे गेल्यावर तो मला म्हणाला,
“काकू, चांगली जमते गाडी तुम्हाला. गिअर्स पण टपाटप टाकता. कशाला पैसे वाया घालवता? घरच्याच गाडीवर रोज प्रॅक्टीस करा… सकाळी गर्दी नसताना.”
मी तर भलतीच खूष झाले ना बा! पण तरी मी त्याला आधीचं दोन दिवसाचं रामायण सांगितलं. तो म्हणाला, 
“एकटीनंच काढा गाडी हळूहळू. सूचनांचा ओव्हरडोस होतोय तुम्हाला.”
त्याचं बोलणं मला शंभर टक्के पटलं.
मग एके दिवशी सकाळी सहालाच गाडी काढली. माझी धाकटी कन्या मोटारसायकल चांगली चालवायची, तिला आधार म्हणून सोबतीला घेतलं. रमत गमत कॉलन्यांमधल्या रस्त्यांमधून फर्स्ट-सेकंड करत करत एक चक्कर मारली. कॉन्फिडन्स पन्नास टक्क्यांनी वाढला!!
दुसर्‍या दिवशी सातला, तिसर्‍या दिवशी आठला, अशी हळूहळू अकरा-बाराच्या गर्दीतून पण गाडी जमायला लागली. नुसती गाडी काढून चक्कर मारायची आणि गाडी पोर्चमधे लावून टाकायची, ह्याच्यात पटाईत झाले होते मी.
पण एखाद्या कार्यक्रमाला किंवा कुणाच्या घरी गाडी न्यायची म्हटलं की मला पार्कींगचं जाम टेंशन चढायचं… ‘कुणी मागेच गाडी लावून ठेवली तर? कुणी पुढंच लावून ठेवली तर? गाडी नीट काढता येईल का?’ ह्या सगळ्या काळजीनं पोटात गोळा यायचा. कार्यक्रमात किंवा कुणाशी बोलण्यात मनच लागायतं नाही, सगळं लक्ष गाडीकडे लागून रहायचं. 
रात्री झोपेत पण गाडी कुठंतरी बंदच पडलीय, कुठंतरी रिव्हर्स घेताना मागच्या नालीत एक चाकच फसलंय, कुणीतरी गाडीखालीच आलंय… अशी स्वप्नं पडायची आणि घाम फुटायचा. गाडी काढायची म्हटलं की मला बरंच अवसान गोळा करावं लागायचं.
एकदा असंच एका संध्याकाळी मला गाडी काढायला लावायची म्हणून मुलींनी माझ्या बर्थडे पार्टीची टूम काढली. धाकट्या मुलीची एक अमराठी मैत्रीण पण त्यांच्यात नाचू लागायला, ‘आंटी चलो… आंटी चलो…’ करायला.
मी आपलं आवरून निघाले. मला वाटलं दोन स्कुटींवर चौघींनी जायचं असेल. पण मुली म्हणाल्या,
“अहं, असं नाही… आज तू आम्हाला आधी लाँग ड्राईव्हला नेणार. मग हॉटेलमधे पार्टी!”
माझ्या घशात आवंढाच आला. लाँग ड्राईव्ह तर ठीक होतं, पण हॉटेलमधे गाडी पार्क केल्यावर नीट काढता नाही आली तर? तिथं इतक्या लोकांसमोर फजिती व्हायची. पण मुली काय ऐकतात का? काढायलाच लावली गाडी. आता गाडी चालवता येत होती तरी गाडी चालवण्यात आनंदापेक्षा दडपणच जास्त असायचं. आधी अर्धा तास बराच धीर एकवटावा लागायचा मला. 
आवरण्याच्या नावाखाली बराच टाईमपास करून, शेवटी गाडी काढली… गेलो घाटाच्या पायथ्यापर्यंत. सप्टेंबर महिना होता तो. हवा जरा ढगाळच होती. घाटात तर काळ्या काळ्या ढगांच्या दांडग्या पिल्लांचा शिवाशिवीचा खेळ रंगला होता.
अर्ध्या रस्त्यात गेल्यावर पावसाची भुरभुर सुरू झाली. काचेवर पडलेल्या पाण्याच्या तुषारांमुळं पुढचं काही दिसेना. मी शेजारी बसलेल्या धाकटीला म्हटलं,
“अगं, काही दिसेना ना मला पुढचं.”
ती म्हणाली, “वायपर चालू कर ना!”
म्हटलं, “मला कुठं माहीत आहे ते कसं चालू करायचं ते!” 
ती म्हणे, “शोध मग.” 
मुली आणि मुलीची ती अमराठी मैत्रीण माझी फजिती बघून हसत सुटल्या. तिची मैत्रीण मराठीचा मर्डर करत म्हणाली,
“धुंडा म्हणजे छपडेल!” 
मी वैतागून मुलीला म्हटलं, “हिला नक्की काय म्हणायचंय?”
मुलगी म्हणाली, “अगं, ‘शोधा म्हणजे सापडेल’, अशा अर्थी म्हणतेय ती!”
ते ऐकून त्या टेन्शनमधेही मला फस्सकन हसायला आलं. मग रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन खटपट सुरू केली… रस्त्यानं जाणार्‍या गाड्या आम्हाला बघून स्लो व्हायच्या. काही आगंतुक समाजसेवक तर गाडी साईडला घेऊन मदतीसाठी लगेच पुढे सरसावायचे. मुली त्यांना जोरदार हातवारे करून पुढं जायला सांगायच्या.
बरीच खटपट केल्यावर ते वायपर चालू झाले… तोपर्यंत पाऊस हूल देऊन पसार झालेला! 
मग गाडी वळवून आम्ही परत निघालो. रस्त्यानं बरीच हॉटेल्स होती. मुलींचं चाललं होतं, ‘अमकं हॉटेल चांगलं, तमकं हॉटेल चांगलं… इथं हे छान मिळतं, तिथं ते छान मिळतं!’
कुठं जायचं त्यावरून त्यांचं गोंधळ घालणं चालू होतं. मी त्यांना मोठ्यानं ओरडून थांबवलं आणि म्हटलं,
“ज्या हॉटेलच्या पार्कींगमधून गाडी काढणं सोपं जाईल, त्या हॉटेल मधे जायचं.”
मग बराच उहापोह केल्यावर ‘पार्कींग’ आणि ‘टेस्ट’ ह्यांचं चांगलं कॉम्बिनेशन असलेलं एक हॉटेल आम्ही निवडलं. मोठ्या झोकात गाडी गेट मधून आत घातली. गाडी हॉटेलच्या आवारात शिरल्याबरोबर वॉचमन सलाम करत पुढं आला. त्याला मी घाईघाईनं सांगितलं,
“रिव्हर्स का प्रॉब्लेम है, अच्छी जगह बताना.”
त्याबरोबर त्यानं एखादी सिरिअस ईमर्जन्सी केस हाताळणार्‍या डॉक्टरसारखा चेहरा केला. आजूबाजूला रिकाम्या जागांचा जायजा घेतला आणि एक सुरक्षित जागा माझ्यासाठी मुकर्रर केली.
मला जमेल तेवढी चांगल्या प्रकारे मी गाडी पार्क केली आणि निघालो… गाडीकडे मागं वळून वळून पहात पहात. तोच वॉचमन ‘मॅडम, मॅडम…’ करत मागं आला…
“वो हेडलाईट चालू हैै ना…” असं म्हटल्यावर मी धावत जाऊन ते बंद करून आले. आता वॉचमनसह आजूबाजूला बसलेले खाद्योपासक माझ्याकडे साशंक नजरेनं पाहू लागले. माझं अवसान दोरी सैल होऊन फुगा सैल पडावा तसं झालं.
गेलो हॉटेलच्या वरच्या मजल्यावर जेवायला. मुलींचं अजूनही वायपर वरून खिदळणं चालूच होतं. मग त्यांनी निवांत चर्चा करून जेवण मागवलं. माझ्या डोक्यात पार्कींग, रिव्हर्स, फजिती… कुठं खाण्यात मन लागतंय!
जेवण झाल्यावर मुलींनी आईस्क्रीमची ऑर्डर दिली. आईस्क्रीम येईपर्यंत मी हॉटेलच्या काचेच्या भिंतीतून पार्कींगकडे नजर टाकली, तर माझ्या गाडीच्या मागंपुढं, आजूबाजूला गाड्याच गाड्या!
शिक्षकांची कसलीतरी वार्षिक मिटींग होती म्हणे. माझे तर पायच सटपटले. मुली म्हणाल्या, “अगं, तो आहे ना वॉचमन! काढायला लावेल तो गाड्या सगळ्यांना. बैस तू. आईस्क्रीम खा.”
मला मनातल्या मनात ते आईस्क्रीम पोरींच्या डोक्यावरच थापावंसं वाटत होतं. माझा टेन्स चेहरा बघून थोरली मला म्हणाली, “कूल मम्मा, मनातल्या भितीवरच तर तुला मात करायचीय… म्हणूनच आपण आज हा प्लॅन केलाय ना! डरके आगे जीत है…!!”
म्हटलं, “कसली डोंबलाची जीत है! गाडीके आगे मोटरसायकल है…!!” पुन्हा सगळ्या जोरजोरात हसत सुटल्या. 
हॉटेल मधून बाहेर पडल्याबरोबर मी तरातरा जाऊन आधी त्या वॉचमनला गाठलं आणि म्हटलं, “तुमको बोल्या था ना, रिव्हर्सका प्राँब्लेम है, आजूबाजूमे गाडी मत लगने देना.”
मी जोरजोरात बोलत असताना बाहेरच्या टेबलांवर बसलेले बरेच कान टवकारले गेले. वॉचमन म्हणाला, “मॅडम आप निकालो गाडी… मै सब गाडीया बाजूमें करता हूँ!”
मी गाडी काढायला सुरूवात केली. माझा जसजसा टर्न बसेल तसतसा तो गाड्या सरकवत होता. मुली पण हातवारे करून त्याला कोणती गाडी काढायची ते हेरून हेरून सांगत होत्या. मघाशी टवकारलेले कान पण आपापल्या गाड्यांच्या काळजीपोटी खाणं सोडून धावत पळत आले आणि वॉचमनला मदत करू लागले.
फक्त एक हँडल लॉक केलेली मोटरसायकल जराशी नडण्याची शक्यता वाटत होती. मग ती मोटरसायकल त्या वॉचमननं जीवाच्या आकांतानं मागून उचलून धरली आणि एखाद्या ट्रकनं फुल्ल टर्न मारावा तसा टर्न मारून मी गाडी गेटच्या बाहेर काढली.
गेटपाशी गेल्यावर मागून  वॉचमन पळत आला आणि म्हणाला, “मॅडम वो रिव्हर्स गिअर का काम करके लेना जल्दी…!!”
त्यानं असं म्हटल्यावर तर गाडीत हास्याचा ठसकाच उठला. तसंच हसता हसता मी गाडी हायवेवर घेतली. तोच मुलीची मैत्रीण, पार्कींगची कामगिरी फत्ते झाल्याच्या आनंदात  आणि माझा उत्साह आणखी वाढवण्यासाठी परत मराठीचा डबल मर्डर करत ओरडली,
“चला काकू, घ्या सदानंदाचा एक घोट.”
धाकटी तातडीनं तिला दुरूस्त करत मला म्हणाली, “सदानंदाचा येळकोट’ म्हणायचंय बहुतेक तिला!”
गाडी शिकण्याच्या आणि नंतर गाडी चालवताना काही विशेष अनुभव मनावर कोरले गेले ते म्हणजे, ‘बाईचं गाडी चालवणं’ हा बर्‍याचदा चेष्टेचा विषय असतो. गाडी चालवण्याकरिता बाईला सहसा कुणीच प्रोत्साहन देत नाही. प्रोत्साहनापेक्षा विश्वासच देत नाही की, तुला नक्की गाडी जमेल.
तरीही एखादी जिद्दीनं शिकलीच, ती कितीही व्यवस्थित गाडी चालवत असली, तरी शेजारी बसलेल्या पुरूषाला, (ह्यात साधारणपणे भाऊ किंवा नवरा असतो) ‘कधी हिची हौस भागते, आणि एकदाचा मी गाडी इच्छीत स्थळी पोहोचवतो’,  असं होऊन जातं.
रस्त्यानं जाणारे पण, बाई गाडी चालवतेय म्हटलं की त्यांचा पुरूषी अहंकार डिवचला गेल्यासारखे वागतात. त्यांच्या चेहेर्‍यावर एकतर खूप सावधगिरीचा भाव येतो किंवा कुत्सितपणाचा भाव येतो.
पुढं चाललेली गाडी, बाई चालवतेय असं लक्षात आलं की मागून खूप हॉर्न देऊन गडबडून सोडणार, खूप भस्सकन ओव्हरटेक करणार, ओव्हरटेक करताना पण काहीतरी काँमेंट पास करणार, शेजारी बसवेल्या पुरूषाला पण मग टेन्शन येणार, ते टेन्शन मग नविनच गाडी चालवणार्‍या बाईकडे तो पास करणार… मग तिनं मागच्या आणि शेजारच्या अशा दोन दोन पुरूषांचे दडपण घेऊन गाडी चालवायची.
हेच जर पुरूष नुकताच गाडी शिकलेला असेल, तर बायको-पोरं, सगळे त्याच्यावर विश्वास टाकून गाडीत चिडीचूप्प बसून रहातात. त्याच्या हातून काय चूका होत नाहीत का? होतातच. पण त्याला कोण जाब विचारणार! उलट ‘तुला काय कळतं?’ असं म्हणून तो बायकोेला गप्प बसवू शकतो.
गाडीला कुठं डेंट जरी आला तरी तो पण माफ असतो. बाईच्या हातून चूक झाली, गाडीला कुठे खरचटलं तरी ती बिचारी परत गाडी हातात घेत नाही. बाईला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आधी तिच्या ‘बाई’पणाशी लढावं लागतं, मग परिस्थितीशी.
म्हणजे तिच्या आखीव परिघाबाहेरची कुठलीही गोष्ट साध्य करायला तिला दुप्पट ताकद लावावी लागते. बाईचं जगणं सोपं नसतं. जसजसं जगणं वेगवान होतंय, बदलती आव्हानं पण तिच्यापुढं त्याच वेगानं येताहेत.

- नीलिमा क्षत्रिय  8149559091
(माझ्या राज्य शासनाच्या विनोदी लेखनासाठीच्या श्रीपाद  कृष्ण कोल्हटकर पुरस्कारानं सन्मानित ‘हॉर्न प्लिज’ ह्या कथासंग्रहातली शिर्षक कथा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...