दोन दिवसांपूर्वीची संध्याकाळ. वापीहून परतणाऱ्या जनता एक्सप्रेसचा डबा. मी सेकंड सीटवर. माझ्या समोर एक, गावाकडचे वाटणारे, बापलेक. ती खिडकीत, बाप तिच्या शेजारी. ती विशीच्या आतबाहेरची, तो माझ्याहून किंचित पिकलेला.
त्यांचं त्यांच्यात्यांच्यात काहितरी चाललेलं. मी पुस्तकात मान खुपसलेला. स्टेशनं सरकतात तशी ट्रेन भरायला लागते. नेमका आमच्या कंपार्टमेंट मधे कॉलेज स्टुडंट्सचा घोळका येउन बसतो. त्यांच्या नेहेमीच्या किंचीत टवाळ गप्पा आणी खेचाखेची सुरू होते. अर्थातच नजरा अधुनमधून त्याच्या लेकीकडे वळत असतात. ऑफेन्सिव्ह नाही, पण सहाजीक म्हणूया. लेक शांत आहे. चार लोकांत वावरलेली मुलगी, या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सहज शिकतेच. ती तशीच वागते आहे. बाप मात्र अस्वस्थ आहे. उगाच. त्याचं पित्रृत्व उफाळतय लेकीचं परपुरषांपासून संरक्षण करण्या करता. तो तिच्याकडे तिरके कटाक्ष टाकतोय. “तिची ओढणी जागेवर आहे ना? ती नीट बसली आहे ना? तीचं त्यांच्याकडे लक्ष नाहीये ना?” तो सतत तपासतोय. तीच्या लक्षात आलय ते. ती सुखावते आहे कुठेतरी, त्याच्या बाप असण्याने. ती त्या तरुणांना फारसं महत्वही देत नाही आणी बापाचं वागणं मनावरही घेत नाही. She handles it well. विरार येईपर्यंत ट्रेन गच्च भरलेली असते. उभं रहायलाही जागा उरत नाही. बाप मनात सुखावलेला असतो. त्याने केलेले संस्कार, त्याने दिलेली शिकवण, ती न विसरता अमलात आणत असते, याचा त्याला अभिमान वाटत असतो.
एकदाचं विरार स्टेशन येतं. गाडी बरीचशी रिकामी होते. आमच्या सोबतचा पोरांचा घोळकाही उतरून जातो. बाप एक निःश्वास टाकतो आणी सैलावतो. मी आणी तो एकमेकांकडे पाहून एक अस्फुट स्मितहास्य करतो. दोन बापांचं अबोल अंडरस्टॅंडिंग, यू नो ! तेव्हाच, रिकाम्या होणाऱ्या पॅसेज मधून वाट काढत, ती येते. फॉरेनर असावी. पाठीवर बॅकपॅक. जीन्स आणी घट्ट बनियान टाईपचा टॉप परिधान केलेली, छान उंची आणी फिगर असलेली, उतू जाणाऱ्या अवयवांची, ‘ती’. An absolute eye delight !!
खोटं का बोला, माझी नजरही क्षणभर जास्तच रेंगाळते तिच्यावर ! ती नेमकी आमच्याच इथे येते, आणी अगदी माझ्या शेजारीच बसते. अगदी त्या बापाच्या समोरच. मुंबईत राहून माझी नजर सरावली आहे या गोष्टींसाठी. पण तो समोरचा बाप, त्याचा जबडा वासून, जवळजवळ हनुवटीला टेकलाय. त्याची नजर तीच्या सताड उघड्या मदन घळीवर, माशाच्या तोंडात अडकलेल्या हुक सारखी, अडकून पडली आहे. मनानी कितीही धडपड केली, तरी नजर काही हलत नाहीये.
चार देशात वावरल्याच्या अनुभवांनी, ती त्या नजरेला सहज नजरेआड करते आहे. पण त्या बापाची लेक….!! ती विलक्षण संकोचली आहे, तिच्या बापाच्या वागण्याने. एका क्षणार्धात, तिच्या बापाचं, एका पुरुषात झालेलं रुपांतरण, तिच्या पचनी पडत नाहीये. हाच माणूस, काही मिनिटांपुर्वी, लेकीच्या रक्षणासाठी सरसावलेला बाप होता, पण आता दुसऱ्या कुणाच्या लेकिकडे, कामुक नजरेनी पहाणार्या परुषात रुपांतरीत होताना, त्याला काहीच कष्ट पडले नव्हते.
लेक अक्षरशः धुमसते आहे, अगदी माझ्या नजरेसमोर ! Ironically, ती लेक त्याबद्दल काहिही, अगदी काहिही करू शकत नाहिये. मी लेकीचा राग समजू शकतो. पण मी त्या लेकीच्या खिजगणतितही नाही. लेक त्या फॉरेनर मुलीला, एक क्षमा मागणारं स्माईल देते. फॉरेनर का असेना, शेवटी तीही एक स्त्री आहे. ती सगळं समजल्या सारखं, त्या हास्याची परतफेड करते. या सगळ्या प्रकारात, मी फक्त एक निरिक्षक आहे.
तरी मला हा अबोल संवाद, माझ्या आणी त्या बापाच्या हास्यसंवादाहून खूप मोठा आणी खोल असल्याचं जाणवतं. शेवटी काही झालं तरी आमचा संवाद, फक्त दोन बापांच्या भुमिकेतून होता. त्या दोघींचा संवाद, समस्त स्त्री जातीचा प्रातिनिधिक आहे. पुरुष आणी स्त्रीजात पुर्ण वेगळ्या विचारांच्या असल्याचं ठसठशीत करणारा !
-अज्ञात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा